एकनाथ शिंदे
कशी केली नामी युक्ती
आमच्या मागे महाशक्ती
तिनेच केला आमचा खर्च
आणि दाखवली गोहाती
फसला असता माझा प्लान
गेले असते माझे प्राण
दगाबाजी नडली असती
झाली असती सगळी घाण
मोदी म्हणाले, आगे बढो
इसलिये तुम्हे सीएम किया
केवढा मोठा उदार माणूस
मी तर त्याच्या पडतो पाया
—-
नरेंद्र मोदी
महाराष्ट्रात आमच्यापुढे
शिवसेना तर मोठा वांदा
म्हणून हाती धरली दाढी
ठरल्याप्रमाणे मारला फांदा
फडणवीस आमचा हुकमी पत्ता
त्यांच्या हाती दिली सूत्रे
ठरल्याप्रमाणे सारे घडले
आणि टाइट झाले भित्रे
गुजरातपासून गोहाती तक
फाइव्ह स्टार सैर मजेची
नेली सोबत फुटकी तपेली
भरही पडली कोटीकोटीची
—-
देवेंद्र फडणवीस
कितीही मन केले घट्ट
तरीही मनात सलतो काटा
`उप’पदावर ठेवले मला
नड्डानेच फोडला फाटा
हेही दिवस जातील म्हणा
नाहीतरी सारे आपल्याच हातात
दाढीवाल्यांना कळणार नाही
कधी आणेन त्यांना गोत्यात
अळवावरचे पाणी सारे
जमेल तेवढे पिऊन घेऊया
वरून हसत, आतून कुढत
एका ताटात मस्त खाऊया
—-
अमित शहा
एकेक राज्य पाडणे म्हणजे
नसते इतके सोपे काम
गळाला लागतात मासे जेव्हा
मोजावा लागतो मोठा दाम
नाहीतर आहेच ईडीची धमकी
शंभर टक्के पडते लागू
संपत्तीकडे बोट दाखवतील
वेड्यासारखे लागतात भागू
भाजप म्हणजे सेफ झोन
किती जमवले आम्ही भ्रष्ट
एकही नाही जाणार सोडून
जरी करिअर झाले नष्ट
—-
चंद्रकांतदादा पाटील
खाते मिळाले तरीही आहे
धूसफूस धुसफूस, आदळ आपट
काहीतरी पदरात पडले
तरीही मारली त्यांनी चापट
प्रदेशाध्यक्षपद गेले
होतो भावी मुख्यमंत्री
गडकरींनी तेलच ओतले
बावनकुळेंना दिली खात्री
उद्या काही सांगवत नाही
तेलही जाईल, तूपही जाईल
आहे त्यात राहावे खूष
नाहीतर पक्ष मलाच खाईल