काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये पार पडलेल्या भव्य महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या (महाबैठक) कार्यक्रमानंतर झालेल्या दुर्घटनेत अकरा निष्पाप श्री सदस्यांचा उष्माघात आणि चेंगराचेंगरीत बळी गेला. सरकार ‘चेंगराचेंगरी’ मानायला तयार नाही. कारण ‘चेंगराचेंगरी’ नियोजनातील ढिसाळ कारभारामुळे होते तर उष्माघात हा नैसर्गिक आहे. ‘चेंगराचेंगरीला’ कुणाला तरी जबाबदार धरावे लागते, तर उष्माघात हा ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणत देवावर सोडला जातो.
या दुर्घटनेनंतर सर्व राजकीय पक्षांचे नेते केवळ एकाच रुग्णालयातील श्री सदस्यांना भेटले आणि बाईट देऊन निघून गेले. ही दुर्घटना झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा रुग्णालयात पोहचले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ही प्रचंड गर्दी त्यांच्या आग्रहास्तव जमली होती. म्हणजे त्यांनी आप्पासाहेबांना गळ घातली आणि मुख्यमंत्री शिष्याचा अट्टहास श्री स्वारी यांनी पुरवला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पनवेलमध्ये तातडीने पोहोचण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सर्वात अगोदर येऊन त्यांनी काय विल्हेवाट लावली ते ईश्वराला माहीत. त्यांनी दहाच्या सुमारास प्रसारमाध्यमांना बाईट दिले. तोपर्यंत एकही अधिकारी, डॉक्टर बोलायला तयार नव्हता. त्यांना तसे ‘आदेश’ होते. मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री हे संपूर्ण माहिती घेऊन बाईट देतात असे समजले जाते. पण, मुख्यमंत्र्यांनी मृतांचा आकडा हा आठ किंवा नऊ असा मोघम सांगितला. मुख्यमंत्र्यांना मृतांचा निश्चित आकडा सांगता आला नाही हे सर्वांनाच आश्चर्य होतं. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिल्या दिवसाचा मृतांचा आकडा रात्री उशिरा जाहीर केला. तो अकरा होता. आठवडाभरात तो चौदा झाला.
उष्माघात तसेच चेंगराचेंगरीचा त्रास झालेले अनेक श्री सदस्य आजूबाजूच्या रुग्णालयांत दाखल झाले होते, पण त्यांना कुणीही भेटले नाही. काही सदस्य मिळेल त्या वाहनाने थेट घरी गेले. तिथे त्यांचे काय झाले हे कोणाला माहित नाही. त्यामुळे मृतांचा आकडा जास्त असण्याची शक्यता सर्वजण आजही व्यक्त करीत आहेत. आठवडाभरातील सर्वच मृतांची आकडेवारी समोर आली पाहिजे.
महाबैठकीतील मृत्यू म्हणजे मोक्ष असं श्री सेवकांच्या मनावर बिंबवण्यात आलं असल्याने ते यावर चकार शब्द बोलायला तयार नाही. साधा इतिवृत्तांत ते सांगत नाहीत. यासारखं स्ट्राँग संमोहन कुठेही नाही. मृताच्या नातेवाईकांनी ना शोक केला ना खेद केला. ही तर ‘श्री’ची कृपा म्हणत सर्वांनी सारं स्वीकारलं. गेले आठवडाभर यावर बरीच चर्चा, आरोप, प्रत्यारोप झाले. अखेर शासनाने आगडोंब शांत करण्यासाठी एक सदस्य समिती स्थापन केली. शासनाचा एक सनदी अधिकारी या दुर्घटनेची चौकशी करणार आहे. काही जणांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. ती शासनाने सपशेल धुडकावून लावली आहे. त्यामुळे या ‘सो कॉल्ड’ चौकशीचे काय होणार हे आताच स्पष्ट झाले आहे.
चौदा मृत श्री सेवकांचे ‘पोस्टमार्टम रिपोर्ट’ आले आहेत. सात आठ तास पोटात अन्नपाण्याअभावी त्यांचा मृत्यू ओढवला असे त्यात नमूद करण्यात आले आहे. चौदा मृतांचा एकच पोस्टमार्टम अहवाल कसा काय असू शकतो, हा पहिला प्रश्न आहे. पाणी आणि अन्न न घेणे ही त्या श्री सदस्यांची चूक ठरणार आहे. चौदा मृतांपैकी एकाही सदस्याला दुसरी व्याधी नव्हती का? प्रचंड गर्दी, प्रखर ऊन, पाण्याचा अभाव यामुळे माणसाला हार्टअॅटकही येऊ शकतो. पण तशी कोणतीही कारणं न देता पनवेलमधील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाने कोणीतरी ‘आदेश’ दिल्याप्रमाणे एकच प्रकारचा पोस्टमार्टम अहवाल सादर केला आहे. त्यामुळेच ही चौकशी रामशास्त्री बाणा असलेल्या एखाद्या न्यायमूर्तीने करणे आवश्यक आहे.
या दुर्घटनेची तुलना गोवारी दुर्घटनेशी केली जाते. ते हास्यास्पद आहे. त्या दुर्घटनेतील मृत हे मोर्चाला आले होते, बैठकीला नाही. त्यामुळे ती खर्या अर्थाने दुर्घटना होती. त्याची चौकशी झाली. आयोग नेमला गेला. गर्दीसाठी काही मार्गदर्शक तत्वं ठरली. या महाबैठकीला कोणीतरी आदेश दिल्याने श्री सदस्य आले होते. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वं पाळली गेली नसल्याने त्याची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात अशी दुर्घटना यापूर्वी झाली नाही. या संपूर्ण मैदानाला ठेवण्यात आलेल्या ‘आऊटलेट’ची संख्या कमी होती. येताना श्री सदस्य हे शेकडोच्या घरात आले आणि जाताना ते लाखोंच्या संख्येने एकाचवेळी घराकडे निघाले. काही वर्षांपूर्वी पुण्यात असाच एक कार्यक्रम झाला होता. त्यात कोणी कधी कसे बाहेर पडावं, वाहन कुठे लावावं आणि पाणी अन्न काय आणावं याच्या सूचना अगोदर दिल्या गेल्या होत्या. प्रचंड गर्दी होऊनही तिथे एखादी दुखापत देखील झाली नाही. हे असं काहीतरी अघटित होणार हे गृहीत धरुन बाहेर पडण्याचे अनेक मार्ग तयार ठेवण्याची गरज होती. एका उच्च सनदी अधिकार्याने पूर्वसूचना दिली होती, पण ती गांभीर्याने घेतली गेली नाही. या उपाययोजना न करणार्यांना त्यासाठी जबाबदार धरले पाहिजे. राज्य सरकारचा उष्माघाताचा ‘हाय अर्लट’ असताना इतकी जनता कुणाच्या ‘आदेशाने’ आली? त्यांना जाब विचारण्याची गरज आहे. पण यातील काहीच होणार नाही असे स्पष्ट दिसत आहे. ‘मी मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं करा’ असा हा मामला आहे. सरकारने समिती नेमली आहे. ती काही दिवस्ाांनी, महिन्यांनी अहवाल देईल. त्यात श्री सदस्यांचीच सगळी चूक असेल. उष्माघाताला जबाबदार धरले जाईल. कदाचित सूर्यदेवाला नोटीस दिली जाईल, तो हजर होणार नाही, तो हजर होणं कोणालाच परवडणारं नाही. शेवटी’ अॅक्ट ऑफ गॉड’चा शेरा मारून फाईल अडगळीत टाकली जाईल आणि त्यानंतर सर्व कसं शांत, शांत होईल. जणूकाही काही घडलंच नाही. फार नाही, आणखी एक आठवड्याने याचा प्रत्यय येईल. लोकही विसरुन जातील. पुन्हा एखादी अशी दुर्घटना घडेपर्यंत.