अगदी शाळेत नसेल पण कॉलेजात असतानापासून माझं आडनाव ऐकल्यावर हमखास येणारा प्रश्न असे, ते अशोक नायगांवकर तुझे कोण. माझा (माझे नव्हे हं) सख्खा काका म्हटल्यावर समोरच्यांच्या तोंडावर हसू उमटतं. ‘वा वा, काका म्हणजे काय, बेष्टच.’
शाळेत असताना तो कवी म्हणून किती मोठा आहे हे अर्थात मला कळलेलं नव्हतं, पण मी तिसरीत असताना काव्यगायनाच्या स्पर्धेत त्याची ही कविता गायली होती आणि बक्षीस मिळवलं होतं. तेव्हा ही कविता शाळेतल्या शिक्षकांना माहीत नव्हती. बक्षीस घ्यायला गेले तेव्हा कोणीतरी विचारलं, कोणाची गं कविता. तेव्हा, माझ्या काकाची, हे उत्तर देताना काय भारी वाटलं होतं ते आजही आठवतंय.
मोजलेस का आकाशांतले तारे किती सांग
आभाळ भरून येते तेव्हा धावतेस छान
एक लिंब दोन लिंबं पारावर चढली
गळामिठी एकामेका उगीउगी रडली
सुटीत सुनी वाटणारी ओकीबोकी शाळा
पायी घुंगुर बांध वाजे छुमछुम वाळा
असा कसा काळा काळा अंधार झाला
अक्षरांचा सूर्य बाई मावळून गेलं
तेव्हा काका आमच्याच घरी बोरिवलीला राहायचा, त्याचं लग्न व्हायचं होतं, तो बँक ऑफ बरोडामध्ये नोकरी करायचा, सँडहर्स्ट रोडच्या शाखेत होता. मी अनेकदा त्याच्याबरोबर बँकेत गेले आहे. मी गेले की तिथे मला अनेक कॅडबर्या मिळत. मला तो लाडाने बनी म्हणायचा, आणि बनी हा शब्द घेऊन कित्येक एकोळ्या, दोनोळ्या त्याने लिहिल्या असतील.
बनीच्या बाईंना अजून सुटले नाही गणित ही ओळ तो मला निव्वळ चिडवायला म्हणत असे.
मी आमच्या कुटुंबातली माझ्या पिढीतली पहिली मुलगी, मोठ्या काकांना दोन्ही मुलगे. त्यामुळे माझं अंमळ जास्तच कौतुक झालं, आणि अशोककाकाने माझे खूप लाड केले. त्याच्या बरोबर महाराष्ट्रात मी इतकी फिरलेय की आता आठवूनही नवल वाटतं. त्याच्या मित्रांच्या लग्नांना वगैरे तो मला सोबत घेऊन जाई.
लग्नानंतर तो चेंबूरला राहायला गेला आणि रोजची भेट थांबली. पण त्याचा माझ्या बाबांना रोजचा फोन असे. कवितेच्या दोन ओळी जरी लिहिल्या तरी बाबांनाच त्या सगळ्यात आधी ऐकवायच्या हा त्याचा नेम, बाबा जाईपर्यंत कायम होता.
कॉलेजात गेल्यानंतर मराठी साहित्य हा नेमका काय प्रकार आहे ते थोडं थोडं लक्षात यायला लागलं आणि काकाचं वेगळेपण कळू लागलं. तो मंचीय कवी म्हणून महाराष्ट्राला माहीत झाला असला तरी त्याच्या कवितेतला सामाजिक आशय लपून राहण्यातला नाही. त्याच्या कित्येक कविता, वा त्यातल्या ओळी संदर्भासारख्या देता येतात अनेक घटनांनंतर.
तो बोरिवली पूर्वेला राहणार्या बाबुराव कुलकर्णी यांच्याकडे सतार शिकत असे अनेक वर्षं. बाबुरावांना दादा म्हणत, आम्ही त्यांना सतारदादा म्हणत असू. दादा हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होतं. काकासाठी ते अनेक अर्थांनी गुरू होते. सतार, अध्यात्म हे दोन मुख्य विषय. पण दादांचीही विनोदबुद्धी जबरदस्त होती, आम्ही कधी गेलो की आपल्या आजोबांच्या वयाच्या माणसाशी बोलतोय असं वाटतच नसे.
मंचीय कविता सादर करायला लागल्यावर काका काही विशिष्ट प्रकारच्या कविता अधिक वाचू लागला. मग महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाने तर त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोचवलं. राज्यातला एकही तालुका नसेल जिथे त्याचा कार्यक्रम झालेला नाही. त्याच्या विशिष्ट मिशांमुळे तो कुठेही सहज ओळखूही येतो, आणि अनेकदा विमानतळावर वगैरे त्याला लोक ओळख दाखवल्याचे किस्से अनेकांनी वाचले असतीलच. पण त्याचा मूळ गाभा जमिनीशी नातं जोडणारा आहे, मुळांना घट्ट धरून ठेवणारा आहे, पण त्याने इतरांना कायम उडायला, पंख पसरायला प्रोत्साहनच दिलं आहे. त्याच्या दोघी मुली खूप शिकलेल्या, वेगवेगळ्या कलांमध्ये माहीर आहेत. आता दोघी परदेशात स्थायिक आहेत, त्यांच्याबरोबर काकाकाकूंनी कितीतरी देशांची भ्रमंती केली आहे.
आमची काकू शाळेची प्राचार्य म्हणून निवृत्त झाली. ती कडक शिस्तीची, शोभा टीचर आल्या म्हटल्यावर वर्ग चिडीचूप होणार अशी तिची ख्याती. आम्हालाही तिचा दरारा जाणवतोच. काकासारख्या वल्लीबरोबर संसार करण्याचं अग्निदिव्य तीच करू जाणे. कारण हा डाळ आणायला म्हणून बाहेर जाणार, आणि वाटेत कोणी भेटलं तर त्याच्याशी तीनेक तास गप्पा मारून टोमॅटो घेऊन घरी येणार. त्या दोघांची जुगलबंदी धमाल असते, त्यात विखाराचा, कडवेपणाचा अंशही नसतो.
स्वयंपाक हा त्याचा आणखी एक गुण. माझ्या आईला पोळ्या करायला त्याने अनेकदा हातभार लावला आहे. आंब्याचा रस काढावा तर त्याने, आणि दिवाळीतला चिवडा करावा, चकल्यांचे घाणे तळावे, तेही त्यानेच. सोबत जो फोटो आहे तो सातार्याजवळच्या एका छोट्याशा भेळेच्या दुकानातला. त्याच्या नातवाच्या मुंजीहून आम्ही मुंबईकडे येत असताना त्याच्या मोठ्या मुलीने नुसतं म्हटलं, ‘बाबा, भेळ हवी यार.’ मग दुकान शोधलं, बस थांबवली आणि हा थेट कांदा चिरायलाच तिथे भटारखान्यात घुसला. भेळेची चव अजून तोंडावर रेंगाळते आहे हे सांगायला नकोच.
काकाने पंचाहत्तरी गाठली यावर खरंतर विश्वास बसत नाही. अजून तो पूर्वीसारखाच ताठ आहे, केसही फारसे पांढरे झालेले नाहीत, त्याचे कार्यक्रम, प्रवास अजून बर्यापेकी पूर्वीसारखाच सुरू आहेत. त्याचं अक्षर अतिशय देखणं आहे. डाव्या हाताने तो झरझर लिहू लागला की पाहात बसावंसं वाटतं. आजही ते तितकंच देखणं आहे.
काकाला शुभेच्छा आहेतच अगदी मनापासून. त्याची तब्येत उत्तम राहावी आणि त्याने लिहितं राहावं. आम्हा नायगांवकर मुलाबाळांवर आशीर्वाद कायम राहावेत, हीच इच्छा.