रोड ट्रिप सिनेमा म्हटला की हिंदीतील बॉम्बे टू गोवा, जिंदगी ना मिलेगी दोबारा, हायवे, पिकू असे अनेक चित्रपट आठवतात. मराठीत हॅप्पी जर्नी, कारखानीसांची वारी असे मोजके चित्रपट सोडले तर या जॉनरचे चित्रपट फारसे नाहीत. ‘येड्यांची जत्रा’ तसेच ‘टकाटक’ यांच्यासारखे तरुणांच्या मनाला भावतील असे व्यावसायिक चित्रपट बनवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे त्यांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा ‘श्री गणेशा’ हा संवेदनशील चित्रपट घेऊन आले आहेत. वडील आणि मुलगा यातील संघर्ष, कडवटपणा आणि अव्यक्त प्रेम यावर हा सिनेमा भाष्य करतो.
चुकीच्या कृत्यामुळे पोटचा पोरगा वाया जाऊ नये म्हणून काळजावर दगड ठेवून भाऊसाहेब पाटील (शशांक शेंडे) आपला मुलगा टिकल्या याला (प्रथमेश परब) बालसुधारगृहात पाठवतात. परंतु तिथे टिकल्या अजूनच बिघडत जाताना दिसतो. वडिलांनी आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा केला, याचा राग टिकल्याच्या मनात आहे. दोन वर्षांनी टिकल्याच्या आईची तब्येत ठीक नसल्यामुळे न्यायालयीन परवानगी घेऊन भाऊसाहेब टिकल्याला गावाकडे न्यायला येतात. बालसुधारगृह ते कोकणातील गाव या प्रवासात त्यांच्यात वादसंवाद घडतात. घाटातील वळणदार रस्त्याच्या सोबत बापलेकातील नातेसंबंधही वळण घेताना दिसतात. टिकल्या आणि वडिलांमधील नाते सुधारते का, याचे उत्तर हा चित्रपट पाहिल्यावर मिळेल.
हा सिनेमा पाहताना कुठेही कंटाळा न येता पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता जागी राहते. मिलिंद कवडे यांची कथा आणि त्यांनी संजय नवगिरे यांच्या साथीने उत्तम बांधलेली पटकथा प्रेक्षकांना बांधून ठेवते. या प्रवासात या दोघांना रीलस्टार नायिका दीपाली (मेघा शिंदे) सोबत करते. सिनेमात प्रेमाची गाणी किंवा संवाद टाकून मुख्य विषय भरकटू दिला नाही, हे कौतुकास्पद आहे. चित्रपटाचा अनपेक्षित शेवट सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. याबद्दल कवडे यांचं विशेष कौतुक.
तक्रार एकच. या उत्तम चित्रपटात गरज नसताना एक आयटम सॉंग घालण्यात आलं आहे. ते विक्षेपच आणतं. मागणी तसा पुरवठा प्रकारचे व्यावसायिक चित्रपट बनवणारा दिग्दर्शकही मनोरंजनमूल्य जपूनही चांगला चित्रपट बनवू शकतो, हे हा चित्रपट पाहून लक्षात येतं.
शशांक शेंडे आणि प्रथमेश परब या दोन मुख्य कलाकारांची योग्य निवड हा या सिनेमाचा यूएसपी आहे. टाइमपास सिनेमातून लोकप्रिय झालेला स्टायलिश प्रथमेश या सिनेमात प्रथमच वेगळा दिसला आहे. पण हे वेगळं दिसणं केवळ झिरो कट लुक इतकंच मर्यादित नसून टिकल्याच्या भूमिकेत तो अंतर्बाह्य घुसला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे वडिलांबरोबरच एकूण समाजव्यवस्थेचा राग, प्रवासात वडिलांच्या नात्यातील गाठ सुटत असताना हळवा होत गेलेला टिकल्या प्रथमेशने हळुवारपणे साकारला आहे. शेवटी मनातील भावनांचा बांध फुटून टिकल्या रिता होतो तेव्हा आपल्याही डोळ्यातील पापण्यांच्या कडा ओलावतात. शशांक शेंडे यांनी विविध आशयघन चित्रपटात सहज, तरल अभिनयाचा ठसा उमटविला आहे. मसालेदार चित्रपटांच्या वाटेला ते फारसे गेले नाहीत. अशा चित्रपटांचा भाग असलेला प्रथमेश परबसोबत त्यांचा अभिनय विरुद्ध न ठरता एकमेकांना पूरक ठरलेला दिसतो. शेंडे यांचा दोन संवादामधील पॉज, शालजोडीतील बोल सिनेमाची खुमारी वाढवतो. ग्रामीण भागातील सिनेमात नेहमी केसाचा भांग विस्कटलेले, वाढलेल्या दाढी-मिशीत दिसणारे शेंडे या सिनेमात क्लीन शेव्ह लुकमध्ये दिसतात. या दोघांसोबतच संजय नार्वेकर भाई वेंगुर्लेकरच्या रूपाने वेगळ्या शैलीत दिसले आहेत.
रोड ट्रिप सिनेमा म्हणजे नेत्रसुखद दृश्यांची पर्वणी. जास्तीत जास्त शूटिंग आउटडोर असल्यामुळे सिनेमॅटोग्राफर हजरत शेखवली यांना त्यांची कला दाखविण्याची संधी मिळाली आहे. तिचं त्यांनी सोनं केलंय. सिनेमा नयनरम्य झाला आहे. गीतकार जय अत्रे यांनी लिहिलेले आणि संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत साज चढविलेले ‘डागडुजी’ हे अर्थपूर्ण गाणं या सिनेमाचा भावार्थ उलगडून सांगतं.
मराठी प्रेक्षक ओटीटी माध्यमातून जागतिक चित्रपट पाहत असल्यामुळे अधिक सजग आणि चोखंदळ झाला आहे. रोड ट्रिप जॉनरमधील ग्रीन बुक, नोमॅडलँड असे इंग्रजी चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांना आता मराठीतही जागतिक पातळीच्या पण मराठी मातीतल्या चांगल्या सिनेमाची उत्सुकता होती. अशा प्रेक्षकांनी नाताळच्या सुट्टीत श्री गणेशा सिनेमाची सफर करायला हवी.
– संदेश कामेरकर