यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चारशे जागांहून अधिक जागा जिंकेल अशा वल्गना अगदी अलीकडेपर्यंत केल्या जात होत्या. तो जोश कधीच ओसरला असून जनता आपल्याला सत्तेतूनच तडीपार करेल की काय, अशा भीतीने भारतीय जनता पक्षाला ग्रासले आहे. त्याच तडफडाटातून तो रोज नवनवीन चुका करून आपल्या पायावर नवनवे धोंडे मारून घेतो आहे.
मुळात हे चारशे पारचे फॅड आले कुठून?
१९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत राजीव गांधी यांनी चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता… खरेतर त्यांनी काहीच केले नव्हते, जनतेने प्रतिदुर्गा इंदिराजींना आदरांजली म्हणून राजीव यांच्या झोळीत भरभरून मते टाकली होती… पण, प्रत्येक बाबतीत नेहरू-गांधी यांची बरोबरी करायचा प्रयत्न करायचा, त्यांना आपल्यापेक्षा खुजे दाखवण्याचे प्रयत्न करायचे, हा संघपरिवाराचा केविलवाणा उद्योग राहिला आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागच नसलेली संघटना नेहरू-गांधींच्या उंचीचे नेते आणणार कुठून? पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही या नेहरूरोगाने पहिल्यापासून ग्रस्त आहेत. नेहरूंचे जाकीट पळवून चाचा मोदी बनण्याचे हास्यास्पद प्रयत्न त्यांनी १० वर्षे केले, त्यातून नेहरूंची बदनामी होण्याऐवजी नेहरूंच्या अभ्यासाला चालना मिळाली आणि त्यांचं नेतृत्त्व किती उत्तुंग होतं, हेच उत्तरोत्तर स्पष्ट होत गेलं.
आंधळ्या काँग्रेसद्वेषापायी राजीव गांधींपेक्षा जास्त यश निवडणुकीत मिळवून दाखवण्याचा चंग बांधून मोदींनी ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केली खरी, पण जमिनीवरचं वास्तव काही वेगळंच आहे याची त्यांना नसली तरी अमित शहा यांना कल्पना होतीच. हळुहळू फुग्यातली हवा कमी होऊ लागली आणि मोदी सरकारची जागा एनडीए सरकारने घेतली, आपलं आघाडी सरकार आहे, याची जाणीव झाली आणि हळूच एनडीए चारशे पार जाणार, भाजप ३७० पार करणार, अशी दुरुस्ती केली गेली. अलीकडे तर भाजप ३०० जागा नक्की मिळवणार, असं त्यांचे धुरीण छातीठोकपणे सांगत आहेत. म्हणजे निवडणूक प्रचाराला सुरुवात होण्याच्या आधीच १००ने आकडा कमी झाला!
हाताशी ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणा, स्टेट बँकेसारखे लाळघोटे, कणाहीन निवडणूक आयोग, समाजमाध्यमांवरची ट्रोलसेना, प्रसारमाध्यमांमधले लाचार आणि भक्त, राम मंदिरापासून नाना प्रकारचे इव्हेंट करून देशातलं सगळं वातावरण भाजपमय करण्याची सोय, हे सगळं असताना या पक्षाला मुळात आघाडीची गरज असता कामा नये. देशभर सतत सगळीकडे सुरू असलेल्या अफाट विकासकार्याच्या रोज छापून येणार्या जाहिराती, व्हॉट्सअपवरचा विश्वगुरू मोदींच्या त्रिलोकी वाजणार्या डंक्याचा अहोरात्र प्रचार यातून प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनाही घर देणारा (त्यांच्यापेक्षा मोठा) महापुरुष अशी उभी केली गेलेली मोदींची प्रतिमा खरी असेल, तर स्वबळावर चारशे काय, पाचशेचा आकडाही पार करता यायला हवा होता भाजपला.
पण, हा सगळा प्रचार आधीपासून भाजपभजनी लागलेल्यांना गुंगवून ठेवण्यासाठी आहे. मुळात जे या प्रचाराला बळीच पडले नव्हते, त्यांना वास्तवातल्या सगळ्या भानगडी माहिती आहेत. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपने केलेला ढळढळीत उघड भ्रष्टाचार ‘चौकीदारच चोर निघाला’ ही भावना लोकांच्या मनात निर्माण करतो आहे. त्यामुळे एकेका जागेसाठी कोणाकोणाच्या नाकदुर्या काढण्याची वेळ या पक्षावर आली आहे, ते पाहिल्यावर अब की बार, भाजप तडीपार हीच घोषणा खरी वाटू लागते.
म्हणूनच हाती असलेल्या सत्ताबळाचा अफाट गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न या पक्षाने चालवले आहेत. भारतीय सत्तेचं केंद्रस्थान असलेल्या नवी दिल्लीतून या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला तडीपार करणारे आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीश्वर आधीपासूनच खार खाऊन होते. तथाकथित मद्य धोरण घोटाळा उघडकीला आला, तेव्हा या सुताने ही मंडळी आपल्यापर्यंत येऊन पोहोचणार, याची कल्पना केजरीवालांनाही होती. आपल्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर अटक होऊ शकते, हे तेच सांगत होते. भाजपने तेही करून दाखवलं आहे.
यावर मोदीचरणी मेंदू गहाण ठेवलेले भक्तगण म्हणतात की भ्रष्टाचार केला असेल म्हणून तर तुरुंगात गेले आहेत ना? हीच मंडळी केजरीवालांनी भाजपपुढे मान तुकवली असती आणि त्या वळचणीला जाऊन बसले असते, तर केजरीवालांचे गुण गाताना थकली नसती. ही यांची भ्रष्टाचाराविषयीची चाड. न खाऊंगा न खाने दूँगा अशा वल्गना करणार्या मोदींनी काँग्रेससह सर्व पक्षांमधले भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते वेचून आपल्यासोबत आणले आहेत, त्यांना पायघड्या अंथरल्या आहेत. प्रामाणिकपणे संघकार्य करणारे कार्यकर्ते त्यांच्या चहानाश्त्याची सोय पाहणारे स्वयंसेवक बनून बसले आहेत. निव्वळ धर्मद्वेषाच्या आहारी जाऊन सद्सद्विवेकबुद्धी हरवलेल्यांच्या पदरी नियतीने हे दान टाकलं आहे.
केजरीवाल, मनीष सिसोदिया, हेमंत सोरेन वगैरेंना तुरुंगात टाकलं की ते प्रचारात नसतील आणि मग आपल्याला निवडणुका ‘मॅनेज’ करता येतील, हा भ्रम भाजपने मनोमन जोपासला आहे. जनता हातात टाचणी घेऊन उभी आहे, याची त्या भ्रमाच्या फुग्याला कल्पना नसावी.