अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल मेषेत, मंगळ वृषभ राशीत, केतू तुळेत, बुध धनु राशीमध्ये, रवि-प्लूटो मकरेत, शुक्र-शनि-नेपच्युन कुंभेत, गुरू मीन राशीत, चंद्र मिथुन राशीत, त्यानंतर कर्क आणि शेवटी सिंह राशीत, गुरू पापकर्तरी योगात मीन राशीत. दिनविशेष : ५ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा, ९ फेब्रुवारी संकष्ट चतुर्थी.
मेष : राहू शनिच्या पापकर्तरी योगात. गुरू व्यय भावात, त्यामुळे बरे वाईट अनुभव येतील, मन विचलित होऊ न देता त्यांना सामोरे जा. काळजीचे कारण नाही. धार्मिक कार्यात अडचणी येतील. आर्थिक चणचण जाणवेल. कर्ज मिळायला देखील विलंब लागेल. घरात शुभकार्य करण्याचा प्रयत्न अपयशी ठरेल. विद्यार्थी वर्गासाठी उत्तम काळ आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळींना परदेशप्रवासाचे योग आहेत. कोर्टकचेरीत तुमच्या बाजूने निकाल लागेल. घरखर्च वाढेल. चटक-मटक खाणे टाळा.
वृषभ : नोकरी, कुटुंब आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांत चांगले यश मिळेल. अनपेक्षित लाभ होईल. काही मंडळींना कामासाठी विदेशात जावे लागेल, त्यातून चांगले अर्थार्जन होईल. वडीलधार्या मंडळींकडून चांगली मदत होईल. गुरू लाभ भावात आणि पापकर्तरी योगात असल्याने घरात नाराजीचे प्रसंग निर्माण होतील. शनि-मंगळाची संयुक्त दृष्टी सप्तम भावात असल्याने धावपळीचा आणि कष्टाचा काळ आहे. धावपळीच्या तुलनेत मिळणारा मोबदला समाधानकारक नसल्याने नाराज व्हाल.
मिथुन : संभाषणकला शिक्षक, क्लासेसचालक, विक्री प्रतिनिधी यांना चांगला काळ आहे. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. गुरू पापकर्तरी योगात असल्याने नोकरदारांनी काळजी घ्यावी. नव्याने जोडधंदा करताना नियोजन चुकू शकते, थोडे थांबून निर्णय घ्या. संततीच्या बाबतीत चांगली बातमी कानावर पडेल. उच्चशिक्षणासाठी विदेशगमनाची संधी चालून येईल. कला आणि मनोरंजन क्षेत्रात चांगले यश मिळेल, एखादा मान सन्मानही मिळू शकतो.
कर्क : आठवड्याच्या सुरुवातीला खर्च वाढेल, त्यामुळे विशेषकरून तीन ते पाच या तारखांच्या दरम्यान पैसे जपूनच वापरा. व्यवसायात चांगले लाभ होतील. जुनी गुंतवणूक, कमिशनमधून धनलाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. देवदर्शनच्या निमित्ताने भ्रमंती होईल. नवीन नोकरीची संधी चालून येईल. मेहनत का फल मीठा ठरेल. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. लाभातील मंगळ अनपेक्षित लाभ देत राहील. सावध प्रवास करा. ७ आणि ८ या तारखा संस्मरणीय राहतील.
सिंह : रवि मकर राशीत षष्ठम भावात असल्याने नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. आगामी काळात चांगला उत्कर्ष होईल. वरिष्ठांवर सकारात्मक प्रभाव पाडाल. त्यामुळे यश मिळेल. सन्मान मिळवून देणारा काळ आहे. आजूबाजूच्या लोकांचे सहकार्य मिळेल. गुरु अष्टम भावात, पंचम भावावर मंगळाची दृष्टी, त्यामुळे संततीकडून चांगले कार्य घडेल. राजकारणी, सरकारी कर्मचारी यांनी मानसिक संतुलन सांभाळावे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सप्तम भावात शुक्र-शनि आणि नेपच्युन यांच्यामुळे कौटुंबिक सुखात निराशा येऊ शकते.
कन्या : विविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील. गुरू आणि बुध केंद्रयोगात आहेत. सप्तमभावातील गुरूमुळे शुभकार्ये घडतील. विवाहेच्छुकांची लग्ने ठरतील. जमिनीच्या अथवा नवीन घराच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ आहे. कुटुंबात खटके उडू शकतात, वैवाहिक आघाडी सांभाळा. व्यावसायिक भागीदारीत अडचणीचे प्रसंग येतील. पाच ते सात तारखेच्या काळात गुरू-चंद्र नवपंचम योगामुळे अनपेक्षित लाभ होईल. मनासारखे काम नकळत झाल्याने मन आनंदी राहील.
तूळ : शुक्र योगकारक शनि-नेपच्युनसोबत पंचमभावात असल्याने कामात तडजोडीचे प्रसंग येतील. त्यात फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. पैशाच्या देवाणघेवाणीत पारदर्शकता ठेवा. सप्तम भावातील राहू आणि हर्षल योगामुळे पत्नीबरोबर अनावश्यक वाद होतील. शेतीत चांगले लाभ होतील. सामाजिक कार्यकर्ते, लेखक, वार्ताहर, संपादकांसाठी उत्तम काळ आहे. लोकहिताची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : नियोजनपूर्वक काम करा, धावपळ टाळा. अन्यथा आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन दवाखान्याची पायरी चढावी लागेल. शनीचे भ्रमण सुखभावात असल्याने जुन्या अनुभवांमधून चांगला फायदा होईल. व्यवसायात अनपेक्षित लाभ वाढतील. तरी पैशाचे नियोजन व्यवस्थित करा. अन्यथा नुकसान होईल. अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होईल. शेअर बाजारात तोटा झाल्याने त्यापासून दोन हात दूरच राहा.
धनु : मनासारख्या घटना घडणार नाहीत. सुखात आणि आनंदात अडचणी निर्माण करणारा आठवडा आहे. संततीसौख्यातही विक्षेप येईल. संततीच्या शिक्षणात अडचणी येतील, अपेक्षित यश मिळणार नाही. प्रवासात वस्तू सांभाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. संयम ठेवा. आलिया भोगासी असावे सादर असे म्हणून वेळ मारून न्या.
मकर : जवळपासच्या प्रवासात आणि शेजार्यांकडून विलक्षण अनुभव येतील. त्यामुळे मन:स्वास्थ्य बिघडू शकते. व्यसनापासून लांबच राहा. अन्यथा नसते दुखणे मागे लागेल. शुक्र-नेपच्युन धनभावात राहणार असल्याने पैशाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या. ऐनवेळेस प्रवास रद्द होऊ शकतात. फोटोग्राफर मंडळींची चलती होईल, मनासारखी कामे, पैसे मिळतील. अचानक मोठा खर्च उभा राहील. बंधूवर्गाकडून सहकार्य मिळणार नाही.
कुंभ : द्विधा मन:स्थिती निर्माण करणारा काळ आहे. शनि-नेपच्युन आणि शुक्राच्या भ्रमणामुळे अवस्थता वाढेल. नोकरीत संभ्रम होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार महागात पडू शकतो. राजकारणात अपयश येईल. अधिकारावर गदा येईल. कुटुंबात चिंता वाढेल. सुखभावातील मंगळामुळे वडीलधार्यांची काळजी घ्या.
मीन : मनातली गोष्ट जिभेवर आणा, त्याचा काहीतरी सकारात्मक निर्णय होऊ शकतो. मनी दिसणारे स्वप्नात उतरेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे मार्गी लागतील. नोकरदारांना चांगले आर्थिक लाभ होतील. घरातली विवाहाची बोलणी पुढे जातील. आरोग्याची काळजी घ्या. अरबट चरबट खाणे टाळा. वाहन सावधतेने चालवा. नवीन घर घेण्याचा विषय मार्गी लागेल.