प्रतिभाशाली निर्मात्याचा अमृतमहोत्सव
प्रतिभावान आणि अनुभवी निर्माता, दिग्दर्शक, कवी आणि लेखक अरुण काकतकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस नुकताच, दि. २४ एप्रिल रोजी झाला. दूरदर्शनच्या इतिहासात अनेक अतिशय आशयघन, दर्जेदार कार्यक्रम, लघुपट, मालिका, चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शनाचं श्रेय काकतकरांकडे जातं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात त्यांच्या सोनेरी कामगिरीची दखल कायम आदराने आणि कौतुकानं घेऊन, त्यांचं मोठेपण मान्य करावंच लागेल.
त्यांचा प्रवास सोपा नव्हता. पण सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात दूरदर्शन आल्यावर, मराठीतील सर्वोत्तम साहित्यिक, संगीतकार, गायक, अभिनेते, कलावंत दूरदर्शनकडे ओढून आणून अवघ्या महाराष्ट्राची अभिरुची घडवण्याचं आणि समृद्ध करण्याचं काम ज्या पहिल्या फळीतील मोजक्या निर्मात्यांनी केलं, त्यात काकतकर आघाडीवर होते. अशा निर्मितीसाठी मुळात त्या निर्मात्याकडे कलेची दृष्टी, जाण आणि कलावंताचा विश्वास संपादन केलेला असावा लागतो. काकतकर या सर्वच बाबतीत उजवे तर होतेच, पण तंत्राच्या बाबतीतही फारच निष्णात होते. पूर्वीचे जड फिल्मचे कॅमेरे घेऊन त्यांनी स्वतः हातानं चित्रीकरण केलंय, स्वतः संकलनही केलंय. म्हणूनच ते परिपूर्ण निर्माता आहेत. याशिवाय रंगमंचावर अवीट गोडीचे गीतांची कार्यक्रम त्यांनी तयार केले आणि रसिकांपुढे आणले. महाराष्ट्रातील अनेक तरूण आणि नव्या गायकांना, कवींना, नाट्य लेखक व अभिनेते दिग्दर्शक कलाकारांना, तंत्रज्ञांना अरूण काकतकरांनी चेहरा आणि नाव मिळवून दिलं. भाषा, शब्द आणि व्याकरण तसंच भावदर्शनाबाबत प्रचंड आग्रही असलेल्या काकतकरांनी दूरदर्शनमधील साहित्य, संगीत, नाट्यविषयक प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम निर्मितीच्या भरीव कामगिरीनंतर, पुण्याच्या बालचित्रवाणीमध्ये सुद्धा माध्यमावरची पकड सिद्ध केली. मुलांच्या मानसिकतेला प्रगल्भ करणारे शैक्षणिक कार्यक्रम तयार केले.
त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीची योग्य दखल मात्र सरकार दरबारी घेतली गेली नाही, किंवा त्यांचा उचित, यथोचित सन्मानही झाला नाही. मनानं कवी, वृत्तीने निर्माता आणि कृतीने जन्मजात प्रतिभाशाली दिग्दर्शक असलेल्या अरूण काकतकरांना उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य मिळो हीच त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सदिच्छा!
– समीरण वाळवेकर
– – –
श्रीलंका एवढी गाळात कशामुळे गेली?
श्रीलंकेतील अरिष्टे ‘शुद्ध’ आर्थिक की त्याचं ‘मूळं’ देशातील राजकीय प्रणालीत?
श्रीलंका, त्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, गेल्या ७० वर्षांतील सर्वात गंभीर अरिष्टातून जात आहे… अन्नधान्य तुटवडा, विजेचे लोडशेडिंग, पेट्रोल/डिझेल उपलब्ध नसणे आणि ते काही पटींनी महाग होणे, देशातील धान्याचे उत्पादन अचानक कमी होणे, महागाई ३० टक्के वाढणे आणि आता बँकिंग धोक्यात येणे आणि हे सर्व एकाचवेळी!
प्रश्न असा पडतो की, हे सगळे एकाचवेळी का घडले?
कोरोनामुळे पर्यटनावर घाला आला होता, हे काय माहित नव्हते? परकीय चलनाची गंगाजळी आक्रसत आहे, हे माहित नव्हते? आपल्या देशाने जे परकीय कर्ज घेतले आहे, ते कोणत्या तारखेला आणि किती डॉलर्स परत करायचे आहेत, हे माहित नव्हते? एका रात्रीत रासायनिक खतांवर बंदी घालून, त्याऐवजी सेंद्रिय खते शेतकर्यांना वापरायला लावण्यातून शेतीक्षेत्रात अंदाधुंदी माजेल हे माहित नव्हते? रशिया-युक्रेन युद्धामुळे खनिज तेलाचे भाव वाढत आहेत हे दिसत नव्हते? श्रीलंकन रुप्याचे ५० टक्के अवमूल्यन करुन, आयातीवर अवलंबून असणारी, निर्यात आपोआप वाढणार नाही, हे कळत नव्हते?
थोडेबहुत वाचन असणार्या, कॉलेजवयीन विद्यार्थ्याला जे माहित होते; ते, हे सारे निर्णय घेणार्या प्रौढ धोरणकर्त्यांना माहित नसणे असंभव… प्रश्न असतो अचूक आणि अद्ययावत माहिती, आकडेवारी, त्याचे होऊ शकणारे गंभीर परिणाम, या निर्णयावर शेवटची मोहोर उमटवायचा अधिकार असणार्या, राजकीय नेत्यांना कोणी सांगत आहे की, नाही? आणि इथे श्रीलंकेत, सर्व सत्ता दोनचार व्यक्तींच्या हातात एकवटली असण्याचा संबंध आहे!
राजकीय सत्ता ज्यावेळी एक-दोन व्यक्तींच्या हातात एकवटते, त्यावेळी या व्यक्ती आपल्याशी व्यक्तिगत निष्ठा वाहणार्या, सुमार वकुबाच्या व्यक्तींना सल्लागार म्हणून निवडतात. बुद्धिमान, कणा असणार्या व्यक्ती, आपल्याविरुद्ध बंड करतील, अशा धास्तीत हुकूमशहा असतात. बॉसला नक्की काय पसंत पडेल, याचा अंदाज घेत, हे कणाहीन सल्लागार एकाधिकारी राजकीय नेत्यांना सल्ला देतात. हळुहळू उच्चशिक्षित, प्रोफेशनल्स त्या सत्तेपासून दूर होतात, राजीनामे देतात… नेमके हेच श्रीलंकेत झाले आहे! हा ‘गोटाबाया’ कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न नाहीये, हा कोट्यवधी सामान्य श्रीलंकन नागरिकांच्या मानवी यातनांचा प्रश्न आहे.
लोकशाही म्हणजे पाच वर्षांतून एकदा मतदान करुन, कोण्या एका व्यक्तीच्या हातात सत्ता सोपवणे नव्हे; तर, त्याचा अर्थ बराच व्यापक आणि खोल आहे. मुख्य म्हणजे, त्याचा संबंध देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवनमरणाशी निगडित आहे.
– संजीव चांदोरकर