आपण जो श्वास घेतो तो आपल्या खिजगणतीतही नसतो. त्या श्वासाची किंमत मोजणारे सर्वजण या वॉर्डमध्ये प्रत्येक बेडवर गतकर्म वा भविष्याची चिंता करीत करोनाच्या ओझ्याखाली अंग विसावून पहुडलेले होते. करोनाने संपूर्ण जगाला श्वासाची किंमत शिकविली असे म्हटले तर वावगे होणार नाही…
—-
अज्ञान हेच भविष्यात येणार्या चांगल्या वाईट प्रसंगातून मार्ग क्रमित करण्यासाठी कधी-कधी तारक ठरतं… आज काय झालंय किंवा पुढे काय वाढून ठेवलंय याची यत्किंचितही जाण नसल्याने आपण एका वेगळ्याच दुनियेत पुढची पावले टाकत असतो… अशीच काहीशी अवस्था माझी होती… त्या रात्री माझा मुलगा म्हणाला, ‘पप्पा, आपल्याला आता बीकेसी जम्बो कोविड सेन्टरमध्ये जायचंय, कपडे घालून तयार राहा, आता अँब्युलन्स येईल… ‘मी तयार झालो. मला एवढंच कळत होतं की माझ्या हाताची बोटे थंड पडताहेत, घर डुचमळतंय याची मला जराही जाणीव नव्हती. बायकोने औषधांच्या डब्यासहीत कपडे भरलेली पिशवी मुलाच्या हातात दिली. देवाला नमस्कार करून मी त्याच्याबरोबर चालू लागलो. अशा वेळी माणसे रडतात किंवा अति भावनिक होतात. असं काही घडलं नाही. अँब्युलन्सच्या मागच्या दाराने पिशवीसहित चढलो, एकटाच. कारण मुलाला त्यांनी मनाई केली. क्षणभर विचार मनाला चाटून गेला… मी एकटाच जातोय… काय होणार?… विचार करता-करता मागचा दरवाजा उघडा होऊन धडाधड आपटणार्या अँब्युलन्सने वेग घेतला.
त्याआधी काय घडलं होतं?…
दोनचार दिवस आधी मी जवळपास वर्षभराने बसमधून प्रवास करून कलाकारांचा चित्रकोशाचं पुस्तक आणण्यासाठी बॅलार्ड पियरला गेलो होतो. पुस्तक घेऊन, बॅलार्ड पियरला बर्याच वर्षांत जाणं झालेलं नसल्याने थोडासा बावचळतच सीएसटी स्टेशनकडे यायला निघालो. कडकडीत ऊन असल्याने भय्याकडचे ताक प्यायलो. बसने पुन्हा घरचा रस्ता धरला.
दुसर्या दिवशी थोडासा ताप आला. डॉक्टरांनी पाच दिवसांचा अँटिबायोटिक्स कोर्स सुरू केला. परंतु पुन्हा पाचव्या दिवशी ताप आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने लॅब टेक्निशियनला घरी बोलावून तिघांनीही कोरोना टेस्ट केली. रिपोर्ट ४८ तासांनी मिळणार होता. कशासाठी मला दाखल केले याची मला जाणीव नव्हती. रुग्णालयामधून घरी आल्यानंतर मला जे सांगितले ते असे… ‘त्याच दिवशी संध्याकाळी माझी तब्बेत खालावू लागली. माझे शब्द बरोबर उमटत नव्हते. डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलाने ऑक्सिजन तपासला. त्याची पातळी ९०पर्यंत घसरली होती. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलगी-जावई यांनी रुग्णालयाची शोधाशोध सुरू केली. महत्प्रयासाने महानगरपालिकेच्या एका कार्यतत्पर कर्मचार्याने बीकेसी कोविड सेन्टरमध्ये संशयित कोरोनाबाधित म्हणून एक बेड मिळवून दिला. त्याचबरोबर सूचना करताना ते कर्मचारी म्हणाले, त्यांना झोपायलाही देऊ नका. एखादं फळ खायला द्या… बेशुद्ध झाले तर या हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळणार नाही. कारण इथे येताना रूग्ण स्वावलंबी असावा लागतो. बेशुद्ध झाले तर प्रायव्हेट हॉस्पिटल शोधावे लागेल.’ सर्वांची पाचावर धारण बसली. उत्तररात्रीचे तीन वाजले. अँब्युलन्सवाल्याचा फोन आला, पाच मिनिटांत पोहोचतो… कोरोनाबाधितचा रिपोर्ट नसल्यावरही संशयित म्हणून दाखल करून घेण्याची सोय फक्त मुंबई महानगरपालिकेने केली आहे. इतर राज्यात काय परिस्थिती हे आपण टीव्हीवर पाहतोच आहोत.
रुग्णालयात पोचल्यावर माझे रजिस्ट्रेशन करण्यात खूपच वेळ गेला. रजिस्ट्रेशन करताना अनेक रुग्णांबरोबर त्याचे नातेवाईक होते हे लक्षात आले. मी एकटाच… अखेर टी वॉर्डमध्ये माझी भरती झाली.
काही चाचण्या झाल्यावर औषधोपचार करण्यास सुरुवात झाली. उपचारकर्त्यांनी पांढरा पीपीई किट परिधान केलेला असल्याने हे डॉक्टर की नर्स हे ओळखता येत नव्हते. काळ्या खडूने त्यांच्या पाठीवर डॉक्टर, नर्स वा वॉर्डबॉय हे त्यांच्या नावासहित पुसटसे लिहिलेले असायचे. गोंधळ व्हायचा. कधीतरी ते वाचता यायचे. मात्र वरिष्ठ डॉक्टरांच्या पीपीई किटचा रंग फिकट निळा होता.
दुसरा दिवस : रात्रीचे दहा वाजले असतील. अचानक नर्सने सूचना केली, आपण पॉझिटिव्ह आहात, पॉझिटिव्ह रूग्ण असलेल्या ‘आय’ वॉर्डमध्ये आपण चला. माझ्या वस्तू घेऊन मी माझी वाट पाहत असलेल्या बेडचा ताबा घेतला. मी स्थिर होतो. थोड्याच वेळात नर्स येऊन काही सोपस्कार व उपचार करून निघून गेली. सहज कपड्याचे छत न्याहाळू लागलो. अतिभव्य जाडजूड कपड्यांचा दु-पाकी तंबू. ए ते झेडपर्यंत वॉर्ड. प्रत्येक वॉर्डमध्ये साधारण ७० बेड. छत वर्षभर जुने झाल्याने त्यावर काजळीसारखे लक्षवेधी आकार तयार झाले होते. मोठाल्या ब्रशने ‘डॉज’ करून कमी-जास्त रंगांचे पुंजके तयार होऊन एकमेकांशी फेर धरतात, असे भासणारे. छताच्या कडेला असलेले पुंजके म्हणजे लॉकडाऊन असूनही लाखोंच्या संख्येने दाटीवाटीने जमणार्या गर्दीसारखेच… हळूहळू विरळ होत जाणारे… एखाद्या टर्शरी रंगातल्या अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचा आभास निर्माण करणारे. जसजशी नजर पुढे सरकते तसतसा वेगळाच नजारा नजरेस पडतो. अति उंचावरून विमानातून दिसणार्या अमेझॉनच्या जंगलासारखे ते आकार भासू लागले.
वरच्या बाजूला कापडाच्या पट्ट्यांची खिडकी. बेडच्या बाजूला एक फॅन. वरती साधारण वीसेक फुकटच्या अंतर ठेवून लटकणारे सीलिंग फॅन. दोन बेडमध्ये पुरेसे अंतर ठेवून मांडलेले बेड व त्यावर पहुडलेले… बसून निद्रेची प्रतीक्षा करणारे… ‘हा कोण आला?…’ अशा कुतूहलपूर्ण नजरेने माझ्याकडे कटाक्ष टाकणारे… मध्येच एखाद्याला खोकल्याची उबळ आलेली असे सुदृढ, तरूण-म्हातारे रूग्ण, त्यामध्ये आठदहा वर्षांची दोन मुलं… हे सर्व अनुभवताना डोळा कधी लागला ते कळलंच नाही.
मी डायबेटिक असल्याने नर्सने हाताच्या बोटातून रक्त काढून त्याची परीक्षा करणे, ऑक्सिजन पातळी पाहणे, त्यानंतर बीपी पाहणे, या दोन्ही क्रिया दिवसातून तीन वेळा केल्या जायच्या. अँटिबायोटिक्स व रक्त पातळ राहण्यासाठी पोटात इंजेक्शन. इतर उपचार केल्यावर नाश्ता यायचा. मला अॅसिडिटी, वायू व कोणताही पदार्थ नुसता पाहिला तरी उलटी येणार असं सतत वाटत राहिल्याने मी काहीही खाऊ शकत नव्हतो. नंतर मला कळले की हेसुद्धा करोनाचे लक्षण आहे. माझी ही अवस्था चारपाच दिवस राहिली. त्यानंतर उपचार झाल्यावर दोन घास खाऊ लागलो.
सातव्या दिवशी अचानक वॉर्डबॉयने फर्मान काढले, जल्दी चालो… फटाफट आपका सामान लेलो… (मात्र तो मला मदत करायला तयार नाही) जे वॉर्ड में आपको ऑक्सिजन लागाने का है. मी थोडासा हललो. एवढ्या दिवसांत मला माझी काळजी वाटली नाही, पण आज… तिथे गेल्यावर बेडवर बसलो. त्याने पटकन मास्क नाकावर लावला आणि चालू पडला. गोंधळलो… थोड्याच वेळात नर्स आली आणि तिने मला समजावले. त्यानंतर औषधोपचार, उपाय केले जाऊ लागले.
गेले वर्षभर कोरोनासंदर्भात वाहिन्या, सोशल मीडिया किंवा अफवांनी भयानक वातावरण निर्माण केल्याने अनेकजण त्याला बळी पडले. समाजामध्ये नकारात्मक भावना वृद्धिंगत होऊ लागली. अशाच असत्य माहितीचा माझ्या कुटुंबाला काळीज फाटण्यासारखा अनुभव आला. आमच्याच ओळखीच्या डॉक्टरने माझ्या मुलीला सांगितले, तुझ्या वडिलांना तू बीकेसी कोविड सेन्टरमध्ये का दाखल केलेस? त्या ठिकाणी ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर आणि रेमेडेसीवर इंजेक्शन इत्यादी काहीही नाही. तू त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल कर. माझ्या मुलीला तर डोक्यावर आकाश कोसळल्याचा भास झाला. माझ्या वडिलांचे काही बरेवाईट झाले तर मीच जबाबदार असेन, अशा वाईट-साईट विचारांनी तिच्या मनात एकच गलका केला. तिने आईला फोन करून सर्व कथन केले. ती रडायलाच लागली. तिघेही वाट चुकलेल्या कोकरासारखी वाईट विचारांनी सैरभर झाले… खाजगी रुग्णालयांशी मुलगी संपर्क साधू लागली… पण कुठेही बेड खाली मिळेना… तिची झोप उडाली… आता एकच पर्याय होता, तो म्हणजे माझ्या हॉस्पिटलशी संपर्क साधण्याचा. अथक प्रयत्नांनंतर तिला एक अॅप सापडले, ज्याच्या साह्याने ती रुग्णालयाच्या ‘वॉर रूम’शी संपर्क साधू शकत होती. अनेक वेळा फोन केल्यावर फोन लागला. तिथल्या कर्मचार्यांशी बोलताना तिला ज्या उणिवा सांगितल्या गेल्या, त्या तिने भडभडा बोलून दाखवल्या आणि माझ्या वडिलांची अवस्था कशी आहे, ते ताबडतोब सांगा, अशी विनंती केली… माझे नाव व बेड नंबर सांगून. कर्मचार्याने हिची अवस्था ओळखूनच अतिशय समजूतदारपणे तिला सांगितले, ‘आमच्याकडे ऑक्सिजन, आयसीयू रूम, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हर इंजेक्शन, डायलिसिस या सगळ्याची सोय आणि इतर तात्काळ लागणार्या सर्व उपायांची उपलब्धता आहे. तुम्ही काळजी करू नका… निश्चिन्त राहा… तुमचे वडील स्थिर आहेत. हे ऐकल्यावर तिच्या काळजावरचे कित्येक टनांचे ओझे एक फुंकर मारल्यागत नाहीसे झाले. त्यानंतर नित्यनियमाने दिवसातून दोन वेळा त्या वॉर रूममध्ये माझ्या अवस्थेबद्दल माहिती घेऊन ती मला फोन करून कळवत राहिली आणि स्वतःला व अन्य कुटुंबियांना आश्वस्त करीत राहिली.
आपण जो श्वास घेतो तो आपल्या खिजगणतीतही नसतो. त्या श्वासाची किंमत मोजणारे सर्वजण या वॉर्डमध्ये प्रत्येक बेडवर गतकर्म वा भविष्याची चिंता करीत करोनाच्या ओझ्याखाली अंग विसावून पहुडलेले होते. करोनाने संपूर्ण जगाला श्वासाची किंमत शिकविली असे म्हटले तर वावगे होणार नाही… अज्ञानाचाही अमूल्य फायदा होतो हे सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे मी माझा मधुमेह, ऑक्सिजन पातळी इत्यादी नर्सला विचारीत नसे. त्यामुळे मी मानसिक दबावविरहित राहू शकलो. कधीही मरणासारखे प्रकारचे नकारात्मक, मनोधैर्य खच्ची करणारे विचार मनाला शिवले नाहीत. करोना झाला हेही जाणवत नव्हते. अंदाजे ९० टक्के नर्सेस, डॉक्टर आणि वॉर्डबॉय हे मुस्लिमधर्मीय होते. त्यांनी आपुलकीने-प्रेमाने केलेली शुश्रूषा आणि घेतलेली काळजी पाहून मलाही ऊर्जा मिळत होती. रूग्णाचे मनोबल आणि मनोधैर्य वाढविण्याचे महत्वाचे कार्य सर्व आरोग्यसेवक न थकता करीत होते, महानगरपालिकेचे रुग्णालय असूनही…
पहिल्या लाटेच्यावेळी जे कानी पडत होते की करोनारुग्णावर नर्स किंवा डॉक्टर लांबूनच औषधोपचार करतात, त्यांना स्पर्शही करीत नाहीत, त्या अफवाच ठरल्या. कारण सर्व वैद्यकीय कर्मचारी रूग्णांमध्ये मिळून मिसळून त्यांची सेवा करीत होते. ते भयंकर साथीने ग्रासले आहेत याची रूग्णांना जाणीव होऊ नये याचे सर्व आरोग्यसेवक भान ठेवून होते. रुग्णांचा एकमेकांशी संवाद असायचा. भयंकर साथीने बाधित रूग्णांचे हे रूग्णालय आहे याचा भासही कधी झाला नाही. एखाद्या सर्वसाधारण रुग्णालयासारखंच स्वच्छ रुग्णालय. पीपीई किटमधील वैद्यकीय सेवक हाच काय तो फरक. याचे श्रेय मुंबई महानगर पालिकेलाच.
वरिष्ठ डॉक्टर सौम्या हे संपूर्ण रात्र रूग्णांची सेवा करताना पाहून अचंबित व्हायला झाले. एक रूग्ण असा होता की तो सतत डॉक्टरना बोलावून तब्येतीच्या व्यथा मांडीत राहायचा. बाजूच्या रूग्णांनाही त्याचा त्रास व्हायचा. परंतु डॉक्टर व नर्स लगबगीने येऊन त्याची समजूत घालायचे, त्याला आश्वस्त करायचे न कंटाळता. एक दिवशी, त्याच्या बाजूस असलेले सुस्वभावी वरिष्ठ रूग्ण त्याच्यावर एकदा अतिशय भडकले… पण दुसर्याच दिवशी तेच गृहस्थ त्याच्या खाण्या-पिण्याची चौकशी करून त्याचे मनोधैर्य वाढवताना पाहून माणुसकीचे दर्शनही घडले. एक रूग्ण मास्क काढून टाकायचा. डॉक्टर त्याला विनवण्या करून समजवायचे. पुढचा धोकाही सांगायचे. पण व्यर्थ… उकाडा खूप असल्याने काही रूग्ण अर्धनग्नच असायचे. त्यातील एक रूग्ण माझे नेहमीच लक्ष वेधून घ्यायचा. गोल चेहरा, डोके सूर्यकिरण परावर्तित करणारे, मोठे डोळे, पोटाचा घेर अवाढव्य… पुढे वाकल्यागत… डबल हनुवटी… ठेंगणी काया… लुंगी परिधान करून चालताना दिसला की ‘हसरा बुद्ध’ किंवा लॉरेल आणि हार्डीमधील हार्डीची मूर्ती समोर यायची. त्यांचे स्केच करावे असे राहून- राहून वाटायचे.
तिसर्या दिवशी माझा ऑक्सिजन काढल्यावर थोडासा आत्मविश्वास वाढला. मी डॉक्टरांना स्वत:ची ओळख सांगितली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व मा. मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याशी असलेले संबंध यांचा उल्लेख केल्यावर ते सहज उद्गारले, मीही एम. एफ. हुसेन यांच्या फॅमिलीचा डॉक्टर होतो… दुसर्या दिवशी तपासणी करताना डॉ. सौम्या सहज उद्गारले, ‘प्रभाकर, तुम्ही कार्टूनिस्ट आहात. या आजूबाजूच्या घटनांवर कार्टून्स काढा. मी पेपर्स पाठवून देतो. मी हो म्हटले, पण ते शक्यही नव्हते याचीही जाणीव होती. तरी असे प्रोत्साहन देणारे डॉक्टर विरळाच! साधारण तीन दिवस देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मला ‘एफ’ वॉर्डमध्ये हलवण्यात आले. त्याला आपण यलो/ ग्रीन झोन म्हणू शकतो.
पूर्वपुण्याईमुळे असेल कदाचित पण या काळात अनेकांचे हात मदतीसाठी पुढे आले… आमचे शेजारी, आमचा वॉचमन यांनी माझी बायको, मुलगा पॉझिटिव्ह असताना त्यांना हवं-नको याची काळजी घेतली. ती दोघेही फॅमिली डॉक्टरांच्या उपायांनी यशस्वी झाले. ‘कोरोना हा एक व्हायरल ताप आहे असे समजा, घाबरू नका… रोज चार लिटर पाणी प्या… पोटभर जेवण घ्या, त्याशिवाय ऑक्सिजनची पातळी वाढणार नाही इत्यादी बजावणार्या, गेले वर्षभर करोनारुग्णांची सेवा करणार्या आमच्या शेजारची नर्स-वहिनी. सुरुवातीचे काही दिवस मी रुग्णालयातील जेवण जेवू शकत नव्हतो, म्हणून बायकोच्या मैत्रिणी व माझ्या मुलाचे मित्र यांनी मला घरगुती पौष्टिक जेवण आणि फळे यांचा रतीब लावला. यांचे आभार कसे मानायचे?… एक दिवशी तर ‘मोदके’ माशांचे तिखले चक्क डब्यात. रुग्णालयातले जेवणही योग्य असायचे. शिवाय सकाळी सात-आठ वाजता व संध्याकाळी पाचच्या दरम्यान चवदार नाश्ता मिळायचा. बाहेरून जेवण घेण्याची या रुग्णालयाने सोय केली होती. नाव, बेड नंबर व वॉर्ड याचा उल्लेख पिशवीवर करून ती रुग्णालयाच्या दरवाजावर ठेवायची, वॉर्डबॉय ती पिशवी वॉर्डमध्ये घेऊन यायचा.
वातानुकूलन नसल्याने रूग्णालयात अतिशय उकाडा असायचा. दोन किंवा तीन वेळा थंड पाण्याने आंघोळ करायचो. बेड गरम व्हायचा. त्याही अवस्थेत झोपावे लागत होते नाईलाजाने… जसजसा सूर्य मावळतीला जायचा तसा थंडावा वाढत जायचा. रात्री गरम चादर घेतल्याशिवाय झोप यायची नाही. मोबाइल वापरण्याची परवानगी असल्याने घरच्या माणसांशी रोज सुखदु:ख वाटता आले. त्यामुळे त्यांच्यावरचा मानसिक दबाव हलका झाला. मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांच्या फोनमुळे मनोबल वाढत गेले…
डिस्चार्ज कधी मिळेल याची रुग्णांमध्ये विचारपूस होऊ लागली. अचानक मुलीचा फोन आला, तुम्हाला ११ वाजता डिस्चार्ज मिळणार… आवराआवर सुरू केली. सात आठजणांना एकाच वेळी सोडणार होते. त्यांच्या फाईल्स वगैरे तपासण्यांमध्ये पुष्कळ वेळ गेला. शेवटच्या तपासण्या, एक्सरेसहित (दोष विरहित येणे आवश्यक) करण्यात आल्या. हे सर्व करण्यात साडेतीन वाजले. मी सर्व वैद्यकीय कर्मचार्यांना धन्यवाद दिले आणि इतरांचा निरोप घेत वॉर्ड बॉयसहित रुग्णालयाचा बाहेर जाण्याचा रस्ता गाठला. वॉर्डबॉयने मला औषधं घेऊन दिली. बाहेर मला घेऊन जाण्यासाठी चार तास थांबलेल्या माझ्या जावयाने घराच्या दिशेने गाडी वळवली…
फेरतपासणीसाठी १४ दिवसांनी बोलावले जाते. आवश्यकतेनुसार तपासण्या, उपचार (कितीही खर्चिक असलेले) व औषधे अगदी विनामूल्य दिली जातात. खाजगी रुग्णालयातून करोनामुक्त होऊन व्यक्ती बाहेर येते व झालेल्या खर्चाचा आकडा ऐकून पोटात खड्डा पडतो… पण या कोविड सेन्टरमध्ये १३ दिवस राहिलो, एक रुपयाही खर्च झाला नाही…
एक-एक अडखळणारा श्वास पूर्वपदावर येऊन ज्यावेळी रूग्ण आनंदलहरीने न्हाऊन निघतो, त्यावेळी या कोविड सेन्टरवर विखारी आरोप करणार्यांच्या खिजगणतीतही नसते त्या एका श्वासाची ‘किंमत’!
– प्रभाकर वाईरकर
(लेखक ज्येष्ठ व्यंगचित्रकार आहेत)