स्वर्गात बांधल्या गेलेल्या लग्नगाठींची, पृथ्वीवर गाठ घालून देण्याचं काम विवाह मंडळं करतात, असं सांगून हृषिकेश म्हणाला, आजच्या मोबाइलधारी तरूण पिढीला, ऑफिसमधे जावून, फाइल बघून स्थळ शोधण्यापेक्षा मोबाईल अॅपमधे एका क्लिकवर होणारे मॅचमेकिंग ‘कूल‘ वाटते. म्हणूनच बहुतांश मुलांचा पारंपरिक पद्धतीने मुलगी ‘पाहून’ लग्न जुळवण्यापेक्षा, पहिला चॉइस ‘मॅट्रिमोनियल साइट‘ हा असतो.
– – –
लग्न बदलतंय… विविध अंगांनी बदलतंय. अर्थात कोणताही आमूलाग्र बदल एका पिढीत होत नाहीच, दोन पिढ्यांच्या विचारांमधील अंतर वाढत जाऊन नवनिर्मिती होत जाते. एका सर्व्हेनुसार भारताची वेडिंग इंडस्ट्री म्हणजे विवाहांची बाजारपेठ आज आठ हजार कोटी रुपयांची आहे. आपला देश तरूण मुलांचा देश म्हणून ओळखला जातो. येत्या काही वर्षात भारतात दर वर्षी एक कोटी लग्ने होतील असा अंदाज आहे. लग्न करायचं ते दणक्यात, कारण लग्न आयुष्यात एकदाच होतं, असं मानणार्या तरुणांची संख्या वाढते आहे. डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूट, दागिने, साड्या, पोशाख, हॉल… लग्नाशी संबधित असणार्या कितीतरी व्यवसायांना सुगीचे दिवस आले आहेत. कित्येक मराठी तरूण या व्यवसायात आपले वेगळेपण ठसवताना दिसतात. पण या सार्यांना व्यवसाय कधी मिळेल? लग्न जुळल्यावरच ना! तर आजच्या या लाइक- अनलाइक, राइट अँड लेफ्ट स्वाइपच्या जगात लग्न जुळवणे या विषयाची मुळापासून माहिती घ्यायचं ठरवलं. ज्या संस्थेला लग्न जुळवण्याचा चाळीस वर्षांचा अनुभव आहे, अशा ‘सौ. कुलकर्णी वधूवर सूचक मंडळा‘चे संचालक हृषिकेश कदम यांना भेटलो. पहिल्याच वाक्यात ते म्हणाले, ‘विवाह जमवणे हा केवळ व्यवसाय नसून ते सामाजिक देणं आहे, ही राष्ट्रसेवा आहे असं मी मानतो.‘
नव्या पिढीत लग्न जुळण्या-जुळवण्याच्या आणि करण्या-निभावण्याच्या पद्धती बदलत आहेत. जगात भारत हा असा देश आहे, जिथे आजही बहुतांश विवाह जुळवून लावले जातात. ‘मॅचमेकिंग‘ हा भारतीय विवाहव्यवस्थेचा कणा आहे. कारण इथे पालक-मुलांचं नाते खूप जवळचं असतं. पन्नासेक वर्षांपूर्वी सोयरीक कुटुंबातच जमवली जायची. वधूवरांच्या शोधाची सुरुवात, मामाची मुलगी-आत्याचा मुलगा इथून सुरू व्हायची. भावी जोडीदार आपल्याच जातीतील, एकाच पंचक्रोशीमधील किंवा फारतर आपल्याच जिल्ह्यातील हवा अशी आग्रही मागणी असायची. तेव्हाच्या एकत्र कुटुंबात नव्या नवरीला स्वतःला सामावून घेताना, चालीरीती, परंपरा यांचे भान राखावे लागायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे, मुलगा काय करतो, मुलगी कशी आहे याची इत्थंभूत माहिती मिळणे आवश्यक असायचे. म्हणूनच लग्नं ओळखीतच व्हावीत हा अट्टहास असायचा.
स्वर्गात बांधल्या गेलेल्या लग्नगाठींची, पृथ्वीवर गाठ घालून देण्याचं काम विवाह मंडळं करतात, असं सांगून हृषिकेश म्हणाला, आजच्या मोबाईलधारी तरूण पिढीला, ऑफिसमधे जावून, फाइल बघून स्थळ शोधण्यापेक्षा मोबाईल अॅपमधे एका क्लिकवर होणारे मॅचमेकिंग ‘कूल‘ वाटते. म्हणूनच बहुतांश मुलांचा पारंपरिक पद्धतीने मुलगी ‘पाहून’ लग्न जुळवण्यापेक्षा, पहिला चॉइस ‘मॅट्रिमोनियल साइट‘ हा असतो. याच ऑनलाइन प्रक्रियेला अधिकाधिक सुलभ व आकर्षक बनवण्याचा प्रयत्न आम्ही सतत करत असतो. आमच्याकडे नाव नोंदणी करायला आलेल्या मुलांकडून ते काय काम करतात, जोडीदाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याची माहिती घेऊन, गरजेनुसार त्यांचं समुपदेशन करतो. कुणी खोटी माहिती देऊन फसवणूक करू नये यासाठी प्रत्येक स्थळाकडून अॅड्रेस प्रूफ घेणे, मोबाईल व्हेरिफिकशन ही काळजी आम्ही घेतो. साइटवर एखादं स्थळ आवडलं तरी अगदी पहिल्याच भेटीत होकार देऊ नका, अजून काही भेटी घ्या, लग्न, कौटुंबिक वातावरण, शैक्षणिक पार्श्वभूमी, आवडी-निवडी, छंद, भविष्यातील महत्वाचे निर्णय, करियर प्लॅन्स यावर सविस्तर चर्चा करा; आणि मगच निर्णय घ्या, असाच आमचा सर्वांना सल्ला असतो. आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेली, स्वतःचं भलं बुरं कळतंय असं ‘समजणारी‘ तरूण पिढी, ‘माय लाइफ माय चॉइस‘ हा मंत्र जपतेय. ‘प्रेम-ब्रेकअप-प्रेम‘ याची वारी करणारे, आणि हल्लीच कायदेशीर मान्यता मिळून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारी कपल्स पाहिली की लग्नसंस्था दोलायमान होतेय का असं वाटतं; पण, लग्नसंस्थेची पाळेमुळे समाजमनात इतकी खोलवर रुजली आहेत की ती धोक्यात येईल असं वाटत नाही.
हृषिकेश सांगतो, आजच्या तरुणाईशी बोलताना लक्षात येतं की या पिढीला लग्न तर करायचं आहे, पण कधी ते त्यांना सांगता येत नाही. तीस चाळीस वर्षांपूर्वी लग्न लागण्याचं वय १८ ते २२ होतं, पण काळ बदलला तसे लग्नाळू मुलांचे वय आज तिशीपस्तिशीकडे झुकताना दिसतंय. ‘विवाहाचे सर्वसामान्यपणे प्रेमविवाह आणि घरच्यांच्या संमतीने ठरवून केलेला विवाह असे दोन प्रकार मानले जातात. आजकाल मुलं करीयरला महत्त्व देतात. प्रेमात पडली तरी शिक्षण पूर्ण होऊन, नोकरीत सेटल होण्याच्या मार्गावर प्रेमाचे धागे विरळ होत जातात. मग पर्याय येतो तो अरेंज मॅरेज करण्याचा. दहा मुलं कांदे-पोहे खाऊन गेली, पण एकानेही पसंत केले नाही, तर त्या मुलीत काहीतरी दोष आहे असं पूर्वी मानलं जायचं. मोठया बहिणीला पाहायला पाहुणे आले तर लहान बहिणींना दुसर्या खोलीत लपवायचे प्रकार घडत असत. पण आज मॅट्रिमोनियल साइटवर एका क्लिकवर शेकडो प्रोफाइल दिसतात. तुमच्या आवडी निवडी, अपेक्षा यांचा सुवर्णमध्य गाठत त्यांच्याकडची सर्वोत्तम आणि तुम्हाला अनुरूप स्थळे सादर होतात. सत्तर-ऐंशीच्या दशकात कोणत्याही उपवर मुलीला लग्नाबद्दल विचारलं की ती ‘मला मुळी लग्नच करायचं नाही’ असं लटक्या रागाने उत्तर द्यायची. या पिढीच्याही मागे गेलो तर डोक्यावर अक्षता पडल्या, अंतरपाट दूर झाला तेव्हा पहिल्यांदा नवर्याचं तोंड पाहिलं, असं आज्या सांगायच्या. मुलगा कोण आहे, काय करतो, कुठे राहतो याचा विचार घरातील वडीलधारी मंडळी करायचे, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य तेव्हा मुलीलाच काय, मुलाला देखील नसायचं. आताची पिढी मात्र लग्न करायचं आहे, पण आपलं स्वातंत्र्य आणि ‘स्पेस‘ जपूनच, असं ठामपणे सांगते. पूर्वी प्रेमविवाह हा शब्द उच्चारला तरी घरात ‘राडा‘ व्हायचा; पण आज घरचेच सांगतात, ‘तुझ्या आवडीचा जोडीदार निवड हो, नंतर आमच्या डोक्याला ताप नको.‘ लग्न कुठल्याही प्रकारे केलं तरी लग्न जमवताना काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे.
हृषिकेशशी बोलताना, मला वक्तशीरपणा, हस्तांदोलन, देहबोली आणि वागण्याबोलण्यातून सैनिकी शिस्त जाणवली. तोच धागा पकडून मी विचारलं,‘‘तुम्ही आधी सैन्यात होतात का?’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी नऊ वर्षे भारतीय सैन्यात नोकरी केली आहे. माझं बालपण ताडदेवमधील चाळीत गेलं. आई शाळेत शिक्षिका आणि वडील ट्युशन्स घ्यायचे. आजोबा पूजेचे हार बनवायचे. कधी कधी मी आजोबांसोबत सकाळी चार वाजता दादर फूल मार्वेâटला फुले आणायला जायचो. आणलेल्या फुलांचे हारात रूपांतर होताना पाहून खूप गंमत वाटायची. बालपणी हिंडणं, फिरणं, बागडणं याबरोबर शिवजयंती साजरी करणे, दिवाळीत किल्ले बनवणे हे आमचे आवडीचे विषय. लहानपणापासूनच मला सैनिकी युनिफॉर्मबद्दल आकर्षण होतं. शाळेत एनसीसी जॉइन केलं. सैन्यात जाण्याची प्रबळ इच्छा होती, पण, भरती प्रक्रियेची काहीच माहिती नव्हती. बारावीत असताना सिडन्हॅम कॉलेजमधे, माझे काका प्रभाकर कारंजकर लायब्रेरियन होते. त्यांनी, भारतीय सैन्यातील के. समुद्रा या त्यांच्या मित्राला बोलावून मला मार्गदर्शन करवलं आणि सैन्यभरती प्रक्रिया समजावून दिली. मुंबइतील कुलाब्यात लेखी आणि तोंडी परीक्षा होऊन माझी सैन्यात निवड झाली. गोवा आणि जबलपूरला ट्रेनिंग पार पडलं. पहिलं पोस्टिंग नागालँडमधे मिळालं. सैन्यात असताना मणिपूर, दिल्ली, पंजाब अशा अनेक ठिकाणी देशसेवा करण्याची संधी मिळाली. सैन्यात अनेक परीक्षा होतात. त्यात तांत्रिक कौशल्यात सरस ठरल्याने माझी कोअर ऑफ सिग्नल्स टेलिकम्युनिकेशन या कामासाठी निवड करण्यात आली. सैन्याचं स्वतःचं टेलिफोन एक्सेंज असतं. शत्रूला चकवा देऊन सैनिकांसोबत रेडिओ सेटवरून संवाद साधणं हे कौशल्याचं काम असतं. या विभागात मी बरंचसं काम केलं. सीमेवरील अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. रोज नवनवीन जबाबदार्या उत्तम रीतीने पार पाडत होतो. पण सलग काही महिने रात्रीच जागरण, उणे तापमान, दिवसाची अपुरी झोप आणि सवयीचं नसलेलं अन्न यामुळे मला पोटाचं आजारपण आलं. अनेक उपचार करूनसुद्धा सैन्यात लागणारा फिटनेस पुन्हा गवसला नाही. त्यामुळे नऊ वर्षे सैन्यात नोकरी केल्यावर राजीनामा देऊन २००३ साली मी घरी परतलो.
सैन्यातून परतल्यावर नोकरी न करता, सामाजिक आणि आर्थिक सुवर्णमध्य साधेल असा व्यवसाय करण्याचा मानस होता. परिचयातील सौ. सुनंदा कुळकर्णी यांचे दादरला वधूवर सूचक मंडळ होते. विवाह जमवणे हा केवळ व्यवसाय नसून एक सामाजिक देणं आहे, ही शिकवण त्यांचीच. त्यांच्या या ब्रीदवाक्याने मला विचार करायला लावला. हे काम मला इंटरेस्टिंग वाटलं आणि मी त्यांना मदत करायला सुरुवात केली. कुळकर्णी वधुवर सूचक मंडळाच्या जाहिराती दर रविवारी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात यायच्या. त्या द्यायला मी त्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जायचो. सोशल मीडिया नसलेल्या त्या काळात, मोठ्या वर्तमापत्रांच्या ऑफिसमधे आपण जातोय, याचं फार अप्रूप वाटायचं. या जाहिराती कशा बनवायच्या हे कुळकर्णी बाईंनीच मला शिकवलं. थोड्याच दिवसांत मी माझी कल्पकता वापरून नवीन जाहिराती बनवायला लागलो.
आपण बनवलेली जाहिरात पेपरमधे छापून आल्यावर भारी वाटायचं. तिथे गेल्यावर जाहिरात विभागाचे अनेक लोक भेटायचे, त्यातील काही मित्र झाले. त्यांच्यासोबत फिरताना ते ग्राहकांसोबत कसे बोलतात, जाहिरातीची संकल्पना कशी समजावून सांगतात हे शिकत गेलो. या व्यवसायातील कलात्मकता भावली, मग हाच व्यवसाय करायचं ठरवलं… ‘आर अँड एम अॅडव्हर्टायझिंग‘ सुरू केली. पहिलीच जाहिरात एका ट्रॅव्हल एजन्सीची मिळाली. त्यांनी एकदम दहा जाहिरातींच पॅकेज दिलं. सुरुवातीलाच मोठं काम मिळालं याचा आनंद झाला. पहिली जाहिरात छापून आल्यावर मी पैसे मागायला गेलो, तेव्हा ते म्हणाले, ‘अरे या धंद्यात क्रेडिट चालतं, सगळ्या जाहिराती छापून आल्यावर एकत्र पैसे घ्यायला ये.’ मला वाटलं या व्यवसायात हे असंच असावं. सर्व जाहिराती प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्याकडे गेलो, तेव्हा ते पैसे द्यायला पुन्हा टाळाटाळ करू लागले. तुझ्या जाहिराती वाचून कुणी पर्यटक आले नाहीत, असं सांगून, पैसे नंतर देतो, असं म्हणाले. अनेक फेर्या मारल्या, पण शेवटपर्यंत त्यांनी पैसे काही दिले नाहीत. व्यवसायाचा पहिला धडा मला २००४ साली चौदा हजारांना मिळाला. हे नुकसान भरून काढायला सैन्यातील बचत कामी आली.
पहिल्या अनुभवानंतर मी थोडा सावध झालो. नियमित पैसे देणारे ग्राहक निवडायला लागलो. सुरुवातीच्या काळात जाहिरात मिळविण्यासाठी खूप वणवण केली. दुःखद निधन, श्रद्धांजलीपासून वाढदिवस, ज्योतिष यांच्यापर्यंत कोणतीही जाहिरात सोडली नाही. ग्राहकाकडून जाहिरात मिळाली की तिथेच एखाद्या इराणी हॉटेलमधे चहा पीत जाहिरात तयार करायची, तिथल्याच एसटीडी बूथवरून वर्तमापत्रांच्या कार्यालयात फॅक्स करायचो. याने काम जलद व्हायचं आणि इतर खर्च वाचायचा. त्यावेळी स्वतःचं ऑफिस नव्हतं, पण ऑफिसवाचून काही अडतही नव्हतं. सैन्यातील शिस्त, वक्तशीरपणा, कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त चांगली कामगिरी करून दाखवणं हे संचित व्यवसाय करताना उपयोगी पडत होतं. हळूहळू ऑर्डर्स वाढू लागल्या. वनौषधींपासून औषधे तयार करणार्या डॉ. ऊर्जिता जैन, जगात ३०० आश्रम असणारे चिन्मय मिशन, विलास गावकर यांचा स्वामी समर्थ ग्रुप असे काही मोठे क्लाएंट्स मिळाले. जाहिरातक्षेत्रात चांगलं नाव कमावत होतो. २००४ ते २००६ अशी सलग तीन वर्षे मला मुंबईत जास्त जाहिरात व्यवसाय दिल्याबद्दल एक्स्प्रेस ग्रूपकडून कार बक्षीस मिळाली. कारऐवजी बक्षिसाची रक्कम स्वीकारून मी ती व्यवसायात गुंतवली.
अॅडव्हर्टायझिंग आणि कुळकर्णी वधू वर सूचक मंडळातील काम हे दोन्ही अगदी जोशात सुरू होते. त्याच सुमारास, शादी डॉट कॉम ही ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइट विवाह जुळवण्याच्या व्यवसायाचा चेहरा मोहरा बदलून टाकत होती. त्यामुळे व्यवसायात टिकून राहण्यासाठी सौ. कुळकर्णी यांनी १९८२ साली सुरू केलेल्या पारंपरिक वधू वर सूचक मंडळासोबतच ‘पवित्र विवाह‘ या ऑनलाइन मॅट्रिमोनीची बेसिक वेबसाइट सुरू केली. या नवीन कामाची जबाबदारी मी उत्साहाने उचलली. सैन्यात शिकलेलं कॉम्प्युटर आणि तांत्रिक विषयातील ज्ञान ही वेबसाइट आधुनिक करण्याकरिता कामी आले.
पवित्र विवाह हा ब्रँड बनविण्यासाठी मी विवाह मेळाव्यांचे आयोजन सुरू केले. फाइलमधील किंवा वेबसाइटवरील फोटो पाहून व्यक्तिमत्व उमगत नाही, टू बीएचके फ्लॅट, पाच आकडी पगार या व्यावहारिक गोष्टींसोबतच ज्या माणसासोबत आयुष्य काढायचं आहे त्याचं व्यक्तिमत्त्व समजून घेणं आवश्यक असतं. शिवाय, शॉर्टलिस्ट केलेल्या प्रत्येक स्थळाला भेटणं शक्य नसतं. वधू वर मेळाव्यात एकाच वेळी अनेक स्थळांना ते (फोटो फिल्टरशिवाय) प्रत्यक्षात दिसतात कसे, वागतात कसे, हे जवळून पाहता आणि ऐकता येतं. इंटरेस्ट वाटला तर दोन मिनिटे त्यांच्याशी बोलून पुढे जायचं की नाही याचा निर्णय घेता येतो. २६-२७ डिसेंबर २०१५ साली गोरेगाव नेस्को येथे आम्ही महाराष्ट्रातील पहिल्या भव्य वेडिंग फेस्टिवलचे आयोजन केले. एक हजार मुलं आणि त्यांचे पालक या मेळाव्यात सहभागी झाले होते. इतका मोठा इव्हेंट तोवर शादी डॉट कॉम या देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन मॅट्रिमोनीने देखील महाराष्टात केला नव्हता. या वेडिंग फेस्टिवलमधे लग्न जमविण्याचे कार्यक्रम तर होतेच, पण त्याशिवाय लग्न जमल्यावर लागणारे, लग्नाचा हॉल, कॅटरिंग, दागिने, साड्या, डेस्टिनेशन मॅरेज हॉटेल्स, हनिमून पॅकेज असे लग्नासंबंधी जे जे व्यवसाय आहेत त्यांचे स्टॉल्स एका छताखाली आणण्यात आले. सौ. कुळकर्णी यांच्या वधू वर सूचक मंडळचा कायापालट करताना माझ्यासोबत सौ. कुळकर्णी यांची मुलगी माणिक हिचा मोलाचा वाटा होता. वधू वर सूचक मंडळात इतरांची लग्न जमवत असताना माणिक आणि माझ्यात प्रेम फुलत गेले. आणि सौ. कुळकर्णी आणि माझ्या आईवडिलांच्या संमतीने २००७ साली आमचा ‘पवित्र विवाह‘ पार पडला. लग्नानंतर आम्हा दोघांचा या व्यवसायातील सहभाग आणखी वाढला. आधी आमचं ऑफिस ११ वाजता उघडायचं. या वेळेत उपवर मुले-पालक ऑफिसला जातात, त्यांना नावनोंदणी करायला फक्त रविवारी संधी मिळायची; त्यांच्यासाठी आम्ही रोज सकाळी आठ वाजता ऑफिस उघडायला सुरुवात केली, या निर्णयाचा खूप फायदा झाला. रविवारी उडणारी झुंबड कमी होऊन ऑफिसमधे येणार्या प्रत्येक ग्राहकासोबत आम्हाला संवाद साधता आला. आधी फक्त दादरलाच आमचं ऑफिस होतं. थोड्याच कालावधीत आम्ही बोरिवली, ठाणे, पुणे अशा आणखी तीन शाखा सुरू केल्या. आमच्या अविरत प्रयत्नांनी अनेक वर्षे घरगुती स्वरूपात असलेल्या व्यवसायाला कॉर्पोरेट चेहरा देण्यात यशस्वी झालो.
आमच्याकडे स्वतःचे किंवा पाल्याचे स्थळ नोंदणीसाठी आल्यावर आमचे एक्झिक्युटिव्ह त्यांचं स्वागत करतात. स्थळाची माहिती घेऊन त्यांच्या अपेक्षा विचारल्या जातात. त्यांना फॉर्म भरायला दिला जातो. मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक, पर्सनलाइज्ड सर्विस अशी आमची वेगवेगळी पॅकेजेस आहेत. फॉर्म भरला की, आमच्याकडील पन्नास हजारांहून अधिक नोंदणीकृत उपवर वधूवरांची प्रोफाइल्स त्यांना पहायला मिळतात. त्यांच्या अपेक्षेनुसार कॉम्प्युटर हजारो प्रोफाइलमधील सुटेबल मॅच प्रोफाइल्स काढून समोर ठेवतो. पसंतीला उतरलेली स्थळं शॉर्टलिस्ट करून ते त्यांचा इंटरेस्ट नोंदवू शकतात अथवा दिलेल्या संपर्कस्थळावर (ईमेल आयडी अथवा मोबाइल नंबर) संपर्क साधू शकतात.
आमच्या नवीन कॉर्पोरेट अवताराला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच अचानक कोविड अवतरला आणि इतर अनेक व्यवसायांसोबत विवाह मंडळांना देखील मोठा सेट बॅक बसला. इन्कम बंद असताना कर्मचार्यांचा पगार, न टाळता येणार्या इतर खर्चांचा मेळ बसवणे ही तारेवरची कसरतच होती. यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा वापर करून ‘पवित्र विवाह’चे मोबाइल अॅप लॉन्च केलं. फारच थोड्या कालावधीत ११ हजार अॅक्टिव युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आणि आमच्या व्यवसायाची गाडी पुन्हा सुसाट धावू लागली. संस्थेत १४ सहकारी काम करत आहेत. मी मार्केटिंग, जनसंपर्क, मीडिया सांभाळतो, सौ. माणिक कुळकर्णी-कदम या अकाऊंटस् आणि मेळावे आयोजन यांचं काम पाहतात. माणिकचा भाऊ आनंद कुळकर्णी हे एचआर विभाग सांभाळतात. माणिक आणि मी एक युनिट म्हणून काम करतो, त्यामुळे घरच्या व संस्थेच्या जबाबदार्या लिलया पार पाडू शकतो. मला वाटतं एकमेकांवर आणि विवाहसंस्थेवर असलेला आमचा प्रगाढ विश्वास, इतरांची लग्न जुळवण्यातही उतरतो. गेल्या चाळीस वर्षांत ‘एक लाखापेक्षा जास्त’ लग्न जमवणारी अग्रगण्य विवाहसंस्था म्हणून आमची ओळख आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, ऑलिंपिकमधे भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, चित्रपट, मालिका, नाटक यातील सेलिब्रिटी, उद्योजक, व्यवसायिक अशा अनेकजणांचे विवाह इथे जमले. सत्तावीस वर्षांपूर्वी आमच्या विवाहसंस्थेत लग्न जमलेलं एक जोडपं, आम्ही आमच्या मुलीची नोंदणी फक्त तुमच्याकडे करायला आलो आहोत हे सांगून फॉर्म भरून गेले. अशा हजारो यशस्वी विवाहांचा एक भाग होता आलं याचा आम्हाला अभिमान आहे.
असं म्हणतात की, वन्स अ सोल्जर, ऑल्वेज अ सोल्जर… हृषिकेश आता सैन्यात नसले तरीही त्यांचं देशसेवेचं व्रत अजूनही सुरू आहे. विवाहसोहळ्यात वाया जाणारे अन्न गरजवंताला मिळवून देण्यासाठी त्यांनी मुंबईच्या चारशे डबेवल्यांसोबत मिळून ‘फूड फॉर ऑल‘ हे स्टार्टअप सुरू केलं. लग्न किंवा पार्टी जिथे अन्न उरलं आहे तेथील माणसं अॅप, वेबसाइट किंवा फोनद्वारे करून कळवतात, मग हृषिकेश आणि त्याची टीम त्यांच्याकडून अन्न जमा करून ते गोरगरीबांना वाटते. अनेक मराठी तरुणांना व्यवसाय सुरू करताना अडचणी येतात, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘उद्यमी महाराष्ट्र‘ हा विनामूल्य बिझनेस प्लॅटफॉर्म हृषिकेशने सुरू केला आहे. व्यावसायिकाने व्यासपीठावर जाऊन विविध क्षेत्रातील दोनशेहून अधिक उद्योजकांच्या समोर त्याच्या व्यवसायाबाबत एका मिनिटात सांगणे अशी ही योजना आहे. यामुळे नवीन व्यावसायिकाला एकाच वेळी अनेक उद्योजकांपर्यंत पोहचता येतं. या एक मिनिटांच्या बिझनेस स्पीचचे प्रसारण विविध वृत्तवाहिन्यांवर करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जातात.
लग्न म्हणजे केवळ वंश चालवण्याची व्यवस्था नव्हे, तर आयुष्यभरातली सुख-दु:खं वाटून घेणारा साथीदार हवा म्हणून लग्न करायचं असतं. विभक्त कुटुंबात स्वत:ला आलेलं किंवा दिलं गेलेलं महत्त्व, बदलती जीवनशैली, एकच बाजू दाखविणारी समाजमाध्यमे आणि जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा या कारणांमुळे लग्न होऊन चार-सहा महिन्यांतच लग्न मोडण्याच्या अनेक घटना आजूबाजूला दिसतात. गेल्या काही वर्षांत लग्नाच्या गाठी सैल झालेल्या दिसतात. म्हणूनच लग्न जुळवण्यासोबत ती टिकली पाहिजेत या सामाजिक जाणिवेतून, पवित्र विवाह आणि निलय वैद्य यांची माय मातृभूमी फाऊंडेशन, प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ राजेंद्र बर्वे, फॅमिली कोर्ट मधील कायदेतज्ञ शाल्मली पुरव यांना सोबत घेऊन समुपदेशनाचे कार्यक्रम आयोजित करतात. या व्यवसायात फक्त टेक्नॉलॉजीवर विसंबून राहून चालणार नाही. जनसंपर्क, नेटवर्किंग ही तुमची बलस्थाने असतील तर लोकांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या या व्यवसायात तुम्हाला उत्तम भविष्य आहे. शादी का लड्डू, खाये वो पछताये और ना खाये वो भी पछताये अशी म्हण आहे; पण जोवर रोज देखणे लाडू पाहण्यापेक्षा, एकदा तरी लाडू खाऊन पाहणार्यांची संख्या जास्त आहे तोवर लग्न जमविण्याच्या व्यवसायाची मिठ्ठास कायम राहील.