□ कोरोनाकाळात गर्दी करून चंद्रभागेला प्रेतवाहिनी करायची आहे का?- विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा सवाल
■ चिंता करू नका. हा महाराष्ट्र आहे. इथले लोक राजकारणाला भुलून कोरोना संकटात शुंभमेळा भरवण्याइतके बेजबाबदार नाहीत.
□ ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट, लसीकरणावर भर
■ आमच्याकडेही तिसरी लाट येण्याची शक्यता; पण भर राजकारणावर, इव्हेंटबाजीवर, प्रतिमानिर्मितीवर.
□ कांदिवलीपाठोपाठ बोरिवलीतही बोगस लसीकरण झाल्याचा संशय
■ मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे हा शब्दप्रयोग आपल्याकडे कसा जन्माला आला असेल, तेच दाखवून देताहेत हे लोकांच्या जिवाशी खेळणारे नराधम.
□ पुण्यात चितळे बंधूंकडे २० लाखांची खंडणी मागणार्यांना अटक.
■ कोणीतरी सोशल मीडियावर म्हटलंय ते बरोबरच आहे, जागा चुकलात. तिथे अर्धा बाकरवडीचा तुकडाही जास्त मिळत नाही ग्राहकाला. तुम्हाला २० लाख द्यायला बसलेत.
□ कुडाळमध्ये शिवसेना १०० रुपयांत दोन लिटर पेट्रोल देणार या घोषणेने भाजपचा भडका
■ तुम्ही १०० रुपयांत चार लिटर द्या की! तुम्हाला काय कमी आहे? हवं तर एखादं पंचतारांकित पक्ष कार्यालय कमी बांधा.
□ चीनची कूटनीती जोरात, भारतातल्या अनेक क्षेत्रांना हॅकिंगचा धोका
■ आपल्याकडे सोशल मीडिया वापरून लोकांचे मेंदूही हॅक केले जातात, हे हॅकिंग चिल्लर आहे आपल्यासाठी.
□ जीवनसाथी निवडण्याचा व्यक्तीचा हक्क अबाधित; समाज किंवा सरकार हस्तक्षेप करू शकत नाही : न्यायालयाचा निर्वाळा
■ जिकडे तिकडे ‘लव्ह जिहाद’ दिसणार्यांना आणखी एक चपराक
□ संभाव्य पूरस्थिती टाळण्याच्या दृष्टीने अलमपट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत महाराष्ट्र-कर्नाटकात समन्वय
■ याच सामंजस्याने बिदर, भालकी, निप्पाणी, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रही होऊन जाऊ द्या.
□ श्रीमंत मुलांप्रमाणेच मध्यमवर्गीय आणि गरीब मुलांनाही
ऑनलाइन शिक्षण मिळावं यासाठी शैक्षणिक आणीबाणी जाहीर करावी : डॉ. सुनीलकुमार लवटे यांची मागणी
■ अगदी योग्य मागणी. आधीच एक वर्ष गेलं आहेच मुलांचं; आता तरी जागे व्हा!
□ केंद्र सरकारचा बंपर सेल सुरूच; सरकारी तेल कंपन्या १०० टक्के विकणार
■ त्या कोण खरेदी करणार तेही उघड आहे! हे त्यांचेच प्रधान सेवक आहेत.
□ लोकशाहीचे धडे आम्हाला देऊ नका : रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना सुनावले
■ बरोबर आहे त्यांचं… धडे त्यांना द्यावेत ज्यांच्यात काही शिकण्याची कुवत आहे… कोरोनाच्या पहिल्या लाटेने एवढा मोठा धडा दिलाष्ठ हे काही शिकले का?
□ चेन्नईत लस घेतलेल्या ग्राहकाला सलूनमध्ये ५० टक्के सवलत
■ बारवाल्यांनो, वाइन शॉपवाल्यांनो, जरा काहीतरी शिका या सलूनवाल्याकडून.
□ दूरदर्शनवरील प्रादेशिक भाषांतील बातमीपत्रांवर कुर्हाड आणण्याच्या हालचाली सुरू
■ एक देश, एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती अशा एकारलेल्या तत्त्वांना बळ दिल्याची ही फळं आहेत. मोकळंढाकळं वैविध्य हे आपलं बलस्थान आहे, याचा विसर पडला की प्रादेशिक तुकडे पडणं अटळ आहे.
□ सुसंस्कृत डोंबिवली आणि ऐतिहासिक कल्याण नशेच्या गर्तेत; एक कोटींचे एलएसडी पेपर सापडले
■ आपणच सुसंस्कृत आहोत आणि आपल्यालाच ऐतिहासिक वारसा आहे, यांच्या नशेपुढे एलएसडी क्या चीज है?
□ उत्तर प्रदेशात धर्मांतराचे रॅकेट; गोरगरीब हिंदूंना पैसे देऊन धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करणार्या मौलानांना अटक
■ इथल्या उच्चजातीचा टेंभा मिरवणार्या हिंदूंनी आधी आपल्याच धर्मातल्या गोरगरीब बांधवांना माणूसपणाचा दर्जा द्यावा, मग, पैशासाठी धर्म बदलण्याचं पातक त्यांच्याकडून होणारच नाही.