पोलिसांना देखील अनेकदा एखादी महत्त्वाची केस सोडवताना फिलिप्स गोन्झाच्या मदतीचा कायमच उपयोग होत आला होता. आणि चार दिवसापूर्वीच या फिलिप्सचा खून करण्यात आला होता; कोणताही पुरावा मागे न सोडता… इन्स्पेक्टर प्रताप यांना तिघांवर संशय होता. शेवटी पैशाचा हव्यास वाईटच…
—-
इन्स्पेक्टर प्रताप सरनौबताकडे केस गेली आणि चार दिवसात एका साधा पुरावा हाताला लागू नये हे सगळ्या खात्यालाच अचंबित करणारे होतं. स्वत: प्रताप पिसाळलेल्या वाघासारखा मुंबई पालथी घालत बसला होता. पण हाताला काही लागत नव्हते.
‘फिलिप्स गोन्झा’ हे नाव सामान्य माणसाला परिचित नसले, तरी गुन्हेगारी विश्वात या नावाचा चांगलाच दबदबा होता. कोणाचा माल कुठे उतरणार आहे, कोण सध्या कोणत्या धंद्यात हात घालतो आहे, कोणाला कुठे घबाड हाती लागले आहे, या सगळ्याची बिनचूक खबर फिलिप्सकडे असायची. मालकांची नावे भले वेगवेगळी असोत, पण मुंबईत तब्बल ५०च्या वर देशी दारूचे गुत्ते फिलिप्सच्याच मालकीचे होते. तिथे काम करणारे लोकही त्याने अत्यंत चाणाक्ष असेच निवडलेले होते. या गुत्त्यांमध्ये बरळला जाणारा शब्द न् शब्द आपसूकच फिलिप्सपर्यंत बेमालूम पोचवला जात होता. पोलिसांना देखील अनेकदा एखादी महत्त्वाची केस सोडवताना फिलिप्सच्या मदतीचा कायमच उपयोग होत आला होता. आणि चार दिवसापूर्वीच या फिलिप्सचा खून करण्यात आला होता; कोणताही पुरावा मागे न सोडता.
फिलिप्सला प्रत्यक्षात भेटलेले लोक खूप कमी असले, तरी एखाद्या भुतासारख्या त्याच्या अनेक कथा-दंतकथा गुन्हेगारी विश्वात चवीने चघळल्या जायच्या. त्यातलीच एक कथा म्हणजे, फिलिप्सकडे ‘अमानवी’ शक्ती असल्याची. त्याला म्हणे पुढे घडणार्या अनेक घटना आधीच दिसायच्या. त्याचाच फायदा घेऊन म्हणे त्याने गुन्हेगारी विश्वात अंमल बसवला होता. गमतीचा भाग म्हणजे, अशा फिलिप्सला आपल्या खुनाचा साधा अंदाजदेखील आला नसेल? अर्थात या भाकडकथांवर प्रतापचा विश्वास नसला, तरी फिलिप्ससारखा चाणाक्ष माणूस इतक्या सहजतेनं मारला गेल्याचे त्याला देखील आश्चर्य वाटतच होतं. आणि त्याच दृष्टीने त्याने तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली होती.
फिलिप्सला शेवटचे भेटलेले फक्त तीन लोक होतं. एक त्याचा अकाउंटट स्वामी, दुसरा त्याचा खानसामा आंद्रे अन तिसरी त्याची प्रेयसी रेखा. हे तिघेही फिलिप्सला शेवटचे भेटले तेव्हा तो जिवंत असल्याचे खात्रीने सांगत होते. पण का कोण जाणे, त्यातल्या त्यात त्याला या रेखाचाच जरा संशय येत होता. खरे तर तिला घाबरायचे काहीच कारण नव्हते, कारण सगळ्यात आधी सातच्या सुमाराला तीच फिलिप्सला भेटली होती. त्याच्याच परवानगीने त्याची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन ती खरेदीला बाहेर पडली होती. मुख्य म्हणजे तिला सोडायला स्वत: फिलिप्स बाहेर आल्याची साक्ष ड्रायव्हरसकट इतर दोन नोकर देखील देत होते. त्यानंतर आठच्या सुमाराला आला स्वामी. दिवसभराचे हिशेब समजावून तो बाहेर पडला आणि सर्वात शेवटी आंद्रे आला मालकासाठी ‘खाना’ सजवून; दहाच्या सुमाराला स्वत:च्या खोलीत झोपायला गेला. डॉक्टर तर खुनाची वेळ आठ ते दहाच्या मध्येच असल्याचे ठामपणे सांगत होतं. पण दहा वाजता आपण खाना ठेवून गेलो तेव्हा मालक जिवंत असल्याच्या जबानीवर आंद्रे देखील ठाम होता!
गेली सत्तावीस वर्षे फिलिप्सच्या सेवेत असलेला आंद्रे ‘आपण भले आपले काम भले’ असा माणूस. दर रविवारी नेमाने चर्च गाठणारा आणि कोणतेही व्यसन नसलेला. तर स्वामी म्हणजे ‘भक्त प्रल्हाद’ म्हणावा असा. गेल्या वीस वर्षांत कधी स्वामीच्या हिशेबात गफलत झालेली नव्हती. फिलिप्सचे बरेचसे काळे पैसे अत्यंत हुशारीने पांढरे करण्याचा उद्योग तो अत्यंत इमाने इतबारे करत आला होता. दारूचा शौकीन पण तिच्या आहारी कधी न जाणारा, त्यातून अविवाहित. फिलिप्स देखील त्याला तगडी रक्कम मोजत होताच. राहिली रेखा.. ती देखील गेली तीन वर्षे फिलिप्ससोबत होती. अर्थात ते राजरोस एकत्र राहत नव्हते एवढंच; नाहीतर फिलिप्सची सगळी माणसे तिला त्याच्या बायकोचाच दर्जा देत होती. पण का कोण जाणे चौकशीच्या वेळी ती खूप तणावाखाली वाटत होती. प्रतापने सगळ्यात आधी तिच्याकडेच लक्ष वळवले..
—
‘बस मुरली…’ हात ताणत आळस देत प्रताप म्हणाला आणि मुरली विलक्षण दचकला.
एकतर या ओसाड गोदामात प्रतापने भेटायला बोलावल्यापासूनच त्याची हवा टाईट झाली होती. त्यात हा खवीस ‘कोणाला न सांगता ये!’ म्हणून दम देऊन बोलावणे करत होता. आज काय आपला ‘अबतक छप्पन’ करायचा विचार आहे का काय? तसा मुरली काही लेचापेचा नव्हता. त्यानेही एके काळी गुन्हेगारी विश्व गाजवलेले होतं. तीन खून पचवून बसलेला बदमाश होता तो. पण वाढते वय आणि फिलिप्सकडे कामाला लागल्यापासून अंगात भिनलेला आळस त्याला कुठेतरी मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवायला लागलेले होतं.
‘मुरली तुझ्या कानांची आणि डोळ्यांची फार तारीफ ऐकलीये मी. सहज कोणाची नजर टिपत नाही ते तुझे डोळे टिपतात आणि लोकांच्या कानावरून जाणारे शब्द तुझ्या मात्र अलगद कानात उतरतात. बरोबर ना?’
मुरलीने फक्त खुळ्यासारखी मान डोलावली.
‘गाडीत फिरणा-या माणसाचे चार कान आणि चार डोळे असतात मुरली. दोन दोन त्याचे स्वतःचे आणि दोन दोन ड्रायव्हरचे. फिलिप्सने रेखाला जवळ केल्यापासून तिच्या दिमतीला तुझीच नेमणूक झाली होती. गाडी आणि तू याखेरीज त्यानंतर ती कधीच बाहेर पडली नाही. ब-याच नको त्या गोष्टी तुझ्या कानावर पडत असतील, डोळ्याला दिसत असतील… त्या तू माझ्याशी बोलाव्यास म्हणून बोलावलंय तुला. मालकाचा खुनी लवकरात लवकर पकडला जावा ही तुझी देखील इच्छा असणारच की.’
प्रतापचा अंदाज आल्यावर मुरली ब-यापैकी निर्धास्त झाला आणि त्याने पोपटासारखी चोच उघडली. ‘रेखा मोठी हुशार बाई आहे साहेब. मालकाने मला फक्त तिच्या रक्षणाला आणि गाडी चालवायला ठेवलेले नाही, याचा अंदाज तिला लवकरच आला होता. तसे तिला बाहेर असताना कोणाचे फोन यायचे नाहीत, किंवा ती देखील गाडीत असताना शक्यतो कोणाला फोन करणे टाळायचीच, अशी मला कायम शंका होती. काही बोलणे, निरोप असेल तर ती मेसेजेसचाच वापर करायची. मालक तिच्या हातात रोख पैसे कधीच द्यायचे नाहीत. अगदी पंपावर डिझेल देखील मी माझ्या पैशाने टाकायचो. नंतर स्वामीसाहेबांना पावती दिली की मला पैसे मिळायचे.’
‘एखादी खास घटना, जी तुला विशेष वाटली असेल?’
‘खास म्हणजे अगदी खास घटना सांगतो मी साहेब. ज्या दिवशी मालकांचा खून झाला, त्या दिवशी मी रेखा मॅडमला घेऊन मॉलला गेलेलो. गाडीतून उतरताना त्या फुटपाथचा अंदाज न आल्याने अडखळल्या आणि त्यांचा तोल गेला. त्यांच्या खांद्यावरची पर्स खालती पडली आणि उघडली गेली. त्यात साहेब दोन दोन हजाराच्या नोटांची दोन बंडल होती साहेब.. चार लाख रुपये कॅश!!’ डोळे विस्फारत मुरली म्हणाला.
—
‘रेखाजी तुमची आणि फिलिप्सची ओळख कशी आणि कुठे झाली? मला माहितीये, ही प्रश्नोत्तरे आधी झालेली आहेत. पण माझ्या ‘रिव्हिजन’साठी मी पुन्हा एकदा तुम्हाला त्रास देतोय,’ प्रताप नम्र स्वरात म्हणाला.
‘माझा नवरा फिलिप्सचे तीन अड्डे सांभाळायचा. तो एकदा जुगारात मोठी रक्कम हरला होता. त्याने फिलिप्सच्या हिशेबात मोठा गफला केला आणि ते पैसे हरलेली रक्कम भरायला वापरले. स्वामीच्या लक्षात ही गोष्ट लगेचच आली. फिलिप्सची माणसं आपल्या शोधात आहेत, हे समजताच माझा नवरा फरार झाला. त्याला परत आणण्यासाठी माझा वापर करायचा, म्हणून फिलिप्सने मलाच उचलून आणायला लावलं. पण नव-याला बहुदा माझ्यापेक्षा स्वत:ची जास्त काळजी होती… त्याच्या त्या वर्तनाने मी पूर्ण खचले. अशावेळी फिलिप्सच माझा आधार झाला. त्याला बायकांच्यात फारसं स्वारस्य कधीच नव्हतं, पण त्याने मला जवळ केलं, आधार दिला. मग मात्र नव-याचं काय झालं, याची मी कधीच चौकशी केली नाही.’
‘फिलिप्सचे आर्थिक व्यवहार तुम्हाला माहिती असायचे? तुम्ही त्यात लक्ष घालायचात?’
‘कधीच नाही! फिलिप्स त्यासंदर्भात कधीच कोणाला विश्वासात घ्यायचा नाही. तशीही मी त्याच्याबरोबर शक्यतो रात्रीच असायचे; ते देखील त्याने कार पाठवून बोलावून घेतलं तर. त्याने मला जुहूला छोटा वन बेडरूम फ्लॅट घेऊन दिला होता. मी तिकडेच असायचे.’
‘दिवस दिवस असं घरात बसून कधी कंटाळा नाही आला?’
‘कधीतरी यायचा ना, पण मग मी फिलिप्सच्या परवानगीने त्याची गाडी घेऊन मनमुराद भटकायचे, खरेदीला जायचे. बरेचदा वेळ असेल, तर स्वत: फिलिप्स देखील मला कंपनी द्यायचा.’
‘अच्छा! रेखाजी माझा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटेल, पण तपासकामासाठी तो विचारणं मला भागच आहे. मला सांगा तुम्हाला फिलिप्सकडून खर्चायला महिन्याला किती रक्कम मिळायची? का तुम्ही लागेल तसे पैसे मागून घ्यायचात?’
‘मला फिलिप्सने ‘स्वामी’च्या नावावर असलेलं कार्ड देऊन ठेवलं होतं. मी तेच वापरायचे. फिलिप्सला स्वत:ला उधळपट्टी कधी आवडायची नाही; त्यामुळे मग मी देखील चैनीवर फारसा खर्च करणं टाळायचेच.’
—
‘स्वामी, रेखाबद्दल तुमचे काय मत आहे?’
‘म्हणजे?’
‘एकूणातच.. एक व्यक्ती म्हणून?’
‘खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब, गेल्या तीन वर्षात आमची फार तर सात-आठ वेळा भेट झाली असेल. ते देखील फिलिप्ससाहेबांच्या रूममध्येच. त्यामुळे तिच्याबद्दल फारशी काही जानकारी मला देता येणार नाही. ती नवीन होती, तेव्हा तिने दोन-तीन वेळा शॉपिंगवर अव्वाच्या सव्वा खर्च केला होता, अन तो मी मालकांपाशी बोललो होतो. त्यावेळी मालकांनी तिला घरून बोलावणं पाठवून बंगल्यावर आणलं आणि चांगलंच खडसावलं होतं. तीच माझी आणि तिची सर्वात लांबलेली पाच-सात मिनिटांची भेट. त्यानंतर मी आलो अन ती खोलीत असेल, तर ती सरळ उठून बाहेर जायची. बहुदा मालकांचीच तशी इच्छा असावी.’
‘तिला खर्चासाठी मालक किती पैसे द्यायचे?’
‘माझ्या मते शून्य! तिला एक कार्ड मात्र त्यांनी वापरायला दिलेले होतं. ज्याचा हिशेब दर आठवड्याला मी त्यांना द्यायचो.’
—
फ्लॅट तसा लहानसाच होता, पण अत्यंत कलात्मक पद्धतीने सजवलेला होता. प्रत्येक गोष्टीत कला आणि उंचीपण दोन्ही झळकत होतं.
‘सोन्याचा पिंजरा…’ प्रताप रेखाला ऐकायला जाईल इतक्या हळुवार कुजबुजला.
‘काही म्हणालात का?’ रेखाने एक भुवई उडवत विचारले.
‘नाही… तुमच्यासारख्या मुक्त, स्वच्छंदी जिवासाठी हा फ्लॅट म्हणजे सोन्याचा पिंजराच की.’ प्रतापच्या उद्गारांवर रेखा कसनुसे हसली.
‘मला सांगा रेखाजी, फिलिप्सला उधळेपणाचा प्रचंड ितटकारा होता, तो तुमच्या खर्चावर देखील नियंत्रण ठेवून असायचा. अशावेळी तुमचे ‘शौक’ पुरे करायला लागणारा पैसा यायचा कुठून?’
‘इन्स्पेक्टर साहेब शुद्धीवर आहात का? मी फिलिप्सची लग्नाची बायको नसले, तरी अशी ऐरीगैरी बाई देखील नाही. शब्द जपून वापरा!’
घाव वर्मी लागल्याचे प्रतापने ओळखले.
‘मी पुन्हा विचारतो, तुमचे ‘शौक’ पुरे करायला लागणारा पैसा तुम्ही कसा मिळवायचात? मी शब्द बदलून विचारू का? आता या क्षणी तुमच्या लॉकरमध्ये असलेले दागिने आणि नोटांची पुडकी कुठून आलीत? फिलिप्स कधीच इथे यायचा नाही त्यामुळे त्याच्या हे कधीच लक्षात आले नाही. पण काल तुम्हाला चौकीत भेटायला बोलावलं अन् तुम्ही तिकडे पोहोचेपर्यंत मी इथे पोचलो होतो. सहज तुमचं कपाट उघडलं अन बरंच काही घबाड दिसलं…’
‘ते.. ते.. फिलिप्सनेच मला ठेवायला दिलं होतं!’
‘रेखाजी मी अत्यंत कायद्याने चालणारा माणूस आहे. पण या माझ्याबरोबरच्या माने मॅडम आहेत ना, त्यांचे पेशन्स फार कमी आहेत. एक दोनदा खोटे ऐकतात ऐकतात.. अन मग सरळ धर की आपट! नक्षाच बदलून टाकतात चेह-याचा..’
‘मी फिलिप्सचे पैसे चोरलेत. आय मीन, चोरत होतं. अगदी खुनाच्या दिवसापर्यंत.’
‘सविस्तर सांगा मॅडम…’
‘मला पहिल्यापासूनच सोन्याचा हव्यास आहे. राकेश, म्हणजे माझ्या नव-यासोबत असताना मला कधीच काही कमी पडत नव्हते, तो कधी माझ्याकडे हिशेब देखील मागत नसे. एखाद्या राणीसारखी जगायचे मी. पण जुगाराच्या व्यसनाने त्याचा घात केला आणि त्याच्या जोडीने माझा देखील. फिलिप्सने मला आधार दिला, पण तुम्ही म्हणालात तसे हा सोन्याचा पिंजरा देखील दिला. मी खूप तडफडले, पण माझ्याकडे काही पर्याय देखील नव्हता. एका वर्षातच मी फिलिप्सचा ब-यापैकी विश्वास संपादला आणि तो नसताना देखील मला त्याच्या खोलीत जा-ये करण्याची मुभा मिळाली. अशाच एका सोनेरी दिवशी मला फिलिप्सची डायरी हाताला लागली अन त्यात त्याच्या गुप्त तिजोरीबद्दल देखील माहिती मिळाली. स्वामीला माहीत नसलेले असे काही वेगळे कमाईचे मार्ग देखील फिलिप्सकडे होतं आणि त्यातून आलेली रोख रक्कम तो या तिजोरीत ठेवायचा. यातला एकही पैसा त्याने कधी बाहेर काढला नव्हता, फक्त नवीन आलेली पुडकी ठेवायलाच तो ही तिजोरी उघडायचा. मी याच संधीचा फायदा उचलला आणि लक्षात येणार नाही अशा रकमांवर हात मारायला सुरुवात केली.’
‘आणि फिलिप्सला हे एके दिवशी कळले. आता जिवावरच बेतणार म्हणल्यावर तुम्ही सरळ धाडस केलेत आणि फिलिप्सचाच काटा काढलात.’
‘नाही नाही नाही!! मी चोरी जरूर केली पण मी त्याचा खून नाही केला! त्याचा खून.. त्याच्या खून ‘त्याने’ केलाय..’
‘तो’ कोण रेखाजी?’
‘मी कायम तिजोरीतले पैसे चोरले की उरलेले मोजून ठेवायचे. खुनाच्या दिवशी मी धाडस करून चक्क चार लाख रुपये चोरले. त्यावेळी तिजोरीत ५२ लाख रुपये उरले होतं. पण खुनानंतर मी तिजोरी उघडली, तेव्हा त्यात फक्त ४७ लाखच रुपये होते…’ रेखा आवंढा गिळत म्हणाली आणि प्रताप सुन्नपणे तिच्याकडे बघत बसला.
—
‘आता लपवण्यात काहीच अर्थ नाहीये? नाही का? आता फक्त खून कसा झाला ते ऐकायचे आहे..’
‘खरे आहे तुमचे इन्स्पेक्टर साहेब… सगळे समोर आलेच आहे. मला त्या तिजोरीचा पत्ता अगदी योगायोगाने लागला. एकदा मी काम संपवून बाहेर पडलो आणि फोन आतच राहिल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्याच पावली माघारी आलो, तर खोली पूर्ण रिकामी. एका क्षणापूर्वी खोलीत असलेले फिलिप्स शेठ नाहीसे तरी कुठे झाले? मी माझ्या फोनचा कॅमेरा चालू केला आणि फोन तिथेच ठेवून बाहेर पडलो. काही वेळाने फोन विसरल्याचं सांगत मी पुन्हा खोलीत गेलो, तर साहेब खोलीतच हजर! मात्र फोनच्या कॅमे-याने आपलं काम चोख पार पाडले होतं. इतकी वर्षे पैशाच्या ढिगा-यात वावरलो, पण साहेबांचा धाकच असा होता की, कधी एका रुपयाला हात लावण्याची हिंमत झाली नाही. पण त्यावेळी मात्र त्या ‘बेहिशेबी’ पैशाने मला मोहात पाडले, अन मी संधी मिळेल तसे पैसे लांबवू लागलो. पण मोह शेवटी वाईटच! त्या दिवशी तिजोरी बंद करून बाहेर आलो तर समोर साहेब दत्त म्हणून उभे. माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता! साहेबांनीच कधीकाळी स्वरक्षणासाठी दिलेले रिव्हॉल्व्हर मी त्यांच्याच छातीत रिकामे केले. तेवढ्यात आंद्रेची चाहूल लागली. मी साहेबांना खुर्ची दाराकडे उलटी करून त्यांना त्यात बसवलं आणि हिशेब समजावत असल्याचा बेमालूम अभिनय वठवला. आंद्रे मला बघून आत आलाच नाही, अन त्यामुळे त्याला रक्त दिसले नाही. मी ताबडतोब साहेबांना कोचात पुन्हा दाराकडे पाठ करून बसवलं आणि ‘साहेबांना डिस्टर्ब करू नकोस, त्यांनी टेबलावर जेवण ठेवून जायला सांगितले आहे’ असं आंद्रेला बजावून बाहेर पडलो.
‘तुमच्या नाही पण रेखाच्या चोरीने तुमचा घात केलाच!! तिला उरलेली रक्कम मोजायची सवय नसती, तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचणे अशक्यच होतं मिस्टर स्वामी…’
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)