शिवसेनाप्रमुखांनी १९७८ साली हे व्यंगचित्र रेखाटलं तेव्हा सत्तापदांवर वेगळी माणसं होती. कायदा-सुव्यवस्था राखणारं पोलीस दल हे अर्थातच सत्ताधार्यांना उत्तरदायी होतं, पण सत्ताधार्यांचे गुलाम बनलेलं नव्हतं. सत्ताधार्यांचा राजकीय दबाव वाढला तर आधी तुम्ही आमच्या अंगावरून उठा, मग आम्ही कायदा सुव्यवस्था आटोक्यात आणू शकतो, असं सांगण्याची हिंमत आणि जरब या दलांमध्ये होती… आज या व्यंगचित्रातल्या पोलीस दलाच्या जागी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, अशी कल्पना करून पाहा… खुद्द बाळासाहेबांनीही आज पार रया गेलेली, जरब हरवलेली, कंबरडं मोडून जमिनीशी समतल झालेली यंत्रणा चितारली असती… सत्ताधार्यांनी छूऽऽ असा हुकूम दिला की ते ज्यांच्याकडे बोट करतील, त्यांच्याकडे धावत सुटायचं, त्याला जेरीला आणायचं, त्याच्याकडे काहीही मलिदा मिळाला नाही, तरी त्याला छळत राहायचं, ही या यंत्रणांची कामाची पद्धत बनून बसली आहे… नंतर कोणत्या ना कोणत्या पदाची, निवडणुकीतल्या तिकीटाची बोटी मिळण्याच्या आशेने लाळ गळत असलेल्या यांच्या तोंडातून सत्ताधार्यांना बाणेदारपणे ठणकावणारे शब्द निघण्याची तर अपेक्षाच व्यर्थ!