आजोबांनी कॉट खालून एक पत्र्याची पेटी काढली आणि त्यातला एक अल्बम जयराजसमोर धरला. अल्बममध्ये केशवच्या चार पाच नाटकांतले, त्याने स्वत:साठी काढून घेतलेले असे बरेच फोटो होते. हे त्याच्या शेवटच्या नाटकातले काही व्हिडिओ. आता ह्याच आठवणी उरल्या आहेत केदारकडे. सतत हे व्हिडिओ लावून बसलेला असतो मामाची आठवण काढत.’ जयराजसमोर एक पेन ड्राइव्ह धरत आजोबा म्हणाले. तेवढ्यात जयराज अचानक एका फोटोपाशी अडखळला. ऊग्र चेहरा करून हातात बत्ता धरलेल्या केशवचा फोटो होतो तो.
– – –
‘मे आय..’
‘ये ये…’
स्पेशल ऑफिसर जयराज कमिशनर कडू साहेबांच्या केबिनमध्ये शिरला. तेव्हा कडू साहेब दरवाज्याकडे बघत, हातातल्या पेनाने डोक्यावर खारका मारत बसले होते. त्यांच्या चेहर्यावरून ते अगदी आतुरतेने जयराजची वाट बघत असावेत असे वाटत होते.
‘बस जयराज… काय घेणार?’
‘केस…’ जयराज मिश्किलपणे म्हणाला आणि केबिनमध्ये वातावरण जरा हलके झाले.
‘येस येस! त्यासाठी तर तुला खास बोलावून घेतले आहे. अगदी साधी केस रे, पण इतकी विचित्र वळणे घेईल असे वाटले देखील नव्हते.’
‘मी केस वाचली आहे सर. पण तुमच्या तोंडून पुन्हा एकदा सर्व काही नीट ऐकायला आवडेल मला.’
‘शुअर शुअर… तर जयराज, एक खून आणि खून होताना प्रत्यक्ष बघणारा साक्षीदार असे साधे सोपे गणित असून देखील आपण खुन्याला पकडू शकलेलो नाही… आणि आता असं दिसतंय की खुनी कधी पकडलाच जाणे शक्य नाही.’
‘असे का सर? गुन्हेगार कितीही चतुर असला तरी..’ त्याला हाताने थांबायची खूण करत कडू साहेब उठले आणि त्यांनी टेबलावर पडलेला एक रिपोर्ट जयराजच्या हातात दिला.
‘तू यायच्या जस्ट दहा मिनिटे आधी हा रिपोर्ट आलाय. डेड बॉडीवर आपल्याला खुन्याचे जे डीएनए सॅम्पल सापडले होते, ते आपल्या रेकॉर्डवर असलेल्या एका गुन्हेगाराशी मॅच झालेत.’
‘दॅट्स ग्रेट न्यूज सर!’
‘नथिंग ग्रेट! ज्या गुन्हेगाराशी हे डीएनए मॅच झालेत त्याला फाशी देऊन ११ वर्षे उलटून गेली आहेत!’
‘काय??’
‘मी देखील मनातल्या मनात दहा वेळा किंचाळून झाले आहे…’ हताशपणे कडू साहेब उद्गारले.
‘मला केसबद्दल सविस्तर माहिती द्या सर.’
‘करण तनेजा म्हणजे आमच्या ह्या छोट्या शहराची शान होती. इथे बसून त्याने अनेक कलाकारांची कारकीर्द घडवली. ह्या छोट्या शहरात प्रयोग बसवायचे आणि मुंबई-पुण्यासारख्या रसिक कलाकारांसमोर ते सादर करून भरभरून दाद मिळवायची हे जणू त्याचे व्यसनच होतं म्हणा ना. अशा हरहुन्नरी माणसाचा त्याच्याच तालमीच्या
हॉलमध्ये खून झाला.’
‘खून कसा करण्यात आला?’
‘मागच्या बाजूने डोक्यात बत्ता घालण्यात आला. एकाच घावात कवटी फुटली आणि…’
‘खुनाला एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पण आहे ना?’
‘हो आहे ना. चहावाला मुलगा रघू. त्याने खुन्याला पळताना पाहिले आहे. हातात रक्ताळलेला बत्ता घेऊन तो पळाला. आम्ही रघूला व्यवस्थित सांभाळून घेत, धीर देत हळूहळू त्या खुन्याचे वर्णन मिळवले आणि त्याचे स्केच काढून घेतले.’
‘पुढे?’
‘खूप शोध घेतला, पण हाताला काही लागलं नाही. मात्र कालच एका दर्दी रसिकाने ह्या स्केचची ओळख पटवली. संशयित मनुष्याचे नाव केशव आहे आणि तो एक कलाकार आहे, एवढंच कळू शकलं. खूप वर्षापासून त्याला शहरात कोणी फारसं बघितलं नाहीये.’
‘आणि हा केशव म्हणजे तोच गुन्हेगार जो ११ वर्षापूर्वी फासावर चढलाय?’
‘येस! डीएनए मॅच झाला तेव्हाच त्याचा फोटो देखील समोर आला. स्केचमधला गुन्हेगार आणि तो फोटो व्यवस्थित जुळतात. फेस मॅच ८५ पर्सेंट इतका आहे.’
‘या गुन्हेगाराची काही माहिती काढली?’
‘मी फाइल मागवली आहे.’
‘एकसारख्या चेहर्याची माणसे, हुबेहूब बापासारखा दिसणारा मुलगा अशी काही फिल्मी गंमत ह्यात असेल असे वाटत नाही. ह्याला एखादा जुळा भाऊ वगैरे असण्याची शक्यता?’
‘ते सगळं आता त्याची फाइल आल्यावरच कळेल. देशमाने हेड ऑफिसच्या ईमेलचीच वाट बघत आहेत.’
काही वेळातच देशमाने प्रिंट काढलेले चार कागद घेऊन हजर झाले.
‘काय चाललंय काही कळत नाहीये सर..’
‘म्हणजे? काय म्हणते केशवची माहिती?’
‘हा केशव साधारण चौदा वर्षापूर्वी तनेजाच्याच ग्रुपमध्ये एक साधारण कलाकार म्हणून काम करायचा. दिसायला देखणा असला तरी अभिनयाच्या नावाने बोंब होती. मुंबईतील एका प्रयोगात त्याची आणि नाटकाच्या हिरॉईनची बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात बत्ता घातला. त्यांच्यातल्या वादाबद्दल सर्वांना माहिती होतंच. पोलीस तपासात इतरही अनेक पुरावे मिळाले, स्वत: केशवने देखील गुन्हा कबूल केला. नंतर कोर्टात मात्र तीन महिन्यात त्याने गुन्हा नाकारला. पण साक्षी आणि पुरावे दोन्ही भक्कम असल्याने त्याला फाशी झाली.’
‘केशवच्या कुटुंबाची काही माहिती?’
‘त्याला एक आई तेवढी होती. बाप लहानपणीच गेलेला आणि अशा फाटक्या, अभिनयाच्या वेडामागे धावणार्या तरुणाला पोरगी कोण देणार?’
‘बाहेर एखादे लफडे?’
‘ज्या मुलीचा त्याने खून केला, तिच्याशीच त्याचे लफडे होते अशी कुजबूज ह्या केसच्या वेळी चालली होती. त्याने तिला तनेजाबरोबर नको त्या अवस्थेत पाहिले आणि…’
‘ओक्के! आले लक्षात.’
‘ह्या केसमध्ये तनेजाचा रोल?’
‘एकदम सरळ. त्याने स्वत: केशवसाठी नावाजलेला वकील दिला होता. आपल्यामुळे एका तरुणीचा हकनाक जाrव गेला, ही गिल्ट त्याला सतत जाणवत होती म्हणे. तो दोन वेळा केशवला बघायला देखील आल्याची नोंद आहे तुरुंगात.’
‘एवढं सगळं होऊन देखील त्याचा तनेजावर राग नव्हता?’
‘तेच काही कळत नाही सर. तनेजाने देखील त्याला वाचवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. स्वत: त्याच्या बाजूने साक्ष देखील दिली.’
‘मला ह्या केसची पूर्ण फाइल हवी आहे. केसचे सरकारी वकील कोण होते?’
‘बावडेकर… रमेश बावडेकर.’
‘ठीक आहे सर. मी एकदा ह्या बावडेकरांना भेटतो आणि खुनाची जागा देखील डोळ्याखालून घालतो. होप फॉर गुड…’
‘ऑल द बेस्ट जयराज! ह्या केशवच्या भुताला तू नक्की शोधशील ह्याची खात्री आहे मला.’
– – –
’ओ हो हो.. दॅट ब्लडी डॅम केस. कशी विसरणार मी ती केस? त्या केसमध्ये मी अजय वर्मासारख्या नावाजलेल्या बॅरिस्टराला धूळ चारली होती. प्रचंड मानसन्मान मिळवला होता. आज हे जे ऐश्वर्य दिसतंय, ते त्या केसचेच आशीर्वाद आहेत मिस्टर जयराज.’ बावडेकर जयराजच्या हातात चहाचा कप देत म्हणाले.
‘केसबद्दल तुमचं स्वत:चं काय मत आहे? कदाचित केशव निर्दोष असण्याची काही शक्यता?’
‘नो वे! सरळ सरळ ओपन अँड शट केस होती. ही केस लढवायला वर्मासारखा वकील तयार कसा झाला हेच आश्चर्य आहे.’
‘पण तरी ही केस कोर्टात एक वर्ष अकरा महिने चालली?’
‘वेल ! जयराज खरं सांगायचं, तर ही केस आधी वाटते तेवढी सरळ नव्हती. काही बळकट पुरावे आम्हाला उशिराने मिळाले. वर्मा कधीही केस फिरवू शकतील अशी परिस्थिती पहिले तीन महिने होती. तीन महिन्यांत केशवने देखील आपला कबुलीजबाब फिरवला होता. मात्र त्यानंतर आम्हाला केशवचे रक्ताने माखलेले कपडे मिळाले, तो बत्ता देखील मिळाला. त्यावर केशवचे ठसे मिळाले आणि आमचं काम सोपं होत गेलं.’
‘येस! मी ती केस, तिचा तपास आणि न्यायालयीन कामकाज सगळं नीट वाचले आहे. पण मला एक उमगत नाहीये की, खुन्याला अटक केल्यानंतर पहिल्या तपासात न मिळालेले पुरावे अचानक कसे काय सापडत गेले?’
‘वेल… तपास अधिकारी एकदा सहज बोलताना म्हणाले होते की त्यांना दोन्ही वेळा निनावी फोन आला होता.’
‘त्यांना हे पुरावे पेरलेले असतील असा संशय नाही आला?’
‘नक्कीच आला होता. मात्र ज्या दोन्ही ठिकाणी हे पुरावे सापडले; त्या दोन्ही ठिकाणी केशवला बघणारे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आम्हाला मिळाले.’
‘हो फाइलमध्ये उल्लेख आहे त्याचा. खून करून पळाल्यावर केशव आधी जंगलातल्या रस्त्याला लागला होता आणि त्यानंतर तो बसने अकलूजला पळाला. आम्हाला खुनी हत्यार अर्थात तो बत्ता जंगलाजवळ असलेल्या दारूगुत्त्यापाशी गाडलेला मिळाला, तर केशवचे कपडे तो राहत असलेल्या लॉजच्या गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीमागे लपवलेले सापडले.’
‘बावडेकर साहेब, तपासात कुठे नोंद नसलेल्या केशवच्या एखाद्या नातेवाइकाची तुम्हाला माहिती आहे? ह्या केसच्या काळात केशव, त्याची आई अनेकदा भेटले असतील तुम्हाला.’
‘केशवला बहुदा एक लहान भाचा होता, तो त्यांच्याकडेच राहायचा. पण हे असं घडल्यावर त्याला भविष्यात काही अडचण नको म्हणून दूर गावाकडे पाठवून दिलं म्हणे. अर्थात फार काही चर्चा त्यावर झाली नाही कधी. त्याचा उल्लेख देखील कधी यायचा नाही.’
‘धन्यवाद बावडेकर साहेब. येतो मी..’
बावडेकरांची भेट घेऊन जयराज थेट कडू साहेबांसमोर उभा झाला.
‘बस रे बस.. काय प्रोग्रेस?’
’’केशव केसचा तपास योग्य मार्गाने झाला नाही असे मला वाटते सर.’
‘म्हणजे?’
‘या तपासात अनेक लूपहोल्स आहेत सर. केशवने आधी गुन्हा कबूल करणे आणि मग नाकारणे. गुन्हा कबूल केल्यानंतर देखील त्याने खुनी हत्याराचा आणि कपड्याचा पत्ता पोलिसांना न देणे. केशवने न्यायालयात गुन्हा नाकारणे आणि लगेच भक्कम पुरावे सापडायला सुरुवात होणे… कुठेतरी घोळ आहे सर…’
‘काय घोळ वाटतोय तुला?’
‘केशवला दारूचे व्यसन नव्हते, रादर तो कधीही दारूला स्पर्श करायचा नाही. तो त्या दिवशी गुत्त्यावर जाईल कशाला? समजा गेलाच, तर एवढं मोठं जंगल सोडून; आजूबाजूला माणसं असताना तिथे बत्ता लपवण्याचं धाडस करेल कशाला? बत्ता येवढ्या चातुर्याने लपवल्यावर, कपडे मात्र सहज सापडतील असे ठेवेल कशाला? मुख्य म्हणजे रक्ताळलेले कपडे सोबत घेऊन तो अकलूजपर्यंतचा प्रवास करेल कशाला?’
‘कदाचित हातून घडलेल्या गुन्ह्याने तो धास्तावला असेल, गांगरला असेल..’
‘पण मग बत्ता लपवताना तरी तो भानावर आला होता ना? तेव्हाच कपड्याची विल्हेवाट का नाही लावली?’
‘केशवला फाशी झाली आहे जयराज. आता ह्या सगळ्या गोष्टी उकरून काढून काय मिळणार आहे?’
‘केशववर झालेला अन्याय हाच ह्या खुनामागचे प्रमुख कारण आहे सर. मला पूर्ण खात्री आहे. इथे देखील स्टेजवरच खून झाला, तो देखील बत्त्याने झाला. अगदी तंतोतंत ११ वर्षापूर्वी घडलेला प्रसंग! सर, सगळी माणसं कामाला लावा. मला ह्या केशवची आई आणि त्याचा जो कोण तो भाचा आहे, तो समोर हवे आहेत, ते ही ७२ तासांत.
– – –
‘ह्या इथे असे पोटावर पडलेले होते सर तनेजाचे प्रेत. आजूबाजूला रक्ताचे बरेच थारोळे साचलेले होते.’
‘तुम्हाला खबर कोणी दिली?’
‘रघूने. सर हा रघू, समोरच्या चहाच्या टपरीवर काम करतो.’
‘रघू, तू कायम चहा घेऊन येतो इथे?’
‘हा साहेब.’
‘ठरलेल्या वेळी आणतो, का ऑर्डर दिली तरच?’
‘तालीम असेल तर कोण न कोण सतत फोन करून मागवतच असते साहेब.’
‘त्या दिवशी कोणी फोन केला होता?’
‘अब्दुल चाचा बोलला, ’जा तनेजासाबके इधरसे फोन है. जल्दी चाय लेके भाग.’
‘देशमाने, तुम्ही अब्दुलचाचाला आलेला फोन नंबर कन्फर्म केलात?’
‘हो सर. तनेजाचाच होता.’
‘किती वाजता फोन आला होता?’
‘सर बरोबर संध्याकाळी सहा एक्कावन्न.’ देशमाने म्हणाला आणि जयराज एकदम चमकला.
‘मला खुनाच्या जागेचे आणि मयत तनेजाचे फोटो दाखवा.’
हातातली फाइल शांतपणे तपासत जयराजने दहा मिनिटे घालवली आणि एकदम एका फोटोवर टिचकी मारली. ‘हे बघा देशमाने, खाली पडत असताना तनेजाचे घड्याळ जमिनीवर आपटले आणि फुटले. फुटताच ते थांबले. त्यात वेळ दिसत आहे सहा वाजून एकोणचाळीस मिनिटे.’
फोटो बघून देशमाने देखील एकदम चमकले.
‘ह्याचा अर्थ खून केल्यावर खुन्याने तनेजाच्या फोनवरून चहा मागवला. त्यानंतर तो पुन्हा रघू येण्याची वाट बघत बसला आणि रघू येताच तो पळाला सर.’
‘नाही देशमाने. कोणीतरी आपल्याला बघावे; अशी त्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने हा सगळा डाव खेळला. नाहीतर त्याला खून करताच पळून जाता आले असते की.’
‘म्हणजे आपला चेहरा मुद्दाम दिसावा म्हणून..’
‘त्याचा चेहरा नाही, केशवचा चेहरा.’ जयराज गूढ आवाजात म्हणाला आणि त्याचवेळी त्याचा फोन वाजला.
‘येस सर..’
‘जयराज गुड न्यूज आहे. केशवच्या फॅमिलीचा पत्ता मिळाला. त्याची आई तर आता हयात नाही, पण भाचा आहे. विशेष म्हणजे आपल्याच शहरात राहतो तो. मी तुला पत्ता मेसेज करतो आहे.’
‘सर, त्यालाच ऑफिसला बोलावू. नीट चौकशी करता येईल.’
‘वेल.. मला वाटते की, तू स्वत: त्याला जाऊन भेटावे. एका पायाने पोलिओग्रस्त आहे तो, त्याला धावपळ करायला लावू नये असे मला वाटते.’
जयराजने सुन्नपणे फोन ठेवला आणि निष्प्राण आवाजात रघूला विचारले, ‘रघू, त्या दिवशी तू खुन्याला खरंच पळून जाताना पाहिलेस?’
रघूने निर्व्याजपणे मान हालवली… ‘नुसते पळून जाताना नाही, तर बत्ता घेऊन पळून जाताना…’
– – –
‘नमस्कार, मी जयराज. मी केशवचा जुना मित्र. केशवचा भाचा इथे राहतो असे कळले म्हणून भेटायला आलो होतो.’
‘मित्र? आणि आता उगवताय? त्याचा परिवार देशोधडीला लागला तेव्हा कुठे होतात?’ समोरच्या आजोबांनी एकदम तिरका सूर लावला.
‘मी गेली १२ वर्षे मस्कत आणि अबुधाबीला होतो. हिंदुस्तानात येणे झालेच नाही. आलो आणि हा सगळा प्रकार कळाला. मिळेल तिथून माहिती जमवत गेलो आणि शेवटी इथे पोहोचलो.’
आजोबांचा चेहरा आता जरा निवळला. ‘फार इच्छा होती हो त्याच्या भावाला अभिनेता व्हायची. फार मन लावून काम करायचा,’ आजोबांनी कॉट खालून एक पत्र्याची पेटी काढली आणि त्यातला एक अल्बम जयराजसमोर धरला. अल्बममध्ये केशवच्या चार पाच नाटकांतले, त्याने स्वत:साठी काढून घेतलेले असे बरेच फोटो होते. हे त्याच्या शेवटच्या नाटकातले काही व्हिडिओ. आता ह्याच आठवणी उरल्या आहेत केदारकडे. सतत हे व्हिडिओ लावून बसलेला असतो मामाची आठवण काढत.’ जयराजसमोर एक पेन ड्राइव्ह धरत आजोबा म्हणाले. तेवढ्यात जयराज अचानक एका फोटोपाशी अडखळला. ऊग्र चेहरा करून हातात बत्ता धरलेल्या केशवचा फोटो होतो तो.
‘केशवच्या शेवटच्या नाटकातले शेवटचे दृश्य. प्रमुख व्हिलनचा साथीदार बनला होता केशव त्यात.’
‘केदार आला नाही अजून?’
‘येईल इतक्यात. समोरच्याच कॉम्प्युटर क्लासेस मध्ये ग्राफिक्स आणि अॅनिमेशन का काय असते ते शिकवतो तो,’ आजोबांचे वाक्य संपले आणि जयराज ताडकन उठला.
‘मी जरा एक अर्जंट कॉल करून येतो..’ असे म्हणत बाहेर पडला आणि त्याने झटकन देशमानेला फोन लावला.
‘देशमाने, तनेजा त्या दिवशी तालमीच्या हॉलमध्ये कशासाठी आला होता?’
‘त्याच्या नव्या नाटकात, तो एक अनोखा प्रयोग करणार होता. त्याच्या नव्या नाटकातील नऊ कलाकारांपैकी एक कलाकार ‘होलोग्राफिक प्रोजेक्शन’ने साकार होणार होता. अर्थात तो कलाकार इतर कुठल्याही दुसर्या ठिकाणी, शहरात, परदेशात वेगळे काम करत असेल, पण नाटकाच्या वेळी मात्र तो प्रेक्षकांना समोर उपस्थित दिसेल असे तंत्रज्ञान असते सर हे. आभासी कलाकार लोकांसमोर उभा करणार होता तो. त्याचेच प्रेझेंटेशन बघायला तो आला होता.’ जयराजने शांतपणे डोळे मिटले आणि त्याच्या चेहर्यावर एक मंद हास्य उमटले.
– – –
‘धन्य आहेस बाबा जयराजा.. कुठल्या धाग्यावरून स्वर्ग गाठावा हे तूच जाणे. पण हा सगळा गुंता नक्की होता काय?’
‘केदार पोलिओचा शिकार झाला होता. त्याला जन्म देताच आई गेली आणि बापाने त्याचे नावच टाकले होते. त्याला आधार दिला केशवनं. केशव त्याचा जीव की प्राण! केशवचं त्याच्याच नाटकातल्या सुमतीवर प्रेम जडले आणि इथेच तो तनेजाच्या ब्लॅकलिस्टमध्ये गेला. सुमतीवर एकतर्फी प्रेम करणार्या तनेजानं तिला संपवलं आणि आळ केशववर आला. घाबरलेला केशव पळाला आणि तनेजाचं काम अजून सोपं झालं. एका बाजूला वकील दिला आणि दुसर्या बाजूला केशवला अडकवत राहिला. वकिलाच्या सल्ल्याने केशवने गुन्हा कबूल केला, पण त्याला अचानक संशय आला आणि तो फिरला. तनेजाचा पुढचा प्लॅन तयार होताच. त्याने पुराव्यासकट केशवला लटकवलं. केदार तेव्हा लहान होता; पण मामाची दुर्दशा त्याच्यावर पुन्हा एकदा आघात करून गेली. केदार उतावीळ नव्हता. तो व्यवस्थित अभ्यास करत होता आणि योग्य ती तयारी होताच तो तनेजाच्या मागावर निघाला. अधू असल्याने त्याला काही मर्यादा होत्या, पण तनेजानं ’होलोग्राफिक प्रोजेक्शन’ची शक्कल लढवली आणि केदारने त्यातली संधी पुरेपूर ओळखली. केशवच्या जुन्या नाटकातला व्हिडिओ वापरून त्याने केशवला पुन्हा जिवंत केलं आणि त्याचा वापर करत तनेजाच्या व्यवस्थित काटा काढला.’
‘मास्टर माइंड! पण शेवटी त्याची हुशारी नको तिथे वापरली गेली.’
‘खरं आहे सर! आयुष्यात असे प्रसंग फार कमी वेळा येतात, जेव्हा माणुसकीवर कर्तव्याला मात करावी लागते… असो… गुन्हेगार मी उजेडात आणलाय, आता पुढचं काम तुमचं…’ गहिवरल्या आवाजात जयराज म्हणाला आणि केबिनबाहेर पडला.