कोंबडे झाकणार्याचा हात धरण्याचे निदान धारिष्ट्य तरी चिनी माणूस दाखवू लागला आहे, हा तिथल्या स्वातंत्र्यसूर्याचाच एक किरण मानायला हवा! तसेच गलवानमध्ये नाक कापले गेलेल्या चीनला ‘हा १९६२चा भारत नाही’ एवढा धडा तरी नक्कीच समजला असावा!
—-
कोंबडे झाकण्याची धडपड फक्त हुकूमशहाच करतात असे नाही. लोकशाहीतही सत्ताधार्यांाना तसा मोह होतोच. पण सूर्यनारायण उगवायचे काही थांबत नाहीत. फरक एवढाच की, भारतासारख्या देशात सूर्याचे दर्शन लवकर होईल आणि चीनसारख्या एकपक्षीय कम्युनिस्ट राजवट असलेल्या देशात जनतेला सूर्य दिसला तरी डोळ्यांवर हात ठेवून गप्प बसावे लागेल!
वर्षभरापूर्वी लडाखमधील गलवान खोर्यात घडलेल्या चकमकीच्या घटनेनंतर हेच दिसून आले आहे.
लडाखमधील अक्साई चीन भागात चीनकडून होणार्या घुसखोरीच्या आणि अतिक्रमणाच्या घटना नवीन नाहीत. १९६२मधील भारत-चीन युद्धानंतर काही वर्षे चीनच्या कारवाया थंडावल्या होत्या. पण गेल्या दहा-वीस वर्षांत चिनी सैनिकांच्या घुसखोरीच्या बातम्या भारतीयांना वारंवार ऐकायला मिळाल्या आहेत. कधी अरुणाचल प्रदेशात, कधी सिक्कीमच्या सीमेवर, कधी लडाखमधील पॅन्गॉग सरोवरालगत तर कधी देस्पांग, दमचोक किंवा अक्साई चीनमध्ये असणार्याग कोणत्याही दोन भारतीय ठाण्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत. असे कुठे ना कुठे चिनी सैनिक आपल्या हद्दीत घुसत असतात.
गलवान खोर्यातील चिनी घुसखोरी ही अशीच आजवरच्या शेकडो घटनांपैकी एक. पण १५ जून २०२० या दिवशी घडलेली घटना ‘रक्तरंजित’ ठरली. तीही गेल्या पंचेचाळीस वर्षांतील सर्वाधिक हिंसक म्हणावी अशी! त्या एक-दीड दिवसात आणि मध्यरात्रीही झडलेल्या चकमकीत वीस भारतीय आणि किमान ४३ चिनी सैनिक ठार झाले.
अतिशय अरुंद आणि खोल दरीतून वाहणार्या- गलवान नदीच्या काठाने दौलत बेग ओल्डी या विमानतळाकडे जाता येण्यासारखा एक रस्ता आपले लष्कर बांधत होते. अक्साई चीनमध्ये होणार्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र नेमके हेच चीनला नको आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामात त्यांच्याकडून वारंवार अडथळे आणण्यात येऊ लागले. परिस्थिती चिघळू नये म्हणून उभयतांच्या लष्करी अधिकार्यांमध्ये चर्चेच्या फेर्या झडल्या आणि गलवान खोर्यातील वादग्रस्त भागातून चिनी सैनिकांनी माघार घेण्याचे ठरले. तो दिवस होता सहा जून २०२०.
चिनी सैनिकांचा उपद्रव थांबून रस्त्याचे काम सुकर होईल, अशा भ्रमात असलेल्या भारतीय जवानांना प्रत्यक्षात मात्र वेगळाच अनुभव आला. जिथे दोन्ही बाजूंनी माघार घेऊन मोकळी जागा ठेवण्याचे (बफर झोन) मान्य झाले होते, त्या टापूत एक नवीनच चिनी ठाणे भारतीयांना आढळून आले. उन्हाळ्याच्या हंगामात भारतीय गस्ती पथक ज्या ठिकाणापर्यंत जाते, त्या ‘पीपी१४’ या पॉइंटच्या वाटेवरच उभारलेले हे चिनी ठाणे काढून टाकण्यास सांगण्यासाठी एक भारतीय तुकडी तेथे गेली. तेव्हा चिनी सैनिकांनी त्यांना नुसतेच धुडकावले नाही, तर दैनंदिन वापरातील हत्यारांनी त्यांना मारहाण केली. अधिकार्यांनमधील चर्चेची पुढची फेरी १६ जून रोजी होणार होती. त्यात माघारीचा आणि ‘बफर झोन’चा अधिक तपशील ठरणार होता. त्याआधीच शांततेच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा हा डाव होता. या चकमकीत भारतीय पथकाचा नेता आणि दोन जवान गंभीर जखमी झाले, तर दहा जवानांना चिन्यांनी पकडून नेले. पथकाचा प्रमुख जखमी अवस्थेत भारतीय ठाण्यावर परतला. त्यानंतर मात्र तेथील बिहार रेजिमेंटचे अनेक जवान हातात येईल ती हत्यारे घेऊन चिनी ठाण्यावर चालून गेले. या टापूत बंदुका आणि दारूगोळ्याचा वापर करायचा नाही, असे उभयपक्षी मान्य करण्यात आल्यामुळे चिनी सैनिकांनी वेगळीच शक्कल लढवली होती. बांधकामाची अवजारे, लाकडे एवढेच नव्हे, तर दगडांना काटेरी तारा गुंडाळून त्याचा शस्त्रांसारखा वापर चिनी सैनिक करत असल्याचे लक्षात आल्यावर आपल्या जवानांनीही ‘हातघाईच्या लढाई’ची साधने वापरली.
१५ जून २०२० रोजी झडलेल्या या चकमकीची बातमी मात्र दुसर्या दिवसानंतरच फुटली. तीही आधी आपल्या देशात. लष्कराच्या प्रवत्तäयाने आधी तीन जवान शहीद झाल्याचे आणि दहाजणांना पकडून नेल्याचे सांगितले होते. पण नंतर काही तासांनंतर त्यात दुरुस्ती करून, सहा जूननंतरच्या आठवडाभरात घडलेल्या घटनांचा आणि चकमकींचा तपशील देऊन एकूण वीस जवान शहीद झाल्याचे स्पष्ट केले. गलवान नदीचे खोरे अतिशय खोल आणि अरुंद आहे. तिथे झडलेल्या या चकमकीत जवानांना जखमी अवस्थेत दरीत फेकून देण्याचे तंत्र दोन्ही बाजूंनी वापरले होते. हाडे गोठवणार्या थंडीत, जखमी अवस्थेत दरीत फेकलेल्या अथवा पडलेल्या १७ जवानांची पार्थिव शरीरे दुसर्या दिवशी वर काढण्यात आल्याचा खुलासाही दुसर्या दिवशी करण्यात आला. अर्थात आपल्या लोकशाहीत या वीसही जवानांच्या पार्थिवांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले गेले.
भले एक-दोन दिवस उशिराने किंवा त्यानंतरही हा तपशील जाहीर झाला असेल, पण एकशेतीस कोटी लोकसंख्येच्या लोकशाही राष्ट्रात ते लपवले गेले नाही!
याउलट चीनमध्ये काय घडले?
चाळीस नव्हेच, फक्त चार सैनिक कामी आल्याचे चीनच्या यंत्रणांकडून जाहीर करण्यात आले! तेही चार दिवसांनी किंवा आठवड्यांनी नव्हे, तर आठ महिन्यांनंतर! चीनमध्ये वृत्तपत्रस्वातंत्र्य नाही. सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष नाही किंवा प्रशासनाला सुनावणारी न्याययंत्रणाही नाही. सरकारी माध्यमातून जाहीर होईल तेवढीच माहिती जनतेला समजते. साहजिकच १५ जून २०२० रोजी गलवान खोर्याझतील चकमकीचा वृत्तांत दीडशे कोटी चिन्यांना लगेच समजलाच नाही.
जनतेला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास मिळावा म्हणून तिअनानमेन चौकात धरणे धरणार्या हजारो लोकशाहीवादी तरुणांवर रणगाडे घालून चिनी राजवटीने ते ऐतिहासिक आंदोलन चिरडून टाकले होते. तीन दशकांपूर्वीची ही घटना चीनमधील नव्या पिढीला फक्त ऐकून माहीत असेल, पण हाँगकाँगमध्ये स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध लढणार्या आंदोलकांना चिनी सत्ताधारी कसे भरडतात, हे पुन्हा पाहायला/ऐकायला नक्की मिळते. तिअनानमेन चौकात किती हजार तरुण मारले गेले, ते चीनने आजतागायत अधिकृतपणे जाहीर केलेले नाही; पण आधुनिक माध्यमांना रोखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मोबाईलच्या लाटेतील सोशल मीडियाला काबूत ठेवणे चिनी सत्ताधार्यांना दिवसेंदिवस जड जाणार आहे. गलवान खोर्यातील चकमकीच्या संदर्भातही चीनने गेले वर्षभर लपवालपवी केली, तरी सोशल मीडियातून ‘ठगवणारा’ तपशील फार काळ झाकून ठेवता येणार नाही हे नक्की.
गलवान चकमकीचा त्रोटक वृत्तांत देऊन ‘बाप दाखवण्याचे’ चीनच्या अधिकृत यंत्रणांनी टाळले, तरी चकमकीत बळी पडलेल्या जवानांचे ‘श्राद्ध’ त्यांना घालावेच लागले आहे. आपल्या संस्कृतीत ज्याप्रमाणे ‘पितृ पंधरवडा’ असतो, तसा चिनी संस्कृतीत चार एप्रिल हा दिवस ‘कबरीच्या साफसफाईचा, सन्मानाचा’ म्हणजेच श्राद्धाचा म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने चीनमध्ये गलवान खोर्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली गेली ती अवघ्या चारजणांना नक्कीच नाही. सरकारी दबावामुळे ‘गलवान खोर्यात शहीद झालेल्या सर्वांना’ मानवंदना देत आकडा लपविण्याची कसरत सोशल मीडियावरही सर्वसामान्य चिन्यांना करावी लागली, तरी चारावरील शून्य नजरेला येत असणारच!
गलवान खोर्यातील चकमकीत नाक कापले गेले असल्याने चीनच्या लष्करी आणि सरकारी यंत्रणेला त्याचा गवगवा करता आला नाही. पण ‘पडलो तरी नाक वर’ अशी वृत्ती असलेल्या अधिकार्याकडून अवघ्या चारजणांनी भारतीय जवानांना शस्त्रांशिवाय कसे रोखले याची शौर्यगाथा सांगितली गेली, तीही फेब्रुवारीत; म्हणजे चकमकीनंतर आठ महिन्यांनी! या चौघांसह त्या पथकाचा नेता की फाबाव याची मुलाखत नुकतीच ‘सीसीटीव्ही’ या सरकारी दूरचित्रवाणीवर सादर केली गेली. त्यावेळी फाबाव यांच्या डोक्यावरील जखमेची खूण प्रेक्षकांच्या नजरेत भरेल, अशा तर्हेने दाखवण्यात येत होती आणि ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तपत्रात त्याचेही कौतुक केले गेले.
गलवानच्या चकमकीत ‘शौर्य गाजवलेल्या’ (आणि तरीही जिवंत राहिलेल्या!) २९ जणांना गौरविण्याचे औदार्यही चीनने दाखवले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापनदिनी, म्हणजे येत्या एक जुलै रोजी त्यांचा सन्मान करण्यात येईल, असे पक्षातर्पेâ जाहीर करण्यात आले आहे.
हे झाले सरकारी आणि प्रचारयंत्रणेचे कर्तृत्त्व, पण त्यांच्या अपयशाबद्दल नुसती विचारणा करणार्याच सामान्य चिनी माणसाची अवस्था कशी होते, हेही पाहण्यासारखे आहे. सरकारतर्फे जी माहिती जाहीर करण्यात येते, त्यातील त्रुटी दाखविणे अथवा त्याबद्दल प्रश्न विचारणे हा चीनमध्ये गुन्हा आहे! गलवान खोर्यात जे काही झाले ते भले एखाददुसरा दिवस उलटल्यावर का होईना, भारतीय जनतेला समजले. एवढेच नव्हे, तीनच जवान शहीद झाल्याची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करून चकमकींचा पूर्ण वृत्तांत देत वीस जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याचेही लगेच भारतीय लष्कराने आणि सरकारने एकमुखाने सांगितले. पण तब्बल आठ महिने उलटून गेल्यावरही चिनी यंत्रणांनी गलवान घटनेचा तपशील अधिकृतपणाने जाहीर केला नाही. तेथील तुकडीतील चार जवानांचे हौतात्म्य गौरविताना प्रत्यक्षात नेमके कितीजण ठार झाले, कितीजण जखमी झाले, बेपत्ता झाले अथवा भारतीयांनी पकडून नेले, ते आठ महिन्यांनंतरही का सांगितले जात नाही, असा सवाल कियू झिमिंग या चिनी नागरिकाने गेल्या फेब्रुवारीत उपस्थित केला होता. जो तपशील भारताने जूनमध्येच जाहीर करून हुतात्म्यांची नावेही दिली, तसे चिनी यंत्रणांना आठ महिन्यांनंतरही का करता येऊ नये असे झिमिंगने विचारले होते. त्याच्या या प्रश्नावर आणखी बारा-पंधराजणांनी काही ना काही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राष्ट्रवीरांचा किंवा हुतात्म्यांचा अवमान करण्याच्या या गुन्ह्याबद्दल चीनच्या न्यायदेवतेने झिमिंगला आठ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे! उरलेले दहा बारा आरोपी सुपात आहेत.
कोंबडे झाकणार्याचा हात धरण्याचे निदान धारिष्ट्य तरी चिनी माणूस दाखवू लागला आहे, हा तिथल्या स्वातंत्र्यसूर्याचाच एक किरण मानायला हवा! तसेच गलवानमध्ये नाक कापले गेलेल्या चीनला ‘हा १९६२चा भारत नाही’ एवढा धडा तरी नक्कीच समजला असावा!
चीनने गलवान खोर्यातच घुसखोरी करावी आणि तिथेच त्यांच्या सैनिकांना भारतीय जवानांनी पाणी पाजावे, या घटनेला आपल्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. चीनने तिबेट गिळंकृत करून राजधानी ल्हासा येथील पोटला पॅलेसला वेढा घातला होता, तेव्हा म्हणजे एप्रिल १९५९मध्ये तिबेटींचे धर्मगुरू दलाई लामा तिथून पलायन करून भारतात आले होते. त्यावेळी भारताने दलाई लामांना आश्रय दिल्यामुळे संतापलेल्या चीनने पुढील तीन वर्षांत अक्साई चीन आणि तत्कालीन नेफा या दोन्ही आघाड्यांवर घुसखोरी करून युद्धाचे बिगुलच फुंकले होते. अक्साई चीनमधील सुमारे ३८ हजार चौरस किलोमीटर प्रदेशापैकी निम्म्याहून अधिक भाग त्याआधी चीनने बळकावला होताच. हा संपूर्ण इलाखा आपल्या टाचेखाली आणण्यासाठी चीनने त्यानंतर घुसखोरी आणि अतिक्रमणे यांचा धडाकाच लावला. कोराकोलम खिंडीपासून पेन्गॉग सरोवर तसेच स्पांगुर-चुशूलपासून दमचोकपर्यंत ज्या ज्या ठिकाणी भारतीय लष्कराच्या चौक्या किंवा ठाणी होती, त्यालगतच नव्हे, तर दोन चौक्यांच्या मधील मोकळ्या जागेत घुसून आपल्या चौक्या/ठाणी उभी करण्याचे सत्रच चीनने आरंभले. अशावेळी अनेकदा भारतीय आणि चिनी सैनिकांत चकमकी उडत. २० ऑक्टोबर १९६२ रोजी प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी अशा चकमकींना ऊत आला होता. संघर्षांच्या त्या ठिणग्यांमधील एक लक्षवेधक ठिणगी याच गलवान खोर्यात उडाली होती. गलवान खोर्यातील एका भारतीय ठाण्याभोवती चारशे चिनी सैनिकांनी वेढा घातला होता आणि पुढे त्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.
गलवान खोर्यात इतिहासाची पुनरावृत्ती करून भारतीयांना धमकावण्यासाठी चीनने निवडलेली वेळही लक्षात घेण्यासारखी आहे. सारे जग कोरोनाच्या संकटात ढकलले गेले असतानाच चीनने गलवान खोर्यात घुसखोरी केली होती. हे खोरे बळकावले तर फक्त लष्करी दृष्ट्याच नव्हे तर तमाम भारतीयांचे मानसिक खच्चीकरणही झाले असते. शिवाय एका विषाणूने हैराण केलेल्या दीडशे कोटी जनतेला ‘चीन अजून बलवान आहे’ असा संदेश देऊन त्यांना मानसिक उभारी देता आली असती. पण चीनचा हा हेतू साध्य होऊ शकला नाही. कारण गलवान खोर्यातील भारतीय जवानांची स्थिती १९६२ची नव्हे, तर २०२१ची होती!
साठ वर्षांपूर्वी आपल्या जवानांकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. दारूगोळा नव्हता, कडाक्याच्या थंडीत वावरण्यायोग्य बूट किंवा कपडेही नव्हते. आता ते सारे होतेच, पण शांततेच्या करारातील अटीमुळे हातातील बंदुकीतून गोळी झाडता येत नसली तरी बंदुकीच्या दस्त्यापेक्षाही नुसत्या मनगटाच्या जोरावर चिनी सैनिकांच्या माना मोडण्याचे आणि मणके खिळखिळे करण्याचे तंत्र आत्मसात केलेले, हातघाईच्या लढाईत तरबेज असे बिहार रेजिमेंटचे जवान याच गलवान खोर्यात तैनात होते. तीन जवानांच्या बदल्यात ४३ चिन्यांना त्यांनीच कंठस्नान घातले.
गलवान खोर्यातून चिन्यांना यावेळी हुसकावले, म्हणजे आपण जिंकलो, अशा भ्रमात मात्र भारतीयांनी राहता कामा नये. कारण आपण दावा करतो तो सर्व ३८ हजार चौरस किलोमीटरचा अक्साई चीन कब्जात येईपर्यंत लडाखमधील संघर्ष चीन चालूच ठेवणार आहे. भारताच्या नकाशात दाखवली जाणारी ‘जॉन्सन लाइन’ नावाने ब्रिटीश अमदानीत नोंद झालेली सीमारेषा चीन मान्य करीत नाही. खुद्द अक्साई चीनसह आपली सीमारेषा दाखवणारे नकाशेही चीनने १९५६ ते १९५९ या काळात दोन तीनदा बदलले. १९५४पर्यंत भारतीय नकाशांतही हा प्रदेश ‘अनडिसायडेड बॉर्डर’ म्हणजे सीमारेषा निश्चित न केलेला प्रदेश म्हणून दाखवण्यात येत होता. थोडक्यात म्हणजे हा ३८ हजार चौरस किलोमाटर प्रदेश वादग्रस्त होता.
या अक्साई चीनमध्ये काराकोरम खिंडीपासून दमचोकपर्यंत ठरावीक ठिकाणीच भारतीय ठाणी होती. तिथून पूर्वेकडे शक्य होईल तिथपर्यंत बर्फाळ दर्याखोर्यांतील निर्जन टापूत भारतीय जवान गस्त घालून येत. मात्र या ठाण्यांच्या उत्तर किंवा दक्षिण दिशांना मैलोन्मैल भागांत कुठेही भारतीयांच्या छावण्या किंवा लोकवस्तीही नसे. दोन ठाण्यांच्या मधील अशा मोकळ्या जागांत तेव्हापासूनच घुसखोरी करण्याचे तंत्र चीनने अवलंबिले आहे.
घुसखोरी, अतिक्रमण आणि आक्रमण यांची गल्लत आपली माध्यमे नेहमी करतात. आपण जिथे ठाणी उभारून गस्त घालण्यासाठी जातो, त्या भागात ‘भारतीय जवानांनी घुसखोरी’ केल्याचे चिनी माध्यमांत सांगितले जाते. तसेच गलवान असो, चिपचाप खोरे किंवा पॅन्गॉग सरोवराच्या उत्तरेकडील दोन टेकड्यांमधील (१९६२च्या युद्धात जिंकलेल्या अशा कोणत्याही) टापूत चिनी सैनिकांनी पुन्हा पाऊल टाकले की, आपण त्यांच्याविरुद्ध घुसखोरीचा दावा करतो. अशी दहा ठिकाणी घुसखोरी केल्यावर लष्करी तसेच राजकीय वाटाघाटींतून दहापैकी नऊच ठिकाणांहून माघार घ्यावी लागली तरी एका ठिकाणचे ‘अतिक्रमण’ कायम करायचे. याच तंत्राने घुसखोरी आणि अतिक्रमण करीत करीत प्रत्येक हंगामात भारतीयांना मागे रेटत जायचे आणि आपल्या नियंत्रणाखालील भूभाग वाढवत न्यायचा, हे जुने तंत्र चीन विशेषत: सिक्कीमलगतच्या डोकलामपासून गेल्या पाच-सात वर्षांत वारंवार अवलंबताना दिसतो. कोरोनानंतरच्या काळातही चीनकडून अशी आगळीक होत राहील, हे आपण लक्षात ठेवायला हवे आणि एक दिवस किंवा रात्रच नव्हे, तर एक क्षणही बेसावध राहता कामा नये. कारगिलप्रमाणे गलवानमध्येही गाफील राहण्याचा फटका बसता बसता आपण बचावलो आहोत. चार हजार ५७ कि.मी. लांबीच्या भारत-चीन सीमारेषेवर यापुढेही आपल्या लष्कराला डोळ्यात तेल घालून जागता पहारा घालत राहावे लागणार आहे.
– आल्हाद गोडबोले
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत.)