थिएटरातला मोठा पडदा घराघरात आला आणि मग अगदी हातात-खिशात आला आणि या सोहळ्याचं रूपडंच बदललं. ओटीटी अर्थात ओव्हर-द-टॉपमुळे मनोरंजन क्षेत्र पूर्णपणे बदलून गेलं. त्याचं आर्थिक गणित, नफा-तोटा या सगळ्यावर विपुल प्रमाणात सखोल संशोधन आणि लेखनही झालेलं आहे. या त्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत. पण पडद्यासमोर बसलेल्या प्रेक्षकासाठी हा बदल नेमका कसा आहे हे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. या बदलाचे अनेक पैलू आणि कंगोरे आहेत. त्या पैलूंना हात घालण्याआधी या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा समजून घेतला पाहिजे.
– – –
पडदा वर जाणं हा वाक्यप्रयोग आला तो नाट्यगृहांमधून. तिसरी घंटा झाली की पडदा वर जायचा आणि मग रंगमंचावर एक वेगळीच सृष्टी अवतरायची. चलचित्रांचा जमाना आला आणि ‘७०एमएम’ हा परवलीचा शब्द बनला. दोन-अंकी, तीन-अंकी नाटकांची जागा झपाट्याने तीन तासांच्या हलत्या चित्रांनी घेतली आणि मोठा पडदा जादू करून गेला. सिंगल स्क्रीनचा मल्टिस्क्रीनही झाला. पण तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने प्रगत होत गेलं की हा मोठा पडदा आक्रसत गेला आणि आता तो अगदी प्रत्येकाच्या खिशात शिरला. जगाचा विचार केला तर पडद्याचे स्थित्यंतर इतर ठिकाणी स्वतःचा वेळ घेत, काही काळ स्थिर होत झालं. पण भारतात मात्र मोठा पडदा-थिएटर, छोटा पडदा-टीव्ही आणि लघु पडदा-मोबाइल हा बदल जरा वेगानेच झालाय. आणि म्हणूनच टीटी (थिएटर, टीव्ही) ते ओटीटी हा पडद्याचा प्रवास प्रेक्षकांच्या नजरेतून बघणंही तितकंच मनोरंजक आहे.
पुलंच्या ‘असा मी असामी’मध्ये एक प्रसंग आहे. धोंडो जोशांचं कुटुंब नाटक बघायला जातं. नाटक बघायला जाणं हे कसं दिव्य आहे आणि तो सोहळा संपन्न करताना त्यांच्या नाकी नऊ कसे येतात हे सगळं पुलंनी त्यांच्या शैलीत चितारलेलं आहे. मुद्दा पुलंच्या शैलीचा नाही (त्या मुद्द्याला हात घालण्याचं धाडस लेखक करणार नाही). सांगायची गोष्ट अशी की नाटक बघायला जाणं हा अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत एक सोहळा होता. जी गोष्ट नाटकाची तीच सिनेमाची. अगदी या दशकाच्या सुरूवातीपर्यंत सिनेमा बघायला थिएटरमध्ये जायचं, याची पूर्वतयारी काही दिवस आधीपासून व्हायची. वर्तमानपत्रात जाहिरात बघून आधी थिएटर ठरायचं. मग त्यातल्या त्यात जवळचं थिएटर गाठायचं. तिथे जाऊन तिकिट-खिडकीवर आपल्याला हव्या त्या तारखेचं इष्ट वेळेचं तिकिट काढायचं. आणि मग त्या दिवशी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचा. त्या तारखेचं, त्या वेळेचं तिकिट नाही मिळालं तर दुसरी तारीख-वेळ याचा बॅकअप प्लान तयार असायचा. हाऊसफुल्ल असेल तर ब्लॅकमधून तिकिटं खरेदी केली जायची. ज्या दिवशी सिनेमा पाहायचा तो दिवस म्हणजे एखाद्या सणासारखा असायचा. तयार होऊन थिएटरात जायचं, इंटर्व्हलमध्ये समोसे-वडे-कोल्ड्रिंक-चहा वगैरेचं सेवन करायचं. तेसुद्धा खिशाला परवडणार असेल तर. अन्यथा घरून सँडविच किंवा बाहेरून तत्सम पदार्थ नेले जायचे. कालांतराने त्यावरही बंदी आली तो भाग निराळा. सिनेमा संपल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण आणि मग ते सगळं आटपून घरी. जवळजवळ अर्ध्या दिवसाचा असा तो सोहळा असायचा.
कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघणं यासाठी वेगळ्या बजेटचीही तरतूद असायची. लेक्चर बंक करून ‘सिनेमा टाकणं’ हे अॅडव्हेंचर होतं. सिंगलस्क्रीनचा मल्टिस्क्रीन झाला आणि बजेटसुद्धा वाढलं. बदलत्या काळानुसार थिएटरातल्या खुर्च्यांबरोबरच तिकिटांचा कागदही बदलला. सिनेमागृह झकपक झाली. मागच्या पिढीतल्या रसिकांसाठी मंदिरांप्रमाणे असणार्या मेट्रो-मिनर्व्हा-रिगल-इरॉस यांनीही कात टाकली. काही काळाच्या ओघात बंद पडली. पण मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्याचा सांस्कृतिक सोहळा थोड्याफार बदलाने साजरा केला जात होता.
हे इतकं स्मरणरंजन करण्याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात झालेले अमूलाग्र बदल. मुळात हा लेखनप्रपंच काही स्मरणरंजनाला गोंजारण्यासाठी करण्यात आलेला नाही. थिएटरातला मोठा पडदा घराघरात आला आणि मग अगदी हातात-खिशात आला आणि या सोहळ्याचं रूपडंच बदललं. ओटीटी अर्थात ओव्हर-द-टॉपमुळे मनोरंजन क्षेत्र पूर्णपणे बदलून गेलं. त्याचं आर्थिक गणित, नफा-तोटा या सगळ्यावर विपुल प्रमाणात सखोल संशोधन आणि लेखनही झालेलं आहे. या त्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत. पण पडद्यासमोर बसलेल्या प्रेक्षकासाठी हा बदल नेमका कसा आहे हे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. या बदलाचे अनेक पैलू आणि कंगोरे आहेत. त्या पैलूंना हात घालण्याआधी या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा समजून घेतला पाहिजे.
मोठा पडदा आक्रसला आणि त्याचा इडियट बॉक्स झाला. मोठ्या पडद्याची जादू काही ओसरलेली नव्हती. पण टेलीव्हिजन संचामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी एक नवीन दार उघडलं. अमेरिकेत साधारण साठ-सत्तरच्या दशकात टेलीव्हिजन घराघरात पोहोचला. आणि त्याने हळूच बेडरूममध्ये शिरकाव केला. त्यामुळे टेलिव्हिजन हे काहीसं खाजगी किंवा वैयक्तिक उपकरण किंवा डिव्हाइस बनू लागलं होतं. भारतात टेलीव्हिजन आला ऐंशीच्या दशकात. सुरूवातीला चाळीत कुणा एकाकडे किंवा गावात एक-दोन जणांकडे असा टीव्ही दिसायचा. त्यामुळे हा इडियट बॉक्स खाजगी जरी असला तरी त्याला आपल्याकडे सार्वजनिक रूपच मिळालं. निदान सुरूवातीच्या काही वर्षांत तरी चित्र तसंच होतं.
घराघरांत टीव्ही पोहोचला तो मागल्या शतकाच्या शेवटाला. पण तरीही तो बाहेरच्या खोलीत किंवा दिवाणखान्यातच असायचा. आणि त्यामुळेच टीव्हीसुद्धा सहकुटुंब सहपरिवारच पाहिला जायचा. साहजिकच टीव्हीवरचे कार्यक्रमही कौटुंबिक, पौराणिक, धार्मिक, शैक्षणिकच राहिले. आठवड्यातल्या एखाद्या वारी रात्री किंवा दुपारी सिनेमा लागायचा. बाकी इतरवेळी मात्र कार्यक्रम किंवा बातम्या. पण या टीव्हीने एक नवीन संकल्पना जन्माला घातली. आणि ती म्हणजे प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रेक्षकवर्ग तयार होऊ लागला. संकल्पना नवीन नसेलही कदाचित पण अमूक एका प्रेक्षकवर्गासाठी म्हणून खास कार्यक्रमही मग तयार होऊ लागले. नाटक, सिनेमा यांच्या जोडीला नवीन अपत्य जन्माला आलं होतं- टीव्ही मालिका. एका विशिष्ट प्रेक्षकवर्गासाठी म्हणून कार्यक्रम तयार होत असतानाच त्याला साजेशा जाहिरातीही तयार होऊ लागल्या. प्रेक्षकवर्गासाठी तयार होणारा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला मिळणारे प्रायोजक आणि त्यांची उत्पादनं असं एक आर्थिक गणित तयार होऊ लागलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त प्रेक्षक असणारा हा वर्ग आता युजर, कन्झ्युमर म्हणजेच वापरकर्ता आणि ग्राहक बनला होता. जागतिकीकरण आणि बाजारपेठ खुली झाल्याने भारतीय प्रेक्षक वेगाने ग्राहक बनू लागला.
हे स्थित्यंतर होत असताना आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे सादरकर्ते (कंटेंट क्रिएटर) आणि वापरकर्ते यांच्यातला संवाद. सिनेमा बनून प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर प्रेक्षकांची त्यावरची प्रतिक्रिया ही फक्त तिकीट विक्रीच्या गल्ल्यातूनच कळायची. फार क्वचित कुणीतरी वर्तमानपत्रात पत्र किंवा लेख लिहिला तर त्यातून प्रेक्षक व्यक्त होत असत. पण ही प्रतिक्रिया सादरकर्त्यापर्यंत पोहोचण्याचं प्रमाण फारच कमी होतं. टीव्ही आल्यानंतर मालिकेतल्या प्रसंगांवरच्या प्रतिक्रिया सादरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याला वेग आला. टीआरपी हा प्रकार सोबतीला होताच. त्यातून मालिकेचं यश मोजलं जायचंच. पण तरीही प्रेक्षकांची आवड-निवड ही काही प्रमाणात का होईना पण वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा थेट चॅनेलला पाठवलेल्या पत्रातूनतरी सादरकर्त्यापर्यंत पोहोचू लागली. पुढे कम्प्युटर आणि इंटरनेट आल्यानंतर थेट इमेलही जाऊ लागले.
एकीकडे भारतात टीव्ही मालिका जोर धरत होत्या. पण त्याचवेळी जागतिक व्यासपीठावरही चांगल्या टीव्ही सीरीज बनत होत्या. जागतिक सिनेमे तर भारतात आधीपासून रिलीज होत होते. पण त्याला ‘जागतिक’ म्हणण्यापेक्षा पाश्चिमात्य आणि हॉलिवूडचे सिनेमे म्हणणंच योग्य ठरेल. प्रामुख्याने जेम्स बॉंडचे सिनेमे आणि त्या आधी ग्रेगरी पेग, कर्क डग्लस, ग्रेटा गार्बो वगैरे प्रभृतींनी तत्कालीन तरूणांवर गारूड घातलं होतं. पण इंग्रजी सोडल्यास इतर सिनेमांच्या बाबतीत भारतीय प्रेक्षक अनभिज्ञच होता. कालांतराने सिनेमा महोत्सव सुरू झाले आणि त्यात कधीमधी इराणी, फ्रेंच, स्पॅनिश वगैरे इतर भाषिक सिनेमे दिसू लागले. किंवा एखाद्या सिनेमाने ऑस्कर जिंकलं तर तो सिनेमा कालांतराने भारतात दिसायचा. अर्थात हे परदेशी सिनेमे पाहणार्यांची संख्या फारच कमी होती. सोबतीला गाण्यांचे अल्बम्स होतेच. त्यातूनही परदेशी कलाकारांशी भारतीय प्रेक्षकांची ओळख झालेली होती.
जागतिकीकरणामुळे आणि माहिती तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मोठ्या संख्येने भारतीय तरूण परदेशात जाऊ लागले. तिथे गेल्यानंतर तिथल्या टीव्ही सीरीजशी जवळून संबंध यायला लागला. त्याच सुमारास खाजगी चॅनेल्स भारतात दिसू लागल्याने त्यावर काही परदेशी मालिकाही झळकू लागल्या. त्यामुळे या अशा परदेशी मालिकांचा एक वर्ग तयार होऊ लागला. यातली वर्गवारी आणि वर्गभेद यापेक्षा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरच्या घरी परदेशी मालिका आणि सिनेमे दिसू लागले होते. कालांतराने खास परदेशी सिनेमे आणि सिरीज दिसणारे चॅनेल्सही दाखल झाले. त्यातूनच सुरू झालं ते म्हणजे रिमोट-वॉर- तसा काही हा प्रकार गांभिर्याने घेण्यासारखा नाही. पण त्यामागेच खरं तर दडला होता भविष्यातल्या ओटीटीचा गाभा. दिवाणखान्यात टीव्ही असल्याने घरातल्या प्रत्येकाचाच त्यावर हक्क. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या. एव्हाना चॅनेल्सची संख्याही वाढली होती. त्यामुळे आपल्याला हवा तो चॅनेल लावून त्यावरचा आपल्या आवडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी रिमोटचा ताबा मिळवण्याची लढाई लढावी लागायची. एका चॅनेलवर जाहिराती सुरू झाल्या की तेवढ्या वेळात दुसर्या चॅनेलवरचा कार्यक्रम बघायचा असे प्रकार घरोघरी सुरू झाले होते.
याच्या बरोबरच कॅसेट-सीडी-डिव्हिडी यांनीसुद्धा आपली समांतर बाजारपेठ सुरू केली होती. सीडी-डिव्हिडी प्लेयर आणून घरात-सोसायटीत-गावात हवा तो सिनेमा पाहणं सुरू झालं होतं. काही काळासाठी हासुद्धा एक सोहळाच असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत असा प्लेयर भाडेतत्वावर आणून सिनेमे पाहिले जायचे. पायरसीनेही याच सुमारास आपले हातपाय पसरायला सुरूवात केली होती. पोर्टेबल डिव्हाइसवर सिनेमे येऊ लागल्याने काळा बाजारही फोफावत गेला. मागाहून येऊ घातलेल्या इंटरनेटने तर या काळ्या बाजाराला खतपाणीच घातलं.
एव्हाना इंटरनेटचं मायाजालही पसरू लागलं होतं. इंटरनेटमुळे जग जवळ आलं आणि जागतिक कार्यक्रम पाहण्यासाठी एक नवा मार्ग सापडला. त्याआधी केबल ऑपरेटर्स दाखवतील ते सिनेमे त्यांच्या स्थानिक चॅनेल्सवर दिसायचे. ऑपरेटर ओळखीचा असला तर त्याला विनंती करून एखादा सिनेमा पाहिला जायचा. किंवा रात्री उशीरा केबलवर इंग्रजी सिनेमे दिसायचे. त्या सिनेमांचा दर्जा आणि पायरसी हा मुद्दा होताच. पण इंटरनेमुळे तर पायरसी घराघरात पोहोचली. जुगाड करून परदेशी सिनेमे आणि मालिका डाउनलोड करून पाहिल्या जाऊ लागल्या. एखादा सिनेमा डाऊनलोड व्हायला दोन-तीन तास लागायचे. कधीकधी संपूर्ण रात्रसुद्धा यात जायची. इंटरनेटच्या जोडीला त्याच सुमारास एका नव्या तंत्रज्ञानाने भारतात पाऊल टाकलं होतं. संवादाच्या क्षेत्रात पराकोटीचे बदल घडवत मोबाइल फोनने दुनिया मुठ्ठी में करून टाकली. इंटरनेट आणि मोबाइल ही भविष्यातल्या बदलांची नांदी होती.
मोबाइल फोनच्या तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत गेले आणि मल्टिमीडिया ते स्मार्टफोन हा प्रवास काही वर्षांतच पूर्ण झाला. सोबतीला ऑनलाइन स्ट्रीमिंगची गंगाही वाहू लागली. मोबाइलमुळे संपर्कक्रांती झाली असली तरी या छोटेखानी उपकरणामुळे आणखी एक संकल्पना उदयाला आली आणि ती म्हणजे ‘पर पर्सन डिव्हाइस’ म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठीचं उपकरण. घरात टीव्ही एकच असेल पण घरातल्या जवळपास प्रत्येकाकडे मोबाइल दिसू लागला. परिणामी पर्सनलाइझेशन किंवा वैयक्तिकीकरणावर अधिकाधिक भर दिला जाऊ लागला. सुरूवातीच्या काळात व्यक्तीसापेक्ष कॉलिंग-मेसेजेसचे पॅकेज विकले गेले. कालांतराने त्याची जागा इंटरनेट डेटाने घेतली. अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या मुलभूत गरजा बनून गेल्या.
इंटरनेटवर विविध गोष्टींचं मायाजाल तयार होत होतं. इमेल, चॅटिंग, ब्लॉगिंगच्या सोबतीला सुरूवातीला फक्त व्हिडिओ सुविधा देण्यात येत होत्या. सोशल मीडियाने नुकतंच बाळसं धरलं होतं. २१व्या शतकाचं पहिलं दशक या नवीन तंत्रज्ञानाने सगळ्याच गोष्टींचं रूपडं बदलवत होतं. इंटरनेट वेगवान (बँडविड्थ वाढत गेली) आणि स्वस्त होत गेलं. सिनेमा, नाटकासाठीची तिकिटं घरबसल्या मिळू लागली. फक्त तिकिटंच नाही तर व्हिडिओ ऑन डिमांड ही संकल्पनाही हळूहळू रूजत गेली. नेटफ्लिक्सचंच उदाहरण द्यायचं तर २००० च्या सुमारास पोस्टाने डिव्हिडी पाठवायचा उद्योग त्यांनी सुरू केला होता. मग भाडेतत्वावर डिव्हिडी देऊ लागले. दहा वर्षांतच २००७ मध्ये त्यांनी डिव्हिडींचा गाशा गुंडाळला आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग, व्हिडिओ ऑन डिमांड सुरू केलं. ओटीटीच्या पायाभरणीला सुरूवात झाली होती.
भारतात म्हणाल तर या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी गेल्या पाच-सहा वर्षांतच जोर धरलाय. आजमितीला डझनभर ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. आणि त्यावर हजारोंच्या संख्येत सिनेमे, नाटकं, मालिका आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत सिनेमागृहात रिलीज होणार सिनेमा आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ लागलाय. मोठा पडदा छोटा तर आधीच झाला होता. आता तो अगदी हातावर आलाय. या ओटीटीसोबत आणखी एक गोष्ट झालीये. दिवाणखान्यातच असणारा टीव्ही आता अनेकांच्या बेडरूममध्येही शिरलाय. अमेरिकेत जे ७०-८०च्या दशकात झालं ते ओटीटीमुळे भारतात होऊ लागलंय. पण ओटीटीमुळे फक्त हाच एक बदल झाला असं म्हणणं चुकीचं ठरेल.
पूर्वी सिनेमाला जाणं म्हणजे कमीत कमी दोन तिकिटं तरी काढली जायची. एकट्याने थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणार्याला वेड्यात काढायचे. अगदीच समीक्षक वगैरे असेल तर तो मुद्दा निराळा. पण सिनेमा, नाटक हे कलेचं माध्यम काही एकट्याने जाऊन आस्वाद घेण्यासारखं नाही असा सर्वसाधारण समज होता. ओटीटीमुळे मात्र या समजाला हरताळ फासला गेला. उलट बहुतांशवेळा इथे सिनेमे, मालिका एकट्यानेच पाहिल्या जातात. फर्स्ट डे फर्स्ट शोला असणारं वलय जसं विरून गेलं तसंच सिनेमा पाहण्याच्या सोहळ्यातली रंगतही निघून गेली. एका रात्रीत सिनेमा, मालिकांचा फडशा पाडला जातो. रात्री १२ वाजता रिलीज झाली रे झाली की सकाळच्या चहापर्यंत मालिका पाहून संपलेली असते. ‘बिंज-वॉच’ हा या ओटीटी जमान्यातला परवलीचा शब्द. पूर्वी पंगतीला एका बैठकीत चाळीस जिलब्या हाणल्या वगैरे अभिमानाने मिरवलं जायचं. तसं आता एका बैठकीत तीन मालिका उडवल्या हे सांगताना छाती फुगून येते.
एखादा सिनेमा, मालिका पाहण्याचं कारण हे प्रामुख्याने त्या विषयाची किंवा प्रकाराची आवड हे असतं. म्हणजे भयपट आवडणे, किंवा थ्रीलर, मर्डर मिस्ट्री, विनोदी वगैरे प्रकारांचा एक चाहता वर्ग असतो. आणि त्या धाटणीचा सिनेमा, मालिका आली की त्याचा आस्वाद घ्यायचा असा साधारण शिरस्ता असतो. पण ओटीटीच्या जमान्यात आवडीसोबतच आणखी एका कारणाची भर पडली आहे आणि ते म्हणजे- पीअर प्रेशर. सगळे एखादी गोष्ट करतायंत म्हणून आपणही ती केलीच पाहिजे असा विचार करून त्यामागे धावत सुटायचं. इंजिनीअर, डॉक्टर होण्यासाठी जसं पीअर प्रेशर असायचं तशाच दबावाला बळी पडून ओटीटीच्या पडद्यावर गेम ऑफ थ्रोन्स, मनी हाइस्ट, स्क्विड गेम पाहण्याचं प्रमाण जरा जास्तच आहे. फोमो – फिअर ऑफ मिसिंग आउट हासुद्धा या दबावाचाच जुळा भाऊ. चार लोक जमल्यानंतर त्यांच्यात होणार्या चर्चेमध्ये आपण मागे तर राहत नाही ना ही भीती मनात असणं म्हणजे फोमो. टपरीवर सगळेचजण एखाद्या मालिकेबद्दल बोलायला लागले तर आपण त्याबाबतीत अनभिज्ञ असून चालत नाही असा काहीसा समज ओटीटीच्या जमान्यात पसरलाय.
पण या सगळ्यासोबत एक महत्त्वाचा पैलू लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे सोशल मीडिया. पीअर प्रेशर, फोमो या सगळ्याला हा सोशल मीडिया खतपाणी घालत असतो. टाइमलाइनवर झळकणार्या पोस्टचा नेमका संदर्भ काय आहे हे समजण्यासाठी अमूक एखादी मालिका पाहणं गरजेचं झालंय. पण या सोशल मीडियाने दोन गोष्टी केल्या. पूर्वी प्रेक्षक हा प्राप्तकर्ता होता. म्हणजे पडद्यावर जे काही दिसेल तो ते एखाद्या रिसीव्हरसारखा झेलत बघायचा. टीव्हीच्या काळात हा प्रेक्षक युजर (वापरकर्ता) आणि कन्झ्युमर (ग्राहक) बनला. पण ओटीटीच्या जमान्यात हा प्रेक्षक आता स्वतःच एक परफॉर्मर (सादरकर्ता) आणि क्रिएटर (निर्माणकर्ता) बनला आहे. ओटीटीवर पाहिलेल्या सिनेमा, मालिकेतील पात्रं, प्रसंग, घटना, संवाद, संगीत याचाच वापर करून स्वतःचं वेगळं कंटेंट बनवणारी ‘कलाकार’ मंडळी आता गल्लोगल्ली दिसू लागली आहेत. पण पूर्वी गणेशोत्सवात हौशी कलाकार मंडळी जशी भाव खाऊन जायची त्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे.
इथे मूळ कंटेंटवरून स्वतःचं वेगळं कंटेंट बनवणार्या कलाकार मंडळींची एक वेगळी कम्युनिटी आहे. त्यांची आर्थिक गणितंही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंडळींनी तयार केलेल्या कंटेंटचा आस्वाद घेऊन त्यावर प्रतिक्रिया देणाराही एक वर्ग आहे. त्या कंटेंटचा दर्जा हा त्या मंडळींची कम्युनिटीच ठरवते. म्हणजे मी एखादं असं कंटेंट बनवलं तर त्यावर माझ्या कम्युनिटीमधल्या इतरांचं दर्जावर शिक्कामोर्तब झालं म्हणजे मी स्टार. गंमत म्हणजे या कंटेंटवर सिनेमा, मालिका, नाटक समीक्षकांचं समीक्षण, विश्लेषण याचा काहीही फरक पडत नाही. मुळात त्या तशा समीक्षणावर यांची लोकप्रियता अवलंबून नसतेच मुळी. त्यामुळेच मूळ कंटेंटमधून एखादा संवाद, प्रसंग काढून, त्याचा संदर्भ बदलून तो जशाचा तसा दुसरीकडे कुठेतरी वापरायचा हे या ओटीटीचं एक बायप्रॉडक्ट आहे. आणि हे बायप्रॉडक्ट तयार करण्याचं काम सोशल मीडियावर जोमात सुरू आहे. यात चांगलं-वाईट असं वर्गीकरण करण्याचा लेखकाचा प्रयत्न नाही. ओटीटी आणि सोशल मीडिया हे असे हातात हात घालून वावरत आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रेक्षक-मालिकेचे सादरकर्ते यांच्यातला संवादही सोशल मीडियामुळे थेट होऊ लागला आहे. किंबहुना अनेकवेळा स्वतःचं वेगळं कंटेंट बनवणारी ही कलाकार मंडळी, मूळ कंटेटच्या सादरकर्त्यांसमोरच आपली कला सादर करू लागले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अमिताभ बच्चन जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा त्यांच्यासारखा हुबेहूब आवाज काढणारे सुदेश भोसलेही लोकप्रियही होऊ लागले. अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर सुदेश भोसलेंनी त्यांची कला सादरही केली. त्यांच्यातल्या कलागुणांवर टिप्पणी करण्याचा मुद्दा नाही. पण अमिताभ बच्चन यांना मूळ कंटेंट मानलं तर सुदेश भोसले म्हणजे हे स्वतःचं वेगळं कंटेंट बनवणारी कलाकार मंडळी आहेत. पूर्वी बच्चन यांच्यासमोर भोसले यांनी स्वतःची कला सादर करण्याचे प्रसंग कमी वेळा झाले असतील. आत्ताच्या जमान्यात मात्र याचं प्रमाण तुफान आहे.
याचा परिणाम असा की ओटीटीवरील कंटेंट प्रेक्षक आणि ही अशी कलाकार मंडळी दोन भिन्न नजरेतून पाहतात. मूळ मालिका, सिनेमा पाहताना त्यातला कोणता प्रसंग, संवाद घेऊन मी दुसरं कंटेंट बनवू शकेन असा विचार सतत या कलाकार मंडळींच्या डोक्यात असतो. परिणामी एखाद्या मालिकेवर, सिनेमावर साधकबाधक विचार करून, विषयाच्या खोलात जाऊन त्यावर चर्चा करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. याउलट या कंटेंटचा वरपांगी विचार करून त्यातून एक वेगळं सादरीकरण तयार करण्याच्या प्रक्रियेला जोर आलेला आहे.
ओटीटीवरील मालिकांच्या बिंज-वॉचमुळे मात्र भारतातील व्ह्यूइंग टाइम- म्हणजेच एखादा कार्यक्रम प्रेक्षक कितीवेळ पाहतो किंवा एखाद्या व्हिडिओवर प्रेक्षक किती वेळ घालवतो- वाढलेला आहे हे निश्चित. मुंबई विद्यापिठाच्या पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाने एक संशोधन केलं होतं. हे संशोधन काही वर्षांपूर्वीचं आहे. पण मुंबईतील प्रेक्षक साधारण किती वेळ बातम्या बघतो आणि त्याचा त्याच्या मनावर किती परिणाम होतो हे शोधण्याचा प्रयत्न त्या संशोधनातून केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत हा वेळ तीन मिनिटं इतका होता. अमेरिका-इंग्लंडमध्ये हाच वेळ काही तासांमध्ये असायचा. त्यामुळेच एखाद्या अपघाती किंवा दहशतवादी बातमीचा परिणाम तिथल्या जनमानसांवर जास्त व्हायचा. सांगायचा मुद्दा हा की ओटीटीवरील मालिकांच्या बिंज-वॉचमुळे आपल्याकडेही हा वेळ आता वाढला आहे. आणि त्याचा चांगला-वाईट परिणाम ठरवण्यासाठीचा सॅम्पल साइझ आणि सॅम्पल टाइम सध्या तयार होतोय.