श्रीलंकेची उपासमार सुरु झाल्यावर लोकांनी राज्यकर्त्यांची भाजावळ सुरू केली. भर पावसात राज्यकर्त्यांच्या मालमत्तांचे वणवे पेटले. अध्यक्ष गोतबाया सिंगापूरला विमान भरून डॉलर्स घेऊन गेले. त्यांच्या जागी पंतप्रधान रनील विक्रमसिंगे हे हंगामी अध्यक्ष बनले आहेत. त्यांना संतप्त जनता कसा प्रतिसाद देणार हे सर्वप्रथम अन्न कुठून आणणार यावर अवलंबून आहे. नाही तर इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. ही धग आता भारतातही जाणवू लागली आहे. बेकारी, महागाई हे जागतिक प्रश्न झालेले आहेत. भारतात अशा परिस्थितीत (श्री) लंकेच्या पार्वतीने भुकेलेल्यांचे लोंढे पाठवले तर…
– – –
रामायणकाळापासून भारताला लंका परीचित आहे. लंकेचा राजा रावण हा देवांच्या खजिन्याचा खजिनदार असलेल्या कुबेराचा भाऊ असल्याने, लंका ही सुवर्णनगरी म्हणूनच प्रसिद्ध होती. भारताप्रमाणेच श्रीलंकासुद्धा इंग्रजांच्या साम्राज्याचा भाग होती. भारत स्वतंत्र झाला आणि सहा महिन्यांच्या आत (४ फेब्रुवारी १९४८ रोजी) लंकेलाही स्वातंत्र्य मिळाले. दोन्ही देश ब्रिटिशांनी लुटलेले, गरीब, निरक्षर, शेतीप्रधान, थोडक्यात सर्वस्वी मागासलेले. इंडियाचा भारत आणि सिलोनचा श्रीलंका झाला. ‘श्री’चा अर्थ संपत्ती, वैभव आणि कीर्ती असा आहे. आज हा देश सर्वंकष अराजकाने ग्रस्त, कर्जबाजारी, भुकेकंगाल आणि कुपोषितच नव्हे तर सरकारघोषित नादार झाला आहे.
कधीकाळी कवींनी त्याला हिंदी महासागरातला मोती म्हणून गौरविले. भावुक कवींनी त्याला अश्रूची उपमा दिली. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर त्या देशाचे पायच धूत नाहीत, तर संपूर्ण देशालाच जणू शुचिर्भूत करतात, सचैल स्नान घालायला सदैव सज्ज असतात. मनमोहक सागरकिनारे, हिरवागार परिसर, भरपूर वन्य प्राणी, ना अति थंड, ना अति उष्ण, असे हवामान… म्हणून पर्यटकांचे नंदनवनच. जगाला आकर्षित करणारा देश अशी श्रीलंकेची जगभर ख्याती झाली होती. २०१८ साली तर आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी घातलेली ‘मध्यम उत्पन्न देशाची’ (वार्षिक दरडोई ४००० डॉलर्स) सीमाही या देशाने पार केली होती. भारताच्या सुमारे दुप्पट अशी ही उंची होती. आज त्याच देशावर जगापुढे हात पसरण्याची नामुष्की आली आहे. भीक म्हणणे असंसदीय ठरवले जाईल, आपण माधुकरी ही सुसंस्कृत शब्द वापरूया- ती मागण्याची पाळी या देशावर आली आहे. देशातील लक्ष्मीच नाहीशी झाल्यामुळे ही श्रीलंकाच आता लंकेची पार्वती झाली आहे!
महाभारतात अर्जुनाच्या ध्वजाला कपिध्वज असे नाव होते. कपि म्हणजे वानर. हा सामान्य शेपूटवाला वानर नव्हता. ब्रह्मांडाला वेढे घालणारा वज्रपुच्छधारी हनुमान होता. श्रीलंकेच्या ध्वजावर व्यापून राहिलेला सोनेरी रंगाचा खड्गधारी केसरी म्हणजे सिंह आहे. सिंहली बौद्ध आहेत. तिथे तामिळी (हिंदू आणि मुस्लीम) नागरिकही आहेत. नारिंगी पट्टा हिंदू दर्शवितो. मुस्लिमांसाठी हिरव्या रंगाचा पट्टा तर ख्रिस्ती बांधवांचे अस्तित्व किरमिजी रंगाने दाखवले आहे. स्वातंत्र्याला २४ वर्षे लोटल्यावर, १९७२ साली हा मोती किंवा अश्रूस्वरूप देश ‘सार्वभौम प्रजासत्ताक’ झाला. मुख्य भाषा दोनच सिंहली आणि तमीळ. बौद्धधर्मीय ७०.२, हिंदू १२.६, मुस्लीम ९.७, तर ख्रिश्चन ७.६ अशी धर्मवार नोंदणी आहे. वंश, धर्म, भाषा भिन्न असल्या तरी घटनेत सर्वांसाठी समभाव आहे. भारताप्रमाणेच निवडून आलेली सरकारे निर्माण झाली. घटनेत समाजवादी असा शब्दही आहे.
प्रत्यक्षात हा मोती पाणीदार देखणा असला, तरी सिंहली बौद्ध आणि हिंदू तामीळ यांच्यात सौहार्दाचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ नव्हते. मुळात एका प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मिळतच नाही. सिंहली भाषा संस्कृतोद्भव आहे. म्हणजे ती भारतातूनच गेली असावी. भारतात कुठेतरी सिंहली भाषक लोक आढळतात का? म्हणजे ही भाषा आली कुठून? मालदीवमधून काही लोक आले, त्यांच्यातील संबंधांमुळे ही नवीनच भाषा जन्माला आली का? सिंहली लोकांची चेहरेपट्टी दक्षिण भारतीय वळणाची दिसते. लंकेचे क्रिकेटपटू भारताविरुद्ध आमने सामने क्रिकेट खेळताना एक जाणवते की गणवेश भिन्नता नसेल तर खेळाडूंमध्ये फार फरक दिसत नाही. श्रीलंकेचे खेळाडू तमीळनाडूच्या संघातून खेळले तर एकाच टीमचे सभासद वाटतील (एखाद दुसरा अपवाद). आणखी एक निरीक्षण नोंदविले पाहिजे- सिंहली बौद्ध आणि हिंदू तामीळ यांच्यातील संघर्ष जसा प्रकट होतो तसा सिंहली आणि ख्रिश्चन वा मुस्लीम यांच्यातला वाद कधी तीव्र झाल्याचे दिसत नाही.
करोनात मृत्यू पावले ते सर्वधर्मीय होते, भाषा, वंश, असा भेदाभेद करोनाने केलेला नव्हता. कट्टर मुस्लीम असोत वा ख्रिश्चन- या सर्व अल्पसंख्यांचे दहनच झाले होते. नाराजी होती पण तिने स्फोटक परिस्थिती निर्माण झाली नाही. धार्मिक, भाषिक वाद डोकं वर काढणारच. कधी सिंहली भाषक आक्रमक बोलतात, तर कधी ख्रिश्चनांना इंग्रजीला प्राधान्य हवे असते. अगदी शिक्षण इंग्रजीतच हवे इथपर्यंत मागणी होते. तामिळी लोकांना तर आपली भाषा संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचा अभिमान वाटतो. जाफना (उत्तर श्रीलंका) प्रांतातील तामीळ भाषिकांनी तर स्वतंत्र देशाचीच मागणी केली. त्यातून वेलुपिलई प्रभाकरनच्या एलटीटीई या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला.
श्रीलंका भारतापासून हाकेच्या अंतरावरील देश (जेमतेम ५० किमी अंतरावरचा). भारताशी रामकथेने कायम्ाचा जोडलेला. एलटीटीईच्या उदयानंतर या देशाचे भारताशी संबंध व्यामिश्र झाले. भारतात इंदिरा गांधी पंतप्रधापदी विराजमान असताना त्यांची हत्या झाली. राजीव गांधी माजी पंतप्रधान व विरोधी पक्षनेते असताना निवडणूक प्रचारादरम्यान त्यांचा तामिळी आत्मघाती दहशतवाद्यांनी जीव घेतला. श्रीलंकेतही १९५९ साली पंतप्रधान बंदरनायके आणि १९९३ साली प्रेमदासा रणसिंगे यांची रणसंग्रामात शत्रूकडून नव्हे तर स्वकियांनीच हत्या केली.
प्रभाकरनने स्वतंत्र तामीळ ईलमची मागणी केली, तेव्हा भारतातून म्हणजे मुख्यतः तमीळनाडूतून त्या फुटीर (देशद्रोही) चळवळीला मदत मिळत होती. चक्क फूस होती. बंडखोर तामीळ वाघांना प्रशिक्षणाची सोय भारतभूमीमध्ये होत होती. प्रभाकरनने श्रीलंकेत स्वतःचे लष्कर, नौदल, वायुदलही संघटित केले. महाभारतातली यादवी युद्धात तलवार हे शस्त्र होते, तर रावणाच्या श्रीलंकेतले तमीळ वाघ बंदुका-तोफा घेऊन बॉम्बसह लढाईत उतरले होते… त्या देशाच्याच लष्कराविरुद्ध. त्यांचा संपूर्ण नाश व्हायला चक्क दोन तपांहून जास्त काळ गेला. हा खात्मा केला तो आत्ता परागंदा झालेले (सिंगापूरला पळून गेलेले) अध्यक्ष गोतबाया राजपक्षे यांचे बंधू, पंतप्रधान महिंद राजपक्षे यांनीच. श्रीलंकेच्या प्रखर राष्ट्रवादाचे ते नायक ठरले. पंतप्रधानपदासह त्यांच्या घरातले इतर सहा सातजण मंत्रिमंडळात होते. भ्रष्टाचार रान वाढते तसा वाढत होता. तरीही २०१०नंतर देशात सुबत्ता येऊ लागली होती. विक्रमी मताधिक्य मिळवून राजपक्षे सत्ताधीश म्हणून मिरवीत होते. जेमतेम सव्वा दोन कोटी लोकसंख्या असलेला देश, क्षेत्रफळाने हरयाणापेक्षाही छोटा- नागालँड आणि पंजाब मिळून होईल एवढा. कुपोषण, भूक निर्देशांक, दरडोई उत्पन्नात भारतालाही मागे टाकणारा देश अशी त्याची अलीकडच्या काळात चर्चा होत असे (क्षेत्रफळ, लोकसंख्या यांचा विचार न करता). हा मुख्यतः शेतीप्रधान देश (तांदूळ, चहा, दालचिनी). जागतिक चहा निर्यातीत श्रीलंकेचा वाटा २५ टक्के कापड उद्योगही चांगला. परिणामी औद्योगिक उत्पन्नाचा एकूण घरेलू उत्पादनात वाटा २५ टक्के होता.
सेवा क्षेत्र भरभराटीला आले ते पर्यटनावर भर देऊन. नको इतका भर पर्यटनावर दिला गेल्याने अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडले. परकीय चलन मिळवण्याचा मुख्य भार पर्यटनावर अवलंबून राहिला. चंगळवादी मध्यमवर्ग वाढत होता. मधल्या काळात राजपक्षे यांचा पक्ष पराभूत झाला (२०१५), मैत्रीपाला श्रीसेना-रानील विक्रमसिंगे यांचे संयुक्त सरकार आले. आर्थिक सुधारणा, परकीय गुंतवणूक इत्यादि स्थिरस्थावर होत असतानाच ईस्टरच्या सणाच्या दिवशीच रविवारी चर्चमध्ये व हॉटेलांसह अन्य ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले. २७० हा मृतांचा अधिकृत आकडा. पर्यटकांनी चंबूगबाळे उचलले ते आजतागायत. यातून सावरण्याचा आधीच कोरोनाने हातपाय पसरले. हा दहशतवादी विषाणू भूमीतून न उगवता हवेतून पसरू लागला. जगभर काही कोटींचे बळी गेले. सरकारजवळचे परकीय चलन पसार होऊ लागले. दुष्काळात तेरावा महिना नव्हे, तर पुढचे सगळेच महिने सरकारी धोरणाने दुष्काळी ठरले.
राजपक्षेना एकदम उबळ आली ती जैविक शेतीची. हरित पालापाचोळा, कंपोस्ट मलमूत्रावर आधारित शेती केली की परकीय चलनाची गरजच काय? कीटकनाशकेही नकोत हे ओघानेच आले! इमारतींवरची टांगती शेती व गच्चीतले फळभाज्यांचे मळे देशाला अन्नसुरक्षा मिळवून देतील हे मनोरथ त्यांच्या मनात असावेत. जैविक शेती आपले चार पिढ्यांपूर्वीचे लोक करीतच होते ना? भौतिक सुबत्ता, औद्यौगीकरण, शहरीकरण, वाढत्या लोकसंख्येला विविध प्रकारचा पोषक अन्नपुरवठा करणे जैविक शेतीतून सध्या तरी अशक्य आहे. एक किलो युरिया वापरुन जेवढा नत्रपुरवठा होतो, तेवढ्याच नत्रासाठी दहा किलो शेणखत लागते. मांसाहार वाढतो, शेतीचे यांत्रिकीकरण होते, शेणामातीत हात बरबटवून घ्यायला नकार देणारा शिकलेला शेतकरी कुटुंबातला तरूण आत्मनिर्भर होण्याऐवजी अत्याधुनिक व्हायचे म्हणतो. जे भारतात तेच श्रीलंकेत. हाती परकीय चलन नाही, त्यात जैविक शेतीतून २०-२५ टक्के उत्पादन घटले. करोनाने सर्व समाजाची हालचाल बंद झालेली. घरात बसून कुटुंबातल्या कुटुंबात खोखो खेळून निभाव कसा लागणार? पेट्रोल नाही, डिझेल नाही, हातात पैसा नाही, दुकानात माल नाही. जागतिक सावकारांचे जास्त व्याजाने काढलेले कर्ज फेडण्यासाठी नवीन सावकाराच्या शोधात सरकारने जग पालथे घालूनही कुणी कर्ज द्यायला तयार नाही.
कर्ज देण्यासाठी आईचे दागिने गहाण ठेवणारे करंटे महाभाग असतातच. श्रीलंकेवरचे कर्ज वाढत वाढत ५२ अब्ज डॉलर झाले. सव्याज कर्जहप्ता ४.५ अब्ज डॉलर्सवर होता २०१७ साली. तो झाला ६.१ अब्ज डॉलर्स. परकीय चलन साठाफक्त उरला दोन अब्ज डॉलर्स. युक्रेन-रशिया युद्ध सुरू होऊन काही महिने झाले. जागतिक पुरवठा खंडित झाला. साखळी तुटली. गहू विकण्याचे करार भारतानेही रद्द केले. युद्धात गुंतलेले देश पुरवठा कसे करणार? रशिया-युक्रेन हे जगाला गहू पुरवणारे देश.
श्रीलंकेची उपासमार सुरु झाल्यावर लोकांनी राज्यकर्त्यांची भाजावळ सुरू केली. भर पावसात राज्यकर्त्यांच्या मालमत्तांचे वणवे पेटले. अध्यक्ष गोतबाया सिंगापूरला विमान भरून डॉलर्स घेऊन गेले. त्यांच्या जागी पंतप्रधान रनील विक्रमसिंगे हे हंगामी अध्यक्ष बनले आहेत. त्यांना संतप्त जनता वâसा प्रतिसाद देणार हे सर्वप्रथम अन्न कुठून आणणार यावर अवलंबून आहे. नाही तर इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा.
ही धग आता भारतातही जाणवू लागली आहे. बेकारी, महागाई हे जागतिक प्रश्न झालेले आहेत. भारतात अशा परिस्थितीत (श्री) लंकेच्या पार्वतीने भुकेलेल्यांचे लोंढे पाठवले तर…
मो. ९८२००७१९७५