□ भारतीय संघाला फिफाचे रेड कार्ड, बाह्य हस्तक्षेपामुळे महासंघाचे निलंबन.
■ फुटबॉल असो की क्रिकेट, जिथे लोकप्रियता आणि मलिदा असेल, तिथे तिथे राजकारणी आणि त्यांची पिलावळ घुसून सत्यानाश करणारच.
□ काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, दोन पंडितांवर गोळीबार, एक ठार.
■ बोगस काश्मीर फाइल्स बघून गळे काढणारे गळाठून घरीच बसणार की तिथे पंडितांना संरक्षण द्यायला जाणार?
□ गुजरातमध्ये १००० कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्ज हस्तगत.
■ दारूबंदीचा ढोंगीपणा चालवणार्या या राज्याचा अंमली पदार्थांच्या बाबतीत ‘उडता गुजरात’ झाला की काय?
□ राज्यपालनियुक्त १२ विधान परिषद सदस्यांच्या नेमणुका वेगाने करून सभापतीपद ताब्यात घेण्याच्या भाजपच्या हालचाली.
■ आता मविआ सरकार नसल्याने मलबार हिलचे अंडी उबवणी केंद्रही झटपट १२ पिले मेड टु ऑर्डर बनवून पाठवेल!
□ अमूल दूध दोन रुपयांनी महागले.
■ मुळात ते एमआरपीला कधी विकलेच जात नाही, अमूल कमिशन देत नाही म्हणून विक्रेते ग्राहकांकडून कूलिंग चार्जेसच्या नावाखाली दोन रुपये काढतातच, त्यात ही भर!
□ डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लूचे संकट वाढले…
■ आणि हे तथाकथित हिंदुत्ववादी सरकार म्हणतंय, हिंदूंनो, सगळे नियम धाब्यावर बसवून बिनधास्त गर्दी करा, पडा आजारी आणि मरा!
□ महत्त्वाची पदंही भाजपला, ६० टक्के निधीही भाजपला; गद्दारांची ४० टक्के निधीवर बोळवण.
■ आणि हे तोंड वेंगाडून महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीच मिळत नव्हता हो, म्हणून रडून दाखवत होते… आता तीही सोय नाही.
□ भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना हटवले, केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना स्थान.
■ प्रतिस्पर्धी ठरू शकेल अशा कोणाही सक्षम नेत्याची मोदीशहांना पहिल्यापासून अॅलर्जी आहेच… त्यांना हटवून महाराष्ट्राचा जो अपमान केला, त्याची भरपाई फडणवीसांच्या नेमणुकीने होत नाही.
□ रोहिंग्यांच्या पुनर्वसनाची केंद्रीय गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा, गृहमंत्र्यांचा तातडीने इन्कार.
■ हे सरकार देशातल्या मुस्लिमांना पाण्यात पाहते, ते निर्वासित मुस्लिमांची काळजी वाहील, यावर असाही कुणाचा विश्वास बसला नसता.
□ महिलेला बरोबरीचे स्थान द्या, तिच्या कर्तृत्त्वाला वाव द्या, त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करा : सरसंघचालक मोहन भागवत.
■ नारी सन्मानाची सुरुवात तुमच्या ‘परिवारा’पासून झाली असती, तर बिल्किस बानोच्या बलात्कार्यांची सुटकाही झाली नसती आणि हारतुरे घालून स्वागतही झाले नसते भागवत जी.
□ महिलांनी उत्तेजक पोषाख परिधान केल्यास लैंगिक छळाचा गुन्हा अवैध : केरळच्या कोझीकोड न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय.
■ आणि ही उत्तेजकता कोण मोजणार न्यायमूर्ती महोदया? चिमुरड्या मुलींवर बलात्कार करणारे नराधम त्यांना कोणत्या उत्तेजक पोषाखात पाहतात?
□ बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदींच्या नावावर मते मिळत नाहीत याचीच कबुली; बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण करायला निघालेल्या फडणवीसांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा टोला!
■ समर्थ रामदासांनी स्वत:च्या वडिलांची कीर्ती पण सांगू नका असं म्हटलं होतं, हे आणि यांच्या कुशीत शिरलेले गद्दार तर दुसर्याच्या वडिलांच्या नावावर मतं मागत फिरतायत…
□ पंचाहत्तरी पूर्ण केलेल्यांना मोफत एसटी प्रवास करता येणार.
■ राज्यभर रस्त्यांमध्ये खड्डे इतके आहेत की या वयात हा प्रवास शेवटचा प्रवास न ठरो!