शिवसेनेत झालेल्या तथाकथित बंडामागे नेमके काय हेतू आहेत, शिवसेना इतक्या क्रूर पद्धतीने संपवून टाकण्याचा डाव का टाकण्यात आला आहे, एकेकाळी मित्रपक्ष म्हणवणारा आणि शिवसेनाप्रमुखांच्या करिश्म्याचा वापर करून राज्यभर पसरलेला भारतीय जनता पक्ष आता अक्राळविक्राळ जबडा वासून शिवसेनेचा थेट घासच घ्यायला का निघाला आहे?… सर्वसामान्य शिवसैनिकांच्या आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयत, सुसंस्कृत आणि लोकहिताची काळजी घेणार्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीने त्यांच्याविषयी आदर निर्माण झालेल्या राज्यातील अनेकांच्या मनात या प्रश्नांचं मोहोळ उठलं आहे… या प्रश्नांची अनेक गुंतागुंतीची उत्तरं आहेत… त्यातलं एक उत्तर सोपं आहे… शिवसेनेचं आणि पर्यायाने मराठी माणसाचं मुंबईवरचं वर्चस्व संपुष्टात आणायचं आणि मुंबई महाराष्ट्रात असूनही महाराष्ट्राची राहणार नाही, अशी रचना करायची… ५० वर्षांपूर्वीही शिवसेना लढतच होती, तेव्हाचे हल्ले वेगळे होते, हल्लेखोर वेगळे होते; पण बिकाऊ प्रसारमाध्यमांच्या टीकेपासून सत्तेच्या मस्तीपर्यंत बाकी सगळे शत्रू तेच आहेत, तसेच आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे… मात्र, शिवसेना तेव्हाच्याच जिगरीने या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे… तिला बाकी काही नको… फक्त मराठी माणसांचा आशीर्वाद हवा आहे… तो पाठिशी असला की शिवसेना या सगळ्या नतद्रष्टांना पुरून उरेल!