रोहिणीला जवळून पाहिलेल्यांना तिची दोन रूपं दिसत असावीत… एक अत्यंत अवखळ, मिश्किल व्यक्तिमत्व… आणि दुसरं अत्यंत परिपक्व सामाजिक भान असलेलं आणि कमालीचं नाट्यप्रेम असलेलं व्यक्तिमत्व. ज्याच्या त्याच्या वाट्याला ते त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे येते. एका समर्थ अभिनेत्रीच्या कारकीर्दीचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एक दिग्दर्शक म्हणून इतक्या जवळून पाहायला मिळावा हे माझे भाग्यच…
—-
तिचं नाव खूप ऐकलं होतं… ती दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थिनी होती, शिवाय अल्काझींची आवडती विद्यार्थिनी, असा तिचा लौकिक होता. तशात तिने एनएसडीचा आणखी एक ब्राइट स्टुडंट जयदेव हट्टंगडी याच्याशी विवाह केलेला. ‘आविष्कार’च्या ‘चांगुणा’ या नाटकात तिची प्रमुख भूमिका होती आणि त्या वर्षीचा राज्य नाट्य स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळवलेला. थोड्याच कालावधीत नावाचा दबदबा तयार झालेली ही अभिनेत्री ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकातल्या म्हाळसाच्या भूमिकेसाठी आयएनटीचे सर्वेसर्वा दामुभाई झवेरी यांनी मला सुचवली तेव्हा मी थोडा चिंतेत पडलो. खरे तर दामुभाईंनी शिवाजी साटम आणि रोहिणी हट्टंगडी ही नावे नुसती सुचवली नाहीत, तर त्यांना घेऊनच तुम्हाला हे नाटक दिग्दर्शित करायचं आहे असं सांगितलं. अर्थात, दोन्ही नावं माझ्या चांगलीच परिचयाची असल्याने मला आनंदच झाला. कारण तोपर्यंत मी आमच्या ‘या मंडळी सादर करू या’ या संस्थेतर्पेâ आमच्याच मित्रमंडळीत नाटके बसवली होती. अशा नावलैकिक मिळवलेल्या कलावंतांबरोबर मी प्रथमच काम करणार होतो. हळुहळू पात्रयोजना होत गेली. शंकरराव धामणीकर आणि त्यांचे सहकारी यांचा ग्रूप एका बाजूला आणि दुसर्या बाजूला रोहिणी हट्टंगडी, शिवाजी साटम, विजय कदम, जुईली देऊसकर, शाहीर विठ्ठल उमप असा दुसरा ग्रूप.
इतर कोणाचंही मला जास्त टेन्शन नव्हतं, सर्वात जास्त टेन्शन होतं ते रोहिणीचंच. एनएसडी, अल्काझी, आविष्कार, चांगुणा, असा पाठपसारा असलेली अभिनेत्री होती ती आणि माझं तसं पाहायला गेलं तर आयएनटीसारख्या मोठ्या संस्थेबरोबरचं पहिलंच नाटक- तेसुद्धा असं संशोधन नाट्य. पण पहिल्याच दिवशी रोहिणीचा अप्रोच एकदम सुखावणारा होता. तिने स्वत: होऊन आपली ओळख करून दिली. मला दिग्दर्शक म्हणून रिलॅक्स केलं. म्हाळसा या व्यक्तिरेखेबद्दल मी बरीच माहिती मिळवली होती. जागरण या प्रकारात तिचं वावरणं, नृत्य, बोलायची पद्धत, हातात घाटी (दोन्ही बाजूने वाजणारी घंटा) घेऊन ठराविक पद्धतीने नाचत हावभाव करून चढ्या आवाजात संवाद बोलण्याची पद्धत, या सर्व गोष्टी तिने अगदी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी असल्यासारख्या माझ्याकडून ऐकून घेतल्या. संगीतकार मीच होतो, त्यामुळे गाणी आणि त्यातलं पद्य व गद्य कशा फरकाने आविष्कृत व्हायला पाहिजे, याविषयी मी पूर्वतयारी करून आलो होतो, ती तिने समजावून घेतली. शिवाय या नाटकात मी एक प्रयोग केला होता. पात्रांच्या सर्व हालचाली ९० अंशाच्या कोनात बसावल्या होत्या. रिसर्चमध्ये मला त्या सापडल्या होत्या, मूळ जागरण फॉर्म बारकाईने पाहिल्यानंतर त्या माझ्या लक्षात आल्या आणि मला गंमत वाटली. हे असं करून बघितलं तर? त्यासाठी कलावंतांनाही त्या पटायला हव्यात, अन्यथा त्या गळी उतरवाव्या लागल्या असत्या. नेमकी या सर्व गोष्टींची जाणीव असलेली आणि नवे स्वीकारायची, ते तसे करून बघायची जिद्द असलेली अभिनेत्री रोहिणीच्या रूपाने सापडली आणि माझं काम सोप्पं झालं. तीच गोष्ट शिवाजी, विजय, जुईली यांच्याही बाबतीत झाली.
तालमीला रोहिणी म्हाळसा म्हणून उभी राहिली आणि तिच्यातलं ते ट्रान्सफॉरमेशन अचंबित करणारं होतं… तिने एकदाच सर्व समजून घेतलं, त्यानंतर आपोआप तिच्यातून म्हाळसा उभी राहिली. सुरुवातीची खंडेरायाच्या प्रेमात पडलेली म्हाळसा, लग्नानंतर त्याच्यापाशी हट्ट करून सारीपाटाचा डाव मांडणारी म्हाळसा, त्यात जिंकल्यानंतर त्याच्याकडून जिंकलेला ‘वर’ हातचा राखणारी म्हाळसा, बाणाईचं प्रेमप्रकरण कळल्यानंतर त्याला शाप देऊन त्याची भंबेरी उडालेली बघून त्या फाजितीचा आनंद लुटणारी म्हाळसा… आणि नंतर बाणाईला सवत म्हणून स्वीकारणारी म्हाळसा, या विविध छटा तिने कमालीच्या उभ्या केल्या. हे सर्व करत असताना रिहर्सलचा आनंद घेणारी रोहिणी त्यातली गाणी व नृत्यही बेमालूम करीत होती. शंकरराव धामणीकर यांचा अत्यंत ओरिजनल जागरणाचा संच आणि दुसर्या बाजूला तसेच नाट्यरूपाने सादर करणारा शहरी संच, अशी या विधीनाट्याची सुंदर रंगरचना होती. ग्रामीण आणि शहरी संचांचं एकमेकांमध्ये पराकोटीचं सामंजस्य असण्याची गरज होती. ती या सुजाण कलावंतांनी पार पाडली. त्यात शिवाजी साटमसारखा अत्यंत समजूतदार अभिनेता खंडोबारायाच्या भूमिकेत तोडीचा वाटायचा. उशिरा निवडला गेलेल्या विजय कदमचा ‘हेगडी प्रधान’ म्हाळसाचा छुपा प्रतिनिधी म्हणून खास धमाल उडवीत असे. त्यात जुईलीने साकारलेली बाणाई धनगराची कन्या शोभत नसली तरी तिचं मूळ जागरणात वर्णन केलंलं दैवी रूप जुईलीमध्ये होतं. खरी मजा आली जेव्हा रंगीत तालमी सुरू झाल्या तेव्हा, ही सगळी सोंगं जेव्हा सजून आली तेव्हा. खंडेरायाच्या रूपात सजलेला शिवाजी साटम, उंचापुरा दिमाखदार राजा, त्याच्या बाजूला पैठणी-शालूमधली, कपाळावर भरगच्च कुंकू लावलेली, डोक्यावरून पदर घेतलेली म्हाळसा म्हणून रोहिणी उभी राहिली तेव्हा वैराग्यशील महादेवाचं ते श्रीमंत राजाच्या रूपातलं खंडेरायाचं स्वरूप, आणि वैराग्याच्या श्रीमंत रूपाची महाराणी म्हाळसा म्हणजे अक्षरश: जागरणातल्या ‘मल्हारी वारी मोत्याने द्यावी भरून’ या आळवणीप्रमाणे ऐश्वर्यवान वाटू लागले. रोहिणीला लाभलेली उंची हे तिला लाभलेलं वरदानच जणू. एक अभिनेत्री म्हणून कधी तिच्या कुठच्याच भूमिकांच्या आड ती येऊ देत नव्हती. उलट तो मोठा प्लस पॉइंट ठरत गेला. सरासरी उंचीपेक्षा जास्त आणि कमी उंची लाभलेल्या दोन महान अभिनेत्री मराठी रंगभूमीला लाभल्या- एक रोहिणी हट्टंगडी (जास्त) आणि दुसरी भक्ती बर्वे (कमी). पण दोघीही पराकोटीच्या समृद्ध अभिनयकौशल्यामुळे त्यांना लाभलेल्या या अनोख्या देणगीचं रूपांतर मिळालेल्या भूमिकेचे सोने करण्यासाठी कसं करता येईल याकडे लक्ष द्यायच्या. ‘ती फुलराणी’मध्ये भक्ती बर्वेची उंची पुढच्या दहा मिनिटांत अभिनयकौशल्यामुळे आकाशाला भिडे. तीच रोहिणी ‘चांगुणा’ आणि ‘खंडोबाचं लगीन’मध्ये चांगलीच उंचीपुरी वाटणारी, पुढे कस्तुरीमृग नाटकात एकदम सरासरी उंचीची वाटू लागली. ‘गांधी’ चित्रपटात तर ‘बा’ म्हणून ती ठेंगणी ठुसकी वाटू लागली. प्रशिक्षित अभिनेत्यांना या सर्व गोष्टींचा वापर कसा करावा हे चांगलंच ठाऊक असतं, त्याचा फायदा ‘खंडोबाचं लगीन’मधल्या म्हाळसाला आणि दिग्दर्शक म्हणून मला झाला. वेशभूषा, संगीत, नृत्य, त्यातली पारंपारिक आणि आधुनिक बाजातली गाणी यांनी सजलेले हे विधीनाट्य खंडोबाचं असले तरी ते म्हाळसाच्या भावभावनांभोवती खेळते, हे बरोब्बर जाणून रोहिणीने त्यातली भूमिका अजरामर केली.
नाटकातला पहिला ‘ब्रेक’
कलावैभव या प्रख्यात व्यावसायिक नाट्यसंस्थेचं नवीन नाटक येऊ घातलं होते. लेखक वसंत कानेटकर आणि दिग्दर्शन व प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू करणार होते. रोहिणी ही तोपर्यंत जयदेव हट्टंगडी यांच्या नाटकातून प्रायोगिक रंगभूमीवर यशस्वी अभिनेत्री म्हणून गाजत होतीच, शिवाय जयदेवबरोबर ती आविष्कार या प्रायोगिक नाट्यसंस्थेतर्फे घेतल्या जाणार्या शिबिरांमध्ये सहायक म्हणूनही सहभागी असे. एका शिबिरात दुपारी अचानक डॉ. श्रीराम लागू हे मोहन गोखलेबरोबर रोहिणीला भेटायला शिबिराच्या ठिकाणी आले. आणि चक्क रोहीणीला आपल्या नवीन नाटकात एक महत्वाची भूमिका करणार का म्हणून विचारले. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता, ‘कस्तुरीमृग’ हे रोहिणीचं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं, तेही साक्षात डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली. त्यानंतर फार काळ रोहिणीला नाटकांत भूमिका करीत बसावे लागले नाही. कारण… सिनेमातला पहिला ब्रेक.
छबिलदास आणि शिवाजी मंदिर या दोन्ही ठिकाणी समर्थपणे अभिनयाच्या कक्षा रुंदावताना रोहिणीला पहिली सिनेमाची ऑफर आली ती ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ या चित्रपटात. या चित्रपटाचं शूटिंग आधी सुरु होऊनसुद्धा तो उशिरा रिलीज झाला. कारण त्याहीपेक्षा मोठा चमत्कार पुढे होणार होता.
‘मोठा ब्रेक’
खूप दिवसांनी एकदा छबिलदासमध्ये गेलो असता, पॅसेजमध्ये एक तरुणी भिंतीला टेकून काहीतरी स्क्रिप्ट वगैरे वाचत उभी होती. मी तसाच पुढे गेलो आणि चेहरा ओळखीचा वाटला म्हणून पुन्हा मागे आलो…
‘अरे? रोहिणी तू? केवढा बदल झालाय तुझ्यात? ओळखताच येत नाही …’
ती सडपातळ तरुणी म्हणजे रोहिणी होती.
नेहमीप्रमाणे गोड हसून रोहिणीने कारण सांगितलं… खरं तर सांगितलं नाही…
‘पुरु, ते सिक्रेट आहे… इतक्यात कुठे सांगायचं नाहीये… फक्त एवढंच सांगते… एका भूमिकेसाठी गेले वीस दिवस कडक डायट सुरू आहे अर्थात तज्ज्ञांच्या सल्ल्याने…’
पुढच्याच आठवड्यात वर्तमानपत्रात बातमी आली… सर रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटातील ‘बा’च्या भूमिकेसाठी रोहिणी हट्टंगडी यांची निवड. ‘गांधी’ चित्रपट ऑस्करपर्यंतचे पुरस्कार घेऊन आला. रोहिणीची त्यातली ‘कस्तुरबा’ जगभर गाजली.
एका समृद्ध अभिनेत्रीची हीच लक्षणे असतात. लक्षणे एवढ्यासाठी म्हणतो की तो तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा काळ होता. अनेक पैलू, अनेक कंगोरे लोकांसमोर यायचे होते, ते कालांतराने आले. अगदी अचानक झटक्यासरशी. महेश भट यांचा ‘सारांश’ आला आणि त्यातली वयस्कर आई हिंदी चित्रपट रसिकांना भावनेचा जोरदार झटका देऊन गेली. त्या आईमध्ये दडलेली तरूण रोहिणी फक्त मराठी रसिकांना माहिती होती. जसा म्हातार्यामागचा तरुण अनुपम खेर नंतर कळला, अगदी तशीच रोहिणी हिंदी रसिकांना नंतर कळली.
ब्रेक के बाद
‘गांधी’ आणि ‘सारांश’ अशा चढत्या क्रमाने रोहिणी सिनेमाक्षेत्र काबीज करीत करीत ‘अग्निपथ’मधील महानायकाच्या मातेच्या भूमिकेपर्यंत पोहोचली… या सर्व भूमिका करीत असताना ‘चालबाज’ सिनेमातली खलनायकांच्या कंपूतली एक विनोदी खलनायिकासुद्धा तिने बहारीने केली. आज तो श्रीदेवीचा सिनेमा बघताना त्यातल्या त्या व्यक्तिरेखेची नायिकेने केलेली फजिती बघताना चांगलीच मजा येते. त्या सिनेमात रोहिणीने श्रीदेवीला तिच्या चेहर्यावर हवं ते करू दिलं आहे… मधल्या काही नाटकांनंतर रोहिणी मराठी रंगभूमीसाठी दुर्मिळच झाली. तरीपण मध्येच वेळ काढून तिचं एखाददुसरं प्रायोगिक नाटक येतच होतं.
जयदेव हट्टंगडी या प्रतिभावान दिग्दर्शकाचा आणि हाडाच्या शिक्षकाचाही सहवास तिला मोजकाच पण महत्त्वाचा मिळाला. ‘या मंडळी सादर करू या’ या आमच्या संस्थेशी जयदेवचे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकेच नव्हे, एक जानेवारी १९८३ला माझ्या शिवाजी पार्क येथील ऑफिसमध्ये ‘चौरंग’ या माझ्या नाट्यसंस्थेचा आणि ‘टुरटुर’ या नाटकाचा मुहूर्त वसंत सबनीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी माझे खास पाहुणे म्हणून रोहिणी आणि जयदेव हट्टंगडी, त्यांच्या सहा महिन्याच्या छोट्या असीमबरोबर आवर्जून आले होते. जयदेवशी खास दोस्ती होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याची संगीतविषयक जाण. उत्तम वादक होता जयदेव. ‘करताल’ हे राजस्थानी वाद्य उत्तम वाजवायचा. आविष्कारच्याच ‘अबु हसन’ या नाटकात दोन्ही हातात काचांच्या पट्ट्या घेऊन वाजवताना त्याला पाहिले होते. तो काचांचा करताल त्याच्याकडून शिकायची इच्छा राहून गेली. कारण नंतर भेटणं कमी झालं.
खूप वर्षे गेली मध्ये… मीही नाटक-सिनेमांत रमलो. मधल्या काळात रोहिणी मालिकांमध्ये कमालीची बिझी झाली. एकेक मालिका फेविकॉलने चिटकवल्यासारखी चार चार वर्षे चॅनलला चिकटली… चालली.
चारपाच वर्षांपूर्वी मला एक कल्पना सुचली… अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पतीच्या निधनानंतर किती तरी माता सैरभैर झालेल्या दिसल्या. त्यांना त्यांच्या नेमक्या कोणत्या मुलाकडे राहायचं हे कळेना; किंबहुना दोन किंवा तीन मुले असतील तर कोणाच्याच बायकोला सासू आपल्याकडे नको असते, असं चित्र मी कित्येक घरांमध्ये पाहिलं होतं आणि या प्रश्नावर एखादं नाटक करावं असं मला वाटलं. मी ही कल्पना दिलीप जाधवला बोलून दाखवली. त्याला आवडली. आपण हे नाटक अशोक पाटोळेकडून लिहून घेऊ या म्हणाला. याआधी अशोक पाटोळेची तीन नाटकं मी दिग्दर्शित केली होती. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘श्यामची मम्मी’ आणि ‘चारचौघांच्या साक्षीने’, त्यातली दोन दिलीप जाधवनेच प्रोड्युस केली होती. त्यामुळे अशोक पाटोळेकडे मी आणि दिलीप गेलो, त्याला गोष्ट ऐकवली. त्याला ती आवडली, आणि त्याने नाटक लिहून देण्याचं कबूल केलं. चर्चेमध्ये ठरलं की ही भूमिका करण्यासाठी रोहिणी हट्टंगडी अत्यंत योग्य ठरेल. पण ती तर झीच्याच ‘होणार सून मी या घरची’मध्ये प्रचंड बिझी होती. मग रिहर्सल आणि प्रयोगांचं काय? शिवाय तिला नाटक आवडलं पाहिजे वगैरे वगैरे. मात्र आधी नाटक लिहून तर होऊ दे, मग बघू, असं म्हणून आम्ही अशोककडून निघालो.
पुढच्या सहा महिन्यांत अशोक पाटोळेने नाटक लिहून पूर्ण केलं आणि वाचलं. सरळ आणि नेमकं वर्मावर बोट ठेवणारं भावनिक नाटक अशोकने लिहून दिलं. त्या आधी त्याचं ‘आई रिटायर होते’ हे नाटक गाजलं होतं. आता ‘आई, तुला मी कुठे ठेवू?’ अशी मुलांच्या मनाची अवस्था दाखवणारं नाटक अशोकने अगदी सगळी क्राफ्ट्समनशिप पणाला लावून लिहिलं आणि वाचल्यानंतर आमचं, अगदी तिघांचंही ठाम एकमत झालं की या भूमिकेसाठी एकच नाव योग्य, ते म्हणजे रोहिणी हट्टंगडी.
दिलीपने मला आधी ‘तुम्ही विचारून बघा, त्या काय म्हणतात? मी कधी काम नाही केलंय त्यांच्याबरोबर,’ असं सुचवलं.
माझ्या दृष्टीने रोहिणी आता ‘खंडोबाचं लगीन’मधली ती चटकन उपलब्ध होणारी रोहिणी राहिली नव्हती. जगभर फिरून आलेली, मोठी मोठी हिंदी, बॉलिवुड, हॉलिवुडची प्रोजेक्ट्स केलेली, अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली, एकेका मालिकेचे हजार हजार भाग केलेली एक मोठी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. माझ्या मनात पाल चुकचुकली- च्यायला नसती जबाबदारी घेऊन बसलो. तिने नाही म्हटलं तर? अशोकची सगळी मेहनत पाण्यात जाणार होती. माझ्या डोळ्यासमोर निर्मिती सावंत, वंदना गुप्ते या अभिनेत्री येऊन गेल्या. रोहिणीकडे जाण्याऐवजी आणि नकार पदरात पाडून घेण्याऐवजी निर्मितीला गळ घालूया का? की वंदनाला भेटूया? पण त्यांनाही आवडले पाहिजे, तरच पुढच्या गोष्टी, असलेही विचार आले.
तशात दिलीपला निर्माता म्हणून वेगळेच टेन्शन आले होते. बाई आता खूप मोठ्या अभिनेत्री आहेत. शिवाय खूप वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन- काय अटी असतील? पैसे किती घेणार? परवडेल की नाही? वगैरे…
लेखक म्हणून अशोक पाटोळेची वेगळी टेन्शन..
दिग्दर्शक म्हणून मला वेगळे टेन्शन..
आणि निर्माता म्हणून दिलीपला वेगळे टेन्शन..
केंद्रस्थानी एकच… रोहिणी नक्षत्र… जे आम्हाला फलदायी ठरावं अशी आमची इच्छा होती…
मी रोहिणीला फोन केला, तिच्या एकंदरीत बोलण्यावरून तिचा नाटक करण्याचा मूड दिसला. हो, नाहीतर लगेच नाही म्हटलं असतं. मला नाटक करायचंय रे आणि आता आमची सिरीयलपण संपण्याच्या दिशेने वाइंड अप होतेय.
अरे व्वा… मी चटकन बोलणार होतो, पण आवरलं…
पण…
(आता कसला पण?)
अरे, ऑस्ट्रेलियामध्ये एक कमिटमेंट आहे, एक हिंदी नाटक करतेय, त्याचे प्रयोग आहेत, पण ते पुढच्या वर्षी.
चला, म्हणजे नाटक वाचायला हरकत नाही.
पहिला पडाव पार पडला.
नाटक ऐकायचं ठरलं. आता तिला पसंत पडलं की झालं.
वाचन झालं, आणि नाटक तिला आवडलंसुद्धा… लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आमची जबाबदारी जवळ जवळ पार पडली होती. आता काम उरलं होतं दिलीपचं.. निर्माता म्हणून… त्यासंबंधी बोलायची मीटिंग ठरली… गोरेगावला सिरीयलच्याच सेटवर मी आणि दिलीप गेलो. कधी करायचं, रिहर्सल वगैरे कशा, यावर बोलून मी बाहेर गाडीत येऊन बसलो.
थोडया वेळाने दिलीप आला. एवढ्यात सगळं बोलून झालं? याचं मला आश्चर्य वाटलं. बहुतेक बारगळलेलं दिसतंय सगळं.
दिलीप गाडीत बसला…
म्हणाला, काय बाई आहे ही?…
काय झालं? नाही म्हणाली का?
अहो, तसं नाही… या बाईला एका पैशाचा गर्व नाही… कसल्या अटी नाहीत… दौर्यात मला अमुक हवं, तमुक हवं ही भानगड नाही, स्टारडम तर अजिबात नाही की काही नाही! मला एक महिना आधी तारखा द्या… मी त्याप्रमाणे बाकी कामं अॅडजस्ट करीन… फक्त माझा ऑस्ट्रेलियाचा दौरा सांभाळा आणि मानधन इतकं कमी सांगितलं की मीच उलट त्यांना सांगितलं की हे खूप कमी आहे, मी तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे जास्त देईन…
मी हुश्श्श केलं.. अत्यंत डाऊन टु अर्थ अशी कलाकार… इतक्या वर्षांनी रोहिणी जशी होती तशीच आहे याचा खूप आनंद झाला. नाटक जगलं तर निर्माता जगेल या विचाराने बहुतेक तिने आपले मनसुबे सांगितले असावेत… मधल्या बराच काळातील व्यावसायिक रंगभूमीवरील व्यावहारिक बदल यांच्याशी तिचं देणं घेणं नव्हतं… बस्स, नाटक करायचं, या विचाराने प्रेरित होऊन तिने दिलीपशी बोलणी केली असावीत…
पुढच्या दोन महिन्यांत अत्यंत शिस्तबद्ध तालमी होऊन नाटक रंगभूमीवर आलं. विषयाची गरज म्हणून त्यात आलेला मेलोड्रामा समीक्षकांना खटकला. पण समीक्षकांचं ऐकतात तर ते प्रेक्षक कसले? त्यांनी स्वागतच केलं. खूप वर्षांनी नाटकात पुनरागमन केलेल्या रोहिणीला भेटायला आणि तिच्या सह्या घ्यायला नाटक संपल्यावर प्रचंड रांग लागायची. तिच्या प्रचंड लोकप्रियतेची ती साक्ष होती.
एका समर्थ अभिनेत्रीच्या कारकीर्दीचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध इतक्या जवळून एक दिग्दर्शक म्हणून पाहायला मिळावा हे माझे भाग्यच…
रोहिणीला जवळून पाहिलेल्यांना तिची दोन रूपं दिसत असावीत… एक अत्यंत अवखळ, मिश्किल व्यक्तिमत्व… आणि दुसरं अत्यंत परिपक्व सामाजिक भान असलेलं आणि कमालीचं नाट्यप्रेम असलेलं व्यक्तिमत्व. ज्याच्या त्याच्या वाट्याला ते त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे येते.
म्हणूनच आविष्कारसारख्या संस्थेला आज अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, काकडे काका आणि विजय तेंडुलकर यांच्यानंतर तिचं अध्यक्षपद लाभलं.
आज जयदेव आणि रोहिणीचा सुपुत्र असीम हा नसिरुद्दीन शहा आणि मकरंद देशपांडे यांच्या हिंदी, इंग्रजी नाटकांमध्ये अभिनयापासून ते तांत्रिक विभागांतही सहभागी असतो. आईवडिलांप्रमाणे ‘नाटक एके नाटक’ हेच त्याचंही ध्येय आहे.
अशा समृद्ध अभिनेत्रीला तिच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देणे म्हणजे रतन टाटा यांना एक नवीन फॅक्टरी काढून देण्यासारखे आहे.
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)