□ गोव्यात भाजपचे ‘ऑपरेशन कमळ’ फसले… काँग्रेसचे लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी.
■ महाशक्तीचा फुगा फुस्स!
□ राज्यपालांची तत्परता चमत्कारिक- शरद पवार यांची टीका.
■ त्यांना भाज्यपाल उगाच म्हणतात का?
□ उठसूट सर्वच निर्णय रद्द करायचे नसतात- अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका.
■ असं कसं दादा, राज्याचं काही भलं झालं आणि महाविकास आघाडी सरकारला श्रेय मिळालं तर कसं चालेल यांना.
□ सोनिया गांधी यांना ईडीचे पुन्हा समन्स.
■ ईडी झाली येडी असं एक वगनाट्य लिहायला हवं आता.
□ अबब! हिंदुस्थान सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरणार. वर्षभरात चीनला मागे टाकणार. संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज.
■ वाह मोदीजी वाह!… चीनला आपण कशात तरी मागं टाकलं म्हणून आता भक्तगण मोदीजींनाच क्रेडिट देणार ना!
□ श्रीलंकेतील राष्ट्रपती भवन बनले पिकनिक स्पॉट.
■ त्या देशात आता तेवढीच एक ऐषोआरामाची जागा उरली आहे.
□ जपानच्या निवडणुकीत हत्या झालेल्या आबे यांचा पक्ष विजयी.
■ गड आला, पण सिंह गेला
□ असंतुष्ट मुले रायफल कुठे वळवतील हे सांगू शकत नाही- मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मोदी सरकारवर निशाणा.
■ त्यासाठीच तर त्यांच्या हातात रायफली सोपवायच्या आहेत.
□ सूत्रधाराशी संबंधाच्या आरोपामुळे राणा दाम्पत्य अडचणीत. अमरावतीचे उमेश कोल्हे हत्या प्रकरण.
■ आता त्यांचं सरकार आलंय, आता कसलीही अडचण नाही.
□ भर पावसात निवडणुका नकोत- भाजपाचे राज्य निवडणूक आयोगाला साकडे.
■ ‘त्या एका’ पावसाळी सभेची धास्ती अजूनही मनात आहे त्यांच्या.
□ विजय मल्ल्याला ४ महिने कारावास, दोन हजारांचा दंड.
■ किती कठोर शिक्षा… शंभरेक रुपयांत सोडा गरिबाला!
□ सीएनजी आणि घरगुती पाइप गॅसच्या दरात मोठी वाढ.
■ आपल्या देशात दरवाढ ही बातमी राहिलेली नाही… एक दिवस ती झाली नाही तर लोक चुकचुकतील.
□ नवीन अशोकस्तंभामध्ये खवळलेला रागीट सिंह; केंद्राकडून इतिहासात फेरफार; विरोधकांकडून टीका.
■ हाच तो ‘नया भारत’ आहे… सम्राट अशोकाचा वारसा खोडून काढल्याशिवाय तो पुढे जाणार कसा?
□ शिवराज चौहान यांना थंड चहा दिला म्हणून अधिकार्याला नोटीस. शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देत खुलासा मागवला.
■ गरम चहाने तोंड भाजलं असतं तरी नोटीस दिलीच असती महाराज शिवराजांनी!
□ भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षाचा बेडरूम व्हीडिओ व्हायरल.
■ पेगासस चुकून भलत्याच फोनमध्ये बसवलं की काय!
□ अंबरनाथमध्ये हॉस्पिटलवर दरोडा. रुग्णांना खोलीत डांबले. एक कोटीचा ऐवज घेऊन चोर पसार.
■ खर्या अर्थाने जीवघेणा दरोडा म्हणायला हवा हा!
□ विरोधकांची सरकारे बरखास्त करणार्यांची सत्ता जनता उलथवेल- शरद पवार यांचे भाजपवर शरसंधान.
■ पण, त्यासाठी लोक अफूच्या गुंगीतून बाहेर तर पडले पाहिजेत…
□ केंद्र विरुद्ध दिल्ली सरकार वाद पुन्हा घटनापीठापुढे. प्रशासकीय सेवांवरील नियंत्रणावरून मतभेद.
■ संघ सरकार राज्य सरकारच्या अधिकारांत ढवळाढवळ करणारं असलं की मतभेद तर होणारच.
□ लोकशाहीत पोलीस राज नको! -सुप्रीम कोर्ट; जामीन सुलभ करण्यासाठी विशेष कायदा करा.
■ जामीन न्यायालयंच देतात ना; अकारण डांबलेल्या आरोपींना आपल्या अधिकारात जामीन द्या की! नुसत्या सुविचारांनी काय होणार?
□ तुम्ही कोणालाही मंत्री म्हणून शपथ देणे घटनाबाह्य- शिवसेनेचे राज्यपाल कोश्यारी यांना पत्र.
■ ते फक्त त्यांच्या पक्षाचीच अलिखित घटना मानतात.
□ भारताचा रुपयाच कसा गडगडतोय? तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा मोदींना सवाल.
■ अहो, त्यातही नेहरूंचाच दोष असणार… व्हॉटसअप विद्वानांना विचारा जरा.
□ ओबीसी आरक्षणाचा निर्णय लांबणीवरच. नव्या निवडणुका जाहीर करू नका, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
■ आता पक्षांनीच आरक्षणं द्यावीत हा तिढा सुटेपर्यंत.
□ संघर्षाची तयारी ठेवा. आपल्याला लढायचे आहे!- माजी आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन.
■ लढणं हाच तर शिवसेनेचा स्वभाव आहे, बाणा आहे आणि संकटांच्या अंगावर धावून जाणे, हेच तर तिचं वैशिष्ट्य आहे.