एकनाथ शिंदे
गेले तिथे निष्पाप ते जीव
माझ्या वेड्या हट्टापायी
मला झाली होती तेव्हा
‘त्यांच्या’ सत्काराची घाई
सीएम पद जाण्याआधी
उरकले मी मोठे काम
माझी हौस झाली पुरी
जरी त्यांनी म्हटला राम
एवढ्या कडक उन्हामध्ये
अक्कल ठेवली आम्ही गहाण
सत्तेपुढे झालो लाचार
मोदी शहा पंचप्राण
—– —– —–
अमित शहा
शिंदेंच्या त्या हट्टालाही
पडलो नसतो आम्ही बळी
शिंदेंना तर होई घाई
भाजून घेण्या आपली पोळी
भाजले ते भोळे जीव
उन्हामध्ये करपले
वेळ चुकीचीच होती
यांनी कार्य उरकले
शिंदे यांना नसते मुळी
वेळ-काळाचेही भान
फक्त आपल्या स्वार्थासाठी
धरती दुसर्याची मान
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
ढिसाळ आयोजन केले कुणी
चौकशी झालीच पाहिजे
हा शिंद्यांचा आगाऊपणा
त्यांना शिक्षा झालीच पाहिजे
आम्ही बसलो शिंद्यांसहीत
गारेगार मंडपात
पाण्यासाठी चेंगराचेंगरी
तिने केला सारा घात
पुढे कधी हिवाळ्यात
केला असता हा सत्कार
पद जाण्याची होती भीती
म्हणूनच त्यांनी पेलला भार
—– —– —–
भाजप भक्तगण
एवढ्या अफाट गर्दीमध्ये
होती व्यवस्था अगदी चोख
विरोधक खोटे बोलतात
द्वेषाचे ते गाठतात टोक
पाणी, जेवण, नाश्त्याचीही
आम्ही केली मोठी सोय
जमलेल्या श्रीभक्तांसाठी
नाही ठेवली मुळीच गैरसोय
आमची ताकद इतकी मोठी
सूर्यही झाकला असता आम्ही
भाजप म्हणजे काय समजता
आमची ताकद पाहिली तुम्ही
—– —– —–
सामान्य माणूस
राजकारणासाठी केवळ
घेतात निष्पापांचा आधार
काम फक्ते करण्यासाठी
चालते टळटळीत दुपार
सामान्यांना जे जे कळते
यांना कसे कळत नाही
स्वार्थीपणाने झाले आंधळे
म्हणून दुपार टळत नाही
सत्तर कोटीच्या उधळपट्टीत
पाच-पाच लाख काहीच नाहीत
देखल्या देवा दंडवत हा
त्यांचे संसार गेले खाईत