‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ हा संगीतमय चित्रपट खूपच गाजला होता. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी : अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
‘नटसम्राट’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट कसा घडत गेला याविषयी ते म्हणाले, ‘पिग्मॅलिअन’ नाटकाच्या कथेने मला नेहमीच आकर्षित केलं आहे. या कथेवर सिनेमा बनवायचा ठरवलं तेव्हा हा सिनेमा ‘पीरियेड चित्रपट’ करावा की तो आजच्या काळातील करावा याबाबत मनात द्विधा मन:स्थिती होती. यासाठी मी हे नाटक अनेकदा वाचून काढलं आणि ऑनलाईन पाहिलं. त्यानंतर मी ही गोष्ट आजच्या काळात मांडायचं ठरवलं. सौंदर्य स्पर्धा, फॅशन वर्ल्ड या पार्श्वभूमीवर एका साधारण मुलीचा कायापालट कसा होतो हे या सिनेमातून प्रेक्षकांना दिसेल.
‘हास्य जत्रा’मधील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही या चित्रपटात फुलराणीची प्रमुख भूमिका करतेय. ही भूमिका तिला कशी मिळाली याची माहिती सांगताना ती म्हणाली, ‘प्रियदर्शिनी ते शेवंता’ बनण्याचा माझा प्रवास अत्यंत आश्चर्यकारकरीत्या अनपेक्षितपणे पूर्ण झाला आहे. खरं तर ‘फुलराणी’सारखा इतका मोठा सिनेमा आणि त्यात टायटल रोल साकारण्याची संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. ‘फुलराणी’साठी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या गाजलेल्या दृश्याचं ऑडीशन द्यायला मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हाही या भूमिकेसाठी माझं सिलेक्शन होईल असं वाटलंच नव्हतं. कारण एक तर माझं याबाबत पाठांतर नव्हतं. बर्याच अभिनेत्रींना हे तोंडपाठ आहे. त्यामुळे पाठ करून सादर करणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. आपण काही ‘फुलराणी’साठी सिलेक्ट होणार नसल्याचं मानून आपल्याला जसं वाटतंय तसं करूया असा विचार केला. आश्चर्य म्हणजे दुसर्याच दिवशी कॉल आला आणि मला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं गेलं. तेव्हाही वाटलं की भेटून घेऊ, पण चित्रपट मिळेल असं वाटलं नव्हतं. भेटल्यावर पहिल्याच मिटिंगनंतर विश्वाससरांनी मला लॉक केलं होतं हे मला नंतर समजलं. त्यामुळे मीच ‘फुलराणी’ बनलेय हे मला स्वप्नवत असल्यासारखं वाटत होतं. खरंच आपली ‘फुलराणी’ म्हणून निवड झालीये आणि आपण सुबोध भावेसारख्या मोठ्या नटासोबत काम करणार आहोत यावर शूट सुरू होईपर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता.
फुलराणी बनण्याचा अनुभव कसा होता? तुझ्या भूमिकेबाबत काय सांगशील, असे विचारता प्रियदर्शनी म्हणते, ‘फुलराणी’ बनणं माझ्यासाठी सुखकारक आणि अनपेक्षित होतं. या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर, पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. ‘फुलराणी’तील त्या फुलवालीनं माझ्या अभिनय विश्वातल्या येण्याचं वर्तुळ पूर्ण केलं’ अशी भावनाही तिने व्यक्त केली. एकूणच प्रियदर्शनीने भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही ‘फुलराणी’ साकारली आहे असे म्हणता येईल.
‘फिनक्राफ्ट मिडिया’, ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.