प्रिय तातूस,
अरे यंदा शंभर टक्के काय त्याच्याहीपेक्षा जास्त पाऊस पडणार अशा बातम्यामुळे काय आनंदी आनंद सगळीकडे! अरे एसएससीला जर शंभर टक्के मार्क मिळू शकतात तर पाऊस का शंभर टक्क्याच्या पुढे पडणार नाही असं वाटत राहतं, पण बरेच लोक अलीकडे घरातूनच काम करतात त्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी बूट यांचा खप मात्र कमी झालाय. फक्त शेतक-यांना अजून घरून काम करायची परवानगी नसल्याने नाराजी आहे. पण मला कळत नाही, पाऊस आधी अंदमानाकडे का जातो, डायरेक्ट केरळकडे यायला काय झालं असं मला अनेक वर्ष वाटतं? आणि हे पेपरवाले पण काही बोलत नाहीत. अरे तातू, खरं सांगू, आपल्याला काय वाटतं ते सांगायचे दिवस आता राहिले नाहीत. अरे मास्क घातल्यावर तू अधिकच सुंदर दिसतेस असं म्हणायची पण चोरी आहे. हल्ली कुणालाही काही बोलायची सोय नाही. अरे परवा लग्नात ती दोघे पाया पडली तर मी `आता नीट वागा’ म्हणून आशीर्वाद दिला तर केवढा वादंग. असो. अरे विषय भलतीकडेच जातो. अरे एखादा देश भलतीकडेच जातो तर आपला विषय भरकटला तर त्यात काय…?
आता केरळची तारीख एक जून आणि आपल्याकडे सात जून तर ठरलेल्या वेळी पावसाने यावे की नाही? पण गोव्याला आल्यावर (गोव्याच्या पाण्याचा पण परिणाम असावा) कुठे गायब होईल काही सांगता येत नाही. आता तर मुंबई-गोवा हायवे झालाय त्यामुळे किती सरळ रस्ता झालाय. आपण शाळेत जाताना घरून निघालो की वाटेत कुठे वेळ घालवत नव्हतो. परवा मी नानाच्या गाडीत बसलो तर तो म्हणाला कुठल्या रस्त्याने जाऊ, तर म्हणालो जवळचा शॉर्टकट बघ!
अरे आपली पण वेधशाळा आता खूपच सुधारलीय. त्याचे कारण आधुनिक यंत्रणा! म्हणजे अरबी समुद्रातून निघतानाच ढगांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवतात, त्याप्रमाणे ढग पुढे जातात हे तर सगळ्यांनाच माहित आहे; पण वेधशाळेने शास्त्रज्ञांबरोबर आता ज्योतिषीदेखील स्टाफवर नेमलेत त्यामुळे अचूक माहिती मिळते. अरे पावसाचा सर्वात जास्त त्रास महिला वर्गाला होतो. इतकी वर्षे पाऊस किती वाजता पडणार काही कळायचं नाही. आता सकाळी दहा ते दोन ऊन पडणार कळलं तर त्या वेळात कपडे वाळत घालता येतात. अरे या वेळेत कुरडया पापडदेखील वाळत घालू शकतो. फार पूर्वी तर आपल्याला वा-याची दिशा पण समजत नव्हती. ब्रिटिशांच्या काळात वेधशाळेच्या गच्चीत टाकीवर साडेचार वार पंचा कळकाला बांधायचे आणि तो हवेत डुलत राहायचा, अगदी लांबवरून बघितले तरी वा-याची दिशा कळायची. आता संगणकामुळे खूपच सोपं झालंय. नानाचा मुलगा पूर्वी लंडनहून आला की सांगायचा बीबीसीवर आज छत्री घेऊन बाहेर पडा, जॅकेट घाला, असं सांगतात; हे ऐकून तो थापा मारतोय वाटायचं. अरे मागे एकदा एका दिवसात प्रचंड पाऊस पडला होता. तेव्हाची गोष्ट तुला पुन्हा सांगतो. अरे इतका पाऊस पडला की, वेधशाळेच्या गच्चीत ठेवलेले पर्जन्यमापक यंत्र वाहून जाते की काय अशी वेळ आली, तर तिथल्या वॉचमनने प्रसंगावधान राखून ते पर्जन्यमापक यंत्र आत आणून ठेवले. त्यामुळे मोजलेला पाऊस जरी कमी भरला तरी यंत्र सुरक्षित राहिले. आताच्या काळात मात्र अशी कर्तव्यदक्ष माणसे दुर्मीळ झालीयत. अरे परवा आमच्या सोसायटीत वॉचमनची जागा भरायची होती, पण झोपायची व्यवस्था नीट नसल्याने अनेकांनी नकार दिला. अरे अनेक कंपन्यांमध्ये रात्रपाळीत काम करणा-यांना स्लीपिंग अलाउन्सदेखील द्यावा लागतो. कंत्राटी पद्धतीमुळे या सर्व सुविधा हळूहळू लयाला जात चालल्यात.
पावसावरच्या कार्यक्रमांनादेखील आता काय उधाण येत चाललंय. अगदी लहानपणापासून आपल्या कानावर `येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ हे ऐकायला मिळायचं. हल्ली मात्र हे ऐकायला मिळत नाही. यातल्या पैसा या शब्दाला अँन्टी करप्शन ब्यूरोने ऑब्जेक्शन घेतल्याने कोर्टानेच या गाण्यावर बंदी आणलीय! पाऊस ही जर सेवा आहे तर त्याला पैशाचे आमिष दाखवून वाईट सवय का लावायची? अरे जेवल्यानंतर कुठल्याही आईने मुलाच्या ताटासमोर बडीशोप असलेल्या बाउलमध्ये बिल आणून ठेवल्याचे आठवत नाही. अरे परवा महापालिकेत आम्ही लस टोचून घेतली, एक पैसा पण खर्च आला नाही आणि रिक्षावालापण ओळखीचाच निघाला. तो म्हणाला, `अनंतराव मी सोडतो तुम्हाला!’ मला नेहमी असं वाटतं की, वनवासाला निघालो तरी कुणीतरी प्रेमाने म्हणेल मी सोडतो तुम्हाला.
अरे सोसायटीत `पावसावरची गाणी’ असा कार्यक्रम झाला. योगायोग म्हणजे नेमका जोराचा पाऊस आला. याला म्हणतात अनुभव! पण सांगायचं म्हणजे पावसावर निबंधस्पर्धा देखील घेतली होती सगळ्यांनी. अनंतराव तुम्ही जास्त पावसाळे बघितलेत, तुम्ही परीक्षक व्हा. मी काय… मी हो म्हटले, पण हिचं म्हणणं, `गवारी निवडून द्या… तीनदा सांगितलं तरी ऐकलं न ऐकलंसं केलं!’ अरे घरासाठी आपण आयुष्यभर राबलो आता थोडं समाजासाठी काहीतरी करूया वाटलं तर त्यात वावगं काय. असो तुला कधीतरी आतलं दु:ख सांगावसं वाटतं.
तर सांगायचं म्हणजे अनेक निबंध पाऊस, वारा, ढग, मान्सून, हिरवाई यावर होतेच, पण एका निबंधाचे शीर्षकच `ढग बिनडोक असतात’ होतं. हल्लीची तरूण पिढी कसा विचार करते हे वाचून मी हादरलोच. त्यानं लिहिलं होतं, `हे ढग जिथून निघतात तिथून येवढे ओझे द्यायची काय जरूर? आपण प्रवासाला निघतो मुंबई-पुणे शिवनेरीने तेव्हा दोनशे मिलीची बाटली देतात, तेवढे पाणी पुरते. येवढे पाणी भरून निघायची काय आवश्यकता? आणि उन्हाळ्यात काहिली आणि कंठशोष होतात तेव्हा हे ढग टिपूसदेखील पाणी बरोबर घेत नाहीत. मुळात पावसाळ्यात इतका चिकचिकाट आणि ओलं असतं तेव्हा ढगांची गरजच नसते. शहरात तर हे काळे ढग म्हणजे न्यूसन्सच आहे. पाऊस खरंतर उन्हाळ्यात पडायला पाहिजे आणि शेतात पडला जंगलात पडला वगैरे ठीक आहे. पावसाला `बिनडोक’ म्हणणारी पिढी येतेय म्हणजे बघ. अरे तातू आपण ‘धूमज्योति: सलिलमरुतां सन्निपात: स मेघ:’ म्हणत शिकत शिकत कालिदासाचा मेघदूत लावला. असो काळाचा महिमा! मी निकाल जाहीर करताना आपल्या सोसायटीत नवीन नक्षत्र जन्माला येताहेत! म्हणत समारोप केला.
अरे मागच्या एका सरकारने `इकडे आड तिकडे विहीर’ अशी पाणीटंचाईवर मात करणारी योजना आणली होती. अगदी घरोघर अंगणात `विहीर’ आणि परसदारी `आड’ खोदून बांधून दिले. पाव्हणे आले की पुढच्या दारी पाणी शेंदून प्रवेश व्हायचे आणि मागील दारी `आडाचे’ पाणी प्यायचे. (आड शब्दाची व्युत्पत्ती म्हणे एखादा आड आला तर त्यात ढकलून देत असत). अरे आपल्याला डिर्ग्या घेतल्या तरी काहीही ज्ञान नसते.
`गाढवाला गुळाची काय चव’ सुद्धा म्हणे मुलगी बघायला आलेल्यांना आधी गुळपाणी देत असत आणि मग चव विचारून परीक्षा घेत असत. अरे तातू या जगात इतक्या भाषा आहेत पण `मराठी भाषेइतकी श्रेष्ठ भाषा जगात कुठलीच नाही (मी फक्त नेपाळ बॉर्डरपर्यंत गेलोय तरीही).
अरे इतकं कलात्मक इतकं सौदर्यपूर्ण वातावरण जगातल्या कुठल्याच भाषेत नाही. तुला अतिशयोक्ती वाटेल, पण ज्या भाषेत चोराच्या मनात पोलीस बेड्या कोठडी वगैरे न येता फक्त `चोराच्या मनात चांदणं’ असते म्हणतात ती भाषा किती थोर… पत्र लांबले खरे! पण असो.
तुझा
अनंत अपराधी