• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मविआ राज्यात सत्ताबदल घडवणारच!

- योगेंद्र ठाकूर (बेधडक)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 5, 2024
in गर्जा महाराष्ट्र
0

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्यामुळे ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पाडली. देशात भाजपाची कामगिरी सुमारच झाली. कारण त्यांना बहुमताचा आकडादेखील गाठता आला नाही. आत्मनिर्भर होण्याच्या गप्पा मारणार्‍या भाजपाला जदयूचे नितीशकुमार आणि तेलगू देशमचे चंद्राबाबू नायडू यांच्यावर एनडीए स्थापण्यासाठी निर्भर राहावे लागले. तसेच महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यामुळे महायुतीच्या घटक पक्षात चलबिचल वाढली आहे. महाराष्ट्रात महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल आणि मुंबईत सहाच्या सहा जागांवर महायुतीचे खासदार निवडून येतील अशी फुशारकी मारणारे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तोंडावर आपटले. तरी ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा थाटात विधानसभा जिंकण्याच्या वल्गना महायुतीतील नेते करीत आहेत.
समाजातल्या एका विशिष्ट वर्गाची एक गठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाल्यामुळे आघाडीचा विजय झाला आहे, असे नॅरेटिव्ह सेट करून बहुसंख्यांकांना अल्पसंख्यांकांविरुद्ध भडकवले जात आहे. खोटे कथानक तयार करून त्या कथानकाभोवती जनतेला फिरवले जात आहे. जेणेकरून त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान करतील. पण आता हे शक्य नाही. ती वेळ निघून गेली आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपाच्या भूलथापांना बळी पडणार नाही. कुठल्याही नॅरेटिव्हला प्रतिसाद देणार नाही. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन अटळ आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या विरोधात मतदान करून दाखवलं. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा तेच होणार आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युतीत लढले. भाजपाचा १०५ जागांवर, तर शिवसेनेचा ५६ जागांवर विजय झाला. वास्तविक शिवसेना-भाजपा युतीचे सरकार महाराष्ट्रात सहजरित्या स्थापन झाले असते. पण सारेच काही मला हवे या अतिमहत्त्वाकांक्षेपायी भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द पाळला नाही. शेवटी पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेची चावी हाती घेतली. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत चालत होते. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला दीड ते दोन वर्षे करीत महाराष्ट्रातील जनतेला आरोग्य सुविधा पुरवित सुरक्षित केले. सारे काही ठीक चाललेले असताना महाराष्ट्रासारखे अग्रगण्य राज्य आपल्या हाती नाही, हे शल्य भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना आणि त्यांच्या दिल्लीतील ‘बॉस’ला बोचत होते. पंचवीस वर्षे मित्रपक्ष म्हणून असलेल्या शिवसेनेला मग भाजपा एक नंबरचा शत्रू समजू लागली आणि त्याप्रमाणे वागू लागली. मग भाजपाचे कटकारस्थान सुरू झाले.
शत्रुपक्षात फितवणारी मंडळी नेहमी दबा धरून बसलेली असतात. चांगले त्यांना काहीही आवडत नाही. फितूर निर्माण करणे हा फितवणार्‍यांचा कार्यक्रम असतो. हे मुळातच विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे लोक असतात. अशा प्रवृत्तीची टोळी एकत्र आली आणि शिवसेनेत फूट पाडली. राक्षसी राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या शिंदेंना भाजपाने फितवले. त्यांना मुख्यमंत्री बनवले आणि गद्दारांच्या मदतीने महायुतीचे सरकार दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. ही गद्दारी आणि हे असे असंवैधानिक सरकार महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही. याचा वचपा त्यांनी लोकसभा निवडणुकीत काढला. महायुतीला फक्त १७ जागा, तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने लोकसभेत करून दाखवलं तेच ती पुन्हा विधानसभा निवडणुकीत करून दाखवणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीस मिळालेल्या अपयशामुळे महायुतीच्या घटकपक्षात चलबिचल सुरू झाली आहे. शिंदेसेना, भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी आपापल्या पराजयाची कारणे शोधून काढताना एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या. संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या लेखात अजितदादा पवारांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपाच्या महायुतीचा महाराष्ट्रात पराभव झाला, भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, असे म्हणत भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत. तर शिंदेसेनेचे रामदास कदम यांनी एका कार्यक्रमात ‘अजित पवार महायुतीत उशिरा आले असते तर बरे झाले असते, अशी टिपणी करून आमच्यामुळे तुमचा लंगोट वाचला, नाहीतर रायगडाची जागा गमावली असती, असा मित्रपक्षावर वार केला. त्यावर अजित गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिहल्ला करीत म्हटले की अजितदादा वेळेवर तुमच्यासोबत आले म्हणून तुम्ही वाचलात. अन्यथा तुम्हाला जप करायला हिमालयात जावे लागले असते. तर भाजपाच्या विचारमंथन बैठकीत अजितदादांना बरोबर घेतले म्हणून फटका बसला, तेव्हा स्वबळावर विधानसभा लढवाव्यात असा सूर भाजपाच्या एका गटाने केला. अजितदादांना असेच टार्गेट केले तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा मिटकरी यांनी दिला. महायुतीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची राळ उडवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाची लुडबुड नको, असे म्हणत शिंदेसेनेने १०० जागांची मागणी केली आहे. अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी त्यांच्या राष्ट्रवादीला ८० ते ९० जागा लढण्यास मिळाव्यात अशी मागणी केली आहे. ‘प्रहार’चे बच्चू कडू यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय जवळ जवळ निश्चित केला आहे. तर सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत जागावाटपासाठी आम्हाला विश्वासात घ्यावे, असे म्हटले आहे. रिपाइंच्या रामदास आठवले यांनी १० जागांची मागणी केली आहे, तर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी २८८ जागांवर भाजपाने लढावे असे मत व्यक्त केले आहे. महायुतीला शेवटच्या क्षणी चिकटलेला भिडू, लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे इंजीन दिशाहीन झाले आहे. स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे. थोडक्यात काय, तर महायुतीतील घटकपक्षात एकवाक्यता-एकसूत्रीपणा राहिला नाही. लोकसभेतील दारुण पराभवामुळे विश्वास गमावलेला दिसत आहे. एकमेकांवर संशय घेतला जात आहे. महायुतीत सारे काही आलबेल नाही याचेच हे द्योतक आहे.
लोकसभा पराभवानंतर आधी आयात केलेले काँग्रेस, राष्ट्रावादीचे नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकारी भाजपाला सोडचिठ्ठी देत आहेत. २०१४मध्ये भाजपात गेलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी कमळाला सोडले. माजी केंद्रीय मंत्री व नांदेडच्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपाने इतर पक्षातील आयात केलेले एकेक खासदार, आमदार आणि नेते सोडून जात आहेत. अजित पवार गटाचे आमदारही शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीत आहेत. सोलापूरचे मोहिते पाटील कुटुंबातील लोकांनी आधीच भाजपापासून फारकत घेतली होती. जिथे सत्ता तिथे ही स्वार्थी मंडळी जातात.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करावेच लागेल. कारण केंद्रातील आणि राज्यातील भाजपाप्रणित सरकारने जनतेला वार्‍यावर सोडले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. सुसंस्कृत पुणे शहराला ड्रग्जचा विळखा पडला आहे. गृहखात्याच्या नाकावर टिच्चून पब व बारमधून ड्रग्जची विक्री होत आहे, अशा बातम्या सर्रास बघावयास व वाचावयास मिळत आहेत. महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. नीटचे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त होत आहे. अशा भ्रष्टाचारी महायुती सरकार विरोधात काँग्रेसने चिखलफेक आंदोलन करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे कमळ फुलू न देण्याचा निर्धार केला आहे. तर शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा असे म्हणत सत्तापरिवर्तनासाठी तुतारी फुंकली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा संपर्क नेते, जिल्हा संपर्कप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, विभागनिहाय समन्वयक यांच्या २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी आढावा बैठक घेऊन विधानसभा जिंकण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. जुलै महिन्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे आणि शिवसेना नेते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना वर्धापनदिनाच्या पहिल्या कार्यक्रमात पक्षप्रमुख यांनी महाविकास आघाडीला भरभरून मतदान करणार्‍या देशभक्त मतदारांचे आभार मानले. शिवसेनेच्या वतीने सर्व मराठी, हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख, दलित या सर्व बांधवांचे मन:पूर्वक आभार मानले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मशालीचे तेज काय असते ते विरोधकांना समजले आहे. विधानसभा निवडणुकीतही मशालीचे तेज झळकणार आहे. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल घडवूनच आणतो.’ हे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ठासून सांगितले आहे. शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्यांना उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदींची भक्कम साथ आहे. त्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रात एक मजबूत राजकीय शक्ती तयार झाली असून महाराष्ट्रात सत्ताबदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही. ‘लोकसभेत संविधानासाठी लढलो, विधानसभेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू’ असा निर्धार महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केला आहे. भ्रष्ट व असंवैधानिक महायुती सरकारला धडा शिकवून विधानसभा निवडणुकीत ती विजयाचा शंखनाद करणार.

Previous Post

‘ओम नहीं सुधरेंगे…’

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.