□ पंकजा मुंडे यांच्याविरोधात पक्षातल्याच काहीजणांनी कट रचला आहे. : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे.
■ हे माहिती आहे, तर कट करणारे कोण आहेत, तेही माहिती आहेतच. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत कधी दाखवाल?
□ मुंबईच्या सर्व पालिका रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधालयासाठी दिल्लीतील संस्थेला जागा.
■ यात आश्चर्य काय? डबल इंजीनमध्ये मिंधे स्क्रू बसवले आहेत कशाला? मुंबई आणि महाराष्ट्र खिळखिळा करायलाच ना!
□ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपटाच्या लिंक्स हटवण्याचे यूट्यूब, ट्विटरला आदेश.
■ आणीबाणीविरोधात लढलेल्या यांच्या ज्येष्ठ नेत्यांना किती शरम वाटत असेल आपल्या पक्षाची ही हुकूमशाही पाहून.
□ रेमेडिसिविर खरेदी प्रकरणात लोकायुक्तांकडून मुंबई महानगरपालिकेला क्लीन चिट.
■ आता तरी सोमय्याला कोणीतरी चाळणीत पाणी नेऊन द्या.
□ पंतप्रधानांनी लोकार्पण केलेली गंगाविलास क्रूझ ही शाही बोट पहिल्याच फेरीत बिहारमध्ये गाळात अडकली.
■ गंगेच्या स्वच्छतेच्या नावाखाली पैसे किती खर्च झाले त्याचा हिशोब विचारा… तेही गाळात गेले आणि गाळातच जात राहणार…
□ विमान, गुरुत्वाकर्षण वगैरे शोध जगाला लागण्याच्या हजारो वर्षांपूर्वीच ते शोध आपल्याकडे लागले होते : मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान.
■ कोणीतरी एक नोबेल पारितोषिक आणून घाला मामांच्या गळ्यात! इतक्या प्रगत देशात अजूनही शिवराज मामांसारखे नेते मुख्यमंत्रीपदावर पोहोचतात, हा मात्र दैवदुर्विलास आहे.
□ डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम सिंग पॅरोलवर बाहेर.
■ निवडणूक आली असणार एखादी जवळ. एरवीही हा बाबा तुरुंगात असतो कधी?
□ चंद्रावर प्रथम पाऊल ठेवणार्या चमूतील चांद्रवीर बझ ऑल्ड्रिन वयाच्या ९३व्या वर्षी ६३ वर्षीय महिलेबरोबर विवाहबद्ध.
■ आता हनी‘मून’ चंद्रावरच करा आणि लवकरच गोड बातमीही येऊ दे…
□ शरद पवार गोड व्यक्तिमत्त्व : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
■ ‘तू मुंगळा, मुंगळा’ हे हेलनचे बेफाट गाणे का कोण जाणे आठवले…
□ संजय राऊत यांनी ठाकरे गटाची शिवसेना संपुष्टात आणण्याची सुपारी घेतली आहे : संजय शिरसाट.
■ मग तुमच्यासाठी बरंच आहे की! तुम्हाला हेच हवं आहे ना? तुम्ही शिवसेना वाढवायला गेलात काय गद्दारी करून?
□ भूक लागू न देणारी कॅप्सूल लवकरच बाजारात येणार.
■ देशातल्या गोरगरीबांमध्ये त्या रेशनवर वाटा, आता त्यांना तेवढाच एक आधार राहिला आहे.
□ दावोसमध्ये सगळा झोलझाल : महाराष्ट्रातल्याच कंपन्यांबरोबर कराराचा देखावा, तीन कोटी भांडवल असलेल्या कंपनीबरोबर २० हजार कोटींचा करार.
■ सगळ्यांना माहिती आहे की हे औटघटकेचं बेकायदा सरकार. यांच्याबरोबर गांभीर्याने करार कोण करणार?
□ वेणुगोपाल धूत यांची अटक बेकायदा, सीबीआय पुन्हा तोंडघशी.
■ अजून न्यायपालिकेवर कब्जा झालेला नाही, म्हणून तिथून तरी न्याय होतोय… एकदा तिथे हुकूमशाहीची ही कीड शिरली की हे दिलासे मिळणंही बंद होईल.
□ १२ हजार कर्मचार्यांना गुगलचा नारळ, स्विगीनेही ३८० कर्मचार्यांची रोजीरोटी हिरावून घेतली.
■ या अव्वाच्या सव्वा फुगवलेल्या कंपन्यांच्या सीईओंचे शेकडो कोटींचे पगार थोडे कापले तरी हे कर्मचारी जगू शकतात, पण यांच्या शब्दकोशात कणव हा शब्द गुगल करूनही सापडणार नाही!
□ पंतप्रधान मोदींच्या विकासकामांचा डंका देशात नव्हे, जगात वाजतोय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ काय सांगता? तरी सगळ्या प्रगतीच्या निर्देशांकांमध्ये देशाची घसरण सुरू आहे, इंधन दर उच्चांकाला पोहोचले आहेत, बेरोजगारी-महागाई वाढलेली आहे, ती कोणामुळे? जगाला मिंध्यांच्या गळ्यातला पट्टा पण दिसतोय.