यंदा नववर्षाच्या सेलिब्रेशनचे प्लानिंग पोक्याने मला करायला सांगितले, याचा मला वेगळाच आनंद झाला. आमच्याबरोबर भाजपचे नेते, आमदार, खासदार तसेच गद्दार बंडोबासुद्धा सेलिब्रेशनमध्ये असणार होते. सेलिब्रेशनचे ठिकाण होते भाजपचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोहाती. मी ताबडतोब अमित शहांना फोन करून परवानगी घेतली आणि कामाला लागलो. चार दिवसांत सर्वांना आमंत्रणे पोचती झाली. पोक्याने सुरतेला जाऊन देशी-विदेशी नावाजलेल्या मद्याचे दोनशे खोके गोहातीला विमानाने रवाना केले. त्याशिवाय चकना खास गुजरातेतील मेहसाणा येथून शंभर किलो मागवला होता.
सोहळा साग्रसंगीत व्हायला हवा म्हणून भाजपच्या सर्व अभिनयकुशल नट्या आणि नृत्यांगनाही आमंत्रित केल्या होत्या. परमपूज्य रसिकाग्रणी योगाचार्य रामदेव बाबांनाही या सोहळ्याचं खास आमंत्रण होतं. मी स्वत: ३१ डिसेंबरला सकाळच्या फ्लाईटने गोहातीला रवाना झालो. गेटवर मध्यभागी कमळात बसलेले मोदी आणि बाजूला भाजपचे प्रमुख नेते यांच्या हसर्या प्रतिमा होत्या. सायंकाळी सहा वाजता एकेका नेत्यांच्या आगमनाला सुरुवात झाली. सुरक्षा व्यवस्था कडक असूनही चार-पाच बंडोबांच्या जाकिटातून दहा क्वार्टर्स निघाल्या. आम्ही दोघांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांनाही पार्टीत सामील करण्याचा तोडगा निघाला. खोक्यामागून खोके रिकामे होत होते. पोक्या सुरतेशी कॉन्टॅक्ट ठेवून होता. तिथून हेलिकॉप्टरने माल येत होता. रामदेव बाबांनी आरोग्यवर्धक द्राक्षासवची बॉटल आणली होती. एवढ्यात बॅण्डच्या तालावर अमित शहांचे आगमन झालं आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. त्यांच्या मागोमाग मोदी असतील अशी सर्वांची अटकळ होती. पण ते गुजरातवरून निघाले असून काही क्षणात पोचतील अशी घोषणा माईकवरून चित्रा वाघ यांनी केली. उपस्थित बहुतेक सर्वांची विमानं एव्हाना हवेत उडायला लागली होती. हा सगळा माहौल पाहून अमित शहांनी माईक हातात घेतला आणि प्रास्ताविकास सुरुवात केली.
भाईयों और बहनो,
रात को बारा बजे हम नये साल में कदम रखनेवाले हैं। लेकिन आपके पांव तो लडखडा रहे हैं। इसके लिए प्रॅक्टिस चाहिए। पिओ या ना पिओ लेकिन आपके पांव कभी भी लडखडते हुए दिखने नहीं चाहिए। कुछ चेहरे नये लगते हैं। हां, दाढीवाले के खोके में से आये हैं ना। लेकिन भाजप को कभी नहीं भूलना। अब तुम होश में नहीं हो। कई मेंबर तो टेबल पर चढते हुए दिखाई दे रहे हैं। नाचने के मूड में हैं। नाचो, गाओ। अलविदा। विश यू हॅप्पी न्यू इयर।
मग दाढीवाल्यांच्या बगलबच्चांनी ‘झिंग झिंग झिंगाट’च्या गाण्यावर अभूतपूर्व हैदोस घातला. त्यात भाजपवाले काही मंत्री, खासदार, आमदार आणि नेतेही सामील झाले. खूप मजा आली. शेवटी विमान स्टेबल झाल्यावर दाढीवाल्यांनी माईक हातात घेतला आणि आजूबाजूला पाहू लागले, पण फडणवीस कुठे दिसेनात. त्यामुळे त्यांच्या तोंडून एक शब्द बाहेर पडेना. शेवटी फडणवीस बाजूच्या दालनातून आले आणि म्हणाले, व्हा सुरू. दाढीवाल्यांच्या जिवात जीव आला. पण त्यांच्या पहिल्याच वाक्याने हंशा उसळला. ते अडखळत बोलले, हॅप्पी न्यू बीअर… सर्वांनी हॉटेल डोक्यावर घेतलं. फडणवीस म्हणाले, बोला तुम्ही. काहीही बोला. तेव्हा दाढीवाले म्हणाले, अरे, हा बोम्या समजतो काय मला? मला — बनवतो. तुझ्या ट्वीटरला कितीही हँडल मारलंस ना तरीही जोपर्यंत अमित शहाजी, फडणवीसजी आणि आपले कोण ते तानाजी पाठीशी आहेत ना, तोपर्यंत बेळगाव, कारवार मुंगीच्या गतीने का होईना महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाहीत. तेवढ्यात मोदीजी आले.
– अच्छा माहौल है। तुम फुल एन्जॉय करो। मुझे खास काम के लिए साडे ग्यारह बजे दिल्ली जाना है। सबको शुभकामनाएं। खाओ, पिओ, ऐश करो। नया बरस क्या, आनेवाले सब बरस हमारे ही हैं। इसलिए डरो मत। जय हिंद, जय भारत। नमस्ते।
मोदी निघून गेल्यावर कोकणातला एक गद्दार मंत्री माझ्याजवळ येऊन म्हणाला, ‘इथे काजू फेणी किंवा हुर्राक मिळेल का?’ ताबडतोब मी गोव्यात ऑर्डर दिली आणि साडे अकराच्या आत फेणीचे खोके आले. तेवढ्यात अमृताबाई रंगमंचावर आल्या आणि त्यांनी ‘दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला गं बाई हसला’ हे ‘पिंजरा’ नृत्य सादर केलं. रामदेव बाबांकडून नृत्याला मोठी दाद मिळाली. नृत्य संपताच भाजप पुरस्कृत खासदार, आमदार आणि नवनीत राणांसारख्या तेवीस जणींचा ग्रूप मंचावर आला. त्यांनी अवधूत गुप्ते यांनी बसवलेला बाईस तेईस डान्स आणि गाणं सादर केलं. त्यात भाजपच्या जागतिक आणि देशी कार्याचा आलेख गुंफला होता. नृत्य संपल्यावर ते दाढीवाल्यांना घेऊन रंगमंचावर आले आणि म्हणाले, आता मी बालगीत गाणार आहे आणि तेही दाढीवाल्यांबरोबर.
दाढीवाले, दाढीवाले
दिसता किती छान
का बरं सारखी असते
फडणवीसांकडे मान
तुमचा दिव्य मेळावा पाहून
डोळे माझे दिपले
माणसे उठून गेली तरी
नाही कुणाला खुपले
आमची बिदागी पावली आम्हाला
कवनही रचले छान
केला तुमचा गौरव पहिला
वाढली तुमची शान
अशीच ऑर्डर द्याल तुम्ही पुढे
गाईन गौरवगीत
आज तुम्हाला वंदन करतो
अशीच फुलू द्या प्रीत
तेवढ्यात बारा वाजले. हॉटेलचे सगळे लाईट गेले आणि पुन्हा आले. बॅण्ड पथकाच्या तालावर ‘हॅप्पी न्यू इयर’ची सलामी देण्यात आली आणि पिण्याचा कार्यक्रम रंगला.