गवयाचं पोर सुरात रडतं, असं म्हणतात. मग, राजकारण्याचं पोर कसं रडतं?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
बापाच्या सुरात सूर मिसळून विरोधकांच्या नावाने रडतं.
अलीकडे इतके लोक दाढी वाढवून फिरताना दिसतात. गालांना थंडी लागू नये म्हणून वाढवत असतील का? बायकांनी काय उपाय करायचा मग?
– सोनाली देशमुख, लातूर
फुटलेलं तोंड (थंडीने) दिसू नये म्हणून दाढी वाढवत असावेत… पुरुष असोत की बाया.. सार्यांनीच बिनपाण्याने करावी. (आंघोळ.. आपली आपणच. थंडी कितीही वाजली तरी ऐकू येणार नाही.)
कितीने कितीला भागलं की बाकी शून्य येते?
– रामप्रसाद गुप्ता, चेंबूर
शून्यच येणार असेल तर कशाला हवी झकमारी.
फक्त वडाच्या झाडालाच पारंब्या का असतात? बाकीच्या झाडांनी काय पाप केलंय?
– सुदेश बेणारे, साकी नाका
इतर झाडांना लटकून वेगळा अनुभव येणार आहे का??
इंग्लिशमध्ये दारू पिण्याच्या जागेलाही बार म्हणतात आणि वकिलांच्या संघटनेलाही बार म्हणतात… असं का असावं?
– संजय बाळ, वानवडी, पुणे
शुद्धीत नसतानाही गीतेची शपथ घेऊन बायकोला सांगू शकतात, रात्री ‘बार’मध्ये गेलेलो.
पोटापाण्याचा प्रश्न असं म्हणतात सगळे, पोटाखाण्याचा प्रश्न का म्हणत नाहीत? पोटाला फक्त पिणे थोडेच लागते, खाणेही लागते ना?
– गायत्री शेंडे, चिखलदरा
पण पिताना खायला थोडंच लागतं?? थोडंसंच लागतं.
मराठीत बाकीचे सगळे कपडे धुतले जातात, धोतर मात्र बडवले जाते, याचं कारण काय असावं?
– रहीम शेख, तुळजापूर
मग काय मस्ती कमी व्हावी म्हणून बैलाला बडवतात, तसा धोतरवाल्याला बडवावा??
अमिताभ बच्चनने तुमच्यासोबत मराठी नाटक करायची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना कोणत्या नाटकात, कोणती भूमिका द्याल?
– सुरेखा पोटाळे, शिवाजी नगर, पुणे
त्यांना चौथा अंक जमतो का ते पाहावं लागेल… नाटकवाल्यांचा इतिहास बदलण्याचं पाप मला नको लागायला.
मोबाईल या शब्दात ‘बाईल’ का असावी?
– नाना पाटील, इस्लामपूर
पाटील, मोबाईलमधली तरी बाईल सोडा… तुमच्या मनात काही नसेल, पण मराठी चित्रपटांनी पाटलांची इमेजच तशी केलीय.
नाटकवाल्यांना बरेच नाद असतात, असं म्हणतात. तुमचे नाद कोणते?
– शमा क्षीरसागर, सांगली
जेवढे तुम्हाला तेवढेच आम्हाला..
अधिक कसलेले अभिनेते तुम्ही कुठे पाहिले आहेत? रंगमंचावर की राजकारणात?
– आबा केदारे, अमरावती
सर्कशीत ज्यांना विदूषक म्हणतात, जे उड्या मारतात, मनोरंजन करतात, खरा चेहरा लोकांना कधीच दिसू देत नाहीत, पण बिचार्यांची शारीरिक उंची खुजी असल्याने रंगमंचावर प्रेक्षक स्वीकारत नाहीत आणि विचारांची उंची उंच असल्याने ते राजकारणात येऊ शकत नाहीत.
मिसळ कुठली भारी? कोल्हापूरची, नाशिकची की पुण्याची?
– साधना पाटील, सिन्नर
दुसर्या दिवशी सकाळी जी ‘बरी’ वाटते ती ‘भारी’.
ज्याच्यासोबत एक तरी नाटक केलंच पाहिजे, असं तुम्हाला मनातून वाटतं, असा कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री आहे?
– प्रीती सांगळे, संभाजीनगर
हां.. ‘मन की बात’ जाहीर बोललो की मला बोलघेवडा बोलायला मोकळ्या तुम्ही.