१९१८च्या उत्तरार्धात प्रबोधनकारांचा प्रवास ब्राह्मणेतर आंदोलनाच्या दिशेने होऊ लागला. त्याची पार्श्वभूमी प्रबोधनकारांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे. ती समजून घेणं फार महत्त्वाचं ठरतं.
– – –
प्रबोधनकार लिहितात, `सन १९१८पासून माझ्या खर्याखुर्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ झाला.` त्यांचं हे वाक्य खरं तर आश्चर्य वाटायला लावणारं आहे. कारण प्रबोधनकारांचं सार्वजनिक जीवन बालपणापासूनच सुरू झालेलं दिसतं. लहान मुलीचं म्हातार्याशी लग्न होतंय म्हणून मंडप जाळणं, शाळेतल्या अपंग शिक्षकावरचा अन्याय दूर करणं, वर्तमानपत्रांत सातत्याने लिहिणं, `विद्यार्थी` नावाची मासिक पत्रिका काढणं, अशी सामाजिक म्हणावीत अशी कामं त्यांनी शाळेत असतानाच केली होती. जळगावात `सारथी` मासिकाचं संपादन करणं, विविध सामाजिक विषयांवर जाहीर सामाजिक भाषणं देणं, स्वदेशी आंदोलनात भाग घेणं, हिंदू मिशनरी सोसायटीत आघाडीचा कार्यकर्ता म्हणून झोकून देणं, सोशल सर्विस लीग आणि दादर स्टुडंट्स युनियन या संस्थांमध्ये काम करणं, शिवजयंती आणि होलिकोत्सव अशा सार्वजनिक उत्सवांच्या आयोजनाबरोबरच त्यात व्याख्यानं देणं, नव्याने विकसित होणार्या दादरसारख्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणं, अशी एक ना अनेक सार्वजनिक जीवनातली कामं प्रबोधनकार १९१८च्या आधीही करत होते. तरीही ते आवर्जून सांगतात की खरंखुरं सार्वजनिक जीवन तर १९१८मध्येच सुरू झालं.
१९१४पासून त्यांच्या भटक्या आयुष्याला पहिल्यांदाच स्थैर्य मिळालं होतं. सरकारी नोकरी आणि फुलणारा संसार यामुळे त्यांचं आयुष्य सुखात सुरू होतं. याच काळात ते विद्वान तरीही धारदार लेखक म्हणून वृत्तपत्रीय वाचकांमध्ये महाराष्ट्रभर लोकप्रियही झालेले दिसतात. `वक्तृत्वशास्त्र` या अभ्यासपूर्ण ग्रंथाचं प्रकाशन त्या काळातल्या सर्वाधिक प्रतिष्ठित चित्रशाळा या प्रकाशन संस्थेने केल्याने त्यावर शिक्कामोर्तबही झालं होतं. मे १९१८मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ चांगलाच लोकप्रिय झाल्याचंही दिसून येतं. असं सगळं छान सुखात सुरू असताना हे स्थैर्य सोडून प्रबोधनकारांचा प्रवास संघर्षाच्या दिशेने सुरू झाला. त्याचं वर्णन `विविध वादांच्या जंगलात प्रवेश` असं प्रबोधनकार करतात.
प्रबोधनकारांना या वादांच्या जंगलात प्रवेश करावा लागला, कारण त्या काळातल्या सामजिक रूढीच तशा होत्या. त्यासाठी ते `माझी जीवनगाथा`मध्ये १९१८चा काळ समजावून सांगतात, `काळ एकरूप राहत नाही. तो सारखा बदलत असतो आणि त्याच्या बदलत्या पावलांबरोबर लोकांचे आचार, विचार नि उच्चारही बदलत असतात. समाज आज ज्या आचार विचारांच्या अवस्थेत आहे, तसा तो ५० वर्षांपूर्वी खास नव्हता. अर्धशतकापूर्वीच्या समाजव्यवस्थेचे यथातथ्य चित्र चालू जमान्यातल्या मंडळींपुढे धरले, तर पूर्वी आपण खरोखरच इतके नादान काय, अशा संभ्रमाच्या धुक्यात क्षणभर ते वावरतील. साशंक होतील. आणि कदाचित त्या चित्रकारावर संतापाने भडकतीलही. सतीचा धर्ममान्य आणि लोकमान्य प्रघात, तरुण विधवांचे जबरदस्तीचे केशवपन, जरठबाला विवाह, इत्यादी लोकाचारात चालू असलेल्या रानटी रूढींचा इतिहास आज वाचला, कोणी सांगितला अथवा लिहिला, तर आजच्या मंडळींना काय वाटेल, हे ज्यांनी आपल्या आत्मारामाला विचारावे. आज आपण त्या सर्व रूढींचा नायनाट करून एका नव्या विवेकवादी मन्वंतरात वावरत आहोत. तरी पण तो इतिहास आणि त्यातली सत्ये कोणालाही तुंकाराने नाकारता येणार नाहीत. किंवा त्याचे कथन कोणी केल्यास संतापाने नाके फेंदारण्याचेही कारण नाही.`
प्रबोधनकार इथे सती, केशवपन अशा अमानवी रूढींचा उल्लेख करतातच; पण त्याचबरोबर तो भयानक काळ आज का सांगायला हवा, याचंही कारण सांगतात. ते महत्त्वाचं आहे. कारण आजही भेदभावाचा भयंकर इतिहास सांगणार्यांना अनेकजण म्हणतात, आज यातलं काही नाही, त्यामुळे जुन्या गोष्टी उगाळण्याचं कारण काय? काही इतिहासकार तर असं काही घडलंच नसल्याचं सांगतात किंवा त्यासाठी इस्लामी आणि ब्रिटिश राज्यव्यवस्थेला जबाबदार धरतात. पण ते नाकारण्याची मुळात गरजच नाही. त्यामुळे रागावण्याचीही गरज नाही, असं प्रबोधनकार स्पष्ट करतात. त्यामुळे आज कुणाच्या डोक्यात जातवर्चस्ववादी मानसिकतेचे अवशेष असतील, तर तो कोणत्याही जातीचा का असेना, त्याला नेस्तनाबूत करण्याची प्रेरणा या काळाचं वर्णन आपल्याला देतं. त्यामुळे ते फारच महत्त्वाचं आहे. प्रबोधनकारांचं साहित्य म्हणूनच महत्त्वाचं आहे. ते जातवादाच्या आणि भिक्षुकशाहीच्या विरोधातला एल्गार आहे. आज आपण त्यातून शहाणपण शिकायला हवं.
प्रबोधनकारांची जडणघडण प्रामुख्याने मुंबई आणि जवळच्याच पनवेलमध्ये झाल्यामुळे ग्रामीण भागांसारखी सामाजिक अन्यायाची दाहकता त्यांना अनुभवायला मिळाली नाही. `मुंबई शहरात पूर्वीपासूनच कॉस्मॉपोलिटन स्पिरिट असल्यामुळे, अनेक सामाजिक अन्यायांची नांगी फारशी कोणाला टोचत नसे. तरीही होलिका संमेलनांमध्ये सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणताना किती मेहनत घ्यावी लागते, हे त्यांनी अनुभवलं होतं. अर्थात त्यांचेही जातीमुळे अपमान झालेच. त्याविषयी ते लिहितात, `ब्राह्मणेतराला, अगदी कायस्थ प्रभूंसारख्या संस्कृतीने, शिक्षणाने, आचारविचाराने समतोल असणार्या मंडळींना, कधीकाळी ब्राह्मणांकडे जेवण्याचा प्रसंग आला तर त्यांची पाने ब्राह्मणांच्या पंगतीपासून लांब दूर खालच्या ओटीवर मांडली जात असत आणि वाढण्याचे पदार्थ उंचावरून टाकण्यात येत असत. असले अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाची कथा काय, पण कित्येक देवळांत ब्राह्मणेतरांनाही कडक मज्जाव असे.`
या अन्यायाला ब्राह्मण समाजातला वर्चस्ववादी दृष्टिकोन कारण असल्याचं निदान प्रबोधनकारांनी केलंय. ते लिहितात, `त्याकाळी ब्राह्मणवर्गाचे सामाजिक व धार्मिक वर्चस्व अगदी कडेलोटाला गेले होते. बहुजन समाज तर कोरा करकरीत निरक्षर. खेड्यापाड्यांतून भटांभिक्षुकांकडून त्यांची अनेकमुखी पिळवणूक बिनधोक चाललेली. वर्तमानपत्रे एकजात ब्राह्मण मंडळींच्या हाती असल्यामुळे हव्या त्या मुकाबल्याचा कांट्याचा नायटा करणे, त्यांची सहज लीला होऊन बसली होती.`
या सगळ्याची अधिक कारणमीमांसा प्रबोधनकारांनी त्यांच्या साहित्यात केलेली आहेच. पण `माझी जीवनगाथा`मध्ये जवळपास पन्नास वर्षांनी ते स्वतःच्या शब्दात ते लिहित नाहीत. उलट डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे यांची साक्ष ते काढतात. सहस्रबुद्धे हे हिंदुत्ववाद्यांसाठी आदर्श असणारे विचारवंत आहेत. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारविश्वावर त्यांचा प्रभाव आहे. एक उजवे सामाजिक विचारवंत म्हणून त्यांचं लिखाण महत्त्वाचंच आहे. कारण इतर ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांसारखं ते झापडं लावून लिहित नाहीत. त्यांच्या महाराष्ट्र जीवन या ग्रंथातला जवळपास पानभराचा उताराच प्रबोधनकारांनी दिला आहे. त्यामुळे प्रबोधनकारांनी आयुष्यभर केलेल्या मांडणीला एक प्रकारचं अनुमोदनच मिळालेलं आहे.
पु. ग. सहस्रबुद्धे यांचा हा पूर्ण उताराच वाचायला हवा. तो पूर्ण देणं इथे जागेअभावी शक्य नसलं तरी त्यातला काही भाग इथे मांडायलाच हवा. तो असा–
`वर्णाभिमान, जातीय श्रेष्ठतेचा अहंकार नष्ट करून बहुजन समाजाशी एकरूप होण्यास ब्राह्मण त्यावेळी सिद्ध झाला नाही. सावकार, कुळकर्णी आणि भिक्षुक ही त्रयी खेड्यापाड्यांतील ब्राह्मणेतर समाजापुढे नित्य उभी होती. तिच्या अंगी ब्राह्मण्याचे कसलेही श्रेष्ठ गुण नव्हते. शुचिता, परोपकार, विद्योपासना, भूतदया, त्याग, समाजहितबुद्धी या गुणांचा लवलेशही तिच्या ठायी नव्हता. स्वार्थ, लोभ, पापवासना, असत्य अमंगल वाणी, कारस्थानी वृत्ती हे सर्व तामस गुण तिच्या ठायी ओतप्रोत होते आणि असे असूनही `आम्ही ब्राह्मण सर्व वर्णांचे गुरू आहो, ब्राह्मणेतरांपेक्षा श्रेष्ठ आहो,` असा अहंकाराचा उग्र दर्प त्यांच्या ठायी होता. हळूहळू जागृत होणार्या ब्राह्मणेतरांना हा जातीय श्रेष्ठतेचा जुलूम असह्य वाटू लागला.`
इतर ठिकाणी वर्गकलह निर्माण होतो, तसा महाराष्ट्रात जातकलह निर्माण झाल्याची कारणंही सहस्रबुद्धे सांगतात, `वकील, सावकार व कुळकर्णी हा वर्ग इंग्रजी राज्याच्या भक्कम चौकटीच्या आश्रयाने श्रीमंत झाला आणि शेतकरी असह्य करांच्या ओझ्यामुळे दरिद्री होत चालला. आणि त्यांच्या जमिनी हळूहळू वरील तिघांच्या घरात गेल्या. हे सर्व कायद्याच्या आश्रयानेच चाललेले होते. त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे न्यायाधीश, शिरस्तेदार, मामलेदार, फौजदार, बेलीफ हे सर्व बहुधा ब्राह्मणच होते. त्यामुळे आपली सर्व बाजूंनी नागवणूक करून आपली अन्नान्नदशा करून टाकण्यास हा ब्राह्मणच कारणीभूत आहे, असा दृढ समज बहुजन समाजाच्या मनात घर करू लागला.`
ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची कारणमीमांसा करताना सहस्रबुद्धे पुढे लिहितात, `ब्राह्मणांच्या मनात नवे सामाजिक तत्त्वज्ञान रूजून त्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांच्या जातीय अहंकाराचा दर्प कमी झाला असता आणि ते मतपरिवर्तन त्यांच्या आचरणात दिसले असते तरी विषमतेची तीव्रता बरीच कमी झाली असती. पण तसे मुळीच झाले नाही. सद्गुणांचा वास नसूनही ब्राह्मणेतरांना ते हीन लेखीत, त्यांचा विटाळ मानीत. मग त्यांच्यात मिसळणे, त्यांच्या पंक्तीला खाणे पिणे, त्यांच्याशी समरस होणे हे त्यांच्या स्वप्नी आले नाही, तर नवल काय? महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज एकमेकांपासून दुरावले. त्यांच्यातील विषमता उत्तरोत्तर तीव्र होत चालली आणि त्यामुळे त्यांच्यातील वैराग्नी भडकून पुढे त्याचे अत्यंत अनर्थकारक परिणाम झाले, त्याची कारणे ही अशी आहेत.`
पु. ग. सहस्रबुद्धेंनी ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची क्रोनोलॉजीच या उतार्यात सांगितली आहे. त्याचं महत्त्व समजून प्रबोधनकारांनी ती आपल्यासमोर मांडली आहे. त्याचं तात्पर्य प्रबोधनकार सांगतात ते असं, `माझा पिण्ड राजकारणी नसून समाजकारणी. सामाजिक उत्क्रांतीशिवाय राजकारणी क्रांती फोल, हा माझा मनोमन रूजलेला सिद्धांत आजही कायम आहे. स्वराज्य येऊन २५वर वर्षे लोटली, तरी लोकांना सुराज्याची चव काय ती ठावी नसावी, यातच माझ्या त्या सिद्धांताचे सत्य सिद्ध होत आहे. ब्राह्मणेतरांचे आंदोलन म्हणजे काही उपटसुंभांचे अनाठायी बंड, असा समज आजही असणारांनी विख्यात समाजशास्त्रज्ञ डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी त्या वादाची केलेली मीमांसा आजही विचारात घ्यावी.`
प्रबोधनकार सांगतात तशी ही मीमांसा आजही आपण समजून घ्यायला हवी. कारण हे लिहिल्याला काही दशकं झाली तरी आपल्याला स्वातंत्र्याची चव हवी तशी कळलेली नाही. शिवाय यातच प्रबोधनकारांची वाटचाल ब्राह्मणेतर आंदोलनाच्या दिशेने का झाली, याचीही कारणं आहेत.`