मी आणि ती आम्ही दोघेच. दारंखिडक्या बंद. पंखा लावूनही मला गरम व्हायला लागलं. हिला काही विचारावं तर शाब्दिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल व्हायचा. मी तिला विश्वासात घेऊन म्हटलं, ताई तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी इथे आलोय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आता इथे कुणीही बघायला नाही, तर डोक्यावरचा पदर बाजूला करता का? तुम्ही त्याच पीडित महिला आहात अशी खात्री पटण्यासाठी मला तुमचा चेहरा पाहायचा आहे. तिने लाजत पदर मागे टाकला आणि मी अनेक फोटो घेतले.
– – –
मुंबई धारावी येथील ढोरवाड्यात राहणार्या विवाहित महिलेवर दोघा प्रतिष्ठित व्यापार्यांनी बलात्कार केला. ही बातमी कुठे प्रसिद्ध होवू नये म्हणून व्यापारी आणि त्याच्या बगलबच्च्यांनी बराच खर्च केला होता. दोघांचे काळे धंदे उजेडात यावे आणि त्याला कठोर शासन व्हावे म्हणून स्थानिक नागरिकांनी समाजसेवकाकडे तक्रार केली. पोलीस केसेस, कोर्टकचेर्या करण्यापेक्षा आपसात भांडणतंटे मिटवण्याची इथे प्रथा आहे. पण काही कार्यकर्त्यांना हे प्रकरण उजेडात आणून आरोपींना सजा व्हावी असे वाटत होते. त्यांच्यापैकीच एक कार्यकर्ता आमच्या संपादकांना येऊन भेटला आणि सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली.
या बातमीची सत्यता तपासून पाहण्यासाठी संपादकांनी माझी नेमणूक केली. ते म्हणाले, या माणसासोबत धारावीत जा. पीडित महिलेच्या नवर्याला भेटून त्याच्याकडून सर्व माहिती आणि संबधित आरोपीचे फोटो घेऊन ये.
बातमी मिळवायला मला उशीर लागत नाही, पण आरोपीचे फोटो काढायला ते काय माझी वाट थोडीच बघत असतील? व्यापार्याची जात भित्री असली, तरी भाडोत्री गुंडांना सुपारी देऊन काम करून घेण्यात हे पटाईत असतात. धारावीत दहा-वीस हजारासाठी जीव घेणारी माणसं भरपूर मिळत, असा तो काळ. मवाल्यांची संख्या अधिक.
त्या माणसासोबत कॅमेरा घेऊन धारावीच्या दिशेने आम्ही टॅक्सीने निघालो. सांभाळून जा, जास्त रिस्क घेऊ नकोस, असे संपादक म्हणाले, पण हे काम रिस्क घेतल्याशिवाय होणारे नव्हते.
टॅक्सीत त्याला बजावून सांगितले, आपण जातोय तेथे जास्त गर्दी जमा करू नका. गुंड कितीही मोठा गुंड असला तरी तो पत्रकाराला मारणार नाही; पण कॅमेर्याची मोडतोड होण्याची शक्यता आहे. कारण, कॅमेर्यातले त्याचे फोटो पुराव्याने गुन्हा शाबीत होण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. त्यामुळे कॅमेरा सांभाळून काम करावे लागेल. काही गडबड झाली तर धूम ठोकायला पळवाटा माहिती असायला पाहिजेत. त्या वाटा दाखवण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा.
यावर तो खळखळून हसला. म्हणाला, अहो ते दिवस गेले, जेव्हा दिवसा ढवळ्या खून पडायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतके गुंड राहिलेत. तेही मला पक्के ओळखून आहेत. मी तुमच्यासंगत असलो म्हणजे तुमच्या केसालाही हात लावण्याची हिंमत होणार नाही. मी अन्यायाविरुद्ध नेहमी उठाव करतो. रास्ता रोको आंदोलन करून गाडी काय, साधी सायकलसुद्धा रस्त्याने जाऊ देत नाही.
खरंतर त्याच्याकडे पाहून तसं वाटत नव्हतं. मी मनात म्हटलं, किती खोटारडा माणूस आहे. हा मला काय मामा समजतो की काय! इथे वरदराजन मुदलियार ऊर्फ वरदाभाई याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही, त्याच्या हुकूमाशिवाय रस्त्यावरचा दगडही हलायचा नाही. अशा गुंडाशी माझा परिचय होता आणि हा काय मला शहाणपणा शिकवतोय! वरदाभाईची माणसं अंगावर आली, तर पॅन्ट पिवळी होईल… ती अंगावर राहिली तरी मिळवलं. धारावी येताच त्याने टॅक्सी थांबवली.
टॅक्सीचे बिल दिले. एका मित्राच्या दुकानात मला घेऊन गेला. तेथील इतरांशी ओळख करून दिली. हे ऑडिटर साहेब आहेत, असे म्हणाला… म्हणजे एडिटर. मी संपादक असल्याचे त्याने सर्वांना भासवले. मीही मान डोलावली. चहापान झाल्यानंतर तो म्हणाला, मला वाटते की मी तुमच्याबरोबर येणं बरं होणार नाही. या केसमध्ये मला पिक्चरमध्ये यायचं नाहीय. मला त्यांनी पाहिले तर हे प्रकरण वरपर्यंत गेले असे ते समजतील. उगाच पाण्यात राहून माशाशी कशाला वैर घ्या. त्यापेक्षा मी तुम्हाला एक मजबूत धडधाकट माणूस देतो. तो तुम्हाला त्या महिलेच्या घरी घेऊन जाईल. त्या पीडित महिलेला तुम्ही प्रत्यक्षात भेटा. किती देखणी दिसते पाहा. पण नवरा पागल निघाला म्हणून इतरांचे फावले. तुम्ही काम उरकून घ्या. तोपर्यंत मी इथे दुकानात थांबतो.
त्याच्या बोलण्याने मी संभ्रमात पडलो याला नेमके काय म्हणायचे आहे ते कळेना.
त्याने उंच धिप्पाड माणूस सोबत दिला, पण तो मतिमंदासारखा वागत होता. हा काय कप्पाळ सोबत देणार!
ढोरवाड्यातील वेड्यावाकड्या वाटांनी आम्ही त्या महिलेच्या घराजवळ पोहोचलो. तिचे पहिल्या मजल्यावरील घर त्याने खालूनच बोट करून दाखवले. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच मागून, असे म्हणून निघून गेला.
अंधारात अरुंद जिन्याच्या पायर्या कशाबशा चढून पहिल्या मजल्यावर पोहोचलो. दारावरील नावाची पाटी वाचून बेल वाजवली. एका तीस पस्तीस वयाच्या माणसाने दरवाजा उघडून माझे हसत स्वागत केले. त्या समाजसेवकाचे नाव सांगून येण्यामागचे प्रयोजन सांगितले.
या! या! तुमचीच वाट पाहत होतो म्हणाला.
त्याने जमिनीवर चादर टाकून बसण्याची विनंती केली. पाणी दिले, बायकोला चहा ठेवण्यास सांगितले.
मी मुद्द्याची गोष्ट काढली. त्या हरामखोर बदमाश व्यापार्यांचे फोटो कसे काढता येतील, ते कोणत्या मार्गाने ये-जा करतात, कुठे उभे राहतात, ती ठिकाणं माहित करून घेतली.
त्या दिवशी नेमकं काय झालं, असं विचारताच तो म्हणाला, मी काय सांगणार? त्यांनी मला काही त्रास दिला नाही. बायकोला विचारा. ती सर्व काही सांगून टाकील. तिच्याच तोंडून ऐका म्हणजे सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील, असे म्हणून त्याने बायकोला माझ्या पुढ्यात आणून बसवले. आता या महिलेला काय विचारावे, कसे विचारावे… मी बुचकाळ्यात पडलो. सोबत महिला पत्रकार असती तर हे काम सोयीचे झाले असते. नवरा म्हणतो, तुम्ही घाबरू नका. बिनधास्तपणे कायपण विचारू शकता. तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही तिला विचारा, खुलेआम विचारा…
तो फारच आग्रह करतो आहे म्हणून मी छातीवर दगड ठेवून काही प्राथमिक जुजबी प्रश्न विचारले. दोघा नराधमांनी जिच्यावर पाशवी बलात्कार केला ती अभागी महिला कसे उत्तर देईल? चेहरा पदराने झाकून डोक्यावर घुंगट घेऊन ती गप्प बसलेली. तोंडातून चकार शब्द काढेना.
ही मुकी आहे की बहिरी… आणि ती तीच पीडित महिला आहे की कुणी डमी बसवली? मला शंका आली.
नवरा म्हणाला, आमच्या समाजातील बायका नवर्यासमोर दुसर्या पुरुषाशी बोलणार नाहीत. चेहरा दाखवणार नाहीत. परपुरुषांसमोर डोक्यावर घुंगट घेण्याची आमची परंपरा आहे. मी इथून निघून जातो, म्हणजे ती तुमच्याशी मन मोकळे करून बोलेल. हे सांगून तो खाली निघून गेला.
मी आणि ती आम्ही दोघेच. दारंखिडक्या बंद. पंखा लावूनही मला गरम व्हायला लागलं. हिला काही विचारावं तर शाब्दिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल व्हायचा. मी तिला विश्वासात घेऊन म्हटलं, ताई तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी इथे आलोय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आता इथे कुणीही बघायला नाही, तर डोक्यावरचा पदर बाजूला करता का? मला फक्त कार्यालयीन कामासाठी तुमचा फोटो काढायचा आहे. तुम्ही त्याच पीडित महिला आहात अशी खात्री पटण्यासाठी मला तुमचा चेहरा पाहायचा आहे. तिने लाजत पदर मागे टाकला आणि वीज कडाडून चमकावी तशी कॅमेर्याची फ्लॅश चमकली. मी अनेक फोटो घेतले.
ती उठली आणि आत जाऊन मला पुन्हा चहा आणून दिला. यावेळी तिच्या चेहर्यावर घुंगट नव्हता. मी गटागटा चहा ढोसला. जीभ भाजली, तरी तिला काही त्रोटक प्रश्न विचारले. दरम्यान तिच्या मनावरचे दडपण कमी झालेले दिसले. नवरा म्हणाला त्याप्रमाणे ती मनमोकळेपणाने बोलू लागली. मी थरथरत्या हातांनी सर्व टिपून घेतले. तिने माझे नाव विचारले. मी सांगितले, घनश्याम! त्याकाळी मोबाईल नव्हता.
खूप वेळ आम्ही बोलत होतो आता जास्त वेळ इथे राहावेना. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था झाली. मी उठलो तसे तिने खिडकी उघडून नवर्याला हाक मारली. बायकोच्या आज्ञेत असल्याप्रमाणे तो हाक मारल्यानंतरच वर आला. म्हणाला हे कधीच्या पेपरात येईल? बातमीसोबत तिचा फोटोपण छापा, नाव गाव पण डिटेलमध्ये टाका, नाहीतर सत्यघटना लोकांना समजणार नाही (अत्याचारितेचे नावही उघड न करण्याचा दंडक नंतर आला). दोन्ही आरोपींवर समाजाने बहिष्कार टाकायला पाहिजे.
मी हो म्हटलं आणि हात जोडून निरोप घेतला. वाटेत तो समाजसेवक भेटला, म्हणाला, झालं ना काम! व्यवस्थित तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळाले ना? मी आलो असतो तर ती माझ्यासमोर खुलेपणाने बोलली नसती, म्हणून तुम्हाला एकट्याला पाठवलं.
मी त्यालाही हात जोडले आणि निघालो. सविस्तर बातमी लिहून संपादकांकडे दिली. पीडित महिलेचा फोटो दाखवला. फोटो पाहून त्यांचा विचार बदलला. पीडित महिलेचा फोटो छापता येत नाही पण तिच्या डोळ्यावर पट्टी ठेवून फोटो प्रसिद्ध करायला हरकत नाही, असे म्हणाले आणि त्यांनी बातमीसह तो फोटो प्रसिद्ध केला.
मी संपादकांनाही हात जोडले. धारावी पोलीस ठाण्याचे अधिकारी एस. एम. कोकरे यांनी सखोल तपास करून प्रथम हिरालाल या व्यापार्यास अटक केली. नंतर रेशनिंग दुकानाचा मालक रमणिकलाल याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात टाकले.