□ ठाण्यात शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष आमने सामने; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल.
■ महाशक्ती का प्यार देखा, अब दुश्मनी देख लो!
□ चीन प्रकरणात लष्करामागे अपयश दडवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न, लष्कराचा राजकीय वापर : राहुल गांधी यांचा आरोप.
■ या वरवंट्यातून लष्कर सुटेल, अशी कल्पना असणारे नंदनवनातच राहात आहेत, त्यांना जागे करण्याचे प्रयत्न फोल आहेत राहुलजी!
□ विरोधकांना बोलू न देता, गोंधळ घालून विधेयके मंजूर करून घेण्याचा घातक पायंडा केंद्र सरकार घालते आहे, विरोधकांनी याचा एकत्र बसून विचार करावा : शरद पवार.
■ त्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि त्यांची विचारधारा हे देशाच्या एकात्मतेला खिळखिळे करणारे राष्ट्रीय संकट आहे, हे कळायला हवे ना सर्वांना.
□ बिहारमधील विषारी दारूच्या प्रकरणातील आरोपीस अटक.
■ अरेच्चा, नीतीशबाबूंनी दारू पिऊन मेले म्हणून नुकसानभरपाई द्यायला नकार दिला होता बळींच्या नातेवाईकांना, मग आरोपीला अटक तरी कशाला करायची? गुन्हाच काय त्याचा?
□ शंभूराज देसाई कर्नाटकला जाणार होते, आता त्यांच्या तोंडाला कुलूप का लागले आहे, शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा सवाल; भास्कर जाधव यांना महत्त्व देत नाही : देसाई यांचे उत्तर.
■ त्यांना देऊ नका हो महत्त्व? पण तुमच्या दौर्याचं काय झालं, तुमच्या तोंडाला का बसलं कुलूप ते जनतेला तरी सांगाल… की त्यांनाही महत्त्व देत नाही?
□ २०२२ सालात काश्मीर खोर्यात १७२ दहशतवाद्यांचा खात्मा.
■ नोटबंदीने ना दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, ना कलम ३७० रद्द केल्यावर काश्मीर शांत झाले; तरी तिथली परिस्थिती सुधारते आहे, असं केंद्रीय गृहखातं कशाच्या आधारावर रेटून सांगतं? निर्मलाअक्कांची शिकवणी लावली की काय?
□ राज्यातील वनांमध्ये वाघ चौपटीने वाढले, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडची वाघांची मागणी : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.
■ तिकडे वनांमध्ये वाघ वाढले आणि इकडे जनांमध्ये वाघाची कातडी पांघरून फिरणारे काही रेडे उघडकीला आले- त्यांना आसामातून मागणी आहे म्हणतात फार!
□ महाराष्ट्रातून पळवले जाणारे उद्योग, सत्ताधार्यांकडून महापुरुषांचा अवमान, भ्रष्टांना संरक्षण यामुळे जनता संतप्त आहे, याची किंमत सरकारचा चुकवावी लागेल : अजित पवार यांचा असूड.
■ जनतेला धर्माची अफू पाजली की ती सगळं विसरते, या समजुतीवरच हा सगळा निर्ढावलेला खेळ सुरू आहे यांचा, दादा. किंमत महाराष्ट्राला म्हणजे जनतेलाच चुकवावी लागेल. राजकारण्यांचे कुठे काय जाते?
□ मुंबईत पोलिसाने पोलिसालाच गंडा घातला, साडे सहा लाखांना ठकवला…
■ अरे, एक सलूनवाला दुसर्या सलूनवाल्याच्या दाढीचे पैसे घेत नाही, एक पाकिटमार दुसर्याचं पाकीट मारत नाही, बेईमानीचे धंदे पण ईमानदारीनेच चालतात, काहीतरी शिका त्यांच्याकडून!
□ लहानपणी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ महाराष्ट्रातले सरडेही थक्क होऊन रंग बदलायचे थांबले आहेत म्हणे सध्या यांच्याकडे पाहून.
□ भ्रष्टाचारामुळे तुरुंगात गेलेल्या अनिल देशमुख यांच्या जामीन मुक्तीचा जल्लोष करून राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राची मान खाली घातली : भाजपची टीका.
■ बिनबुडाचे, बेलगाम आरोप करून, ऐकीव माहितीवर त्यांना आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना तुरुंगात डांबणार्या भाजपच्या दारातील कुत्रे बनलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी मात्र देशाचा गौरव जगात वाढवला आहे, नाही का?
□ कुठूनही कुठेही मतदान करण्याची सुविधा देणारे दूरस्थ ईव्हीएम विकसित केल्याचा निवडणूक आयोगाचा दावा.
■ इथे आहेत त्या स्थायी ईव्हीएमबद्दल लोकांना शंका आहेत, अशात दूरस्थ ईव्हीएम वगैरेंचा शोध लावण्यापेक्षा ट्विटरवर आणि व्हॉट्सअपवर मतदान करण्याची सोय करून टाका… आयटी सेल आणि बनावट खात्यांमध्ये सत्ताधार्यांनी केलेली गुंतवणूक तरी कामाला येईल!
□ राज्यात भ्रष्टाचाराचे आरोप फक्त शिंदे गटाच्याच मंत्र्यांवर का होत आहेत, त्यांचीच भ्रष्टाचाराची प्रकरणे का बाहेर येत आहेत? : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल.
■ शिंदे गटाच्या ‘मागे’ असलेली महाशक्ती हे वॉशिंग मशीन आहे ना, खुद्द वॉशिंग मशीन कधी अस्वच्छ असते का!