महाराष्ट्राचे आजवरचे सगळ्यात सुमार राज्यपाल म्हणून ज्यांचा नंबर एक ते १० अशा सर्व क्रमांकांवर लागेल अशा विद्यमान राज्यपालांची सदैव घसरोत्सुक जीभ पुन्हा एकदा घसरली आणि त्यांनी मुंबई ठाण्यातून राजस्थानी आणि गुजराती गेले तर पैसा राहील का, ही देशाची आर्थिक राजधानी कशी राहील, अशी मुक्ताफळं उधळली… महाराष्ट्रात राहून नमकहरामी करणार्या या व्यक्तीविषयी संतापाची लाट उसळली… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा खास ठाकरी शैलीत समाचार घेतला आणि यांना कोल्हापुरी जोडे दाखवायला हवेत, अशी त्यांची उत्तरपूजा बांधली… त्यातून शिवसेनाप्रमुखांनी १९८३ साली काढलेल्या या व्यंगचित्राची आठवण झाली… सीमाभागात कानडी पोलिसांनी मराठी माणसांवर केलेल्या अत्याचाराचा त्याला तात्कालिक संदर्भ आहे… पण, सत्तेच्या मदाने उन्मत्त झालेल्या आणि मराठी अस्मिता चिरडायला निघालेल्या कोणत्याही हत्तीचे गंडस्थळ फोडायला शिवसेनेचा वाघ आजही सज्ज आहे, हे महाराष्ट्रद्रोह्यांनी लक्षात ठेवावं… बाळासाहेबांच्या या कमालीच्या थरारक आणि चलच्चित्राची गती पकडणार्या नाट्यमय व्यंगचित्रात वाघापुढे विशालकाय हत्ती किती केविलवाणा दिसतोय ते पाहून ठेवा… तीच तुमची गत होणार आहे.