आपला कोणताही प्रश्न, कोणतीही समस्या ‘मी इथे आहे, मी तिथे कसे जाऊ?’ या स्वरूपाची असते. मी इथे आहे, मी तिथे कसे जाऊ, या दोन ओळींच्या साच्यामध्ये आपण आपला कोणताही प्रश्न घालून त्याचे उत्तर मिळवू शकतो. तो प्रश्न सोडवू शकतो. आता ‘मी इथे आहे, मी तिथे कसे जाऊ’ म्हणजे काय? तर माझ्यासमोर अमुक प्रश्न आहे आणि तो मी कसा सोडवू? मी या अवस्थेत आहे, तर मी त्या अवस्थेत कसे जाऊ? मला अमुक प्रॉब्लेम आला आहे, त्या अवस्थेतून तो प्रॉब्लेम सुटल्याच्या अवस्थेत मी कसा जाऊ?
हे समजून घेण्यासाठी आपण एक-दोन उदाहरणं पाहूया.
ऋतू एक कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे. तिला टेन्शन आलंय. एक्झाम तर जवळ आली आहे अन् माझा अभ्यासच झालेला नाहीये. ती स्वतःशी म्हणते, वाट लागली. आता तर मी फेलच होणार. माझं काही खरं नाही. माझं वर्ष फुकट गेल्यात जमा आहे आणि हे असंच होत राहिलं तर माझ्या करिअरची वाट लागणार. मी अशीच आहे. मी आळशीच आहे. मी अभ्यासच करत नाही. माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही…
ऋतूसमोरचा प्रश्न काय आहे? काय असायला पाहिजे? मी इथे आहे, मी तिथे कशी जाऊ? आज एक्झामला आठ दिवस शिल्लक असताना माझा अभ्यास झालेला नाही. आता आठ दिवसात मेहनत घेऊन मी पास कशी होऊ? मी अभ्यास न झालेल्या अवस्थेत आहे, मी अभ्यास झालेल्या अवस्थेत कशी जाऊ? मला बरे मार्क मिळतील अशा स्थितीत मी कशी जाऊ? आपण ऋतूसारखेच ‘मी इथे आहे, मी तिथे कसं जाऊ’ यावर लक्ष एकाग्र न करता निरुपयोगी, नकारात्मक विचार करत राहतो. हे विचार आपल्याला ‘इथून तिथे’ जायला मदत करत नाहीत. उलट ‘तिथे’ जाण्यासाठी आपलं पाऊल उचलण्यात अडथळे निर्माण करतात.
ऋतू स्वतःशी जो विचार करते आहे तो तिला पास होण्याकडे नेणार नाहीत. तिने हाती असलेल्या आठ दिवसात कठोर मेहनत करून परीक्षेत पास होण्यासाठी कंबर कसली पाहिजे. ती इथे आहे, तिने तिथे जाण्याचा विचार केला पाहिजे.
आपण आणखी एक उदाहरण पाहू. मकरंदरावांचं. डॉक्टर मकरंदरावांना म्हणाले की तुमची शुगर खूप वाढली आहे. तुम्ही शुगर कंट्रोल केली पाहिजे. तुम्ही यापुढे साखरेचा चहा घेऊ नका. बटाटा खाणं टाळा. भात खाऊ नका. भरपूर चाला. इतरही अनेक गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या. डॉक्टरकडून निघाल्यावर मकरंदराव डॉक्टरांवर खूप चिडले. ते स्वतःशी म्हणू लागले. ‘डॉक्टरांना काय जातंय सांगायला बिनसाखरेचा चहा प्या! यांनी पिऊन पाहिला आहे का कधी बिनसाखरेचा चहा? हे डॉक्टर लोक स्वतः सगळं खातात अन् पेशंटला ‘हे खाऊ नका ते खाऊ नका’ सांगतात. मला बटाटा तर खूप आवडतो. बटाटावडाही खूप आवडतो. बटाट्याची भाजी आवडते. मी कोकणी माणूस असल्याने भात तर मला लागतोच. हे डॉक्टर म्हणतात भात खाऊ नको. भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतं तरी काय?
नंतर मकरंदराव स्वतःच्या नशिबालाही दोष देतात. माझ्याच नशिबात हा डायबिटीस होता? लोक सगळं खातात. त्यांना कसं काही होत नाही?
मकरंदराव जे विचार करत आहेत ते विचार त्यांना शुगर कंट्रोल करायला उपयोगी पडणार नाहीत. त्यांनी ‘मी इथे आहे, मी तिथे कसा जाऊ’ याचा विचार करायला हवा. मकरंदरावांसमोर प्रश्न असा आहे की, मी शुगर वाढलेल्या अवस्थेत आहे, मी शुगर कंट्रोल झाल्याच्या अवस्थेत कसा जाऊ? मकरंदरावांनी डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये पाळून अन् सांगितलेले उपाय करून डायबिटीज कंट्रोल केला पाहिजे. तरच ते ‘माझी शुगर वाढली आहे’कडून ‘माझी शुगर कंट्रोल झाली आहे’पर्यंत जाऊ शकतील.
‘मी इथे आहे मी तिथे कसा जाऊ’ याचा विचार करताना आपण आपल्या आपल्यासमोरचा प्रश्न नेमका काय आहे, किंबहुना तो काय असायला हवा, याचाही नीट विचार करणं महत्वाचं आहे.
उदाहरणार्थ, ज्या माणसांसोबत जगताना, काम करताना त्रास होतोय, पण त्याला काही इलाज दिसत नाहीत. तिथे मला मानसिक त्रास होतोय, माझा मानसिक त्रास कमी कसा होईल हा आपला प्रश्न असायला हवा. मी मला मानसिक त्रास देणार्या व्यक्तीला तिची जागा कशी दाखवू, तिला धडा कसा शिकवू, तिची वाट कशी लावू असा अविवेकी विचार तर आपण करत नाही आहोत ना, हेही तपासून घेतले पाहिजे. आपला ‘मी इथे आहे, मी तिथे कसं जाऊ’ हा विचारी असला पाहिजे, विवेकी असला पाहिजे. ‘तिथे’ जायला जे विचार मदतकारक आहेत, ते सोबत घ्यायचे आणि आपल्या ‘तिथे’ जाण्यावर फोकस करून ‘तिथे’ जायचे.