महान व्यंगचित्रकार, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी ६० वर्षांपूर्वी एका व्यंगचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून मरगळलेल्या मराठी मनांमध्ये ऊर्जा भरली, अंगार फुलवला आणि तो चेतवून मराठी माणसाच्या हितासाठी लढणारी संघटना उभी केली. तिच्यातून पक्ष उभा राहिला. फक्त कुंचला आणि लेखणी यांच्या बळावर जग बदलण्याचा चमत्कार त्यांनी करून दाखवला. त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘मार्मिक’चा हीरक महोत्सव विशेषांक छापील स्वरूपात नुकताच प्रकाशित झाला आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी ‘मार्मिक’च्या या वेबसाइटचे लोकार्पण बाळासाहेबांचे नातू, युवासेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होत आहे, ही ‘मार्मिक’ परिवारासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. व्यंगचित्रकार आणि पत्रकार बाळासाहेबांचा हा सणसणीत आणि खणखणीत वारसा या वेबसाइटच्या माध्यमातून सातासमुद्रापार झेपावणार आहे आणि एका क्लिकसरशी तो वाचकांसमोरच्या लॅपटाॅपपासून मोबाइलपर्यंत कोणत्याही स्क्रीनवर अवतीर्ण होणार आहे.
कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, सत्तेच्या डोळ्याला डोळा भिडवून जळजळीत सत्य परखडपणे सांगण्याची हिंमत आणि मराठी माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कोणाशीही दोन हात करण्याची तयारी हे ‘मार्मिक’चं ब्रीद आहे. त्यासाठी बाळासाहेबांनी कुंचला आणि लेखणी ही शस्त्रं वापरली आणि रक्ताचा थेंबही न वाया घालवता मराठीविरोधकांचे कोथळे काढले. नव्या स्वरूपातल्या ‘मार्मिक’मध्येही हीच शस्त्रे मराठी माणसाच्या हितासाठी वापरली जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर डिजिटल माध्यमातून मार्मिक आता जगभरातील मराठीजनांचा आवाज ठरेल.
महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र संस्कृती डिजिटल स्वरूपातील मार्मिकच्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांच्या मनांमध्ये रुंजी घालेल.
शिवाय डिजिटल मार्मिकमध्ये अनेक नवनवीन सदरांचा खजिना असणार आहे. ताज्या घडामोडी, विविध विषयांवर वैचारिक किंवा खुसखुशीत खुमासदार भाष्य यांच्यापासून ते क्रीडा आणि मनोरंजनापर्यंत वेगवेगळे विषय ‘मार्मिक’च्या वेबसाइटवर रोजच्या रोज वाचायला मिळतील.
‘व्यंगचित्र साप्ताहिक’ ही ‘मार्मिक’ची अनोखी ओळख वेबसाइटवरही जपली जाणार आहे. इथेही व्यंगचित्रांना मानाचे स्थान मिळणार आहे. शिवाय, व्यंगचित्रांच्या आणि बाळासाहेबांच्या चाहत्यांना त्यांच्या कुंचल्याचे अजरामर ‘फटकारे’ही इथे संग्रहित स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या रोचक कहाण्या वाचायला मिळणार आहेत. दृक् श्राव्य माध्यमांमध्येही ‘मार्मिक’ची दणदणीत उतारी लवकरच होईल.
या प्रेरणादायी आणि ऊर्जादायी आनंदसोहळ्याचा प्रारंभ आजच्या आघाडीच्या व्यंगचित्रकारांनी बाळासाहेबांना दिलेल्या मानवंदनेतून आणि ‘मार्मिक’च्या हीरकमहोत्सवानिमित्त मान्यवरांनी लिहिलेल्या विशेष लेखांमधून होतो आहे. दिवाळीच्या काळात वाचकांसमोर येणारा हा कुरकुरीत, खुसखुशीत आणि झणझणीत फराळ त्यांना आवडेल आणि ‘मार्मिक’बरोबरचे जिव्हाळ्याचे जुनेच नाते आता नव्या युगातल्या नव्या स्वरूपाबरोबरही तेवढेच घट्ट प्रस्थापित होईल, याची खात्री आहे.