पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेत या, आमचे बोलणे ऐकून घ्या- विरोधकांचे व्हिडिओद्वारे साकडे
आता ते डायरेक्ट सेंट्रल व्हिस्टामध्येच येतील बहुतेक- तेव्हा देशात लोकशाही असली तर भेटतीलच की!
कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या मिश्रणाचा डोस प्रभावी : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा दावा
ते पूनावाला म्हणतात की ही सगळी लस उपलब्ध करून देता येत नसल्याने होणारी बेअब्रू झाकण्याची आयडियाबाजी आहे! फेकाफेकीवर एखादी लस नाही का तयार झालेली?
३९ सुवर्णपदकांसह अमेरिका ऑलिम्पिक्समध्ये अव्वल स्थानावर
पण सगळ्या पदकविजेत्यांची जात कळली का? ते सगळ्यात महत्त्वाचं!
पोलिस ठाण्यातल्या छळामुळे मानवी हक्क धोक्यात- सरन्यायाधीशांना खंत
पोलिसांसमोर कोणत्याही सामान्य माणसाचे सगळे हक्क स्थगित होतात माय लॉर्ड, ते मानव मानतात का मुळात सामान्यजनांना?
केंद्राला हवेत भाजपच्या विचारांचे न्यायाधीश – चिदंबरम यांची टीका
काहीही काय? केवढं शिकावं लागतं न्यायाधीश बनण्यासाठी!
नवी मुंबईत अभ्यासाचा तगादा लावणार्या आईची मुलाने केली हत्या, नाशिकमध्ये अभ्यास न करणार्या मुलाची आईने केली हत्या
अभ्यासाच्या अतिरेकापायी ओढवलेल्या या भयंकर परिस्थितीचा कोणी अभ्यास करेल का गांभीर्याने?
भारतीय जनता पक्षाला वर्षभरात तीन हजार ६२३ कोटी रुपयांची देणगी, काँग्रेसच्या पाचपट देणग्या
हेच होते ते अच्छे दिन… आणि तुम्ही येड्यासारखे रोज अकाउंट बॅलन्सचे एसेमेस बघताय!
यशाची हवा डोक्यात जाणार नाही- नीरज चोपडा
बेटा, नीरज म्हणजे कमळ. त्याआधारे एखाद्या कळपात ओढला गेला नाहीस, तर पाळू शकशील हे वचन.
ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यात विजेत्यांपेक्षा मोदींचा फोटो मोठा
त्यांचे फोटो लावले हेच नशीब समजा!
विवाहितेवर प्रेमपत्र वा शायरी लिहिलेला कागद फेकणे हा गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल
सगळ्या बायकांच्या फेसबुक अकाउंटच्या इनबॉक्स जाऊन ‘जे१ झालं का?’ असं विचारणार्या वासूंनो, पुढचा नंबर तुमचा लागणार.
ज्यांना अधिकार नाही, त्यांना फक्त बोलण्यासाठी मंत्री केले आहे- राष्ट्रवादीचा रावसाहेब दानवेंवर निशाणा
बोलण्यासाठी नाही, ते स्वत:च्या मनाने करायला लागतं- फक्त पढवलेली पोपटपंची करण्यासाठीच आहेत या नेमणुका!
दर सात वर्षांत दोन मोठ्या नैसर्गिक आपत्ती : तापमानवाढ रोखण्यासाठी केलेल्या कालमर्यादेआधीच धोका
चूक सुधारण्याची वेळ कधीच टळून गेली आहे, असं म्हणतात ते हेच!
सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांनी दंड न भरल्यास तासभर सार्वजनिक स्वच्छतेची सेवा करावी लागणार
यांच्याकडून दंड मागूच नका, तासभर सगळीकडचं थुंकलेलं साफ करून घ्या, आपोआप तोंडाला चाप बसेल!
भरधाव दुचाकी चालवण्यात मुंबईकर आघाडीवर, सहा महिन्यात २१ हजार जणांवर गुन्हे
चुकीची बातमी- भरधाव दुचाकी चालवणार्यांवर दंड आकारण्यात मुंबई सगळ्यात पुढे, असं म्हटलं पाहिजे- हे भरधाव बिनडोक सगळीकडचे उच्छाद घालत आहेत! कारवाईचं तेवढं भय नाही इतरत्र.