मित्र मैत्रिणींनो, आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटत असू शकतं की आपलं रूप आकर्षक नाही. आपली कुणावर छाप पडत नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वात काही दम नाही. असं वाटण्याचं कारण असं असतं की आपल्याकडे रूढ अर्थानं छान दिसण्याचे काही निकष ठरवून टाकले गेले आहेत. गोरा रंग, पुरेशी उंची, मध्यम बांधा, (स्त्री पुरुष जे कोणी असाल, त्याप्रमाणे सुडोल बांधा इत्यादी. अर्थात हे सुद्धा त्या त्या प्रांताप्रमाणे, त्या त्या राज्याप्रमाणे, त्या त्या देशांप्रमाणे बदलणारे निकष आहेत.)
अशी रूढ अर्थाने सुंदर दिसणारी तथाकथित सुंदर माणसं आपल्या सार्यांना माहिती असतात. आपल्या आजूबाजूला ती असतात आणि आपल्याला त्यांच्या पार्श्वभूमीवर आपलं दिसणं खटकत राहतं. आपल्या दिसण्यातली, रूपातली तथाकथित कमतरता जाणवत राहते. आपल्याला वाटतं की लोकांना आपण आवडलं पाहिजे. खरं तर लोकांना आपण आवडणं हे काही पूर्णपणे आपल्या हातात नाही. आपण जसे आहोत, जसे दिसतो, तसेही आपण लोकांना आवडू शकतो. आपणही सुंदर व्यक्तिमत्त्वाचे दिसू शकतो. लोक आपल्यावरही भरभरून प्रेम करू शकतात. पण त्यासाठी काय करायला हवं तर माझं व्यक्तिमत्व इम्प्रेशन पडण्यासारखं नाही, हा विचार दूर सारायला हवा.
जरा आठवून पाहूया. आजवर आपल्याला जी माणसं आवडली होती, ज्या सगळ्यांचं आपल्यावर इंप्रेशन पडलं ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आपण भारावून गेलो ती सगळी माणसं रूढ अर्थानं सुंदर होती का? रुबाबदार होती का? आपल्यावर जो प्रभाव पडला तो फक्त त्यांच्या दिसण्याचा होता की त्यांच्या वागण्याचा होता? त्यांच्या विचारांचा होता? त्यांच्या स्वभावाचा होता, त्यांच्या सद्गुणांचा होता?
वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेली माणसं त्यांच्या दिसण्यामुळे यशस्वी झाली की त्यांच्या कर्तृत्वामुळे? त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नाम कमावणारी माणसं आपण आठवली तर त्यातील बहुतेकांची शरीरयष्टी सामान्यच आहे हे आपल्या लक्षात येईल.
दोस्त हो! रूढ अर्थाने सुंदर दिसणारी व्यक्ती प्रथमदर्शनी सुंदर दिसते हे अगदी मान्य. पण जर ती व्यक्ती सुंदर वागत नसेल. चांगलं बोलत नसेल. तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती आपल्याला सुंदर दिसते का? या उलट जी माणसं आपल्याला खूप मदत करतात. आपल्याशी चांगलं वागतात. चांगलं बोलतात. आपल्यावर प्रेम करतात ती माणसं आपल्याला सुंदर दिसतातच ना? आपल्यावर त्यांचा प्रभाव पडतोच ना?
दोस्त हो, आपण आपली प्रगती करतो म्हणजे काय करतो, तर आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. मेहनत करतो. चिकाटी ठेवतो. श्रम घेतो. हे सर्व करण्याचे आपलं माध्यम आपलं शरीरच आहे. माझं असणं, माझं दिसणं हेच तर माझं माध्यम आहे. मग जगाला भिडण्याच्या या माझ्या माध्यमालाच मी कमी लेखलं, तर मी प्रगती कशी करू शकणार?
मित्रहो, आपण जसे आहोत, आपलं शरीर जसं आहे तसं आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे आणि त्या शरीरासह जगाला भिडलं पाहिजे. आपण नीटनेटके राहू शकतो, स्वच्छ राहू शकतो. आपण आपल्या दिसण्यात चांगले बदल जरूर करू शकतो. म्हणजे आपण लठ्ठ असू तर ते आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे आपण आपलं वजन कमी करू शकतो. आपण फारच हडकुळे अन अशक्त असू तर चांगला आहार घेऊन अन् व्यायाम करून शरीर कमवू शकतो. जे बदल करणे शक्य आहे अन ते आरोग्याला अपायकारक नाहीत, उलट पोषक आहेत ते जरूर करावे. परंतु आपल्या दिसण्यामध्ये एका मर्यादेबाहेर आपण फार मोठे बदल करू शकत नाही, तसे ते करण्याची गरजही नाही हे लक्षात घ्यावे.
तुम्ही एक गोष्ट तर नक्की मान्य कराल. आपण सारेजण एकांतात जेव्हा आरशात स्वतःचं रूप न्याहाळतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ‘अरे आपणसुद्धा दिसायला सुंदर आहोत? आपलं नाक छान आहे. आपला चेहरा छान आहे. आपले डोळे बोलके आहेत. खूप वेळ स्वतःला आरशात पहात राहिलो की आपल्याला आपणही सुंदर असल्याचं जाणवतं. विश्वास वाटतो. परंतु आपण घरातून बाहेर पडून इतर मित्रांमध्ये मिसळतो, सहकार्यांमध्ये मिसळतो, तेव्हा आपण विचार करतो, ‘अरे तो तर माझ्यापेक्षा हँडसम वाटतो. अरे ती तर माझ्यापेक्षा सुंदर वाटते. मित्रमैत्रिणींनो, जर आरशात आपण सुंदर दिसलो होतो, तर मग आता काय झालं? आता असं झालं की आपण स्वत:ची इतरांशी तुलना केली. हा इतरांच्या दिसण्याशी तुलना करण्याचा वेडेपणा आपण करायचा नाही. आपण जर आरशात सुंदर होतो तर आताही सुंदर आहोत.
पूर्वी नाटक-सिनेमांमध्ये खलनायकाला जाड भुवया मोठ्या मिशा लावत किंवा त्याच्या चेहर्यावर एखादा मोठा तीळ किंवा मस्सा दाखवत. एखादा चाकूसुर्याचा व्रण त्याचं रूप बिघडवण्यासाठी वापरला जायचा. खरंतर खलनायक दाखवण्यासाठी नाटक-सिनेमात वेगळा मेकअप करायची गरज नाही. त्याच्या वाईट वागण्यातून तो आपोआप वाईट दिसायला लागतो हे आपण अनेक नाटक-सिनेमात आणि प्रत्यक्षातही पाहिलं आहेच. मला आता चटकन आठवतंय ते उदाहरण आमिर खानच्या ‘फना’ सिनेमातलं सांगता येईल. ‘सुभानल्ला सुभानल्ला… चांद सिफारिश जो करता हमारी, देता वो तुमको बता, शरमो हया के पर्दे गिराके करनी है हमको खता…’ असं गाणं गात नेत्रहीन हिरोईनच्या (काजोल) मागे फिरणारा लांब केसांचा आमीर आपल्याला खूप छान दिसतो. पण गोष्ट पुढे जाते अन कळतं की अरे हा नायक नाही, खलनायक आहे, देशद्रोही आहे, अतिरेकी आहे. तेव्हा तोच आमीर खानचा चेहरा भयंकर दिसू लागतो. त्यासाठी वेगळा मेकअप करण्याची गरज लागत नाही.
काही माणसं आपल्याला मनासारखं शरीर मिळालं नाही याची खंत करत राहतात, तर काही माणसं त्यांना मनासारखं किंवा लोकांना आकर्षित करेल असं शरीर मिळाले म्हणून त्याचा गर्व करत राहतात, त्याचा निरर्थक अभिमान बाळगत बसतात.
मंडळी, आपले दिसणे हे आपलं बाह्य रूप आहे. आपण आपले अंतरंग बदलू शकतो. आपण आपल्यातली कला-कौशल्ये विकसित करू शकतो. आपण आपला अभ्यास वाढवू शकतो आणि आत्मविश्वासाने यशस्वी होऊ शकतो. सौंदर्य आपल्या कर्तृत्वावर, आपण जोडलेल्या नात्यावरही अवलंबून असतं. जी व्यक्ती आपल्याला आवडते, ती आपल्याला सुंदर दिसते. हे भावनिक प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्यातील सद्गुण वाढवले पाहिजेत. आपल्या दिसण्याचा कोणताही न्यूनगंड घेऊन आपला फायदा होणार नाही. अन बरं का, आपण जसे कसे दिसतो ते लोकांना दिसतो, आपण स्वत:ला किती काळ पाहात असतो? आपण आपल्याला आरशात पाहतो, तेव्हाच तर आपण आपल्याला दिसतो. मग आपल्या दिसण्याचं आपल्याला का टेन्शन असायला हवं? ज्यांना आपला चेहरा पाहावा लागतो, त्यांनी ते घ्यावं की. काय मंडळी, आहे की नाही गंमत? मी बुवा असाच विचार करतो.
मंडळी मी स्वतः रंग, उंची, बांधा, शरीरयष्टी या बाबतीत बोंब असलेला माणूस आहे. पण मी एखाद्या राजबिंड्याने वावरावे तसा आत्मविश्वासपूर्ण वावरत असतो.
मंडळी एका वस्तूसारखी दुसरी वस्तू असेल, पण एका माणसासारखा दुसरा माणूस नसतो. कदाचित दिसायला असेल. पण तेच गुण अवगुण, तोच स्वभाव, तेच विचार संपूर्ण आयडेंटिटी तीच, असा माणूस नसतो.
मंडळी, जगभरातून लोक ताजमहल पाहायला का येतात? कारण ताजमहल एकच आहे. जगात दुसरा नाही म्हणून तो महत्वाचा आहे. आपण प्रत्येक जणही जगात एकमेव आहोत. म्हणून आपण महत्वाचे आहोत. आपण प्रत्येकजण ताजमहल आहोत हे लक्षात घेऊ या.