ऑलिम्पिकमध्ये जिभेचा दांडपट्टा चालविण्याची स्पर्धा असती तर…?
– अशोक परशुराम परब, ठाणे
आधी ऑलिंपिकच विकत घ्यावे लागले असते… कारण मालकांनी छू म्हटल्याशिवाय जिभेचे दांडपट्टे चालत नाहीत…
मुंबईला सारखी ये-जा करण्यापेक्षा दिल्लीश्वर त्यांचे कार्यालय (त्यांच्या लाडक्या मोरांसह) मुंबईलाच का हलवीत नाहीत?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
मुंबईच हलवता येत असेल तर उगाच बिचार्या मोरांना का त्रास देतील ते?
मला बँकेकडून माझ्या एकूण निव्वळ मालमत्तामूल्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज घेऊन बुडवायचं आहे. मला कोणती बँक कर्ज देईल? त्यासाठी कोणाची ओळख द्यावी लागेल?
– जयंत जाधव, खासबाग
बँक नंतर बघू… आधी बँकेत ओळख देण्यासाठी एखादं काळं कुत्रं तरी आपल्याला ओळखतं का, ते शोधा (मी पण मला ओळखणारं कुत्रं शोधतोय).
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ज्यांच्यावरून गदारोळ झाला त्या अदानी यांच्याविषयी मौन बाळगून वर भारतीय जनता माझे कवच आहे, असे उद्गार काढले… म्हणजे भारतीय जनता मूर्ख आहे, असे त्यांना म्हणायचे असेल का?
– साहेबराव फाळके, सिन्नर
जी गोष्ट त्यांनी सिद्ध केलीये त्याबद्दल अजून वेगळं बोलायला ते वेडे आहेत का?
आपल्या मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या मनातलं सरकार आणलं, असं तेच सतत सगळीकडे सांगत असतात… मग त्यांच्या सभांना कुठेच चार टाळकीही का फिरकत नाहीत?
– अप्पा कासुंदे, भायखळा
असुंदे ना कासुंदे.. जी टाळकी सभेला फिरकत नाहीत, त्यांना भीती वाटत असेल की सभेला जाईपर्यंत पार्टी बदलावी लागली तर?? झेंडे आणि उपरण्याचा खर्च कोण करणार, म्हणून घाबरत असतील बिचारे!
व्हॉट्सअपवरच्या माझ्या फॅमिली ग्रूप्सवर, शाळेतल्या मित्रांच्या ग्रूपवर सतत गरळ ओकणारे फेक मेसेज, भंपक फॉरवर्ड येत असतात. ते फेक आहेत, असं सांगितलं की मित्र, नातेवाईक अंगावर धावून येतात. हे ग्रूप सोडताही येत नाहीत. मनस्ताप कमी कसा करायचा? कुछ आयडिया दो, सरजी!
– विराज सावरकर, पाचपाखाडी
असं डोकं फोडण्यापेक्षा मोबाइल फोडा.. तुम्ही पण मोकळे आणि मी पण मोकळा (अशा प्रश्नांपासून)!
दारू पिणार्या माणसाची इच्छा महत्त्वाची की समाजाचं हित महत्त्वाचं, असा प्रश्न डॉ. अभय बंग यांनी विचारला आहे… त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल?
– व्यंकटेश पाटील, सीवुड्स
तुमच्या इच्छेवर गदा येतेय का पाटील? बंग साहेबानी प्रश्न मला विचारलाय का? मला विचारला असेल तर त्यांनाच उत्तर देईन ना मी…
यंदाच्या व्हॅलेंटाइन डेला गायीला मिठी मारली की नाही तुम्ही?
– रेश्मा शिरोडकर, सातारा
तुम्हालाच शोधत होतो ताई… (कोणाला मिठी मारली ते सांगण्यासाठी.)
गाढवाला गुळाची चव काय, असं म्हणतात. पण, मुळात गाढवाला गूळ चाखवणार्याला काय म्हणायचं?
– अप्पा कुंडले, घोटी
अप्पा… म्हणायचं.
नवराबायकोच्या भांडणात बायकोचा शब्द अखेरचा असतो, असा नियम आहे ना? तरी माझा नवरा माझं बोलून झाल्यावर पुन्हा बोलतोच. यावर काय करता येईल?
– सरिता भागवत, पनवेल
नवरा तुमच्याआधी बोलत नाही, असं समजा
किंवा नवरा तुमच्यानंतरच बोलतो असं समजा.
किंवा तो तुमचा नवरा नाही, असं समजा.
( त्याशिवाय नवरोबाला कळणार नाही).
बैल गायीला कशी मिठी मारत असतील, एक जस्ट आपली शंका.
– तात्याराव घोरपडे, फलटण
मी सांगून कळणार नाही… बैलासमोर गायीऐवजी तुम्ही उभे राहा, तात्या.. सगळं कळेल.
आईवडील म्हणतात लग्न कर म्हणून. पण लग्नानंतर बायको कडाकडा भांडेल, म्हणून माझी हिंमत होत नाहीये. तुमचा काय सल्ला असेल?
– श्रीनिवास डोंगरे, बडोदा
माझ्यापेक्षा आईवडिलांना वेगवेगळे गाठून त्यांचा सल्ला घ्या… तरच ते खरा सल्ला देतील.