खूप वर्षं झाली असतील या गोष्टीला. किती तेही धड आठवत नाही. माझ्या एका मित्राचे वडील आजारी होते. हॉस्पिटलला नुकतंच दाखल केलं होतं. तो मला नेहरू रोडवर भेटला. म्हणाला,‘माझं एक काम करशील का? तिकडे कुंकू वाडीत उजव्या हाताला डॉक्टर पिंगळे म्हणून आहेत. त्यांच्याकडे जा आणि ते प्रिस्क्रिप्शन देतील आणि काही कागद देतील तेवढं घेऊन तू अमुक एका हॉस्पिटलला ये.’
मी ‘हो’ म्हटलं. मारुती मंदिराच्या शेजारी डॉक्टर सुहास पिंगळे ही पाटी असलेल्या दवाखान्यात मी शिरलो. काउंटरला तुळतुळीत दाढीमिशी केलेला फुल शर्टमधला कडक इस्त्रीच्या फुल शर्टातला एक माणूस सुहास्यवदनाने बसला होता. त्यांना मी म्हटलं, ‘डॉ. पिंगळे! मी सुनील कामतकडून आलोय. मला प्रिस्किप्शन हवं आहे…’ त्यावर तो माणूस म्हणाला, ‘ते डॉक्टर पिंगळे यांच्याकडे आहे. मी त्यांचा कंपाउंडर रामचंद्र!’
अरे बापरे! कळकट्ट दाढी वाढलेले आणि चुरगळलेला शर्ट आणि खाली लेंगा (तोही चट्ट्यापट्ट्याचा!) घातलेले कितीतरी कंपाउंडर माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले! आता कंपाउंडर इतका रुबाबात असेल तर डॉक्टर कसे असतील, हे त्रैराशिक मी मनातल्या मनात सोडवत असतानाच विंगेतून बोलत बोलत प्रमुख पात्र रंगमंचावर यावे, तसे डॉक्टर पिंगळे केबिनमधून मोबाईलवर बोलत अवतीर्ण झाले आणि मला म्हणाले, ‘सुनील कामतकडून तुम्ही आला ना! हे घ्या प्रिस्क्रिप्शन’ आणि समोरच्या पेशंटला म्हणाले, ‘जोशी, तुमचा नंबर आहे. चला आत!’
डॉ. पिंगळे यांची ही पहिली भेट माझ्या मनात पक्की कोरलेली आहे.
एकाच आठवड्यात मी आणि माझी पत्नी डॉ. पिंगळे यांचे रीतसर पेशंट झालो. आमची दोन्ही मुलंही त्यांच्याकडे जायला लागली, धाकट्या मुलाच्या लग्नानंतर सूनबाई देखील जायला लागली. मग माझी बहीण, तिचा नवरा, तिची मुलगी अशी एक वेगळी रांग लागली!
एकदा काय झालं! मला व्हायरल इन्फेक्शन झालं आणि प्रचंड खोकला यायला लागला. मी दवाखान्यात पोचलो तेव्हा दुपारी शेवटचा पेशंट होता. डॉक्टर दवाखाना बंद करणार होते. मला तपासलं आणि म्हणाले, ‘चला चला आपण डॉ. माधवानीकडे जाऊ या.’ मग मला रिक्षात कोंबून डॉ. माधवानीकडे आले. माझा छातीचा एक्स-रे काढला. तो तिकडे कॉम्प्युटरवर पाहून तपासला. मग मला एका पॅथॉलॉजीमध्ये घेऊन गेले. तिकडे माझ्या टेस्ट केल्या. अर्धा तास थांबून त्याचे रफ रिझल्ट पाहिले. मग मला केमिस्टकडे घेऊन गेले. तिकडून मला औषधे घेऊन दिली आणि रिक्षात बसून मला घरी पोहोचवलं आणि त्याच रिक्षातून ते पुढे गेले!
त्यांच्या या काळजीने आणि सौजन्याने मी तर पुरता दबूनच गेलो आणि हळूहळू त्यांच्या प्रेमात पडत गेलो.
नंतर कळले की त्यांचे मराठी वाचन प्रचंड आहे. सगळा भालचंद्र नेमाडे त्यांना जवळपास तोंडपाठ आहे. एवढेच नव्हे, तर नेमाडे त्यांच्या घरी येऊन गेले आहेत. हे ऐकल्यावर तर मी आश्चर्यचकित झालो. मग, हळुहळू आम्ही एकत्र सिनेमाला नाटकाला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला जायला लागलो.
मी दीनानाथ नाट्यगृहात नाटकाच्या लायनीत उभा राहिलो की तीन तिकिटे काढायचो. एक माझं, दुसरं माझी पत्नी सुप्रिया आणि तिसरं डॉक्टर पिंगळे यांचं. डॉक्टर पिंगळे मला एकच तिकीट सांगायचे. मला आश्चर्य वाटायचं. यांची पत्नी नाटकाला का येत नाही? पण मी त्यांना कधी विचारण्याचे धाडस दाखवलं नाही. पण तो खुलासा नंतर झाला.
बरीच वर्षे गेली. आम्ही खूपच चांगले मित्र झालो. ते आमच्या घरी येऊ लागले. आम्ही प्रेस क्लब आणि इतर ठिकाणी कार्यक्रमाला जाऊ लागलो. एकदा ते म्हणाले, पार्ला स्टेशनला उभे राहा. आपण भालचंद्र नेमाडे यांच्या भाषणाला साहित्य अकादमीला जायचे आहे. मी आपलं पार्ले ते दादर दोन रिटर्न तिकीटं, सेकंड क्लासची काढून, प्लॅटफॉर्म नंबर एकला उभा राहिलो. काही वेळाने डॉक्टर पिंगळे आले. मला विचारलं, तिकिटं काढलीस का? (तोवर ते माझ्याशी बोलताना एकेरीवर आले होते.) म्हटलं ‘हो’, म्हणाले, ‘दाखव’. मी त्यांना तिकीटं दाखवली. म्हणाले, ‘थांब थांब, मी जरा जाऊन येतो.’ आणि ते कुठे गेले ते कळलंच नाही. परत आले म्हणाले, ‘चल.’ इतक्यात लोकल आली. तर मला फर्स्ट क्लासच्या डब्यात घेऊन गेले! मी सेकंड क्लासची तिकिटं काढली होती, ते त्यांना फारसं आवडलं नव्हतं. त्यांनी स्वत: जाऊन पुन्हा दोघांची फर्स्ट क्लासची रिटर्न तिकीट काढून आणली! तेव्हापासून पुढे मी नेहमी फर्स्ट क्लास रिटर्न तिकीट काढू लागलो!
पिंगळे यांचा जन्म चाळीसगावचा (२४ जून १९५१चा). नुकतीच त्यांची सत्तरी झाली. १९५५पासून पार्ल्यात वास्तव्य. आताच्या पार्ले पोलिस स्टेशनजवळ पटेल चाळ किंवा प्रेमानंद बिल्डिंग होती. अगदी सुरुवातीला तिकडे राहायचे ते. त्यांना दोन बहिणी. भाऊ नाही. पार्ले टिळक विद्यालयाचा हा हुशार विद्यार्थी. नंतर पार्ले कॉलेज. आणि नंतर नायर हॉस्पिटलमधून एमबीबीएस केले. १९७६पासून कुंकूवाडीत वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू. त्यांचे वडील बीएमसीमध्ये काम करायचे.
एक ऑगस्ट २०१९ रोजी डॉक्टर पिंगळे यांनी धो धो चालणारी प्रॅक्टिस बंद केली. केवळ मनासारखं जगता यावं म्हणून. त्या शेवटच्या दिवशी मी त्यांच्या भेटीला आवर्जून गेलो होतो. त्यांनी तपासले तो शेवटचा पेशंट म्हणजे मी. ४३ वर्षं सहा महिने इतक्या प्रदीर्घ कालावधीत त्यांचा शेवटचा ‘तोतया’ पेशंट मी! तोतया यासाठी की मी त्यावेळी त्यांची एक दहा मिनिटाची मुलाखत घेतली आणि फेसबुकला टाकली. त्याच वेळी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्रकडून या बातमीची दखल घ्यायला बातमीदार आणि फोटोग्राफर आले. त्या वेळेला सर्व पेशंट तपासून गेले होते.
त्या फोटोग्राफरने सर्व पद्धतींनी पिंगळे यांचे फोटो काढले. परंतु ते म्हणाले तुम्ही पेशंटला तपासत आहात असा आम्हाला फोटो पाहिजे. टाइम्समध्ये फोटो येणार म्हणून आनंदाच्या उकळ्या महत्प्रयासाने दाबत, अत्यंत आर्त, वेदनामय चेहरा करून त्यांच्या क्लिनिकमधल्या पलंगावर आडवा झालो आणि मग त्या फोटोग्राफरने अनेक फोटो काढले. त्यात डॉक्टर माझे ब्लडप्रेशर तपासतानाचा फोटो टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोन कॉलममध्ये आला! या अर्थाने मी तोतया पेशंट म्हटलं!!
डॉक्टरांचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रॅक्टिकल विचारसरणी, अत्यंत पॉझिटिव्ह दृष्टिकोन आणि तिसरे म्हणजे मित्रांनी आणि नातेवाईकांनी केलेल्या उपकाराची कृतज्ञतापूर्ण जाणीव! शिवाय अत्यंत नैतिकतेने, कोणतेही कट न स्वीकारता केलेली केलेली प्रदीर्घ वैद्यकीय प्रॅक्टिस.
ते नेहमी म्हणतात की माझ्या वडिलांनी तीन-तीन नोकर्या करून हा फ्लॅट विकत घेतला आणि त्यासोबत ही तळमजल्याची जागा विकत घेतली म्हणून मी डॉक्टर होऊन प्रॅक्टिस करू शकलो.
अशा या सुसंस्कृत डॉक्टरच्या जीवनात अत्यंत दुःखद असे प्रसंग आले आहेत. नंतर खूप घट्ट मैत्री झाल्यावर त्यांनी ते सांगितले. डॉक्टर पिंगळे यांना दोन मुली. मोठी स्वप्ना लग्न होऊन आता जपानमधील टोकियो या शहरात आता स्थायिक आहे आणि तिला मोठा मुलगा आहे. तिची धाकटी बहीण म्हणजे शाल्मली. डॉक्टरांच्या पत्नीचे नाव वैजयंती.
२६ मे २००२ साली पत्नी आणि दोन मुली आणि डॉक्टर स्वतः असे पुण्यात दुपारी कारने जात असताना समोरून आलेल्या एका बारा चाकी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि त्या ट्रकने यांच्या कारला एकदम जोरदार धडक मारली. हे सगळे लोक एका ठिकाणी जेवायला चालले होते. कार त्यांचा मेव्हणा चालवत होता. ड्रायव्हर सीटच्या मागे त्यांची धाकटी मुलगी शाल्मली बसली होती. तिच्या डाव्या हाताला आई. तिच्या डाव्या हाताला मोठी बहीण स्वप्ना आणि ड्रायव्हरच्या बाजूला डॉक्टर पिंगळे बसले होते. हा ट्रक इतक्या वेगाने आला की शाल्मली ही जागच्या जागीच निधन पावली तर पिंगळे यांचा मेहुणा पुढे एक-दीड महिना हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याला अनेक फ्रॅक्चर्स होती. बाकीचे तिघेजण किरकोळ जखमांवर बचावले. डॉक्टर पिंगळे यांनी तशाही स्थितीत जाणले की आपली लाडकी मुलगी जागच्या जागीच आपल्याला सोडून गेलेली आहे. सर्व कुटुंबावर घाला घालावा असाच हा प्रसंग होता.
त्यावेळी शाल्मली फक्त एकोणीस वर्षाची होती आणि बीकॉमच्या दुसर्या वर्षाला शिकत होती.
या प्रसंगातून ते सावरतात तोच आणखी चार वर्षांनी म्हणजे आठ जुलै २००६ रोजी दुसरी दुर्दैवी घटना घडली. पिंगळे यांची पत्नी वैजयंती, तिची धाकटी बहीण आणि तिचा नवरा, त्यांचा मुलगा हे सगळे अमेरिकेवरून आले आणि ते चारधाम यात्रेला गेले. त्यावेळेला ऐन पावसाच्या दिवसात ऋषिकेश येथे त्यांची कार एका खोल दरीत घसरत गेली आणि त्या अपघातात बहिणीच्या मुलाचे निधन झाले. डॉक्टर पिंगळे यांच्या पत्नीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णपणे लुळा पडला. व्हीलचेअर हे त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग झाले! तरीदेखील वैजयंती वहिनी यांनी आपला डाएटिशियनचा व्यवसाय रोज संध्याकाळी तीन चार तास याप्रमाणे चालू ठेवला… मीही त्यांचाच पेशंट होतो (परंतु वैजयंती यांनी माझ्यासारख्या बेशिस्त माणसाचे वजन कमी होणार नाही हे जाणले आणि वेळीच मीही ते पथ्यपाणी सोडून दिले हा भाग वेगळा!) अजूनही पिंगळे यांच्या घरी गेलो की मला त्या म्हणतात, ‘मग मंत्री, करायचं ना पुन्हा सुरू!’ मीही ‘हो, हो’ म्हणतो. काही वर्षं आमचा हा नियमित संवाद चालला आहे!
डॉक्टर पिंगळे यांनी ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन या संपूर्ण भारतातील डॉक्टरांच्या शिखर संघटनेचे काही वर्षे सेक्रेटरी म्हणून काम पाहिलेलं आहे. आता ते या संस्थेचे नियोजित अध्यक्ष आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतातले वेगवेगळ्या ठिकाणांचे डॉक्टर त्यांना माहित आहेत. अनेक वर्तमानपत्रांसाठी ते सल्लागार म्हणून काम करतात. अनेक पत्रकारांचा त्यांचा जवळचा संबंध आहे.
याशिवाय त्यांचा शास्त्रीय संगीताचा खूप चांगला अभ्यास आहे युट्युबवर दुर्मिळ शास्त्रीय संगीताच्या चिजा ते ऐकत असतात. शास्त्रीय संगीतातील घराणी वेगवेगळा गायक आणि वादक, त्यांचे गुरू व शिष्य यांच्या तपशिलाची सनावळीच त्यांना माहिती असते. कोणते गायक किती साली वारले आणि कोणत्या रोगामुळे त्यांचे निधन झाले हेही ते अचूक सांगतात. एवढ्या तारखा त्यांच्या लक्षात कशा राहतात हे मला आश्चर्यच वाटते. राजकीय सजगता हा वैद्यकीय पेशातला दुर्मीळ गुण त्यांच्यापाशी आहे.
पार्ल्यात त्यांच्यासोबत वीस मिनीटे पायी चालत फिरले, की किमान दहा माणसं हात उंचावतात! पिंगळे म्हणजे पार्ल्याचा चालताबोलता इतिहासच आहेत. त्यांना विलक्षण स्मरणशक्तीचं वरदान लाभलंय. शिवाय वर्तमानपत्रं, नियतकालिकं याच्यात त्यांच वैद्यकीय विषयांवर चौफेर लिखाण असतंच!
एकदा आम्ही फिरत असताना मला एका अजिता गांधी नावाच्या मैत्रिणीचा अमेरिकेवरून सहज फोन आला. आम्ही थोडा वेळ बोललो. मग पिंगळे म्हणाले, ‘अहो, या गांधी म्हणजे माहेरच्या हेगिष्टे ना. राजपुरीया जवळच्या गल्लीत राहतात. असं सांगून त्यांच्या वडिलांची, सासर्यांची माहीती मला दिली. मी घरी गेल्यावर अजिताला दुसर्या कामासाठी पुन्हा फोन केला, तेव्हा विचारले. तर ती माहिती तंतोतंत बरोबर निघाली, जी मलाही माहिती नव्हती!
पत्नीसोबत ते जपानला मुलीकडे जाऊन काही महिने ते राहून आलेत. पत्नीची गैरसोय होऊ नये, तिला कुठेही फिरता यावे यासाठी त्यांनी अख्खी व्हीलचेयर जाऊ शकेल, अशी कार मुद्दाम घेतली आहे. गेली काही वर्ष त्यांची ‘योगायोग सोसायटी’ ही रिडेव्हलपमेंटला गेली होती. त्यामुळे आणि त्यांच्या वृद्ध वडिलांना फिरायला जाताना, लिफ्ट नसल्यामुळे, त्रास व्हायचा म्हणून ते नरिमन रोडला लिफ्ट नसलेल्या एका सोसायटीमध्ये भाड्याने राहत होते.
२०१७ साली त्यांच्या वडिलांचे निधन वयाच्या ९३व्या वर्षी झाले. यावर्षी, २०२१ला गुढीपाडव्याला त्यांचा ‘योगायोग’ सोसायटी मधला फ्लॅट पूर्णपणे तयार झाला आणि संपूर्ण सोसायटीत फ्लॅटचा ताबा घेणारे ते पहिले फ्लॅटधारक ठरले. आजच्या मंदीच्या काळात रिडेव्हलपमेंटची जागा मिळणे म्हणजे पुनर्जन्मच म्हणावा लागेल. डॉक्टर पिंगळे आणि सौ. वैजयंती पिंगळे हे दोघेही नव्या इमारतीत राहायला गेले आहेत. मोठी मुलगी स्वप्ना २००५ साली विवाह होऊन आता टोकियो, जपान येथे पती व मुलगा यांच्यासोबत वास्तव्यास आहे.
डॉक्टरांच्या योगायोग सोसायटीतील तळमजल्यावर दवाखान्याच्या जागेत आता एक डेंटल क्लिनिक उघडले आहे. डॉक्टर आता दादर माटुंगा परिसरातील किकाभाई हॉस्पिटलच्या मेडिकल डिरेक्टरपदी काम करतात.
ऑर्थोपेडिक व कार्डिअॅक स्पेशलिटी असलेले हे हॉस्पिटल आहे.
आमची खूप मैत्री झाल्यावर आम्ही दोघे फिरत असताना मी त्यांना एकदा विचारले होते, ‘अहो तुमची मुलगी गेली तर तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल ना!’ तेव्हा ते म्हणाले, ‘अहो वाईट तर वाटलंच ना! परंतु आम्ही एका कुटुंबातले पाच जण होतो. आम्ही चौघे जण आणि माझा मेव्हणा. तर या पाच जणांपैकी फक्त एकच वाचू शकली नाही आणि बाकीचे चार जण वाचले हे पण नशीबच म्हणायचे ना!’
तर ही गोष्ट माझ्या ध्यानात नव्हती आली. यालाच पॉझिटिव्ह दृष्टिकोन असेही म्हणता येईल. त्याच्यामध्ये वैद्यकीय पैशाचा काही संबंध नाहीये. डॉक्टर पिंगळे चित्रकार किंवा लेखक असते तरीही त्यांनी आताच विचार केला असता. कारण कुठल्याही परिस्थितीत न डगमगता सारासार सकारात्मक विचार करायचा हा त्यांचा मूलभूत गुण आहे. त्यामुळे बारीक सारीक कटकटी भांडणं, वाद-विवाद याच्यामध्ये ते कधीही गुंतत नाहीत. ‘तुझं माझं पटत नाही ना, आपण दूर होऊया’ अशी त्यांची वृत्ती आहे. अत्यंत आनंदी आणि निर्मळ वृत्तीने हे जीवन जगत असतात. त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो!