देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जनतेने आक्का म्हणजे मोठी बहीण म्हणावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे खरेतर. पण, केंद्रीय अर्थमंत्रीपद स्वीकारल्यापासून त्यांच्या चेहर्यावर सतत करवादलेले, त्रासलेले भाव असतात. त्यांचा मनमोकळे, दिलखुलास हसतानाचा फोटो शोधणे कठीण जाईल. भारतासारख्या खंडप्राय देशाची अर्थव्यवस्था सांभाळणे, तिला दिशा देणे हे कामच तसे जिकिरीचे आहे. त्यात अर्थमंत्र्याला, त्याच्या मतांना सरकारात काही किंमत असेल, तर ठीक. लहरी महंमदाप्रमाणे मनात येईल ते आर्थिक दु:साहस अर्थमंत्र्यालाही विश्वासात न घेता करणारे सर्वोच्च नेते लाभलेले असतील तर चेहर्यावर हसू कुठून उमटणार? कायम टेन्शन… आता काय जाहीर होणार? काय निस्तरावे लागणार? कशाची कौतुके गावी लागणार?
ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला की गुण लागतोच. नाहीतर सहृद दिसणार्या निर्मलाक्कांनी ‘देशात इतकी काही महागाई नाही’ असे गोरगरीबांच्या जखमेवर मीठ चोळणारे उद्गार काढले नसते. देशातल्या गोरगरीबांची थट्टा उडवण्याची थोर परंपरा भारतीय जनता पक्षाने नोटबंदीपासून जोपासली आहे. इतर अनेक कुप्रथांप्रमाणे याही कुप्रथेचे जनक साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. प्रपंचापासून पळ काढलेल्यांना सांसारिकांच्या दु:खावर हसण्यात विकृत आनंद मिळतो. नोटबंदी जाहीर केल्यावर ज्यांच्याकडे लग्नसमारंभ होते, त्यांची कशी धावपळ झाली, यावर परदेशात हास्यविनोद करून तोच आनंद मोदी यांनी लुटला होता. देशात कांदा-लसूण यांचे भाव कडाडले तेव्हा निर्मलाक्कांनी आपण मोदींच्या आक्का आहोत, हेच दाखवून दिले. मी नाही बाई कांदा आणि लसूण घातलेले जेवण खात, त्यामुळे मला काही जाणवलीच नाही महागाई, हे त्यांचे तेव्हाचे अद्भूत उद्गार होते. तुम्हीही आमच्याप्रमाणेच ‘सात्त्विक’ बना आणि कांदालसूण त्यागा, उगाच भाववाढीबद्दल त्रागा कशाला करता आहात, असे त्यांना त्यातून म्हणायचे होते. ताई, तुमचे पोट मोदीजींच्या हवेतल्या बातांनीही भरत असेल, बाकीच्यांना चार घास जेवावे लागते, हे तेव्हा त्यांना कोणी सांगितले की नाही कोण जाणे!
आता देशात महागाईचा कहर झाला आहे, इंधनदरवाढीने सगळ्याच वस्तू कडाडल्या आहेत, तेव्हा देशाच्या अर्थमंत्री आधी देशात महागाईच नाही, असं सांगतात आणि नंतर जी काही महागाई आहे ती रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धामुळे झालेली आहे; ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, याला आम्ही काय करणार, असे वर शहाजोगपणे विचारतात, असा जिवंत विनोद सुरू आहे. अहो आक्का, देशावर अशी परिस्थिती येतच असते. तिच्यातून बाहेर काढण्यासाठी तुमची आणि प्रधान सेवकांची जनतेने पाच वर्षांसाठी नेमणूक केली आहे. २००८ साली सबप्राइम घोटाळ्यानंतर जगभरात मंदीची लाट आली होती, तेव्हा कुशल अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या हातात देशाचे सुकाणू होते. त्यांनी कौशल्याने तो पेचप्रसंग हाताळला आणि त्या मंदीची झळ भारतीय उद्योगधंद्यांना कमीत कमी बसेल, याचे नियोजन केले. महागाई वाढू दिली नाही आणि विकासाचा दर फार घटू दिला नाही. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्षही ज्यांना (खरोखरीच- यांनी बळजबरीने गळ्यात न पडता) गुरूस्थानी मानत त्या विद्वानाइतकी तुमची अर्थशास्त्रात पोहोच असावी, अशी अपेक्षा तुमचा शत्रूही करणार नाही. पण इंधनदर स्वस्त असताना देशवासीयांना चढ्या दराने इंधन विकून कमावलेले लाखो कोटी रुपये आता उपयोगाला आणायचे नाहीत तर कधी आणायचे? जनतेला महागाईच्या झळांमधून कसला तरी दिलासा द्याल की नाही? तो देण्याऐवजी तुम्ही राज्यांना उत्पन्नवाढीसाठी आणखी काही वस्तूंवर जीएसटी वाढवण्याच्या विचारात आहात. राज्यांना त्यांचा महसुलातला वाटा द्यायचा नाही, महसूल हवा तर वाढवा जीएसटी, म्हणजे लोक राज्य सरकारांच्याच नावाने बोटे मोडणार, असा तुमचा कारभार आहे.
बाकी सोडा निर्मलाक्का, लोकांना दिलासा देण्याची तुमची तयारी आणि क्षमता नसेल तर निदान तरी गप्प बसा! कुठे आहे महागाई, मला तर बाई ती दिसतच नाही, असे उद्गार काढून सर्वसामान्यांच्या जखमांवर मीठ कशाला चोळता? अर्थात तुमच्याकडून तरी किती अपेक्षा बाळगणार म्हणा! जिथे देशाचे सर्वोच्च नेते कॅशलेस व्यवहार किती वाढले याचा उदोउदो करताना एक दिवस कॅशलेस डे साजरा करा, असे सांगतात, तिथे तुमच्याकडून काय अपेक्षा करायची? मोदीजींच्या आणि तुमच्या अर्थनिरक्षर धोरणांमुळे लोक कॅशलेस डे रोजच साजरा करता आहेत… एखाद्या दिवशी त्यांना कॅशयुक्त दिवस साजरा करण्याची संधी द्या! बहुमताच्या हत्तीवरून जमिनीवर या, जिव्हाळ्याने निर्मलाक्का म्हणण्याची संधी द्या!