ध्येयपूर्तीची शेवटची पायरी म्हणजे यश. या पायरीच्या वरच्या बाजूस असलेल्या तक्त्यावर विराजमान होऊन टिकून राहण्यासाठी घेतलेले परिश्रम, सद्सद्विवेकबुद्धी, सामाजिक भान, प्रामाणिकपणा आणि निष्ठा यांची जाणीव असणे अतिमहत्त्वाचे. जागोजागी काम, क्रोध, मोहमायारुपी मदनिका बेधुंद नजाकतीतून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रखर बुद्धी, अचूक भान, कर्मावरील श्रद्धा आणि स्वत्वाला साद घालण्याची प्रवृत्ती हे सर्व ठायी वसलेली असेल तर अशा मदनिकांचा संचार होत राहिला तरीही आपले अढळपद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वरील प्रवृत्तींच्या विरोधात आचरण ठेवले, तर डोंगराएवढे यश मिळवूनही संपूर्ण भविष्यकाळ पाण्यात विरघळलेल्या सुक्या मातीच्या मूर्तीप्रमाणे होईल- जसे- सुरुवातीस सचिन तेंडुलकरपेक्षाही नजरेत भरणारी फलंदाजी करणारा, क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेला विनोद कांबळी बिनधास्त फिल्मी वागणुकीने क्रिकेटच्या प्रवाहातून कधी बाहेर फेकला गेला हे कळलेच नाही. नाटकवेड्या रसिकांच्या हृदयावर राज्य करणारा गुणी, देखणा, अभिनयसंपन्न स्व. काशिनाथ घाणेकर, व्यसनरुपी सैरंध्रीच्या कवेत विसावला आणि मराठी नाट्यविश्व सैरभैर झाले. भारताची पहिली महिला पंतप्रधान, धाडसी, आयर्न लेडी ऑफ इंडिया, बांगलादेशाची निर्मिती जिने केली, अशा स्व. इंदिरा गांधी कोर्टाच्या निकालाने सत्ताभ्रष्ट होणार या भीतीपोटी त्यांनी संपूर्ण भारतामध्ये आणीबाणी लादून बदनाम झाल्या.
९०व्या दशकात भारताची अर्थव्यवस्था लयाला गेलेली. तिला उर्जितावस्थेत आणून उदारीकरण, जागतिकीकरण व खासगीकरण या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्याने यशस्वी ठरलेले पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव भ्रष्टाचार, लाचखोरी यांच्यासारख्या नायट्याच्या डागांनी अस्पृश्य झाले. पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी प्रथमच नेहरु-गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. नरसिंहराव काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि नंतर काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे १९९१ साली भारताचे पंतप्रधान झाले. अल्पमतातील!
अतिशय हुशार, चळवळ्या स्वभावाचे, भारतीय व परदेशी १७ भाषा मुखोद्गत. पेशाने वकील, राजकारणी. १९२१मध्ये तेलंगणामध्ये जन्म त्यांना तेलंगणाचे `बृहस्पति’ संबोधले जायचे. आठ अपत्यांचे जनक. गोगलगाईच्या चालीने निर्णय घ्यायचे. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी औद्योगिक खाते सांभाळले. `लायसन राज’ने जो औद्योगिकरणाला विळखा घातला, त्याचा बर्याच प्रमाणात बिमोड करण्यात ते यशस्वी झाले.
ते पंतप्रधान झाले. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था घटका मोजत होती. कर्जाच्या डोंगराखाली भारत चेपला होता. रुपयाचे अवमूल्यन (आत्ताएवढे नाही) होऊन देशाची पत रसातळाला चालली होती. महागाईचा आगडोंब. तशातच अल्पमतातील काँग्रेसचे मंत्रिमंडळ म्हणजे एका चाकावर पळणारा रथ आणि त्याचे अतिशय चतुरपणे सारथ्य करीत होते नरसिंह राव. आर्थिक घडी व्यवस्थित बसविण्यासाठी त्यांनी अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची नेमणूक केली. अर्थव्यवस्थेला आयसीयूमधून बाहेर काढण्याचे काम या जोडगोळीने केले. जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण करून मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. आयएमएफ या संस्थेच्या आर्थिक कार्यक्रमांचा फायदा घेऊन भारताची कर्जातून मुक्तता केली. सरकार अल्पमतामध्ये असूनही विरोधकांना विश्वासात घेण्याची जी चतुराई दाखविली त्याची इतिहास नोंद घेईल. त्याचीच पोचपावती म्हणून नरसिंह रावांना `चाणक्य’ म्हणून संबोधले गेले. पंजाबमधील घुसखोरी व काश्मीरमधील दहशदवाद यावर नियंत्रण आणण्यात यश मिळत होते.
यशस्वी वाटचाल चालू असताना अचानक त्यांच्या कार्यशैलीत बदल होऊ लागला. अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, वेगवेगळ्या घोटाळ्यांचे ढग नरसिंह राव यांच्यावर आदळू लागले. स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी यांचे सल्लागार असलेले ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व सल्लागार चंद्रास्वामी यांचा पंतप्रधानांच्या घरात सहज प्रवेश झाला. चंद्रास्वामी यांचे ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, अभिनेत्री एलिझाबेथ टेलर इत्यादी अनेक विदेशी व्यक्तींपासून शस्त्रास्त्रांचा व्यापारी अदनान खाशोगीपर्यंत अनेकांशी चांगले संबंध होते. डावे पक्ष सोडून इतर पक्षांचे नेतेमंडळी स्वामीजींच्या आशीर्वादासाठी त्यांना पूर्ण शरण गेली होती. शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करणारा शेअर दलाल हर्षद मेहता याने घोटाळ्यातून सुटका होण्यासाठी पंतप्रधानांना एक करोड रुपये भरलेली बॅग दिल्याचा आरोप केला. या आरोपाने पंतप्रधानांची खुर्ची डळमळू लागली. चंद्रास्वामी व हर्षद मेहता हे नरसिंह रावांसह इतर राजकीय नेत्यांचे करोडो रुपये शेअर्समध्ये गुंतवतात, या चर्चेने देश ढवळून निघाला. नरसिंह रावांनी विश्वासमत सिद्ध करण्यासाठी जे.एम.एम. व जनता पक्षाचा पाठिंबा मिळवून सरकार वाचवले. घोटाळ्यामुळे अन्न आणि पुरवठा मंत्री कल्पनाथ राय यांना राजीनामा द्यावा लागला. टेलिफोन खात्याचे मंत्री सुखराम यांनी तर हद्द पार केली. घोटाळारुपी टेलिफोनच्या वायरमध्ये ते संपूर्ण गुरफटून गेले. `हवाला केस’च्या तीन जैन बंधूंनी केलेला महाघोटाळा आणि त्यांना वाचविण्यासाठी चंद्रास्वामी यांनी घेतलेले कथित ३ कोटी रुपये या प्रकरणावर वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने लिहित गेले. राव यांचे एक मंत्री के. के. तिवारी, चंद्रास्वामी व एन. के. अगरवाल (मामाजी) यांनी कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून विरोधी पक्षनेते व्ही. पी. सिंग यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केला. व्ही. पी. सिंग यांच्या मुलाने `सेंट कीटस’ येथील बँकेत करोडो डॉलर्स ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता. वरील तिघांनीही भारताला पेपर पल्पचा पुरवठा करणारे प्रसिद्ध व्यापारी लखुभाई पाठक यांना एक लाख डॉलर्सचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. जैन हवाला केसमध्ये सर्वपक्षीय डर्टी डझन नेत्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. यात डावे पक्ष सामील नव्हते. केस दाखल झाली. पण सर्व निर्दोष. भारताच्या पंतप्रधानांवर सीबीआयने केस दाखल केली. त्यातून ते पुराव्याअभावी निर्दोष सुटले. वरील सर्व कांडांमध्ये एक-दोन सोडले तर कोणालाही शिक्षा झाली नाही.
नरसिंह रावांवर मोठ्ठा ठपका आला बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा. लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथपर्यंत जी रथयात्रा काढली, तिच्यात सर्व उजव्या संघटना सामील झाल्या. लोकभावना अनावर होऊन बाबरी पडली आणि त्याचीच परिणती १९९२मध्ये मुंबई बाँबस्फोटांमध्ये झाली. हजारो लोक त्या दणक्याने मानसिक, आर्थिक व शारीरिकदृष्ट्या नामशेष झाले आणि परिणामी १९९३ साली मुंबईत हिंदू-मुस्लिम दंगे झाले. हजारो लोक मातीमोल झाले, घरादारांची राखरांगोळी झाली. या घटना पंतप्रधान नीटपणे हाताळू शकले नाही. त्यासाठी जनतेसह काँग्रेस पक्षाने त्यांना दोषी धरले.
अशा प्रकारे भारताच्या निधर्मीवादाचे धिंडवडे निघत असताना जे एकेकाळी सोन्याच्या अंबारीतून डौलदार हत्तीवरून मिरवत होते तेच पंतप्रधानपद वरील आरोपांनी ऐरावताच्या पायदळी तुडविले गेले. अशा लज्जास्पद व भारतीय मनावर खोलवर जखम करणारी घटना घडत असल्या तरीही राखेतूनही भरारी घेणार्या फिनिक्स पक्षाप्रमाणे लयाला गेलेली देशाची पत जागतिक पातळीवर एका घटनेने पुन: प्रस्थापित होण्यास कारणीभूत ठरली…
…भ्रष्टाचार, घोटाळे इत्यादींच्या दररोज नकारात्मक बातम्यांनी भरलेली वर्तमानपत्रे वाचून मन अगदी कावले होते. पाण्याचा योग्य पुरवठा न झालेल्या फुलझाडासारखे. कोमेजलेली फुले, मरगळलेल्या फांद्या, बुंध्याकडे डोकं खुपसून बदनामीने खचलेल्या देशाच्या ललाटावर अचानक एके दिवशी सिल्व्हर लाईन चमकली. वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर आनंदाश्रूंनी डोळे डबडबलेले, जगाला वेड लावणारे, ओठांच्या पाकळ्यांतून फुलणारे, अत्यानंदाची ग्वाही देणारे हास्य, झगमगत्या वातावरणात खुललेल्या चेहर्यावर काळ्याभोर केशकलापावर लाखो करोडो नजरा खेचून घेणारा, आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल स्पर्धा जिंकण्यासाठी केलेल्या परिश्रमांनी चमचमणारा, सुंदरतेच्या सर्व गुणांनी ओथंबलेली, हुशार, बुद्धिमान तरुणी ऐश्वर्या राय हिने ‘मिस वर्ल्ड’ या किताबावर आपले नाव कोरले असे ओरडून सांगणारा रत्नजडित मुकूट पाहून मन हरखले. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर व्यंगचित्रातून, त्या मुकुटामधून काही संदेश देता येतो का याचा मन विचार करू लागले.
एकीकडे उपरोल्लेखित घोटाळे, खाबुगिरी, भ्रष्टाचार, महागाई, दंगे इत्यादी डागांनी देशाची प्रतिमा अतिशय विद्रुप भासू लागली होती आणि या परिस्थितीला जबाबदार असलेले पंतप्रधानांवर आरोपांची सुई रोखली गेली होती. पंतप्रधानांनी कर्तव्यबुद्धीने, घटनात्मक वागणुकीने देशाचे नाव त्रिखंडात दुमदुमत ठेवले पाहिजे होते. झाले उलटेच. एक सामान्य नागरिक असलेल्या मुलीने बुद्धिमत्ता व सौंदर्य यांच्या जोरावर स्वत:बरोबर देशाचीही ख्याती अभिमानरुपी कोंदणात नेली. काही क्षण तरी भारतीयांनी आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण उपभोगले. ऐश्वर्या रायने स्वप्रयत्नाने खेचून आणलेली सन्मानाची गंगा आणि काळवंडलेल्या प्रतिमेने प्रगतीच्या गंगेचा प्रवाह उलटे फिरवणारे पंतप्रधान, अशा परस्परविरोधी परिस्थितीत सोबतच्या व्यंगचित्राचा जन्म झाला.
ऐश्वर्या रायच्या डोक्यावर लखलखणारा मिस वर्ल्डचा मुकुट आणि पंतप्रधानांच्या डोक्यावर काळवंडलेल्या अवमानांचे अनेक मुकुट यांचे उपहासात्मक चित्रण करण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. त्यावेळी हे सर्व आरोप पंतप्रधान नाकारत होते. उसने अवसान आणून कोडगेपणाने सुहास्यमुद्रेने ते ऐश्वर्याचे स्वागत करतात आणि तीही त्यांच्याबद्दलचा कोणताही नकारात्मक भाव चेहर्यावर न दाखवता ते स्वागत स्वीकारत आहे. दोघेही एकमेकांना फसवत आहेत. कोडगेपणाचा कळसच की! चालत्या बोलत्या जगात असे मुखवटे धारण केलेले अनेक लोक उगवलेले दिसतात आणि अल्पावधीतच मातीमोल होतात. नरसिंह रावांनी उसने अवसान आणून देशाचा कारभार हाकला. पण जनतेच्या जागरुक वृत्तीने १९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. केलेले सुरुवातीचे कर्तृत्त्व कापरासारखे उडून गेले. परंतु प्रामाणिक, सचोटीचा मिस वर्ल्डचा मुकुट आजही झगमगतो आहे.
पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची कारकीर्द तेरड्याच्या फुलासारखीच! सुरुवातीला लक्षवेधक व नंतर कोणाच्याही खिसगणतीत नसलेली. त्यांनी इहलोकाचा प्रवास संपवल्यावर त्यांचा देह दिल्लीच्या काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यास मज्जाव करण्यात आला. बाबरी मशीद वाचवण्यात ते अयशस्वी ठरले म्हणून. माजी पंतप्रधान असूनही दिल्लीच्या बाहेर, त्यांच्या देहावर तिरस्कार व तुच्छतेची चादर पांघरून हैद्राबादला त्यांच्या गावी त्यांना मुखाग्नी देण्यात आला.
हाच संदर्भ घेऊन तयार केलेल मिस वर्ल्ड व मिस्टर इंडिया हे व्यंगचित्र मीड-डेने प्रकाशित केले. स्वयंभूत स्वतंत्र भारताचे पंतप्रधान डोक्यावर भ्रष्टाचार / घोटाळ्यांचे अनेक जिरेटोप घालून प्रामाणिकता आणि आत्मसन्मानाच्या हिर्यांचा मुकूट धारण केलेल्या ऐश्वर्या राय यांचे सुहास्यवदनाने स्वागत करीत आहेत. केवढा हा विरोधाभास… पदाचे अवमूल्यन…
कालाय तस्मै नम:
सदर व्यंगचित्र फ्रान्स येथील सलोन इंटरनॅशनल या संस्थेने आयोजित केलेल्या १९९५च्या जागतिक व्यंगचित्र प्रदर्शनात माझ्या इतर व्यंगचित्रांसोबत प्रदर्शित करण्यात आले. त्या ठिकाणी मला भाग घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्याबद्दल नंतर कधीतरी…