□ लोकसंख्येत भारताने चीनला मागे टाकले…
■ जे ६० वर्षांत झालं नाही, ते मोदीजींच्या नेतृत्त्वात भारताने करून दाखवलं, असे ढोल का नाही बरं वाजले? बातमी खरी आहे ना?
□ खारघरमधील मृत्यू चेंगराचेंगरीमुळेच; खोके सरकार नक्की काय लपवतंय?
■ आपलं अपशकुनी तोंड आणि सर्व पातळ्यांवरचं अपयश!
□ श्री सदस्य उन्हात तडफडत होते तेव्हा श्रीमंत-श्रीमान शाही मेजवानी झोडत होते…
■ कोणताही ‘परिवार’ म्हटलं की हे आलंच… अशा ठिकाणी जाणार्यांनी आपल्या जबाबदारीवर जायला हवं… नंतर हॉस्पिटलमध्ये विचारपूस करायला कोण आणि किती फिरकले ते विचारा.
□ चौकशी समिती कशाला नेमता, आयोजकांवर गुन्हा दाखल करा- उद्धव ठाकरे यांचा संताप.
■ ज्यांना झाल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारता येत नाही, आमच्यामुळे नाही यांच्यामुळे गेले, अशी एकमेकांवर ढकलाढकली सुरू आहे, ते उंदीर स्वत:वरच गुन्हा दाखल कसे करतील, उद्धवजी! जबाबदारी घ्यायलाही वाघाचं काळीज लागतं.
□ ‘महाराष्ट्र भूषण’च्या गर्दीमागे निवडणुकीचे राजकारण- शरद पवार.
■ आपण एकगठ्ठा मतं मिळवण्याच्या नादात एकगठ्ठा मतं घालवली, एवढंच यांच्या डोक्यात येणार… किमान १४ जीव घेतले आपल्या सत्तालालसेने, याची लाज वाटण्याची शक्यता कमीच.
□ राज्य सरकारला आली जाग; मास्क वापरण्याचे आवाहन केले…
■ आता हर्ड इम्युनिटी आली असेल इतका संसर्ग झालाय करून… बैल गेला आणि झोपा केला…
□ संजय राठोड यांच्या खात्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; केमिस्ट संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
■ सरकार पडण्याआधी छापून घेणं चाललं आहे, यापुढे जनता आपल्याला दारात उभी करणार नाही, ही शेवटची संधी आहे, हे सगळे गद्दार जाणून आहेत…
□ गेल्या पाच वर्षांतील अनेक ईव्हीएम सदोष.
■ म्हणजे निवडणुकांचे काय ‘निकाल’ लागले असतील, ते पाहा!
□ कुलगुरूंच्या खुर्चीवर ‘रॅपर’; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धक्कादायक प्रकार.
■ अलीकडे कुलगुरूंच्या नेमणुका करताना जे प्रकार घडतात, ते पाहता हाच कदाचित सर्वोत्तम उमेदवार निघायचा त्या पदासाठी.
□ मुंबईत रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार- आदित्य ठाकरे यांनी केली पोलखोल.
■ यावर उत्तर काय येणार तेही माहिती आहे… आम्ही केलेला विकास काहीजणांना पचत नाही, एवढंच म्हणणार… अरे, विकास कोणाचा केलात? आपल्या बगलबच्च्यांचा?
□ सरकारी विभागांत हजार कोटींचा घोटाळा; हायकोर्टात जनहित याचिका.
■ हायकोर्टही आता म्हणेल, हजार कोटी म्हणजे काही फार नाहीत, सेशन्स कोर्टात निपटा… याहून मोठं काही असेल तर सांगा…
□ अंगणवाडी सेविकांना चार महिन्यांत मोबाईल हॅण्डसेट द्या; हायकोर्टाची राज्य सरकारला ताकीद.
■ चांगली कल्पना आहे, पण ज्या दुर्गम भागांमध्ये त्या काम करतात, तिथे नेटवर्क कसं देणार?
□ कितीही चौकशा करा, सरकारच्या हाती काहीही लागणार नाही; एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांचा ठाम विश्वास.
■ जमेल तेवढी हुलाहूल करून पाहतात, राजनजी…
□ पुनर्वसन न करताच पालघरमध्ये आदिवासींच्या घरांवर फिरवला बुलडोझर
■ जमीनमालकांना मिळाली ना भरपाई, वरच्यांना मिळाला ना कट… आता आदिवासींना विचारतो कोण?
□ पोलिसांची दडपशाही! नागपूरच्या वेशीवरच पाणी संघर्ष यात्रा रोखली
■ पोलीस हुकमाचे बंदे… त्यांना हुकूम देणार्यांची भेदरट दडपशाही आहे ही!
□ वांद्र्यातील पुनर्विकासात उदय सामंत यांची ‘ताकद’, मोहित कंबोज यांची दहशत
■ मिल बाँट के खाओ… कल किसने देखा…
□ मध्य रेल्वेची मुजोरी; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सीएसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यास नकार.
■ मध्य आणि उत्तर भारतात महाराजांविषयी किती जहर भरलं गेलं आहे आणि ते भरणारे घरचे भेदी कोण आहेत, ते तपासा… अनेक उत्तरं मिळतील.
□ मटण शॉप तोडून चोरट्यांनी दहा बोकड चोरून नेले.
■ सराफाचं दुकान लुटलं तर दागिने नेतात, मटण शॉप तोडल्यावर बोकड नाही तर काय ओंडके चोरणार?
□ उल्हासनगरातील दीड लाख अनधिकृत बांधकामे अधिकृत होणार.
■ तिथे काही अधिकृत बांधकामे आहेत आधीपासून, हीच बातमी असेल अनेकांसाठी…
□ मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; मिंधे सरकारला धक्का.
■ महाविकास आघाडी सरकारला बोल लावत होते, आता तुम्ही काय दिवे लावलेत?
□ मोदी सरकारचा भंडाफोड करताच माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयची नोटीस.
■ नसती आली तर बातमी होती…
□ ‘खासदार आपल्या दारी’ कार्यक्रमाला राजेंद्र गावित यांची दांडी.
■ ते आपल्या घरी असतील….