• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कोरोनाकाळात सुरक्षित गुंतवणूक; कुठे आणि कशी?

- सुधीर साबळे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 30, 2021
in भाष्य
0
कोरोनाकाळात सुरक्षित गुंतवणूक; कुठे आणि कशी?

कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही, त्यामुळे भविष्यासाठी गुंतवणूक करताना ती सुरक्षित कशी असेल, याला प्राधान्य द्यायला हवे. म्युच्युअल फंड, मुदत ठेव योजना, आरबीआय बॉण्ड, पीपीएफ ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने तयार केलेली मुदत ठेव योजना हे गुंतवणुकीसाठी चांगले आहेत.
—

विनय आणि महेंद्र हे दोघे चांगले मित्र… त्यापैकी एकजण आयटीमध्ये नोकरी करणारा तर दुसरा व्यावसायिक… हे दोघेजण भेटले की त्यांचामध्ये गप्पा रंगतात त्या गुंतवणूक या विषयावर. मात्र, अलीकडच्या काळात ते होताना दिसत नाही, त्याचे कारण विचाराल तर ते आहे कोरोना. कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे गेलेले नाही, अनेक व्यवसायधंद्यांचे बारा वाजलेले आहेत, देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, शेअर बाजारातला जोर खरा आहे का, याविषयी तिथल्या गुंतवणूकदारांच्याही मनात शंकाच आहेत… गुंतवणुकीसाठी पैसे नाहीत आणि कुठे गुंतवणूक करावी याचा काही अंदाज नाही. त्यामुळे या मित्रांच्या गप्पांमध्ये मोठा खंड पडलाय. त्यातच आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येणार का, डेल्टा प्लस हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट किती बरबादी करणार, या विषयांवर रोज चर्चा झडत आहेत. या मित्रांचीच नव्हे, तर अनेकजणांची गुंतवणुकीची घडी विस्कटली आहे या काळात. एरवी नियमित गुंतवणूक करण्याची सवय असणारी अनेक मंडळी सध्याच्या या परिस्थतीमुळे नवी गुंतवणूक कशी करायची याच्या संभ्रमात पडले आहेत, त्याचबरोबर या काळातही खिशात पैसे असणार्‍या अनेकजणांना आपण सुरक्षित गुंतवणूक कशी करायची, ही चिंता सतावत आहे.

गुंतवणुकीची संधी आहेच, पण…
दीड वर्षांपूर्वी आलेला कोरोना आता सर्वांना माहितीचा झालेला आहे. त्याच्याशी लढण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. पण, सर्वत्र त्याचा वेग अद्याप वाढलेला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यात ज्यांच्या नोकर्‍या टिकल्या आहेत, त्यांचे पगार कमी झाले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे एरवी बाहेर खाण्यापिण्यावर, प्रवासावर होणारा खर्च कमी झाला आहे. त्यामुळे पगार कमी झाले तरी ज्यांच्या नोकर्‍या टिकून आहेत, त्यांना गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध आहे. मात्र, ज्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्यांना आता सगळीच घडी बसवणे आताच्या परिस्थितीत अवघड झाले आहे. खरे म्हणजे कोरोनाच्या या संकटामध्येही ज्यांची आमदनी सुदैवाने चांगली आहे, त्यांनी भविष्यासाठी चांगला गुंतवणुकीचा पर्याय निवडायचा विचार करायला हवा. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र, भविष्याचा विचार करून त्याची निवड केली, तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

शेअर बाजारात पाऊल ठेवताना सावध राहा…
कोरोनामुळे जीडीपी खाली आला आहे, तरी त्यात शेअर बाजार झपाट्याने वर जाताना दिसत आहे, हे कशामुळे होते आहे, हे कळण्याच्या पलीकडचे असल्याचे मत गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ ठकार यांनी नोंदवले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केली की चांगले रिटर्न मिळतील, या कल्पनेने अनेकांनी तिथे गुंतवणूक करण्याचे नियोजन केले असेल. तिथे गुंतवणूक करणे चांगले आहे, पण हे सगळे करत असताना सल्लागाराची मदत आणि खूप जपून पाऊल टाकण्याची गरज असल्याचा सल्ला ठकार देतात.

कोरोनाच्या काळात बाहेर जाणे बंद झाल्यामुळे लोकांचे शानशौकीचा खर्च कमी झाला. वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे आपल्याकडच्या फावल्या वेळेचा वापर कसा करायचा, म्हणून आयटीमध्ये काम करणार्‍या अनेकांनी डी मॅट अकाउंट सुरू केली. कोरोनाच्या काळात नऊ कोटी डी मॅट अकाउंट उघडली गेली असल्याचे गुंतवणूकतज्ज्ञ भूषण महाजन सांगतात.
आताच्या घटकेला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सल्लागाराची मदत घ्या. वर्षभरापूर्वी कोरोनामुळे लोकांना गुंतवणूक करण्याची संधी होती, तेव्हा शेअर बाजार खाली होता. आताची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे नवीन गुंतवणूक करताना खबरदारी घ्या, असे महाजन सांगतात.

सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य हवे…
कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही, त्यामुळे भविष्यासाठी गुंतवणूक करताना ती सुरक्षित कशी असेल, याला बारावी प्राधान्य द्यायला हवे. म्युच्युअल फंड, मुदत ठेव योजना, आरबीआय बॉण्ड, पीपीएफ ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने तयार केलेली मुदत ठेव योजना हे गुंतवणुकीसाठी चांगले आहेत.

हे आहेत पर्याय…
सध्या लोकांची आमदनी कमी झाली असली तरी आता निर्माण झालेली परिस्थिती कायमस्वरूपी अशीच राहणार नाही. त्यामुळे भविष्याचा विचार केला तर म्युच्युअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करण्याचा चांगला पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे, यात येणारी रक्कम ही टप्याटप्प्याने शेअर बाजारात गुंतवली जात असते, त्यामुळे यात जोखीम कमी असते. भविष्याचा विचार करता नवीन गुंतवणूक करताना बॅलन्स्ड म्युचुअल फंड सोयीस्कर वाटतो, असे भूषण महाजन सांगतात. अलीकडे बँकांच्या मुदत ठेव व्याजाचे दर आकर्षक राहिलेले नाहीत. सध्या दर जरी कमी असले तरी आताच्या आर्थिक वातावरणात ती गुंतवणूक सुरक्षित आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. आरबीआय बॉण्डमध्ये गुंतवणूक केली तर त्यामधून मिळणारे रिटर्न चांगले आहेत. तिथल्या गुंतवणुकीवर ७.१५ टक्के व्याज मिळते फक्त त्याला सात वर्षाचा लॉक इन कालावधी आहे, दर सहा महिन्यांनी टीडीएस कापून व्याज मिळते. रिझर्व्ह बँकेचे बॉण्ड असल्यामुळे त्याला कोणताही धोका नाही, त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा पर्याय चांगला ठरू शकतो. पीपीएफमधील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज चांगले आहे, फक्त तिथे दर वर्षाला दीड लाख रुपये ठेवता येतात. १५ वर्षाचा लॉक इन कालावधी आहे आणि सहा वर्षानंतर थोडे थोडे पैसे काढता येतात. तिथे मिळणार्‍या व्याजावर कर आकारला जात नाही, त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा पर्याय उत्तम असल्याचे महाजन सांगतात.
कोरोनाच्या धास्तीमुळे अनेकजण विमा पॉलिसी घेण्यास प्राध्यान्य देत आहेत, खास करून अनेकजण टर्म इन्शुरन्सला महत्व देत आहेत. कोरोनाचे संकट गेलेलं नाही, त्यामुळे विम्यात गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय उपलब्ध असल्याचे कौस्तुभ ठकार सांगतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून बँक आणि टपाल खात्यामार्फत राबवण्यात येणार्‍या मुदत ठेव योजनेत मिळणारा व्याजाचा दर ७.४० इतका असून त्यात दर तीन महिन्याला व्याज घेण्याची सुविधा आहे. त्यामध्ये १५ लाखांपर्यंत रक्कम ठेवता येते आणि त्याचा लॉक इन कालावधी पाच वर्षांचा आहे. याखेरीज लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची ‘पंतप्रधान वयम वंदे’ ही योजना आहे, त्यामधून चांगले रिटर्न मिळू शकतात, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा विचार करायला हरकत नाही, असे ठकार आवर्जून सांगतात.

सोन्या चांदीतील गुंतवणूक लाभदायी
गेल्या १० वर्षांमध्ये सोन्याचांदीच्या भावामध्ये चांगली वाढ झालेली आहे, त्यामुळे आताच्या परिस्थितीत त्यात केलेली गुंतवणूक भविष्यात नक्कीच फायदा देऊन जाणारी ठरू शकते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आपला आवाका पाहून त्यात गुंतवणूक करायला हरकत नाही. २०१९ पासून सोन्याचे भाव वाढत आहेत. आगामी काळात हे भाव वाढू शकतात, त्यामुळे मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक उत्तम असल्याचे महाजन सांगतात.

पैसे वापरा पण जरा जपून…
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थती कधी बदलणार याचे उत्तर, तूर्तात तरी कोणाकडे नाही. त्यामुळे आपल्याकडे असणारे पैसे प्रत्येकाने जपून वापरण्याची आवश्यकता आहे. खासकरून तरुण मंडळींचे हॉटेलिंग, बाहेर फिरायला जाणे, मौजमजेवर खर्च वाढायला लागतील. मौजमजा अवश्य करावी, पण सध्याची परिस्थती पाहता तिथे खर्च करताना जरा काळजी घ्या आणि भविष्याचा विचार करून चांगली खात्रीशीर, सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्या.

– सुधीर साबळे

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

Previous Post

भाजपविरोधी जुळवाजुळवीची नांदी!

Next Post

एका श्वासाची किंमत!

Next Post
एका श्वासाची किंमत!

एका श्वासाची किंमत!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.