पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला आणि त्या माणसाचा खून धारदार हत्यारांनी वार केल्यामुळे झालाय, हे लक्षात आलं. मृत्यूची वेळही होती, रात्री ९ ते ११ च्या दरम्यान. त्याच रात्री पुलापाशी पक्याने दोन माणसांना एक पोतं टाकताना बघितलं होतं. गुन्ह्याचा तपास तातडीने होणं आवश्यक होतं. मिरजकरांना सगळ्या शक्यता पडताळून बघायच्या होत्या, त्यामुळे त्यांनी पक्याला शहरातल्या काही सराईत गुंडांचे फोटो दाखवले.
– – –
शहरातल्या वस्तीच्या बाहेर, नदीच्या किनार्यावर सकाळीच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या एक दोन गाड्याही उभ्या होत्या. रस्त्याने येणार्या जाणार्या गाड्या थांबत होत्या, आणखी गर्दी वाढत होती. पोलिसांनी हळूहळू गर्दी हटवायला सुरुवात केली होती, पण तरीही नियंत्रण ठेवणं अवघड झालं होतं. घटनाही तशीच घडली होती. नदीतून वाहत आलेलं एक प्रेत काठाला लागलं होतं आणि सकाळीच पोलिसांना खबर गेली होती. इन्स्पेक्टर मिरजकर घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी गर्दी हटवायचे आदेश दिले आणि ते प्रेतापाशी पोहोचले. प्रेत बहुधा एका दिवसाहून जास्त काळ नदीत राहून शेवटी काठावर आलं होतं. एका पोत्यात घालून फेकून देण्यात आलं होतं, याचा अंदाज येत होता. मृताच्या अंगावर चाकूचे वार होते.
शहरातून बेपत्ता झालेल्या लोकांची यादी मिरजकरांनी मागवली आणि ते लगेच कामाला लागले. संध्याकाळपर्यंत यादी मिळायला हवी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या. तेवढ्यात कोठडीत ठेवलेल्या पक्या कोळवेकरचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला.
“साहेब, खरंच काय केलं नाही मी…मला सोडा…! देवाची शपथ घेऊ सांगतो, बंगल्यात चोरी केलेली नाही हो…आता काही माल सापडलाच नाही तर कुठनं आणून देऊ? ऐका माझं…रिकाम्या हातानं परत आलो हो साहेब…!“ तो एवढा अखंड बोलत होता, की मिरजकर वैतागून गेले. त्यांचं कामात लक्षच लागेना.
“शिंदे, कुणाला आणून डांबलंय लॉकअपमध्ये? त्याचं तोंड बंद करा…दम द्या जरा त्याला!“ ते डाफरले, तशी हवालदार शिंदेंची धावपळ झाली.
“साहेब, अहो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. फाटका माणूस आहे तो. मागे बनकर वाडीतल्या बंगल्यावर चोरी करताना पकडला होता ना, तोच तो.“
“तो पक्या? पण त्या वेळीही त्याच्याकडे काही मुद्देमाल सापडला नव्हता ना? किरकोळ चोर आहे तो. त्याला आज पुन्हा का टाकलंय आत?“
“दोन दिवसांपूर्वी सोलॅसिस कॉलनीतल्या एका बंगल्याच्या भिंतीवरून उडी टाकून जाताना दिसला होता. पकडायचा प्रयत्न केला, तर पळून गेला. आज सकाळीच सापडलाय, साहेब. आज त्याला सोडायचा नाही!“ शिंदे त्वेषानं म्हणाले.
“अहो, पण आज तरी काही मुद्देमाल सापडला का त्याच्याकडे? त्याच्या घराची झडती घेतली का?“
“घर कसलं साहेब, वस्तीतल्या एका खुराड्यात राहतो. तिथेच छोटी मोठी दुरुस्तीची कामं करतो. रात्री असा बाहेर पडून कुठे कुठे हात मारायचा प्रयत्न करतो. आज त्याची सगळी मस्ती उतरवायला हवी.“
हा पक्या फक्त भुरटा चोर आहे, प्रत्यक्षात त्यानं चोरीचा प्रयत्न केला, तरी त्याच्या हाताला फारसं काही लागत नाही आणि अनेकदा त्याचे चोरीचे प्रयत्न फसतातच, हे मिरजकरांना माहीत होतं. त्यांनी स्वतः त्याला याआधी दोनदा पकडलं होतं, दम देऊन सोडून दिलं होतं. आज मात्र तो जरा जास्तच ओरडत होता.
“साहेब, त्या चोरीचं जाऊ द्या, खरंच काही लागलं नाही माझ्या हाताला. काल जे बघितलं, ते ऐका की. तिकडे तुम्ही लक्षच द्यायला तयार नाही!“ असं तो म्हणाला, तेव्हा मात्र मिरजकरांना राहवलं नाही.
“शिंदे, त्याला घेऊन या इकडे!“ त्यांनी आदेश दिला. फाटका, उपाशी वाटणारा पक्या त्यांच्यासमोर हजर करण्यात आला. मिरजकरांची नजर बघून पक्याचा धीर खचलाच होता, पण त्याला काहीतरी सांगायचं आहे, हे मिरजकरांच्या लक्षात आलं होतं.
“हं, बोल, काय बघितलंस तू काल?“ त्यांनी दरडावून विचारलं. अर्थात, पक्याकडून काही माहिती काढून घ्यायची असेल, तर त्याला आधी खायला घालायला हवं, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी कुणालातरी पाठवून त्याच्यासाठी खायला मागवलं. त्यांच्यासमोरच पक्यानं ते अधाशीपणानं खाल्लं. आता त्याला जरा हुशारी आली होती. मिरजकरांनी आता त्याला बोलतं केलं. पुन्हा तोच प्रश्न विचारला.
“साहेब, मांडववाले चाळीच्या मागे जी नदी आहे ना, तिथल्या पुलावर….“ सांगताना तो थरथरत होता.
“तिथल्या पुलावर काय?“
“तिथल्या पुलावरनं एका गाडीवाल्या माणसानं एक पोतं नदीत ढकलून दिलेलं बघितलं मी.“
“काय?“ मिरजकरांना धक्का बसला.
“होय, साहेब. पण अंधार होता. कोण माणसं होती, दिसली नाहीत. एक गाडीवाला होता आणि त्याच्याबरोबर आणखी एक माणूस. बहुतेक त्या माणसाच्या घरातला कुणीतरी असणार. त्यांनी पोतं फेकून दिलं आणि ते निघून गेले.“ पक्यानं सगळं सांगून टाकलं आणि मग तो तांब्यातलं पाणी घटाघटा प्यायला.
तो घाबरलाय, पण खरं सांगतोय, हे मिरजकरांच्या लक्षात आलं. तरीही अशा कुठल्याही चोराच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नव्हता. ही माणसं आपली सुटका व्हावी म्हणून, सहानुभूती मिळावी म्हणून किंवा आणखी कुठल्याही कारणासाठी कितीही खोटं बोलू शकतात, याचा मिरजकरांना अनुभव होता. त्या पुलावरून काही जण कचर्याची पोतीही खाली टाकतात, याचीही माहिती त्यांना होती. त्यामुळे पक्या सांगतोय ती माहिती खरी असली, तरी त्या पोत्यात प्रेतच होतं, त्या प्रेताचा आज बाहेरच्या बाजूला नदीच्या काठी मिळालेल्या प्रेताशी काही संबंध असेलच, याची खात्री नव्हती.
मिरजकरांनी खोटं न बोलण्याविषयी पक्याला दम दिला आणि पुन्हा ते कामाला लागले. त्यांच्या अखत्यारीत ही एक महत्त्वाची केस असली, तरी पोलिसांची इतरही अनेक कामं होती. त्यामुळे दिवसभरात ते त्यात अडकून राहिले.
पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला आणि त्या माणसाचा खून धारदार हत्यारांनी वार केल्यामुळे झालाय, हे लक्षात आलं. मृत्यूची वेळही होती, रात्री ९ ते ११ च्या दरम्यान. त्याच रात्री पुलापाशी पक्याने दोन माणसांना एक पोतं टाकताना बघितलं होतं. गुन्ह्याचा तपास तातडीने होणं आवश्यक होतं. मिरजकरांना सगळ्या शक्यता पडताळून बघायच्या होत्या, त्यामुळे त्यांनी पक्याला शहरातल्या काही सराईत गुंडांचे फोटो दाखवले. त्यांनी हा खून केलाय का, हे त्यांना पडताळून पाहायचं होतं. पक्याने कुणाचे चेहरे तसेही बघितले नव्हतेच, पण एक शक्यता म्हणून त्याला आजमावून बघायला हरकत नव्हती. पक्याला त्या गुंडांपैकी कुणाचाही चेहरा ओळखीचा वाटला नाही. कदाचित या कामासाठी बाहेरून एखादा सराईत गुन्हेगार शहरात आला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मिरजकरांनी बाहेरच्या पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून तिथल्या भागातल्या सराईत गुन्हेगारांचे फोटो मागवून घेतले.
दरम्यानच्या काळात प्रेताची ओळख पटवण्यासाठी पोलिस पथक जोरदार प्रयत्न करत होतं आणि त्याची ओळखही लवकरच पटली. राजेश सोनगावडे नावाचा हा ४५ वर्षांचा माणूस होता. त्याच्याबद्दल पोलिसांना आणखी माहिती मिळाली, ती विशेष होती. दाखवायला त्याचं एक छोटं दुकान होतं, पण त्याचा प्रत्यक्ष धंदा होता मोठमोठ्या श्रीमंत लोकांकडे त्यांच्या वासनेसाठी कॉलगर्ल पुरवण्याचा. त्यातून राजेश चांगली कमाई करत असे. कुणाच्याही डोळ्यावर येणार नाही, अशा पद्धतीनं त्याचं हे काम व्यवस्थित सुरू होतं. त्याच्या गिर्हाइकांशी तो अगदी गुप्तपणे संपर्क ठेवत असे. त्यांच्याकडे पाठवलेली कॉलगर्ल कुठली, कुठून आली, याविषयी काहीही माहिती विचारण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्या मुलीलाही आपण कुणाकडे जातोय, याची कल्पना नसायची. त्यामुळे हे कुठे उघड होण्याची, कुणी पकडले जाण्याची किंवा मुळात राजेश हा कुठल्या प्रकरणात सापडण्याची अजिबात शक्यता नव्हती.
“शिंदे, काय वाटतं? ह्या राजेशचा धंदाच त्याच्या जिवावर बेतला असेल? त्याच्या एखाद्या गिर्हाइकानं किंवा धंद्यातल्या आणखी कुणी माणसाशी त्याचं वैर झालं असेल?“ मिरजकरांच्या या प्रश्नाने शिंदेही काही काळ गोंधळून गेले. कुणालाही सहज गुंडाळू शकणारा, सगळ्यांची उत्तम बडदास्त ठेवणारा राजेश हा कुणाचं वैर पत्करून घेण्याची शक्यता नव्हती. त्याचा धंदा अगदी राजरोस, तेही कुणाच्या पाहण्यात न येता सुरू असताना त्याचा जीव घेण्याची गरज कुणाला वाटली असेल आणि का, हाच प्रश्न होता. पोलिसांना आता हेच गूढ उकलायचं होतं.
ज्या भागात राजेशला पोत्यात घालून ढकलून देण्यात आलं होतं, तो निर्मनुष्य परिसर होता. तिथे दुसर्या कुणी गुन्हेगारांना बघितलं असण्याची, किंवा सीसीटीव्हीमध्ये काही सापडले असण्याची काहीच शक्यता नव्हती. मिरजकरांनी सगळ्या बाजूंनी तपास सुरू केला होता. राजेशच्या संपर्कातल्या प्रत्येक माणसाची माहिती काढायची, त्याला चौकशीला बोलवायचं आणि त्यातून काही हाती लागतंय का बघायचं, असा सपाटा पोलिसांनी लावला होता. स्वतः मिरजकर या चौकशीत सहभागी होत होते. ज्यांच्यावर संशय आहे, त्यांची वेगळी यादी केली जात होती. त्यांच्याबद्दल आणखी माहिती खणून काढली जात होती.
दोन चार दिवस झाले तरी ठोस काही हाती लागायला तयार नव्हतं. मधल्या काळात पोलिसांनी पक्याला सोडूनही दिलं होतं. तो पुन्हा कुठे चोरी करताना सापडला तर मात्र काही खरं नाही, असा दमही दिला होता. पक्याला आता कुठे चोरी करणं परवडणारच नव्हतं.
राजेशच्या फोनमधून सगळी माहिती काढली गेली, तेव्हा त्याच्या लिस्टमध्ये एक नंबर असा सापडला, ज्यावर त्यानं अलीकडच्या काळात बरेच कॉल्स केले होते. मात्र तो नंबर कुणाचा आहे, याचा शोध लागत नव्हता. राजेशच्या मृत्यूपासून तो नंबर बंदच होता. तो अॅक्टिव्ह आहे की नाही, याचा शोध घेण्यात आणखी एक दिवस गेला आणि एक दिवशी अचानक पोलिसांसाठी नव्या मार्गाची कवाडं खुली झाली. सतत त्या नंबरवर जे कॉल केले गेले, त्यातला एक कॉल त्या नंबरवरून उचलला गेला. त्यावरून त्याचं लोकेशनही शोधून काढलं गेलं.
बनकरवाडीतल्या एका बंगल्याचं लोकेशन स्पष्ट होत होतं. या बंगल्याचे मालक होते, विशाल घोरपडे. मोठे बिझनेसन होते, काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. एकटेच राहत होते. बरोबर फक्त एक माणूस असायचा. घोरपडे यांच्याकडे चौकशीला जाण्याआधी मिरजकरांना बरीच तयारी करावी लागणार होती. चौकशी करून त्यांना त्रास दिला आणि हाती काहीच लागलं नाही, तर पोलिसांवरच टीकेची झोड उठण्याची शक्यता होती. तरीही मिरजकरांनी ही शक्यता आजमावण्याचा निर्णय घेतला. कदाचित, घोरपडेंच्या विश्वासातल्या एखाद्या माणसाचा या कृत्याशी संबंध असण्याची शक्यता होती.
मिरजकरांनी बंगल्यावर जायच्या आधी एक छोटा प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी पक्याला बोलावून घेतलं आणि त्याला पुन्हा काही फोटो दाखवले. हे फोटो गुन्हेगारांचे नव्हते. पक्यानं त्यातला एक चेहरा पटकन ओळखला. “साहेब, ह्या माणसाला मी बघितलंय!“ तो एकदम म्हणाला आणि मिरजकरांनी त्याच्याकडून आणखी माहिती काढून घेतली.
थेट पोलिस पथक घेऊन ते घोरपडेंच्या बंगल्यावर पोहोचले.
“घोरपडे साहेब, आज संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी तुम्हाला बोलवायचं होतं. तुमचा बाकी काही कार्यक्रम ठरलेला नाही ना?“ मिरजकरांनी पहिला प्रश्न टाकला. घोरपडेंनी जरा रागातच त्यांच्याकडे बघितलं.
“तुमचे कुणाबरोबर काय काय कार्यक्रम चालतात, त्यासाठी तुम्ही कुणाला हाताशी धरता, कुणाशी भांडण झालं, तर कुठल्या थराला जाता, सगळं कळलंय आम्हाला.“ मिरजकरांनी आता थेटच सांगितलं.
राजेशच्या फोनमध्ये सापडलेला तो दुसरा नंबर घोरपडेंचाच होता. बंगल्यावर वेगवेगळ्या बायका बोलावून ते वासना पूर्ण करून घेत. त्यासाठी राजेशला त्यांनी हाताशी धरलं होतं. राजेशच्याही मनात लालसा निर्माण झाली. त्यालाच हाव सुटली. घोरपडेंना त्यानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि घोरपडेंना तो डोईजड झाला, तेव्हा त्याला संपवायचा निर्णय घोरपडेंनी घेतला. एके रात्री त्याला बोलावून समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो तरीही ऐकेना. तेव्हा त्यांनी त्यांच्या माणसाला सांगून त्याला संपवला आणि प्रेतही नदीत फेकून विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला.
अर्थात, पोलिसांच्या तावडीतून कुणी वाचणं शक्यच नव्हतं. यावेळी एका भुरट्या, विश्वास न ठेवता येण्यासारख्या चोरानं त्यांना महत्त्वाची मदत केली होती.