काही दिवस श्री श्री श्री रविशंकरांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. त्यांचा तो आगळावेगळा पेहराव, त्यांचं ते शांतसंयमी वागणं, त्यांचं मधाळ बोलणं… हे सगळं बघून मला ते आवडायला लागले होते. पण नंतर मला एका मित्राने त्यांची एक क्लिप पाठवली. त्यामध्ये श्री श्री श्रींच्या अंगात आलं होतं आणि ते सगळ्या श्रोत्यांच्या समोर बसल्या जागी झुलत होते, उड्या मारत होते. हा व्हिडिओ पाहून मी खूप हसलो. आता तुम्ही म्हणाल, एखाद्याच्या अंगात आलं तर आपल्याला हसायला कशाला यायला पाहिजे? खरंय तुमचं. पण, मला हसू वेगळ्याच कारणाने आलं. व्हिडिओ बनवणाराने पार्श्वसंगीत म्हणून अजय अतुलचं ‘जोगवा’मधलं ‘लल्लाटी भंडार…’ टाकलं होतं. त्यातल्या चौंडक्याच्या तालावर आर्ट ऑफ लिविंग शिकवणारे बाबा उड्या मारत होते. हे असलं काही बघून माणसाला हसू येणार नाही तर काय होईल?
आता जग्गीजींच्या सिद्धीबद्दल सांगतो. ते सांगतात, ‘मला लहानपणापासून दम्याचा त्रास होता. जेव्हा मला तपसामर्थ्याने सिद्धी प्राप्त झाली त्या क्षणी माझा दमा आपोआप बरा झाला. लहानपणी खेळत असताना माझा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. सिद्धीच्या द्वारा तो बरा झाला.’ ते म्हणतात की, तंत्रामध्ये एवढी ताकत असते की त्याच्या सहाय्याने अगदी एखाद्या मेलेल्या माणसालासुद्धा जिवंत करता येतं. माझ्याकडे तंत्र आहे असं हे सद्गुरु सांगतात. त्यापुढे जाऊन ते असं सांगतात की ज्याच्याकडे तंत्र नाही तो गुरुच नाही.
माझे आजोबा श्री दत्तात्रयांबद्दल असं सांगायचे की त्यांनी २४ गुरू केले होते. पण ते गुरू काही तंत्राचे निकष लावून केलेले नव्हते त्यांनी. तर ‘जो जो जयाचा घेतला गुण। तो तो गुरू केला मी जाण।।’ असं स्वतः श्री दत्तात्रय सांगतात. थोडक्यात काय तर ज्याचं जे चांगलं वाटेल ते त्याच्याकडून घ्यावं. तोच आपला गुरू. या स्वयंघोषित सद्गुरुला स्वतःभोवती गूढ वलय तयार करायचं आहे म्हणून हा माणूस स्वतःचं महत्त्व वाढवायला बघतो. बाकी काही नाही.त्या तंत्राच्या साह्याने त्यांनी स्वतः किती मेलेल्या माणसांना आजपर्यंत जिवंत केलं आहे? अर्थात आसे अचाट दावे करणारे सद्गुरु काही एकटे नाहीत. असे अनेक असतात. प्रभू येशूच्या नावाने हालेलुया करणारा एक बाबा आहे. त्याच्याकडे व्हीलचेअरवर बसून गेलेला पेशंट बाबाचा हात लागताच व्हीलचेअर सोडून उठून पळायला लागतो. बाबाच्या नुसत्या हात लावण्याने जर दुर्धर व्याधी नाहीशा होणार असतील, तर मग एवढे मोठे मोठे हॉस्पिटल बांधण्याची गरजच काय बरं? तुकोबा म्हणाले तसाच काहीसा हा प्रकार… ‘नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती।।’.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ‘निर्मला माताजी म्हणून एक बाई होती. तिचा दावा होता की तिला कुंडलिनी कशी जागृत करायची ते माहित आहे. आम्ही तिला आव्हान दिलं, आमच्यासमोर ही कुंडलिनी जागृती करून दाखव. तिने आव्हान स्वीकारलं नाहीच, उलट आमच्यावरच मारेकरी घातले. आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले.’ काळ्या जादूवर विश्वास असणारे लोक सांगतात की, एखाद्याच्या शरीराला हात न लावता, केवळ जादूच्या सहाय्याने त्याचा जीव घेता येतो. असं असताना दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी वगैरे मंडळींना गोळ्या घालून का ठार करावं लागलं ह्या लोकांना? त्यांच्यावर का नाही काळी जादू करता आली?
आता या सगळ्या प्रकाराबद्दल संतांचं काय मत आहे हेही आपण जाणून घेऊ. संत सांगतात, ‘अवघा तो शकुन। हृदयी देवाचे चिंतन।।’, ‘आम्हा हरिच्या दासा। शुभकाळ अवघ्या दिशा।।’, ‘काळ वेळ नाम उच्चारिता नाही..’ संत सांगतात, आमच्यासाठी शुभ अशुभ असं काहीच नाही. प्रत्येक काळ हा आमच्यासाठी शुभ आहे. प्रत्येक वेळ आमच्यासाठी मुहूर्ताची आहे. आमच्यासाठी कुठलीच गोष्ट कधी बाधा ठरत नाही. काळी जादू वगैरे तर खूप दूरची गोष्ट.
आता हे ढोंगी बाबा लोक ज्या तपाच्या सामर्थ्याबद्दल, योग बळाने मिळवलेल्या सिध्दी वगैरेबद्दल बोलत असतात त्यांची सत्यता पडताळून पाहायची असेल तर मी काय करू शकतो? मी आमच्या संतांना शरण जातो. त्यांच्या वचनाचा मी आधार घेतो. पण थांबा.. त्याआधी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद ह्या सिद्धिवाल्या चमत्कारी बाबांबद्दल काय बोलतात, ते जाणून घेऊ. हे बागेश्वर धाम चर्चेत आलं तेव्हा काही पत्रकार मंडळींनी शंकराचार्यांना विचारलं, तुम्हाला यावर काय वाटतं म्हणून. शंकराचार्य म्हणाले, कुणाकडे अशी दिव्य चमत्कारी शक्ती वगैरे असेल तर त्यांनी जोशी मठाला जात असलेले तडे थांबवून दाखवावेत चमत्काराच्या साह्याने.’ ‘हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या..’ शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वशक्तिमान केवळ इश्वर आहे. बाकी तुम्ही आम्ही सगळे सामान्य जीव आहोत. त्यामुळे कुठल्याच हाडामांसाच्या व्यक्तीने असा दावा करू नये की माझ्याकडे काहीतरी जगावेगळी ताकद आहे, सिद्धी आहे.
आता आमच्या संतांची भूमिका काय भूमिका आहे याबद्दल? आपण थेट ज्ञानदेवांनाच विचारू. ते अधिकारवाणीने सांगू शकतील. कारण ते योगीराज आहेत. ज्ञानदेव म्हणतात, ‘योग याग विधी येणे नोहे सिद्धी। वायाची उपाधी दंभधर्म।।’ ज्ञानदेव म्हणतात, कसला योग.. कसला याग.. कसला विधी.. अन् कसली सिद्धी.. या सगळ्या खेळात अडकून पडाल तर पदरात तर काहीच पडणार नाही तुमच्या.. दंभ, अहंकाराचे मात्र धनी व्हाल.
संत निळोबाराय काय सांगतात पाहा.. ‘करिता योगाभ्यास न पवे ती सिद्धी। करिता नाना याग वाढती उपाधी। नित्य नित्य ज्ञाने अभिमानाची वृद्धी।..’ संतांच्या म्हणण्यानुसार हे कलियुग आहे आणि कलियुगात जप तपादी साधने, योग यागादी साधने व्यर्थ ठरतात. पण सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी, संसाराचा भार पेलण्यासाठी, आत्मबल वाढवण्यासाठी कुठल्यातरी साधनाची गरज आहे, याचीही जाण संतांना आहे. त्यामुळे अशा लोकांच्यासाठी ते सांगतात, ‘कलियुगामाजी करावे कीर्तन। तेणे नारायण देईल भेटी।।’, ‘कलियुगी उद्धार हरीच्या नामे..’ नामभक्ती सोपी आहे. त्यासाठी तुमचा संसार सोडून कुठे रानावनात भटकण्याची गरज नाही. ‘असोनी संसारी जिव्हे वेगू करी..’, ‘नलगती सायास जावे वनांतरा..’, ‘ठायीच बैसोनि करा एकचित्त..’ काम धंदा सोडून नुसतं हातावर हात धरून बसावं का? नाही. ‘कामामध्ये काम। काही म्हणा राम राम।।’ अशी साधी सोपी सरळमार्गी शिकवण संत देतात. आणि जो कोणी या सगळ्याच्याही पलीकडे जाण्याच्या पात्रतेचा होईल त्याच्यासाठी तुकाराम महाराज सांगतात, ‘ऐसा आहे देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।।’ आ. ह. साळुंखे सर ह्याला तुकोबांच्या नास्तिकतेचा परमोच्च बिंदू म्हणून सांगतात.
मुळातला प्रश्न आहे, श्रद्धा कशाला म्हणायचं? ‘विद्रोही तुकाराम’मध्ये पु. मं. लाड यांचं एक विधान साळुंखे सर उद्धृत करतात, ते असं, ‘बुद्धीने विचारांती केलेल्या निश्चयाची जी निष्ठा तिलाच श्रद्धा म्हटले पाहिजे. ही खरी श्रद्धा. विचारातून, विवेकातून प्रकट झालेली.’ श्रद्धा खरी असेल तर ती कोणामुळे डळमळीत होण्याचं काय कारण? आणि जी कशानेही, कुणाच्या काही बोलण्याने डळमळीत होते ती श्रद्धा कसली? ते असेल केवळ एक ढोंग.
मी लहान असताना आजोबा मला एक गोष्ट सांगायचे, रामकृष्ण परमहंसाची. स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या भेटीला केशवचंद्र गेले. केशवचंद्र नास्तिक होते. रामकृष्णांची ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा. केशवचंद्र वाद घालायला लागले रामकृष्णांबरोबर. देव अस्तित्वातच नाही म्हणून. अर्थात हा वाद केवळ एकतर्फी सुरू होता. केशवचंद्र मोठे विद्वान व्यक्ती. निरनिराळ्या ग्रंथांमधील, शास्त्रांमधील वचनं, संदर्भ देऊन केशवचंद्र सांगत होते की, ह्या जगात देव नाहीच. रामकृष्ण परमहंस डोळे मिटून तल्लीन होऊन केशवचंद्रांना ऐकत होते. केशवचंद्रांचं बोलून झाल्यावर स्वामीजींनी डोळे उघडले आणि कडकडून मिठी मारली केशवचंद्रांना. स्वामीजी म्हणाले, ‘देव आहे यावर माझा विश्वास होताच, पण आज तुम्हाला पाहून, तुमची एवढी विद्वत्ता पाहून तर माझी खात्रीच पटली. बुद्धीचं एवढं वैभव त्याच्याशिवाय दुसरं कोण देऊ शकतो तुम्हाला? ही सगळी त्याचीच तर लीला आहे..’ असं म्हणून स्वामीजी आनंदाने नाचायला लागले…
बायबल, नवा करार, मत्तय मध्ये येशू सांगतो, ‘तुला जे काही धार्मिक कार्य करायचं असेल ते कर, पण त्याचा गाजावाजा मात्र अजिबात करू नकोस. तुला दानधर्म करायचा आहे तर कर.. पण या हाताने केलेलं दान त्या हाताला कळू देऊ नकोस. तुला प्रार्थना करायची आहे तर अवश्य कर.. पण प्रार्थनेचं प्रदर्शन मात्र करू नकोस. तुझ्या घरात, दारं खिडक्या लावून घे आणि एका बंद खोलीत कर ही प्रार्थना..’
स्वतःच्या भक्तीचं, श्रद्धेचं, सिद्धीचं, योग सामर्थ्याचं वगैरे जो कोणी लोकांच्यासमोर प्रदर्शन करत असेल तो प्रत्येक व्यक्ती ढोंगी आहे. आणि त्याहीपुढे जाऊन कोणी या सगळ्याचा धंदा करणार असेल, माझ्याकडे दिव्य चमत्कारी सिद्धी आहे असा दावा करून, लोकांना भुलवून, थापा मारून त्यांच्याकडून पैसे उकळणार असेल, देवाच्या धर्माच्या नावाखाली त्यांना मूर्ख बनवणार असेल. अशा लोकांसाठी आणि त्यांच्या भक्तांसाठी तर देवाने स्पेशल नरकाची स्थापना केलेली आहे. येशू सोडा, या बाबतीत कृष्ण काय म्हणतात,
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः।।
प्रार्थनेच्या बाबतीत, धर्माचरणाविषयी जे नियम येशूने सांगितले आहेत तेच कृष्णानेही सांगितलेलं आहे. आता कोणी म्हणतील की मी बायबल, कुराण, भगवद्गीता यांचं उदात्तीकरण करतो म्हणून. पण याबाबतीत स्वामी विवेकानंदांना मी आदर्श मानतो. इतर कुणाची मला पर्वा नाही. स्वामीजी सांगतात, ‘धर्म ग्रंथांच्या ज्या भागात विचारांचा व्यापकपणा व प्रेमभाव आढळून येतो तेवढाच भाग योग्य असून बाकीच्या ज्या भागात तर्कदोष, चुका, भेदभावना, द्वेषभाव दिसून येईल तो त्याज्य आहे.’
महापुरुषांच्या, संतांच्या कल्पनेतील परमात्मा हा प्रेमस्वरूप आहे. प्रेमाला वगळून ते ईश्वराची कल्पना करत नाहीत. कारण शेवटी प्रेम खरं आहे. शाश्वत आहे. सत्य आहे. धर्म पंथ संप्रदाय रूढी परंपरा यांचं बंधन माणसाला आहे, परमेश्वराला नाही. माणूस अज्ञानातून स्वतःला बंधनात अडकवून घेतो आणि प्रेमापासून, सत्यापासून, ईश्वरापासून दूर जातो. लहानपणी मी विविध भारतीचा श्रोता होतो. त्या काळात जावेद अख्तर साहेबांचं एक गाणं नेहमी यायचं रेडिओवर. अभ्यास नव्हता, जाणीव प्रगल्भ नव्हती. पण अशाही काळात ते गाणं मात्र मनात कुठेतरी घर करून गेलं. ह्या लेखाचा शेवटही मी त्या गाण्यानेच करेन..
पंछी नदिया पवन के झोके
कोई सरहद ना इन्हें रोके
सरहदें इन्सानों के लिए हैं
सोचो तुमने और मैंने
क्या पाया इन्सां हो के…