• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

थकले रे डोळे माझेऽऽऽ

- टोक्या टोचणकर (टोचन)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 28, 2022
in टोचन
0

महाराष्ट्राचे दाढीवाले मुख्यमंत्री दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसह गृहमंत्री अमितजी शहा तसेच इतर ओळखीच्या व बिनओळखीच्या मंत्र्यांची भेट घेण्यासाठी व त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गेले असता त्यांची पीएम व जीएम यांच्या भेटीसाठी तब्बल वीस तास रखडपट्टी करण्यात आली व शेवटी भेट न देताच वाटाण्याच्या अक्षता लावून त्यांची बोळवण करण्यात आली हे पाहून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला बसलेल्या धक्क्यातून महाराष्ट्र अजून सावरलेला नाही. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या यास ‘ईडी’वाल्यांनी दाढीवाल्यांच्या पाळतीवर पाठवलं होतं. सध्या मुंग्यांच्या रांगेसारखी बंडखोरांची रांग भाजपाच्या बिळाकडे लागली असून किरीट सोमय्या यांना काही कामच उरले नसल्यामुळे त्यांनाच पोक्याऐवजी पाठवणार होते. ‘ईडी’ने करावयाच्या हजामतीसाठी किरीटकडे आता बहुदा एकही गिर्‍हाईक शिल्लक राहिले नसल्यामुळे आता बिनपाण्याने करण्यासाठी कुणाला ‘ईडी’कडे पाठवावे, असा प्रश्न त्यांना पडला असल्यामुळे तेही स्वत:ची दाढी न करता ती वाढविण्याच्या विचारात असल्याचे एका वाहिनीवर सांगितले होते. त्यामुळे पोक्याला दिल्लीला पाठवण्यात आले.
पोक्याने दिल्लीहून पाठविलेला वृत्तांत पुढीलप्रमाणे- त्या दिवशी रात्री दाढीवाले मुख्यमंत्री जेव्हा विमानातून पायउतार झाले तेव्हा त्यांच्या स्वागताला पुष्पगुच्छ घेऊन तीन बंडखोर खासदार उपस्थित होते. त्यांनी गौहाटी येथे मिळालेल्या पिपाण्या वाजवत त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर हा लवाजमा दिल्लीतील नव्याने बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात गेला. तिथे त्यांना दाढीवाल्यांसमोर नृत्यगीत सादर करायचं होतं. ढोल, ताशे, लेझिमवाले यांनाही ऑर्डर देण्यात आली होती. पण त्यांनी आम्ही खर्‍या शिवसेनेचे आणि उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत, असे सांगून त्यांना दिलेला अ‍ॅडव्हान्सही परत पाठवला. दाढीवाले म्हणाले, आता एकच लक्ष्य आणि ते म्हणजे मोदीजी आणि शहाजी यांची दीर्घ भेट. त्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. मी माझ्या दालनात एकटाच बसतो आणि एक झोप काढतो. बाहेर भाजपच्या कोणी व्हीआयपी व्यक्तीचा फोन आला तर माझ्या दारावरची तुतारीची बेल वाजवा. रात्री बारा वाजून गेले तेव्हा दाढीवाल्यांना जाग आली. भाजपवाल्यांच्या महत्त्वाच्या घडामोडी मध्यरात्रीनंतरच होतात हे माहीत असल्यामुळे त्यांनी तोंडावर पाणी शिंपडून झोप उडवून लावली आणि ते ‘मोदी मोदी मोदी मोदी’ हा जप करत डोळे मिटून ध्यान करत बसले. पहाटे पाचचे ठोके पडले तरी कुणाचाच काहीही निरोप न आल्याने अखेर ते ध्यानमुक्त होऊन खुर्चीतच झोपी गेले. बाहेर शेवाळे आणि बंडखोर खासदार मंडळी रात्रीच डाराडूर झाली होती.
अखेर सकाळी सात वाजता दाढीवाल्यांना जाग आली. त्यांनी झटपट सकाळच्या कर्मक्रिया आटोपून येरझार्‍या घालायला सुरुवात केली. दाढी करण्याचा प्रश्नच नव्हता. या बाबतीत मोदी आणि त्यांचं जुळत होतं. एवढ्यात चहा आणि मराठमोळा नाश्ता आला. त्यात पुरणपोळी आणि झुणका-भाकरही होती. नंतर चहा आणि बिस्कीटं आली. इथे मुख्यमंत्र्यांसाठी मोठ्या आकाराची बिस्कीटं कंपन्यांकडून खास मागवली जातात. एकेका बिस्किटाचा आकार पापलेटएवढा असतो. दोन बिस्कीटं खाल्ली तरी पोट भरतं. आपली सदनाच्या वँâटीनवाल्याशी ओळख असल्यामुळे त्याने मला पुरेसा स्टॉक भेट म्हणून नेहमीप्रमाणे दिला होता. अखेर दाढीवाले दरवाजा उघडून रूबाबात बाहेर आले आणि म्हणाले, कोणी भाजपचे नेते वा कार्यकर्ते येऊन गेले का? मी म्हणालो, कुत्रंही फिरकलं नाही इथे साहेब. ‘बरं लक्ष ठेवा. मी आतच बसतो.’
दुपारी बारा वाजून गेले तरी तिथे भाजपचं कोणीही फिरकलं नाही. जेवणाची वेळ झाली तरी जेवायला बसायची पंचाईत. नेमकं त्याचवेळी ही नेतेमंडळी यायची. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागल्यावर एक वाजता त्यांनी जेवण मागवलं. जेवून झाल्यावर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना फोन केला व आमच्या फुटीर खासदारांना मान्यता मिळण्यासाठी तसं पत्र घेऊन येऊ का असं विचारलं. त्यांनी या म्हणून सांगितल्यावर ते या बाराजणांच्या स्वाक्षर्‍या असलेलं पत्र घेऊन बिर्ला यांच्या निवासस्थानी गेले. पत्र पाहताच ते वैतागले व यू डोन्ट नो प्रोसिजर? यावर प्रतोदांची सही घेऊन या. पत्राचा तर्जुमाही बदला. असं त्यांनी सांगितल्यावर ही वरात दाढीवाल्यांच्या खासदार पुत्राच्या घरी गेली. तिथे पुन्हा पत्र टाईप करून त्यावर प्रतोदांची सही घेण्यात आली आणि मग पुन्हा फुटीर खासदारांच्या सह्या त्यावर घेऊन ते पत्र ओम बिर्लांना देण्यात आलं. त्यांनी त्या बारा फुटीर खासदारांची ओळख परेड घेऊन त्यांना निरोप दिला. आता मोदी आणि शहांच्या प्रतीक्षेत दाढीवाले पुन्हा महाराष्ट्र सदनात बसले. निदान त्यांनी मुखदर्शन तरी द्यावं व त्यांना यायला वेळ नसेल तर त्यांनी आपल्याला ते जिथे असतील तिथे भेटायला बोलवावं, असा संदेशही त्यांना मोबाईलवर धाडला. पण मोदींनी सहा वाजेपर्यंत काहीच प्रत्युत्तर दिलं नाही.
दिल्लीला आल्यानंतर वीस तास झाले होते. पण मोदी-शहांनी त्यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झालेल्या मुख्यमंत्री दाढीवाल्यांना भेटण्याचं टाळलं. जोपर्यंत या फुटीर गटाला लोकसभा सचिवालयाकडून अधिकृत मान्यता मिळत नाही तोपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही असा पवित्रा मोदी यांनी घेतला होता. त्यामुळे दाढीवाल्यांची साधी सदिच्छा भेटही त्यांनी घेतली नाही. एवढ्या लांबून आलेल्या पाहुण्याला भेट न दिल्यामुळे पाहुण्याचा पोपट झाला व दिल्लीत भाजपवाल्यांना टिंगल करण्यासाठी व मोदींचा वरचष्मा कसा असतो हे दाखविण्यासाठी एक निमित्त मिळालं. इकडे घामाघूम झालेले दाढीवाले पत्रकार मागे लागल्यामुळे संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्सची घोषणा करून मोकळे झाले. अखेर सहानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाढीवाल्यांनी आमच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याचे सांगत प्रश्नांना थातुरमातूर उत्तरं देत तिथून पोबारा करत अखेर दिल्लीहून मुंबई गाठली खरी, पण बंडोबा आमदारांच्या वैधतेलाच न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने १ ऑगस्टपर्यंत या आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे. जर या आमदारांची बंडखोरी अवैध ठरली तर ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होणार आहे. त्यामुळे दाढीवाल्यांच्या गटात आमच्यावर शिवसेनेत कसा अन्याय झाला हे ओक्साबोक्शी रडत, आक्रंदत सांगण्याची स्पर्धा लागली आहे. शिवसेनेत पोट फुटेपर्यंत खाल्ल्यानंतर आता यांना अन्यायाचे उमाळे येत असल्याचे फडणवीस आपल्या भाजप सहकार्‍यांच्या कानात सांगत आहेत. दाढीवाले मुख्यमंत्रीपदावरून कधी जातील आणि आपण कधी त्या खुर्चीवर बसू हे जाणून घेण्यासाठी ते सध्या बड्या ज्योतिषांचे उबंरठे झिजवत आहेत, तर दाढीवाल्यांना कधी एकदा मोदींची गळाभेट घेतो असं झालं आहे. पण हे औट घटकेचे मुख्यमंत्री आहेत, यांच्याशी फार सलगी करून उपयोगाचे नाही, त्यामुळे आपला पक्षच बदनाम होऊ शकतो, याची जाणीव असल्यामुळे मोदींच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले दाढीवाले निराशेच्या गर्तेत आहेत.

Previous Post

भविष्यवाणी – ३० जुलै

Next Post

नया है वह…

Next Post

नया है वह...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.