खवळलेला दर्या आणि त्याला शांत करण्यासाठी श्रीफळ अर्पण करणारे कोळी बांधव हे मुंबईच्या नित्य परिचयाचे दृश्य. आदरणीय बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमध्ये फार मोजक्याच कल्पनांची पुनरुक्ती होते. त्यातली ही एक कल्पना. इथे देशात माजलेल्या अस्थिरतेवर पंतप्रधान चरणसिंग यांचे नवे मंत्रिमंडळ उतारा ठरेल का, अस्वस्थतेचा दर्या शांत होईल का, असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारला आहे… महाराष्ट्रात आज नेमकी हीच परिस्थिती आहे. महिना होत आला तरी दोनच मंत्री, एक मुख्यमंत्री आणि दुसरे असंवैधानिक उपमुख्यमंत्री… दोघांनाही धक्का देऊन या पदांवर बसवण्यात आलेलं आहे… एकाच्या हृदयात धाकधूक, दुसर्याच्या हृदयात नाराजी… राज्यात पुराने हाहाकार माजवलेला असताना मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या चरणी रुजू व्हायला धावताना दिसतात… इथून पुढे सगळी सूत्रं दिल्लीहून हलणार, तेच ‘मालक’ आहेत, असा स्पष्ट संदेश दिसतो आहे… महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरच्या नेत्याची अवहेलना महाराष्ट्र अविश्वासाने पाहतो आहे… कालपर्यंत शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्या नावावर पोळ्या भाजणारे आज ‘आमच्यावर किती अन्याय झाला होता हो’ असं रडून दाखवतायत… महाराष्ट्राची खदखद मतपेटीतून व्यक्त होणार आहे… गद्दार आणि महाशक्ती यांच्या अनौरस मंत्रिमंडळाचा नारळ या दर्याला शांत करू शकणार नाही.