मुंबईतील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात १९८७ साली पोटनिवडणूक पार पडली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पार पडलेली ही पहिली निवडणूक शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू यांनी ११ हजार मतांनी, ११ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त करून जिंकली. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांनी एका सभेत जाहीरपणे मान्य केले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मिळू शकतात आणि निवडणूकही जिंकता येते हे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सिद्ध केले आहे.
१९८७ सालच्या या निवडणुकीची पार्श्वभूमीही तशीच होती. देशात शहाबानो प्रकरण नुकतेच गाजले होते. शहाबानो नावाच्या तलाकपीडित मुस्लिम महिलेने १९८१ साली मध्य प्रदेश हायकोर्टात पोटगीसाठी दावा केला होता. निकाल तिच्या बाजूने लागला. नंतर तिचा पती अहमद खान सर्वोच्च न्यायालयात गेला. १९८५ साली सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश हायकोर्टाचा निकाल कायम केला. नंतर न्याय मागणार्या शहाबानोने घुमजाव केले. तेव्हा तिच्यावर वर्तमानपत्रांतून आणि समाजाच्या विविध थरांतून टीका झाली. या संबंधात ‘मार्मिक’मध्ये ‘चिरफाड’ सदराखाली एक उपहासात्मक अनावृत्त पत्र छापले होते. शिवसेनाप्रमुख चिडून म्हणाले होते की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेची आणि नागरी कायद्याची होळी करणार्या जात्यंध मुसलमानांना या देशात थारा नाही.’ मुंबईतील लाखो मुस्लिमांनी मंत्रालयात प्रचंड मोर्चा नेऊन मुस्लीम महिलांना पोटगीचा हक्क देणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. देशात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. मुंबईत याविरोधात शिवसेनेने ‘इस्लाम खतरे में, देश खतरे में’ असा आवाज देणारा प्रचंड मोर्चा २७ डिसेंबर १९८६ रोजी काढला आणि कडकडीत बंदही पाळला. या प्रकरणाने संपूर्ण देशाला एक कायदा असावा का, याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाल्या.
दुसरी घटना नाशिकची. अयोध्येतील राममंदिर मुक्त झाल्यावर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९८६ साली नाशिक येथे हिंदूंची मिरवणूक निघणार होती. परंतु या मिरवणुकीवर पोलिसांनी बंदी घातली. याला न जुमानता हिंदूंनी मिरवणूक काढली, तेव्हा पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात जवळजवळ शंभर जण जखमी झाले. नाशिकमध्ये याविरोधात हिंदू नागरिकांनी आंदोलन केले ते चिघळले. आपल्यावर अन्याय होतोय ही जाणीव हिंदूंना होऊ लागली. त्यानंतर झालेल्या शिवजयंती मिरवणुकीवर नाशिक, मालेगाव, नांदेड, पनवेल आदी ठिकाणी दगडफेक झाली आणि त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले आणि जाळपोळ, दंगली झाल्या. त्याआधी १९८०च्या दशकात पंजाबमधील खलिस्तान वाल्यांनी हिंदूंवर केलेले अत्याचार, कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा प्रश्न, जळगाव-भिवंडी आदि शहरांत हिंदू-मुस्लिमांच्या दंगली, जात्यंध मुसलमानांचा हैदोस महाराष्ट्रातील हिंदू जनतेने पाहिला होता, अनुभवला होता, त्याच्या झळा सोसल्या होत्या. त्यावेळच्या केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांविषयी असलेल्या सहानुभूतीमुळे हिंदूंवर अन्याय होत गेला. तेव्हा वेळोवेळी शिवसेनेने हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले आणि हिंदू समाजाचे संरक्षण केले हा इतिहास आहे.
त्यावेळेस दबलेला हिंदू समाज संधी शोधत होता. हिंदुंना आपला हक्क, आपली ताकद दाखवण्याची संधी विलेपार्ले पोटनिवडणुकीने दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी ही नस पकडली. मार्मिकमध्ये २९ नोव्हेंबर, १९८७ रोजी ‘पहिले पाऊल पार्ल्यात’ हा अग्रलेख छापून आला. अग्रलेखाच्या सुरूवातीलाच विलेपार्ल्याची पोटनिवडणूक का लढवीत आहोत ते शिवसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले. ‘विलेपार्ल्याची निवडणूक जाहीर झाली आणि आम्ही अवधान राखून योग्य वेळी डॉ. रमेश प्रभू यांची उमेदवारी जाहीर केली. डॉ. प्रभू यांना आम्ही केवळ उभे केलेले नाही तर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणून शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्यातील सत्ताग्रहणाचे पहिले पाऊल पार्ल्यात टाकणार आहोत,’ अशी गर्जनाच त्यांनी केली. विलेपार्ल्यातील शिवसेनेच्या यशाची नांदी ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी सुरू झाली. कारण सर्वच पक्षांसमोर सध्याच्या शिवसेनामय हिंदुत्ववादी वातावरणात उमेदवार कोणास करावा हा यक्षप्रश्न उभा राहिला. जनता पार्टीतर्फे प्राणलाल व्होरा, काँग्रेसतर्फे प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेतर्फे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू हे निवडणुकीच्या रिंगणात होते. स्वतःला हिंदूंचा कैवारी समजणार्या भाजपाने आपला उमेदवार मागे घेऊन हिंदुत्त्ववादी शिवसेनेला पाठिंबा दिला नाही, पण विलेपार्ल्यातील सुजाण मतदारांना, संघाच्या स्वयंसेवकांना, हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना हा भाजपचा निर्णय पटला नव्हता. कारण शिवसेनेचे हिंदुत्व त्यांना पटले होते.
१९८५च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे हंस भुग्रा यांच्या आकस्मिक निधनामुळे १३ डिसेंबर १९८७ साली ही पोटनिवडणूक झाली. या विधानसभा क्षेत्रात येणार्या सहा नगरसेवकांपैकी शिवसेनेचे पाच नगरसेवक होते. बाळासाहेबांनी या निवडणूक प्रचाराची जबाबदारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यावर सोपवली होती, तर विभागप्रमुख दादा वेदपाठक हे निवडणूक कार्यालयीन प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत होते. सुभाष देसाई प्रचारयंत्रणा राबवित होते, तेव्हा या यंत्रणेत काहीवेळा माझाही सहभाग असायचा. त्यामुळे साहेबांच्या सहाही प्रचारसभांना उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. या सर्व वॉर्डात शिवसेनाप्रमुखांच्या दणदणीत प्रचारसभा झाल्या. प्रत्येक सभेला हिंदूभिमानी जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत होता. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या ज्वलंत विचाराने मतदार पेटून उठला होता. शिवसेना हिंदूंच्या बाजूने निवडणूक लढते आहे म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी गुजरातहून शंभू महाराज देखील आले होते. तेही प्रचारात सामील झाल्यामुळे विलेपार्लेतील हिंदुत्ववादी गुजराती समाज शिवसेनेकडे आपसूकच वळला.
बॉलिवुडमधील नट जितेंद्र आणि ऋषी कपूर यांनी देखील प्रचारसभांना हजेरी लावली. मूळचा मार्क्सवादी विचाराचा पगडा असलेला आणि नक्षली चळवळीविषयी सहानभूती दाखवणारा मिथुन चक्रवर्ती हा अभिनेताही बाळासाहेबांबरोबर हिंदुत्वाच्या बाजूने भाषणे देत होता. त्याच वेळेस शिवसेनेच्या मराठी अस्मितेच्या भूमिकेला पाठिंबा देणारे लिखाण करणारे आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर कधी कधी उपस्थित राहणारे काही पत्रकार मात्र शिवसेनेला मतदान न करता काँग्रेसला मतदान करा, असा जातीयवादी प्रचार-प्रसार करत होते.
१४ डिसेंबर १९८७ रोजी विलेपार्ले पोटनिवडणुकीचा निकाल लागला. शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू ११ हजार मतांनी विजयी झाले. ११ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. शिवसेनाप्रमुख उद्गारले, ‘आता राज्य आमचे!’ या घटनेनंतरच्या ‘मार्मिक’मध्ये ‘हा विजय हिंदुत्वाचा!’ असा अग्रलेख छापून आला. त्या अग्रलेखात ते म्हणतात… ‘मातांनो, भगिनींनो, बांधवानो, सैनिकांनो, पर्वतांनो, वृक्षवेलींनो, आमचे सारे शब्द आज भावनेच्या कोंदणात बंदिस्त झाले आहेत. नाहीतर त्या शब्दांची फुले आम्ही आज कृतज्ञतेच्या ओंजळीने भरभरून तुमच्यावर उधळली असती. त्या फुलांचे हार तुम्हाला अर्पण करून आम्ही तुमच्यापुढे नतमस्तक झालो असतो. आमचे उरलेसुरले जीवनही कृतार्थतेने आपल्या चरणी वाहिले असते. पण जीवितकार्य संपल्याशिवाय जीवन कधी संपत नाही. हा विजय भवानी मातेचा आहे. आई जगदंबेचा आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचा आहे. प्रभू रामचंद्रांचा आहे. डॉ. प्रभू निमित्तमात्र आहे. आम्हीही निमित्तमात्र आहोत, म्हणून आम्हाला या धवल यशाचा अभिमान वाटत असला, तरी गर्व वाटत नाही. घमेंड तर नाहीच नाही. या पराक्रमाचे श्रेय द्यायचेच झाले तर विलेपार्लेच्या जनतेच्या खालोखाल महिनाभर तहान भूक विसरून जिवापाड मेहनत घेणार्या सार्या शिवसैनिकांना द्यावे लागेल. रात्र जागविणार्या आमच्या सहकार्यांना द्यावे लागेल. नगरसेवकांना द्यावे लागेल. विभागप्रमुखांना द्यावे लागेल.
अग्रलेखात पुढे असेही म्हटले आहे की नजिकच्या भविष्यकाळात संपूर्ण देश हिंदुमय होऊन सार्या जगात तो हिंदूंचा हिंदुस्थान म्हणून ओळखला जाणार आहे. त्या हिंदुस्थानात फक्त राष्ट्रवादी लोकांना थारा राहणार आहे आणि सर्व धर्माचे राष्ट्रवादी सुखासमाधानाने राहून या देशाची, हिंदूधर्माची कीर्ती वाढविणार आहेत. ते युगप्रवर्तक कार्य शिवसेनेच्या हातून घडावे अशीही त्या श्रींचीच इच्छा आहे. म्हणून विलेपार्ल्यात आम्हाला विजयाचा प्रसाद मिळाला. विजय हिंदुत्वाचा झाला आणि यापुढेही या देशात हिंदुत्वाचा आणि हिंदुत्वाचाच विजय होत राहील अशी आम्ही समस्त हिंदूंना कृतज्ञतापूर्वक ग्वाही देऊ इच्छितो.’
त्यानंतर निवडणुकीसाठी हिंदुत्त्वाच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती केली आणि एकत्रितपणे निवडणूक लढले आणि जिंकले. आज भारतीय जनता पक्ष हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवून विजयाचे इमले बांधत आहेत. त्या इमल्याची पहिली वीट शिवसेनेने १९८७ साली रचली होती, हे भाजप आता सोयिस्करपणे विसरली.
२०१९ साली शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेसबरोबर घरोबा केला आणि हिंदुत्वाला तिलांजली दिली. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांच्या विरोधात उद्धव ठाकरे वागतात आणि वाटचाल करतात, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते करतात. सध्या हिंदुत्वाचा बुरखा पांघरून हिंदुंना फसवले जात आहे. नागपूरच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा बुरखा फाडला आहे. ‘एका बाजूला हनुमान चालीसा पठण करायची आणि दुसर्या बाजूला मशिदीमध्ये जाऊन कव्वाली ऐकायची, हे यांचे हिंदुत्व आहे. उत्तर प्रदेशात मदरशामध्ये जाऊन मन की बात करणार हे यांचे हिंदुत्व आहे. जो देशासाठी, मातीसाठी जीव द्यायला तयार आहे त्याला आपले मानणारे हिंदुत्व आमच्या रक्तामध्ये आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असे ठणकावून सांगणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या मुद्यावरून निवडणुकीत मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. तर शिवसेना नेते सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक यांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमदारकी रद्द झाली होती. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी अनेक शिवसैनिकांची केसेस अंगावर घेतल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वावर कुणीही प्रश्न उपस्थित करू नये, शंका घेऊ नये. कारण १९८७ साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विलेपार्ले पोटनिवडणूक प्रथम जिंकून शिवसेनेने बावनकशी हिंदुत्व सिद्ध केले आहे.