अशी आहे ग्रहस्थिती
राहू-मंगळ-हर्षल मेषेत, शुक्र मिथुनेत, रवि-बुध कर्केत, केतू तुळेत, शनि (वक्री)-प्लूटो मकरेत, गुरू (वक्री)- नेपच्युन मीन राशीत, चंद्र कर्केत, त्यानंतर सिंह-कन्या-तुळेत. एक ऑगस्टनंतर बुध सिंहेत. दिनविशेष – २ ऑगस्ट नागपंचमी.
मेष – महत्वाच्या कामात पीछेहाट होईल. मन:स्तापाचे प्रसंग घडल्याने स्वभाव चिडचिडा होईल. मंगळ-राहू-हर्षल यांची युती लग्नी, वक्री शनीबरोबर केंद्रयोग त्यामुळे अंगारक योगाचे तीव्र पडसाद अनुभवायास मिळतील. स्वराशीतला व्ययातला गुरू वितंडवाद घडवेल. किरकोळ व्यापार, स्टेशनरी, पुस्तक छपाई आदी व्यवसाय करणार्यांना चांगला आठवडा जाईल. वीमाक्षेत्रात उत्तम काळ. राजकारणात महत्वाच्या पदावर नियुक्ती होऊ शकते.
वृषभ – नाटककार, साहित्यिकांना कामाच्या नव्या संधी चालून येतील. पंचमेश बुधाचे सिंह राशींमधील राश्यांतर फायद्याचे राहील. वक्री गुरू लाभात आणि योगकारक शनी भाग्यात त्यामुळे नवीन संधी चालून येईल. उच्चपदस्थांशी ओळख होईल. जीवाभावाच्या मित्रांची गाठभेट होईल. २४-२५ वयोगटातील तरुणांना अचानक धनलाभाची शक्यता आहे. संततीच्या दृष्टीने आठवडा चांगला जाईल. धार्मिक कार्यात सढळ हाताने मदत कराल.
मिथुन – अध्यात्मिक यश मिळेल. बुधाचे पराक्रमातील राश्यांतर व्यापारी वर्गाबरोबर मैत्री वाढवेल. २ ते ४ तारखांपर्यंतचा काळ लाभदायक राहील. पगारवाढीची शक्यता आहे. पण काही नोकरदारांना फटका बसू शकतो. अष्टमात राश्यांतर करून आलेल्या वक्री शनीमुळे वातविकार, पोटाच्या आजारांना निमंत्रण मिळेल. आर्थिक क्षेत्रात कमिशनच्या माध्यमातून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यात यश मिळेल. वक्री शनि आणि मंगळाचा रवीसोबत होणारा कुयोग नोकरीत अपयश देईल.
कर्क – मनासारखी स्थिती राहणार नाही. नको ती शुक्लकाष्ठे लागू शकतात. दशम भावातील राहू-केतूमुळे काही गोष्टी मनासारख्या तर काही मनाविरुद्ध घडतील. सप्तमातील वक्री शनीमुळे शत्रूपक्षाकडून धोका होईल. महिलावर्गाकडून क्लेश होईल. नोकरीत वरिष्ठांची गैरमर्जी होईल. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर पडतील. संततीचे मनाविरुद्ध वागणे मनस्तापाचे राहील. शनि-बुध-रवीच्या समसप्तक योगामुळे हिशेबात घोळ आणि व्यवहारात अडचणी निर्माण होतील.
सिंह – दुरावलेली माणसे परत येतील. कोर्टकचेरीच्या कामांतून फारसे काही पदरात पडणारा नाही. राजकारण्यांना काळ चांगला जाईल. लाभातील पुनर्वसू नक्षत्रातील शुक्रामुळे व्यवसायाची घडी चांगली बसेल. सराफी व्यवसायातील मंडळींची पतप्रतिष्ठा वाढेल. संततीसौख्य लाभेल. कला व नाट्यक्षेत्रात लाभदायक काळ आहे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – काही दिवसापासून घडणार्या अनपेक्षित सकारात्मक गोष्टींमुळे मन प्रसन्न राहील. बुधाच्या व्ययस्थानातील भ्रमणामुळे अकारण खर्च होईल. सर्वच बाबतीत परिस्थिती उत्तम राहील. व्यवसायाची बिघडलेली घडी पुनर्वसु नक्षत्रातील शुक्रामुळे पूर्वपदावर येईल. वादविवाद वाटाघाटीने सुटेल. आगामी काळ चांगला आहे.
तूळ – परिस्थिती अनुकूल नसली तरी राश्यांतर करून बुध तुमच्या लाभात येत आहे. सकारात्मक संधी वाया जातील. पण धीर सोडू नका. भविष्यात यश नक्की मिळेल. छोटे प्रवास घडतील. विदेशातील व्यवसायाची गाडी ट्रॅकवर येईल. लग्नेश शुक्राचे भाग्यातले भ्रमण कलाकार, संगीत कलावंतांना घवघवीत यश देईल. सच्च्या सोबत्यांबरोबर सलोखा राहणार नाही. श्रद्धा सबुरी ठेवा.
वृश्चिक – आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. मंगळ षष्ठम भावात, राहू-हर्षल यांच्यामुळे किडनी स्टोनचे दुखणे उद्भवेल. इलेक्ट्रिक वस्तूंपासून जपा. विरोधक, शत्रू, कामगारांवर वचक राहील. २ आणि ३ ऑगस्ट रोजी होत असणारा गुरू-चंद्र दृष्टियोग अनपेक्षित लाभ मिळवून देईल. वक्री गुरू, रवी-बुधाचा नवपंचम योग यश मिळवून देईल. शुभकार्यात दिरंगाई होईल. आईसाठी पैसे खर्च करावे लागतील. अडचणी येतील.
धनु – संततीकडून चुकीचे कृत्य होईल. विनाकारण वाद घडतील. कौटुंबिक सौख्यात मिठाचा खडा पडेल. पंचमातील मंगळ-हर्षल युती भरणी नक्षत्रात असल्याने अस्थिरता, विपरित गोष्टी घडतील. मनासारखी स्थिती राहणार नाही. ध्यानधारणा, मौनव्रताचा अवलंब करा. सप्तमातील शुक्रामुळे दाम्पत्य जीवनात गोडवा निर्माण होईल. शुभघटना घडतील.
मकर – नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होतील. शनीचे पदार्पण मकर राशीत झाले आहे. गुरुकृपा लाभेल, अडचणीत मार्ग सापडेल. कामाच्या ठिकाणी संयम ठेवावा लागेल. समयसूचकता दाखवा. मित्रांकडून फसवणूक होईल. कोणताही व्यवहार काळजीपूर्वक करा. स्थावर मालमत्तेसंदर्भात थांबून निर्णय घ्या. कोणताही वायदा करू नका.
कुंभ – चॅनेल, वर्तमानपत्रांतील बातमीदारांसाठी हा काळ त्रासदायक ठरेल. वादग्रस्त बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे या मंडळींनी काळजी घ्यावी लागेल. हटवादी वृत्ती, चंचलता वाढीस लागेल. त्यामुळे मानसिक त्रास होईल. पराक्रमस्थानात स्वराशीचा मंगळ राहू – हर्षल युतीमुळे व्यवसायात मतभेद होतील. कितीही उंचीचे असाल तरी आपली पात्रता शून्यवत होईल. धाकट्या भावाची काळजी घ्या. प्रवासात आततायीपणा टाळा. व्यवसायाची नवी कल्पना सुचेल.
मीन – राशिस्वामी गुरू वक्री लग्नात असल्याने अविचाराने गुंतवणूक केल्यास नुकसान होईल. नव्या गुंतवणुकीचा विचार दूर ठेवा. धन स्थानातील मंगळ-हर्षल-राहू युती हानीकारक राहील. नोकरी-व्यवसायात आणि खासगी आयुष्यात जमाखर्चाचा ताळमेळ बसणार नाही. शेती व रासायनिक द्रव्यांचा व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम काळ राहील. संरक्षण खाते, पोलीस, वीजनिर्मितीत शुभ काळ राहील. जबाबदारीने काम करा.