‘सातार्याचे दैव आणि दैवाचा सतारा’ हा लेख प्रबोधनच्या ज्या अंकात छापून आला त्याच अंकात बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडा प्रसिद्ध झाला होता. तो प्रबोधनकारांनीच लिहिला होता. काव्य, शाहिरी हा प्रबोधनकारांच्या लेखनाचा एक दुर्लक्षित म्हणावा असाच पैलू आहे.
– – –
मुळात प्रबोधनकारांच्या साहित्याकडे दुर्लक्षच झालं. त्यातही त्यांच्या काव्याकडे जास्तच दुर्लक्ष झालं. प्रबोधनकारांचं पहिलं पुस्तक वक्तृत्वशास्त्र, याची सुरुवातच कवितेने झालेली आहे. मराठी माणसाला हे पुस्तक अर्पण करताना लिहिलेली अर्पणपत्रिका ही कवितेच्या फॉर्ममध्येच आहे. शिवाय प्रबोधनकारांचं उमेदवारीच्या काळात लिहिलेलं पहिलं प्रकाशित नाटक सीताशुद्धी हे संगीत नाटक आहे. त्याचा भाग मुख्यत्वे गाण्यांनीच भरलेला आहे. त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे गद्य संवाद येतात ते गाणी जोडण्यासाठीच. या नाटकात एकूण १३१ पदं असल्याची मोजणी प्रबोधनकारांचे अभ्यासक धर्मपाल कांबळे यांनी केली आहे. मुळात प्रबोधनकारांच्या भाषाशैलीतच नादमाधुर्य आहे. शिवाय त्यांना मुळातूनच संगीताची जाण होती. त्यामुळे यातली पदं वाचताना आजही गंमत वाटते. उदाहरण म्हणून नाटकाचं भरतवाक्य म्हणजे शेवटच्या पदातला एक तुकडा पाहता येईल,
उगवो विभव-रवी । भरतभूवरीं ।
झणि द्वैत लया जाऊनिया । ऐक्य होऊनि ।।
स्वधर्म पालनी । नित रति वसो जनी ।
मनिं मातृभूमिभक्ति । अचल सतत बाणुनि ।।
जुलै १९२५ च्या प्रबोधन अंकात सातार्याचे दैव आणि दैवाचा सतारा हा प्रबोधनकारांचा गाजलेला लेख छापून आला होता. तो आपण वाचला. पण त्याचबरोबर प्रबोधनकारांचा एक पोवाडाही यात प्रसिद्ध झाला आहे. `वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा’ या नावाने जवळपास साडेतीन पानं हा पोवाडा आलेला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांना प्रबोधनकार चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजासमोर आदर्श म्हणून उभा करत होते. आज नव्याने येणार्या छत्रपती शिवरायांवरच्या सिनेमांमध्ये आणि कादंबर्यांमध्ये बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण असल्यासारखी मांडणी सर्रास केली जाते. पण त्या काळात बाजीप्रभूंचे वंशज सामाजिक जीवनात सक्रिय असल्यामुळे ते कायस्थ असल्याचं वेगळं सिद्ध करावं लागत नव्हतं. अर्थात तेव्हाही बाजीप्रभू हे ब्राह्मण असल्याचे दावे करायला सुरुवात झाली होतीच. खुद्द ज्ञानकोशकार केतकरांनी तसा उल्लेख केला होता. त्यावर प्रबोधनकारांनी तसंच इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी साधार टीका करत केतकरांना खुलासा करायला भाग पाडलं होतं. त्याच सगळ्या प्रयत्नांचा हा पोवाडा एक भाग होता.
मुळात हा पोवाडा नवा नव्हता. तो प्रबोधनकारांनी १९१८ सालीच लिहून प्रसिद्धही केला होता. प्रबोधनकारांच्या पुढाकाराने २९ मे हा दिवस बाजीप्रभूंचा स्मृतिदिन म्हणून १९१८ साली पहिल्यांदा साजरी करण्यात आला होता. दादरच्या ज्योतिर्माला मासिकाच्या कचेरीत हा कार्यक्रम झाला होता. या तारखेवरून थोडा वाद झाला होता. पण बाजीप्रभूंचे वंशज विनायकराव देशपांडे यांनी ही तारीख नक्की करून कळवली होती. त्यानंतर हा स्मृतिदिन दरवर्षी साजरा होत असे. त्यात हा पोवाडा गायला जात असे. या पोवाड्याच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती १ ऑगस्ट १९२५ रोजी प्रबोधनकारांनी प्रसिद्ध केली होती. त्यासाठी छपाईसाठीचे साचे तयार झाले असावेत, त्याचा वापर प्रबोधनकारांनी प्रबोधनमध्येही करून घेतला असावा. त्यामुळे हा पोवाडा आणखी वाचकांपर्यंतही पोचला. प्रबोधनच्या अंकात त्याचं शीर्षक वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा असं आहे तर पुस्तकात पावन खिंडीचा पोवाडा अर्थात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा आत्मयज्ञ असं शीर्षक आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रबोधनचे सहसंपादक रामचंद्र वामन उर्फ बापूसाहेब चित्रे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे, हा पावन खिंडीचा पोवाडा महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रांत पडलेल्या भेदभावाच्या खिंडारांना एकजिनसी एकीच्या चैतन्याने पावन करो.
या पोवाड्याची सुरुवात देवी अंबाभवानीच्या उदोकाराने आहे,
जय जय अंबे माय भवानी तुळजापुरवासी ।।
उदो उदो श्री जय जयदंबे रक्षि बाळकांसी ।।
गोंधळ अंबे ! तुझा घालण्या अनन्य भावाचा ।।
दिवटा घेऊनि करी नाचतो शाहीर शिवबाचा ।।
स्वत:ला शाहीर शिवबाचा म्हणवून केलेली स्वाभिमानी सुरुवात आपला वारसा थेट छत्रपती शिवरायांच्या दरबारात कला सादर केलेल्या शाहिरांशी जोडते.
स्फूर्तीच्या तेलांत भिजविला दिवटा कवनाचा ।।
पेटविला बघ नाचुनि गातो शाहिर मानाचा ।।
मीच नाचलो शिवबापुढती रायगडावरती ।।
थाप फडावर पडे पडे तो अस्तनी हो वरती ।।
पोवाड्याच्या पहिल्या भागाच्या शेवटी अंबेचा जगदंबेचा उदोकार केला आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्राचाही उदोकार आहे. मार्तंडाचा एळकोट आहे, त्याच बरोबर छत्रपती शिवबाचाही आहे. किल्ले रायगडाचा आणि भगव्या जरीपटक्याचा देखील जयकार आहे. पुढच्या भागापासून पोवाड्यातल्या कहाणीला सुरुवात पन्हाळ्याच्या वेढ्याने होते. त्यानंतर वेढ्यातून बाहेर पडताना शिवरायांबरोबर बाजीप्रभू सर्वात आघाडीवर असतात, त्याचं वर्णन असं आहे,
ज्या कायस्थें रक्त ओतिले
शिवप्रभूच्या कार्या ।।
अग्रगण्य हा बाजी त्यांतिल
पूज्य सर्व आर्यां ।।
पन्हाळ्याच्या वेढ्यात शत्रूच्या हातावर तुरी देणं. त्यानंतर शत्रूने केलेला पाठलाग. त्यात पावनखिंडीच्या तोंडावर बाजीप्रभूंनी शिवरायांना पुढे जाण्यास सांगणं, हा सगळा कथाभाग फारच उत्कट उतरला आहे. त्यात राजा आणि त्याच्या सरदारामधला मायेचा ओलावा मानवी आहे.
बाजीस धरी शिव पोटी ।।
हृदयांसआणिले ओठी ।।
भडभडूनआलें पोटी ।।
सांगितलि एक हितगोष्टी ।।
ठोकिन तोफा पांच पोचतां
रांगण किल्ल्यासी ।।
त्यानंतर मूठभर मावळ्यांनिशी बाजीप्रभूंनी केलेली पराक्रमाची शर्थ वर्णन करताना प्रबोधनकारांच्या शब्दांना समशेरीचं तेज आलंय. ते मुळातून वाचायला हवं.
शिवरायाची तोफ जोवरी
पडे न मम कानी ।।
तोंवरी आला काळ तरी त्या ठेचिन लाथांनी ।।
उभा ठाकला पुढे काळ साक्षात त्यास खाया ।।
परंतु मानी त्यास न तीळ धरि चित्त प्रभूपाया ।।
शेवटी तोफांचा आवाज ऐकू येतो आणि बाजीप्रभू आपला अंतिम श्वास घेतात. त्यांचा पराक्रम पाहून शत्रूच्या सरदारांसह सैनिकही त्यांची स्तवनं गातात. तलवारीने वंदन करतात. मुस्लिम सैनिकही रडतात, असं अत्यंत हृद्य वर्णन आहे. बाजीप्रभूंचा मृतदेह पाहून शिवराय लहान मुलासारखे ढसढसा रडतात आणि म्हणतात,
बळी दिला तूं तुझ्या जिवाचा केवळ मजसाठी ।।
राष्ट्रोन्नतिची जणू वसविली कोणशिला मोठी ।।
शेवटी प्रबोधनकार एक इशारा देऊन ठेवतात. तो इशारा महाराष्ट्रासाठी आजही महत्त्वाचा आहे,
बाजी केला कीर्त करुनिया बखरी त्या गाती ।।
विसरे ज्या दिनि महाराष्ट्र त्या खाइल ते माती ।।
अगदी शेवटच्या ओळीत प्रबोधनकार स्वतःचा उल्लेख शाहीर केशव असा करतात. प्रबोधनकारांनी बाजीप्रभूंवर लिहिलेला हा एकमेव पोवाडा नाही. त्यांनी `विविधज्ञानविस्तारा’च्या जानेवारी १९२२च्या अंकात आणखी एक पोवाडा लिहिला होता. त्यातही मोठी तेरा कडवी आहेत. त्यात पावनखिंडीत शत्रूला रोखण्यासाठी बाजीप्रभू उभे राहिले तेव्हापासून पुढची कथा आलेली आहे. त्यातलं एक कडवं उदाहरणादाखल,
रणधुमाळीत या घाव । बाजीच्या वर्मी बसला ।
रणशय्येवरी मग पडला । अभिमन्यू दुजा तो गमला ।
शिवचरणिं लागले चित्त । कंठात प्राण घुटमळला ।
सरबती परिसुनि कानी
जावोत प्राण मज त्यजुनी
हा निश्चय मनिं दृढ धरूनी
निज चमूस देई धीर ।
घनघोर चालवी समर ।।
मुरुड जंजिरा इथल्या पांडुरंग दिघे यांच्या काव्यलीला या १९४२ साली प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाला प्रबोधनकारांची चार पानी प्रस्तावना आहे. त्यातही हा पोवाडा परिशिष्ट म्हणून छापलेला आहे.
प्रबोधनकारांनी एका पोवाड्याची आणखी एक छोटी पुस्तिका सप्टेंबर १९२५ला प्रकाशित केली होती. उपलब्ध असलेली तिसर्या आवृत्तीची ही सहा पानांची छोटी पुस्तिका विक्रीसाठी नव्हती, तर आजच्या भाषेत खासगी वितरणासाठी होती. त्यात चांद्रश्रेणीयकायस्थप्रभु समाजासाठी विजयादशमीचा संदेश असा पोवाडा होता. या पोवाड्यातून सीकेपी समाजाला त्यांचा महान इतिहास सांगून जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते लिहितात,
राज्य मर्हाठी शिवरायांचे
कां कायस्थांचे? ।
कायस्थांच्या रक्तांवरती बुरुज उभे त्याचे ।।
प्राणप्रतिष्ठा त्या राज्याची कायस्थें केली ।
अवतारी शिवमूर्ती वरती मग स्थापन केली ।।
त्यानंतर शिवरायांचे चिटणीस बाळाजी आवजी, बाजीप्रभू, मुरारबाजी, सावित्रीबाई ठाणेदारीण, सखारामबापू गुप्ते, नीलकंठ राम पागे अशा पूर्वजांचा वारसा सांगितला आहे. पण आता मात्र केसरीचे जे छावे बनले मेष कसे आता? असा प्रश्न विचारायला ते मागेपुढे पहात नाहीत,
महाराष्ट्राची हाक ऐकूनी खडबडले पणजे ।
स्वराज्य शब्दही बोलाया कां मन तुमचे लाजे ।।
गडकरि गडविरहीत जाहले, राज्य न राजांना ।
प्रधान बसले स्वस्थ, मिळेना गुप्ती गुप्त्यांना ।।
टिपणीसांचे टिपण हरवले, फड नच फडणीसा ।
चौबल हतबल, करि न समर्था कोणी कुर्निसा ।।
स्थिती असे ही, स्पष्टोक्तीचा राग नका मानू ।
सत्यप्रिय कवी चीत कराया साधु नका कानू ।।
या पोवाड्याच्या शेवटी, दसर्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या कायस्थांनो, आता तरी सत्वरी जागृतिस या हो, असं आवाहन केलं आहे. नवरात्र आणि त्यानंतरचा दसरा हा सीकेपींचा महत्त्वाचा सण. त्यानिमित्ताने प्रबोधनकार सतत या समाजाला उद्देशून काही ना काही लिहीत राहिले. त्यातला आणखी एक पोवाडा विजयादशमीचा संदेश या नावानेच १२ ऑक्टोबर १९१९च्या प्रबोधनाच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्याची ओळख पुढच्या अंकात.