प्रबोधनकार हा माणूस जगावेगळा. त्यांचा संसारही जगावेगळाच होता. रमाबाईंनी हा संसार मोठ्या समर्पणाने आणि नेटाने केला. लग्नानंतरचे त्यांचे सुरुवातीचे दिवस प्रबोधनकारांनी नोंदवले आहेत. कुटुंबाविषयी ते फारसं लिहित नाहीत. पण लिहिलंय ते फार लोभस आहे.
– – –
प्रबोधनकारांच्या आत्मचरित्राचं नाव `माझी जीवनगाथा` आहे. मुळात ते आत्मचरित्र आहे आणि त्याचं नाव जीवनगाथा, त्यामुळे यात इतर आत्मचरित्रांसारखे वैयक्तिक तपशील वाचायला मिळतील, असं आपल्याला वाटतं. म्हणजे लग्न, बायको, मुलं वगैरे. पण प्रत्यक्षात तसं काहीच सापडत नाही. प्रबोधनकारांना मुलं किती? त्यांचे जन्म कधी झाले? त्यावेळेस त्यांना काय वाटलं? याविषयी काही म्हणजे काही या जीवनगाथेत नाही. आजी, आजोबा, आई, वडील यांच्याविषयी थोडं सविस्तर आहे, पण तेही प्रामुख्याने सामाजिक स्वरूपाचं. प्रबोधनकारांनी आयुष्यभर समाजाचाच संसार केला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या समाजाचं जवळपास शंभरेक वर्षांचं चरित्र यात आलंय.
अर्थात त्यात लग्न जुळवण्याविषयी आहे. पण ते पुन्हा त्या काळातल्या लग्नाविषयीच्या चालीरीती सांगण्यासाठी, त्यातल्या चुकीच्या गोष्टींवर टीका करण्यासाठी आणि आपली वैचारिक भूमिका मांडण्यासाठी. प्रत्यक्ष लग्नाचं वर्णन अवघ्या दोन चार ओळींत संपवून टाकलंय. पण आपला पोटापाण्याचा संघर्ष सांगत असताना प्रबोधनकार अचानक `किंचित संसाराकडे वळतो` असं म्हणतात आणि त्याच्या पुढच्या ओळीत तसं वळण्याची गरजही सांगतात, `कारण, त्याच पार्श्वभूमीवर या बाह्य जगातल्या अडीअडचणींना मी कसा तोंड देऊ शकलो, याचं चित्र नीट रेखाटता येईल.` म्हणजे संसाराचं तीन चार पॅरेग्राफांत वर्णन द्यायचं आहे, तेही कौटुंबिक आयुष्याविषयी सांगण्यासाठी नाही, तर जगण्यातले संघर्ष मांडण्याची पार्श्वभूमी म्हणून. म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यासारखं इथेही संसाराला स्थान दुय्यमच.
आयुष्याच्या या टप्प्याचं म्हणजे लग्न होऊन चार पाच वर्षं झालेली असतानाचं त्यांनी केलेलं संसाराचं वर्णन या खरं तर पत्नीविषयी अत्यंत प्रेमाने आणि आदराने लिहिल्या नोंदी आहेत. परतवाड्यासारख्या वर्हाडातल्या अगदी छोट्या शहरातून मुंबईसारख्या महानगरात येणं त्या काळात काय होतं, याचं वर्णन करताना ते लिहितात, `तसं म्हटलं तर सौभाग्यवती मूळची खेडेवजा गावची. परतवाड्याची. शिक्षण व्हफा पास. रहाणी जुन्या वळणाची. वाहन म्हणजे घोड्याच्या टांगा यापेक्षा अधिक माहिती नाही. लग्नाआधी परतवाड्याहून घोड्याच्या टांग्यातून अमरावतीला आल्यावरच आगगाडीचं दर्शन झालं.`
मुंबईत आल्यानंतर रमाबाईंची उडालेली तारांबळही ते नोंदवतात, `मुंबईला (दादरला) आल्यावर येथली ती रोजची घनचक्कर हातघाईची रहाणी पाहून बिचारी काही दिवस बावरलीच होती. सकाळी वर्तमानपत्रांचा ढिगारा दुधाच्या उकाड्यासारखा येतो काय, घरातले सारे चहा प्यायचे विसरून त्यावर तुटून पडतात काय, काही तिला उमगेच ना. पण थोड्याच दिवसांत तो गावठी नूर विरघळत गेला आणि चार सहा महिन्यांतच सौ. रमा अगदी अपटुडेट बनली.`
आजपासून शंभर वर्षांपूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे. आजच्यासारखी नवरा बायकोच्या नात्यातली प्रायव्हसी ही एकत्र कुटुंबात नसायचीच. ते सांगतानाही आपल्या भावना हळूवार भाषेत नोंदवण्याऐवजी प्रबोधनकार दादर परिसरात फिरायला जाण्यासाठी जागा नसल्याची तक्रार वर्तमानपत्राला लिहिलेल्या पत्रासारखी नोंदवतात. ती अशी, `आजूबाजूचे वातावरण आजच्यासारखे मनसोक्त नसे. नवराबायको एकत्र रस्त्याने चालू शकत नसत. मग फिरायला जाण्याचे नावच कशाला? आणि त्यावेळी दादर-माहीम विभागात फिरायला जाण्याची सोय तरी होती कुठे? दादरची चौपाटी ही अगदी अलिकडचा अवतार आहे. त्याकाळी आमची नि दादर चौपाटीची भेट फक्त मुडदेफराशीच्या प्रसंगी व्हायची. तिकडे एरवी कुत्रंसुद्धा फिरकत नसे. गणपती बुडवायचे तेही माहीम लेडी जमशेटजी रस्त्यावर असलेल्या दोन तळ्यांत. त्यातल्या त्यात माटुंग्याच्या देवळाला लागूनच असलेल्या तलावात. हे तळे मात्र छान असायचे. चारी बाजूंनी चौफेर चिरेबंदी पायर्या आणि स्वच्छ पाणी. त्या जागेवर आज मार्केट थाटलेले आहे.` प्रबोधनकारांनी `जुन्या आठवणी` या पुस्तकात केलेलं तळ्याचं वर्णन या वर्णनाशी जुळणारं आहे. त्यानुसार हे तळ्याच्या काठी शंकराचं देऊळ आहे. त्याला धरून अंदाज बांधायचा तर हे कटारिया रोडवरचं काशी विश्वेश्वर मंदिर असावं. पण याच्या जवळच्या तळ्यावर उभारलेलं प्रबोधनकारांनी सांगितलेलं मार्केट शोधायला हवं.
चार सहा महिन्यांत रमाबाईंना अपटुडेट करण्यात प्रबोधनकारांचा काहीच हातभार नव्हता. ते काम प्रबोधनकारांच्या आई आणि आजी यांनी चोख बजावलं होतं. त्या दोघींच्या मार्गदर्शनात रमाबाई संसार चालवण्यात निपुण बनल्या. त्यांच्यात अल्पावधीत झालेले बदल प्रबोधनकारांनी टिपले आहेत. ते असे, `तीही लवकरच वर्तमानपत्रांच्या व्यसनात दंग होऊ लागली. चर्चा चिकित्सा शंकाकुशंका यांवर वाद करू लागली. दिवसभर मुंबईला व्यवसायाची दगदग, महिन्याला रोख पगार हाती पडायचा. घरातला देण्याघेण्याचा सारा व्यवहार ती जातीने पाहू लागली. बाजारातला कोणताही जिन्नस आणण्याची माझ्यावर कधी वेळच आली नाही. त्यामुळे आजही कोथिंबिरीपासून तो तांदळापर्यंत, कशाचा किती भाव, नि बरे वाईट कोणते, या ज्ञानात मी अगदी अक्षरश: `ढ`च आहे. अमक्याचा भाव वाढला नि तमक्याचा घसरला, कसे काय दिवस जाणार बुवा, या विषयावर कोणी चर्चा करू लागले का आजही मी नुसता हुंहूं करीत नाइलाजाने ऐकत बसतो झाले. त्यातले अवाक्षरही मला समजत नाही नि उमजतही नाही.`
हे सांगून झाल्यावर प्रबोधनकार आपल्या संसाराचं नेमकं वर्णन करतात. त्यावर आजच्या जमान्यात विश्वास बसणार नाही, तरी त्यात वाचण्यासारखं आणि समजून घेण्यासारखं बरंच आहे. ते लिहितात, `सारांश, सौ.ने मला त्या संसारी जंजाळात कधी पडूच दिले नाही. माझ्या दैनंदिन गरजा काय, याचा तिने चोख आढावा घेतल्यामुळे बाह्य जगाच्या दलामलीत मला यथेच्छ भाग घेता आला. मुलेबाळे झाल्यावरही संसाराच्या कसल्याही विवंचना तिने माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत. फक्त दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आम्ही रोख खंडणी भरली की `राज्याचा बंदोबस्त कसा काय आहे?` विचारण्याची जरूरच पडायची नाही.`
प्रबोधनकार नेहमी व्यासंगात बुडालेले असायचे, नाहीतर कोणत्या तरी सामाजिक कामांत गुंतलेले असायचे. त्यांना हे सारं करता आलं याचं श्रेय ते इथे त्यांच्या पत्नीला रमाबाईंना देत आहेत. इतर अनेक बायकांसारखं त्यांनी घरच्या कटकटी आणि मागण्यांनी हैराण केलं असतं, तर प्रबोधनकार इतकं बहुआयामी काम करू शकले असते का, याबद्दल शंकाच आहे.
प्रबोधनकारांसोबत राहून रमाबाईंचे विचारही क्रांतिकारक बनले होते. त्याच्या उदाहरणादाखल प्रबोधनकारांनी एक प्रसंग दिला आहे. तोही त्यांच्याच शब्दांत वाचायला हवा-
`तरीही अस्पृश्यतेबाबत हिचे मत काय असावे याचा मला अंदाज येण्याचा योगच येई ना. एका शनिवारी तो आला. हापिसातून परत येत असता, कोटातले माझे स्नेही श्री. सदोबा काजरोळकर माझ्याबरोबर घरी आले. कोणी पूर्व अपरिचित घरी आला का चहा चिवडा भजी तयार करणे, हे ठरलेलेच असायचे. त्याप्रमाणे चहा भजी फराळाला आली. बशाही तिने उचलून आत नेल्या. काजरोळकर निरोप घेऊन गेल्यावर मी विचारले,
मी : आता आला होता हा गृहस्थ कोण, माहीत आहे काय?
ती : कोणी का असेना महार मांग, आपल्याला काय करायचे?
मी : हे चांभार जातीचे.
ती : इतक्या स्वच्छतेने वागणारे नि सभ्यपणाने वागणारे कोणी का असत ना, आपल्या घरी स्वागत झालेच पाहिजे. त्यात कसला आलाय विटाळ नि चंडाळ. घाणेरड्या कपड्यानं एखादा ब्राह्मण आला तर मात्र त्याला थारा देता कामा नये.
मी : मग हे सारे लोक, केवळ महार, मांग, चांभार जातीवरून…
ती : त्यांना अस्पृश्य मानतात. हा तुमच्याच भाषेत सांगायचं तर गाढवपणा आहे.
बस्स! त्या दिवशी मी जिंकलो. त्यानंतर अस्पृश्योद्धाराच्या ज्या ज्या आंदोलनात मी आणि बेंद्रे भाग घेत असू, त्यात सौं.चा भरभक्कम पुरस्कार आम्हाला लाभत असे.`
विषयांतर असली तरी एक गोष्ट नोंदवायलाच हवी, या प्रसंगात उल्लेख असलेल्या सदोबा काजरोळकर यांचं नाव चुकलेलं असावं. ते नारायण सदोबा काजरोळकर असावेत. सुरुवातीचं नाव चुकून राहिलं असावं. ते प्रबोधनकारांचे समकालीन. मुंबईतल्या गांधीवादी हरिजन चळवळीचे नेते. त्यांनी १९५२ साली लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला होता.
प्रबोधनकारांनी सांगितलेला हा प्रसंग आणि त्यावरची त्यांची `मी जिंकलो` ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. आधीच एकत्र कुटुंबाचा पसारा. त्यात दिवसरात्र घरी येणारी मित्रमंडळी. दिवसा चर्चांची गुर्हाळं तर रात्री गाण्याच्या मैफिली. त्यात पुस्तकांत डोकं खुपसून बसलेला नवरा. सरकारी नोकरीची साडेसात वर्षं सोडली तर उत्पन्न तसं अनियमित आणि अपुरंच. अशा परिस्थितीत समाजाचा संसार सांभाळणार्या एका अवलियाची जोडीदार बनणं हे पदरात निखारा बांधण्यासारखंच होतं. ती संसाराची साधना रमाबाईंनी संपूर्ण समर्पणाने केली. आज ठाकरे कुटुंबाची ओळख बनलेलं `मातोश्री` हे ब्रँडनेम त्या साधनेविषयीची कृतज्ञता आहे.