कामात असताना अथवा अगदी नुसते बूड टेकून बसला असाल निवांत, अशावेळी मोबाईल वाजतो… अनोळखी नंबर… हल्ली लोकं कपडे बदलावेत तसे नंबर बदलतात. त्यामुळे कोणा ओळखीच्याचा असेल म्हणून उचलता… आपल्या ‘हॅल्लो’ला प्रत्युत्तर, ओळख कोण बोलतेय?…
…आणि मग ही ‘ओळखा पाहू’ची कसरत बराच काळ चालते. बरं, एकदम अर्वाच्य काही बोललं, तर कोणी परिचयाचे, त्यातही ज्येष्ठ निघायचे ही भीती.
मनात मनुक्ष्य प्राण्याच्या अनेक गुह्य जागांचा विचार येऊन, त्या नाजुक जागांवर लत्ताप्रहार करावासा वाटत असूनही, क्षीण आवाजात ‘नाही ओळखले, सॉरी, कोण बोलतेय’ असे करुणाष्टक आळवावे लागते. समोरची, आय मीन विरुद्ध दिशेची व्यक्ती लगेच बोलू लागते, ‘वाटलंच मला, तुम्ही मोठी लोकं, आमची कशी ओळख ठेवणार’ इथपासून ‘असा कसा विसर पडला माझा?… काय माणूस आहेस तू!’ इथपर्यंत काहीही पचकू लागते.
अशा ‘ओळख कोण बोलतेय?’ टाईप लोकांना, मूळव्याध होवून, खड्डे असणार्या रस्त्यावरून, रिक्षाप्रवास करायला लागावा अशी माझी तळमळीची इच्छा आहे. तथास्तु!!!… मीच मला म्हणून घेते.
माझी एक मैत्रीण आहे, तिचा असल्या पिडेश लोकांवरचा उपाय म्हणजे, ‘अरे ओळखले म्हणजे? प्रश्नच नाही! ओळखणार नाही म्हणजे काय? ओळखायला हवेच!’ असे ‘बनवाबनवी’मधील अशोक सराफ स्टाईलने वाक्ये फेकणे… अथवा ‘बोला, पैसे कधी देताय परत? किती दिवस झाले!’ किंवा ‘नक्की येणार जेवायला, आमंत्रण तुमचं आहे, कसे नाकारणार?’ अशी आचरट बडबड करणे… परिणाम हुकमी होतो.
दुसरे काही महाभाग असतात…
स्थळ : मासे मंडई
वेळ : रविवार सकाळ
आपण कोळणीशी ‘उत्तम सुरमई कशी देणार?’ या महत्वाच्या वाटाघाटीत मग्न असताना हे महाभाग विचारतात, काय, मासे घ्यायला का?
अरे भावा, इथे काय आणखी घेणार?
एवढ्यात आपली नजर असलेली ती सुरमई आपण पक्क्या केलेल्या दरात दुसरा कोणी गनीम अलगद उचलतो, यातलं अनिवार दुःख फक्त अट्टल मासेप्रेमी जाणू शकेल.
मी हल्ली प्रदीपकुमार टाइप मख्ख चेहेरा करून सांगते, ‘तुम्हाला माहित नाही का? इथे बनारसी साड्यांचा सेल लागलाय ते. तीच घ्यायला आलेय.’
अर्थात भारतीय लोकांना, त्यातही ज्येष्ठ लोकांच्या अलीकडे बेसुमार बोकाळलेल्या गर्दीत एकंदरच विनोदबुद्धी कमी असल्याने त्याचा तसा उपेग होत नाही. पण चौकशी थांबते.
लिफ्टमधील सोशल संभाषण हा आणखी एक नित्य वैताग…
हातात डी मार्ट अथवा किराणा सामानाच्या ठोस भरलेल्या पिशव्या, भाजी इत्यादी सर्व सांभाळत आपण लिफ्टमध्ये शिरलो की, अरे बोहोत शॉपिंग किया लगता है, हा कानावर पडणारा उद्गार.
डीमार्टच्या खरेदीला शॉपिंग म्हणणे, म्हणजे कणकवलीच्या आठवडा बाजाराची तुलना लंडन, लॉस एंजेलिस, पॅरिसच्या फॅशनेबल हायब्रो दुकानाशी करणे. आधी डाळ, तेल, तांदूळ या किराणा मालवर्गीयांना शॉपिंग क्याट्याग्यरीत घ्यायचे हाच मोठा विनोद…
समजा नुसते रिकाम्या हाती लिफ्टमध्ये शिरलो तर, क्या कटिंग करके आये क्या? ही पृच्छा. आपण आलेलो असतो लॅबमधे रक्त, मूत्र आणि विष्ठा तपासणीसाठी देऊन (करोना काळातील नवी कामे) आणि हे असले काही विचारले गेले की ते तिकडे दिलेले बहुमोल ऐवज इथे यांच्या तोंडावर मारावेत, असे वाटते. लिफ्टमधील या असल्या सो कॉल्ड सोशल संभाषणावर कायद्यानेच बंदी असायला हवी.
तुम्हाला वाटेल काय बया आहे ही, पण खरं सांगते, करोना काळ मला अतिशय आवडायचा. तेव्हा जागोजाग हे असले चौकशीखोर जंतू मिळत नसायचे. आजकाल लोकांना काय कुठे बोलायचे, याचे तारतम्य उरलेले नाही, हा माझा समज दिवसागणिक दृढ होत चालला आहे.
ब्रिटिश अथवा कोणत्याही युरोपियन माणसाचं एक असते, हाय हॅलो म्हणतील, हसतील आणि चूप बसतील. आपल्याला असे आवडते. एक १७ तासाची फ्लाईट मी मिठाची गुळणी घेवून पार पाडली होती. सुदैवाने बाजूला खडूसपणात डॉक्टरेट मिळवलेला गृहस्थ असल्याने निभावले. एकमेकांना बघताक्षणी एकमेकांचा इंस्टंट राग दोघानाही आला होता, हे टॉप काम झाले होते.
काही माणसे, किंबहुना बहुतेक माणसे जेव्हा गप्प असतात, तेव्हाच विलक्षण लोभस वाटतात. तोंड उघडले की बोंबला. आमचे मालक, कुंकवाचे धनी मात्र एअरपोर्ट, विमान किंवा कोणतीही तत्सम जागा असल्यावर ताबडतोब आजूबाजूच्या सहप्रवाशांकडे, तुम्ही कोण? कुठले? अशा चौकशी सुरु करुन मला वीट आणण्याचे काम निष्ठेने पार पाडतात.
याचा अर्थ मी तुसडी, माणूसघाणी आहे, असे बिलकुल नाही. निवांत गप्पा मारायला मला अतिशय आवडतात. कोरोनाकाळात लस घ्यायला गेले होते. लई लांब लाईन, म्हणून बाजूला शाळा होती, त्या ओट्यावर बूड टेकले. ठसठशीत कुंकू लावलेली आणि हातात भरभक्कम चुडा घातलेली एक माऊली पदर खोचून, प्लास्टिकवर निगुतीने सांडगे घालत होती. एकसारख्या आकाराचे सुबक सांडगे, हसली बघून, मी हसले आणि पुढील एक तास आम्ही विविध सांडगे, फेण्या, पापड, मसाले यावर निवांत बोलत होतो.
भाजीवाल्या मावशी, कोळीण अक्का, उबर ड्रायव्हर, अगदी मॉलमधील हाऊसकीपिंग स्टाफ अशा सगळ्यांशी मी छान गप्पा मारते, डोक्यात जातात ते विनाकारण चौकशी करणारे.
यांच्यात आणखीन एक वर्ग असतो. आपल्या ओळखीतल्या कोणत्या लोकांची मुले दहावी बारावीला आहेत याची नोंद ही मंडळी पक्की लक्षात ठेवून परीक्षा सुरू होण्याआधी, सुरू असताना, झाल्यावर आणि निकाल लागल्यावर ती मुले आणि त्यांचे पालक यांच्यावर प्रचंड सूचना, चौकशा यांचा भडिमार करतात. त्यात या लोकांची मुले यशस्वी असल्यास विचारायला नको. किती मार्क मिळाले? आणि पुढे काय करणारे? या प्रश्नांवरही कायदेशीर बंदी घालायची वेळ आली आहे. अर्थात सध्याची कार्टी ९९ टक्के मार्क्स मिळवण्याचे अचाट कार्यक्रम करू लागली आहेत आणि बहुतेक वेळी त्यात ग्रेड वगैरे असते, त्यामुळे थोडे बरे आहे. आमच्या वेळी खणखणीत टक्के जाहीर व्हायचे, माझ्यासारख्या लोकांची त्या बाबतीतली कारकीर्द किंवा कामगिरी यथातथा असल्याने, मुकाट ऐकण्याखेरीज पर्याय नव्हता. त्यात पालक भर घालायचे नि मग जाहीर मानभंग व्हायचा. मुलांना असे विचारणारे नक्की काय हेतू घेऊन येतात, हा संशोधनाचा विषय आहे.
बरं, या नसत्या चौकशा करणार्या चांडाळांची बुद्धी फार प्रखर असते, असेही नाही. सतरा नव्वे किती? वर्गमूळ कसे काढायचे? अथवा भारताची लोकसंख्या किती? यापैकी एकाचेही उत्तर यांना येणार नाही. फिदी फिदी हसणार मात्र त्या बिचार्या आलिया भट्टला… निव्वळ वय या गोष्टीच्या जोरावर असे सर्व चालते.
या लोकांचे दुसरे भाऊबंद लग्न कर, असा घोशा लावतात अविवाहितांच्या मागे. मग लग्न झाले की आता (गोड) बातमी कधी, ती बातमी दिली की आता बाळाला भावंड हवे, असल्या चौकशा कम सूचना करणारे हे लोक्स. आधी लग्न हीच खाजगी बाब, त्यात तुम्ही का नाक खुपसता?
माझा लेक त्याच्या लग्नानंतर वेगळा राहायला लागला, त्यावरून लोकांनी त्याला आणि आम्हाला भंडावून सोडले. एकुलता एक मुलगा का वेगळा केला? आता तुमची काळजी कोण घेणार? जणू आम्ही दोघे विकलांग होऊन खाटेवर पडलोय.
माझ्या परिचयाच्या एका घरात मुलाच्या घटस्फोटाचे गंभीर बोलणे चालू होते, अतिशय वाईट परिस्थिती. आणि एक महाभाग त्यावेळी सांगतो, ते सर्व होईल तेव्हा होईल, तू मात्र लगेच लग्न कर, जीवनात सहचर हवा. अरे काही कायदे असतात ते तरी आठव. निदान वेळ काळ बघ. निव्वळ बोलता येणे, या शक्तीवर अशी लोक ओरल डायरिया झाल्यागत वागतात.
त्यानंतर येतात ते, किती जाडी झालियेस, किती खराब दिसतोय, असे शेरे देणारे. मी हवा जरी गिळली तरी माझे वजन काही ग्रॅमने वाढते. त्यामुळे या मंडळींचे मी कायम लक्ष्य. कशी होतीस, काय झालीस ही वाक्यं माझ्या पदरी कायम.
काही समारंभाला आपण गेलो नाही किंवा आपल्याला आमंत्रण नसेल की दुसर्या दिवशी विचारणा होणारच, तू अमुक अमुकच्या साखरपुड्याला का आली नाहीस? बायोला पूर्ण माहित असते कारण, पण विचारणारच. मी उत्तर देते की तू गेलेली का? होय म्हणाली तर म्हणते, म्हणूनच मी आले नव्हते. मग दुसर्या बाजूला भयाण शांतता आणि कसनुसे हसणे. चौकशी मात्र विराम पावते.
माझ्या अशा उत्तरं देण्यामुळे एक मात्र झाले आहे. लोक हल्ली माझ्याशी फार बोलत नाहीत. सुंठ, खोकला इत्यादी इत्यादी समजून जा. पण अशी माणसे भरपूर आढळतील. तरी इथे हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार्या महाभागांची गणती केलेली नाही. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
तर मुद्दा काय की तुमच्या पदरी अशा फुक्कट चौकशा आल्या तर काय करावे, यासाठी मी एक कार्यशाळा घेण्याचे ठरवते आहे. एकही अपशब्द न वापरता खोचक उत्तर देऊन समोरच्याला कसे गारद करावे? नाही, मी पुणेकर नाही. पण त्या स्थळाचा गुण माझ्यात पूर्ण आहे. पुरावा हवा असल्यास संपर्क साधून पाहा… फक्त ओळखा पाहू कोण बोलतेय, इतकं बोला… त्यापुढच्या परिणामांना मात्र मी जबाबदार नाही.